परिचय :
- जन्म : ०३ डिसेंबर १७७६
- जन्म ठिकाण : किल्ले वाफगाव ता.खेड जि.पुणे
- पदव्या : राजराजेश्वर, महाराजाधिराज, चक्रवर्ती
- राज्यभिषेख : ०६ जानेवारी १७९९
- राज्यभिषेख ठिकाण : किल्ले महेश्वर जि.खरगोण(म.प्र)
- मृत्यू : २८ ऑक्टोबर १८११
- मृत्यू ठिकाण : किल्ले भानपुरा जि.मंदसौर(म.प्र)
- वडील : सुभेदार तुकोजीराव होळकर(पहिले)
प्रस्तवना :
इंग्रज इतिहासकार मालकम हा होळकरांचा कट्टर शत्रू होता. हिंदुस्थानात आपल्या कवायती फौजांचा टेंभा मिरविणाऱ्या इंग्रजांचा नक्षा फक्त यशवंतरांवानीच उतरविला होता. अखेरपर्यंत इंग्रजांची तैनाती फौज न स्वीकारणारा फक्त यशवंतराव होळकर’ हाच इंग्रजांचा शत्रू होता.
पहिले यशवंतराव होळकरांविषयी इतिहासकार गो. स. सरदेसाई यांच्या मते, ‘मराठेशाहीच्या अत्यंत विपन्नावस्थेच्या पडत्या काळात यशवंतराव होळकर हा एक फार मोठा हिराच अल्पकाळात चमकून गेला आणि या हिऱ्याने आपल्या तेजाने त्या काळातील निबीड अधार किंचित काळ दूर सारला. त्याचवेळी त्याच्या तोडीचा सेनानायक मराठ्यांकडे दुसरा कोणी नव्हता. अंतःकरणाचा उदार, गरीबांचा कनवाळू, हाता खालच्या मंडळीस जीवा पलीकडे जपणारा, स्वत:च्या सुखाविषयी अत्यंत निरिच्छ पण समरांगणी कर्दनकाळ असे यशवंतरावा सारखे पुरूष आपणास आपल्या इतिहासात क्वचितच दाखविता येतील. यशवंतरावाचे सर्व चरित्र इतके अद्भूत वहृदयंगम आहे की ते सर्व व्यवस्थित व साधार लिहिले जाईल.
जॉन माल्कमने यशवंतरावाची बदनामी करण्याची संधी सोडली नाही. परंतु असे असलेतरी सारा हिंदुस्थान इंग्रजांविरूद्ध उभा करणारा तो एक बाणेदार मराठा सरदार होता. यशवंतराव होळकर इंग्रजांविषयी लिहतो की, ‘ परकीयांनी तुमच्या आमच्या समोर एक एक दौलत घशांत टाकली, त्यांना कुठ तरी जबरदस्त तडाखा दिला नाही तर उद्या तुम्हाला सारा दक्षिण माळवा आणि हिंदुस्तान त्यांनी घेतलेला दिसेल. त्यास पायबंद घालावा हा आमचा उद्देश. ! परंतु यशवंतराव होळकरांसारख्या पराक्रमी मराठा सरदाराला पेशवे दौलतराव शिंदे, भोसले इत्यादींनी साथ न दिल्यामुळे शेवटी केवळ दौलतीच्या हिंदुस्थान विचारातच वेडा होऊन त्याचा मृत्यू झाला.
अन्य Post हि वाचा :
मल्हारराव होळकर ते यशवंतराव होळकरांपर्यंतचा इतिहास :
मराठ्यांनी १६९८ इ. सनाच्या जवळपास ज्या युगांतराचा श्रीगणेश केला होता त्याचा परिणाम म्हणून माळव्यात एक प्रकारची अराजकतेची स्थिती निर्माण झाली. परंतु १७६५ इ.स. येईपर्यंत त्या अवस्थेचा अन्त झाला युगांतराची प्रक्रिया पूर्ण झाली. होळकर राजवंशाचा संस्थापक मल्हारराव (प्रथम) होळकर हा त्या अराजकपूर्व परिस्थितीचा प्रमुख नायक होता.
इ.स. १७३३ मध्ये मल्हाररावा होळकरांनी बाजीराव (प्रथम) पेशव्यांना पत्र लिहले की, माझी सेवा ध्यानात घेऊन माझी पत्नी गौतमबाई हिस काही खाजगी जहागीर देण्यात यावी! यासाठी पेशव्यांचे भाऊ चिमणाजी बल्लाळ यांनी सुद्धा पेशव्यांकडे शिफारस केली. त्यानुसार छत्रपती शाहूमहाराजांच्या आज्ञेने पेशव्यांनी मल्हारराबांना एकपत्र लिहिले की, आता पुढे खाजगी आणि दौलतीचे विभाजन वेगवेगळे राहिल. हे पत्र पेशव्याकडून २० जानेवारी, १७३४ ला लिहिले गेले होते. या आदेश पत्रानुसार मल्हाररावाची पत्नी गौतमाबाई होळकर यांना खाजगी जहागिरी प्रदान करण्यात आली, जिची सुरुवातीची मिळकत २,९९,०१० रूपये होती. महाराज कुंवर डॉ. रघुवीरसिंह यांच्या नुसार या जहागीरीच्याच प्राप्तीनंतर इंदौर राज्याची खरी स्थापना झाली.
सुभेदार मल्हारराव(प्रथम) जास्त काळ जगू शकले नाही आणि २६ मे १७६६ ला आलमपूर जवळ त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या मृत्यूनंतर माळवाच्या राजनैतिक वातावरणात व सामाजिक संघटनांत एक फार मोठी क्रांती झाली. मल्हाररावाचा पुत्र खंडेराव भरतपुरच्या जटांशी झालेल्या संघर्षात आधीच मारले गेले होते. होळकरांचा वारसाधिकार त्यांचा अल्पवयीनपणतु (प्रपौत्र) मालेरावाला मिळाला परंतु १३ मार्च १७६७ ला त्याची सुद्धा जीवन ज्योत मालवली.
मल्हाररावाचे संपूर्ण प्रयत्न संपूर्ण व्यवस्था व प्रशासनाचा संपूर्ण पायाच ढासळण्याच्या उंबरठ्यावर आला होता. परंतु त्याची पुत्रवधु(सुन) अहिल्याबाई हिने दृढ विश्वासाने सर्व सूत्र हाती घेतली व काही काळासाठी होळकर राजवंशाची विघटन प्रक्रिया थांबली. अहिल्याबाईने जवळपास २८ वर्षे यशस्वी आणि सुदृढ राज्यव्यवस्था स्थापली. परंतु १३ ऑगस्ट, १७९५ ला त्यांची ही जीवनलीला संपली. तपस्वी, साध्वी, भागवत् , परायण, राजमाता अहिल्याबाईच्या निधनासोबतच होळकर राजघराण्यातील सर्व गांभीर्य, बुद्धिमत्ता, विचारशीलता व राज्याचा शांतीमय प्रभाव पूर्णपणे लुप्त होत गेला.
अहिल्यादेवींच्या मृत्यूनंतर होळकर राजबंशाचे निष्ठावान सेवक व वरिष्ठ अधिकारी सेनापती तुकोजीराव (प्रथम) यांना उत्तराधिकारी प्राप्त झाले. पुण्याच्या पेशवे सरकारने होळकर घराण्याचा वरिष्ठ, अनुभवी राजकारणी म्हणून तुकोजीच्या उत्तराधिकाराला मान्यता दिली. तुकोजीराव शेवटपर्यंत चिवट योद्ध्या प्रमाणे झुंजत राहिले व शेवटच्या श्वासापर्यंत राजवंशाप्रति निष्ठावान राहिले. तुकोजीरावाचा सर्वाधिक सैन्याभिमानात खर्च झाला होता. त्यामुळे युद्धाच्या चक्रधुमाळीत गुंतलेला हा योद्धा.
तुकोजीराव यांच्या मृत्यूनंतर होळकर राज्यातील अंतर्गत कलह :
होळकर प्रशासनास इ. १७९५ ते १७९७ इ. पर्यंत जी कीर्ती, जे यश, जो गौरव प्राप्त झाला होता तो तुकोजीरावांच्या मृत्यूनंतर संपला. तुकोजीरावांच्या निधना सोबतच होळकर राजवंशावर संकट कोसळले व त्याच्या इतिहासात अराजकता, गृहकलह षड्यंत्र याजला त्याने सर्व व्यवस्था कोलमडली व होळकर वंशाचा इतिहास एक दुख:द गाथा होवून राहिला. तुकोजीरावांच्या मृत्यूनंतर त्याचे पुत्र या गृहकलहांत एकमेकांच्या प्रतिस्पर्ध्याच्या रूपाने पुढे आले. ज्याने संपूर्ण १७९७ ते १८४४ पर्यंत राज्यात अराजकता, अस्थायित्व ब अंध:कार व्यापून टाकला.
तुकोजीरावांना चार बायका होत्या. रखमाबाई(प्रथम), रखमाबाई(दुसरी), कृष्णाबाई व राधाबाई. तुकोजीरावांच्या पुत्रात काशीराव आणि मल्हारराव ही वैध मूलं रखमाबाईकडून झाली होती आणि विठोजी व यशवंतराव ही राधाबाईकडून झालेली अवैध मुल होती. तुकोजीराव शेवटपर्यंत युद्ध क्षेत्र आणि सैन्य संघटना यातच गुंतून राहिले. त्यामुळे परिवाराच्या आणि उत्तराधिकाऱ्यांच्या चरिञाचे भरणाचे कार्य त्यांनी अहिल्यादेवी वर सोपविले होते. राजवंशाला भविष्यासाठी एखादा सुयोग्य सेनानायक किंवा योग्य प्रशासक घडविण्यासाठी अहिल्याबाई आपल्या व्यस्त प्रशासन कार्यातून वेळ काढू शकल्या नाहीत.
तुकोजीरावांचा जेष्ठ पुत्र काशीराव दुर्बुद्ध व अपंग होता व दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून होता. दुसरा पुत्र मल्हाराव अतिशय उदंड, भांडखोर व गर्विष्ठ होता. चांगल्या सल्ल्याचा द्वेष करी व हिंसा करताना मागचा पुढचा विचार करीत नवहता. तो मद्यपानाचा व्यसनी असून लुटमार करणे त्याला आवडत असे. तुकोजीरावांच्या अवैध पुत्रांपैकी विठोजी व यशवंतराव योग्य व शूर होते. परंतु त्यांची शक्ती नियंत्रित करून त्यांना चांगल्या लक्ष्या कडे प्रेरित करणारी योग्य व्यक्ती नव्हती. त्यामुळे परिवाराच्या उपयोगी पडण्याऐवजी ह्या शक्ती परिवाराला घातकच ठरल्या.
तुकोजीरावांनी आपल्या जीवनकाळातच, पुण्यात असतानांच जेष्ठ पुत्र काशीरावास आपला उत्तराधिकारी घोषित करून सत्यावर पेशव्यांची स्वीकृती मिळविली होती. जरी काशीराव या मोर्चात उत्तराधिकारी असला तरी त्याच्यात प्रशासनाची क्षमता नव्हती. त्यामुळे लवकरच मल्हाररावाने काशीरावाच्या या उत्तराधिकाराचा उघड विरोध केला व काशीरावा विरूद्ध सैन्याची जमवाजमव करू लागला. अतिसाहसी आणि अपराधी प्रवृत्तीचे लोक अशा स्वामीच्या झेंड्याखाली जमू लागले व त्यांनी १५०० सैन्य जमविले. तुकोजीरावास मल्हाररावाच्या या भ्रातुधातकी स्वभावाची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे एकदा आपल्या पुत्रांचा हा व्यवहार पाहून निराशेने ओरडून वृद्ध पिता म्हणाला, माझ्या ह्यातीतच तुमचे बंधुप्रेम जर द्वेष आणि शत्रुत्वात बदलत असेल तर मी गेल्यानंतर याचा अंत काय होईल हे देवच जाणो.
मल्हारराव फक्त होळकर परिवारासाठीच नव्हे तर लवकरच संपूर्ण मराठा राज्यालाच त्रासदायक झाला. स्वत: अहिल्याबाई सुद्धा आपल्या कार्यकाळात मल्हाररावाच्या कृत्यांमुळे अत्यंत चिंतीत होवून शेवटी त्यांनी आपले राजनिष्ठ सेवक पाराशर दादा यांना स्पष्ट पणे म्हटले होते. या शनितुल्य राक्षसास पकडून कारागारात टाकून द्या. त्यानंतर अहिल्याबाईच्या आज्ञेने मल्हाररावास कुशलगडाच्या किल्ल्यात कैद केले गेले होते. शेवटी तुकोजीरावाच्या वारंवारच्या विनंतीमुळे अहिल्याबाईंना मल्हाररावाला सोडण्याची आज्ञा द्यावी लागली.
अशाप्रकारे काशीराव विरूद्ध उत्तराधिकाराच्या या युद्धात इतर तिन्ही भावांनी सुद्धा तलवारी उचलल्या व संघर्ष अटळ झाला. मल्हारराव, विठोजी व यशवंतराव काशीरावा विरूद्ध एकत्र आले व त्यांनी एकमताने उघड पण केला की ते काशीरावास पदच्यूत करून त्याला कैद करतील. त्यांच्या या कार्यात त्यांना नाना फडणीसांचा गुप्त पाठिंबा मिळत होता. अन्य ठिकाणी होत असलेल्या गृहकलहाचे होळकर परिवारातील कलह सूचक होते. ग्वाल्हेरचा शिंदे(सिन्धीया) राजवंश व राजपुतानातील अनेक राजपूत राजवंशातही अशा प्रकारचे गृहकलह व्यापले होते.
दौलतराव शिंदे (सिंधीया) कडून काशीरावच्या पक्षाचे पोषण :
दौलतराव शिंदे (सिन्धीया) पूर्वी पासूनच होळकर दरबारात आपल्या प्रभूत्वाची स्थापना करू इच्छित होते. होळकर अंतर्गत युद्ध त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी होती. तसेच कमी बुद्धीचा काशीराव त्यांच्या प्रभुत्व स्थापनेच्या प्रयत्नात एक उत्तम साधनच सिद्ध होऊ शकत होता. त्यामुळे शिंद्यांनी अशा वेळेवर काशीरावच्या पक्षाचे पोषण केले. आत्मरक्षेसाठी काशीरावने आपल्या विरोधी लोकांच्या नाशा साठी प्रलाखांची मोठी रक्कम शिंद्यांना देण्याचे आश्वासन दिले. १४ सप्टेंबर, १७९७ ला शिंदे (शिंधीया) च्या सैन्याने मल्हाररावावर पूर्वनियोजीत योजनेनुसार आक्रमण केले. मल्हाररावाच्या विनाशासाठी शिंदे (सिन्धीया) ने मजपफर खानाच्या नेतृत्वात ५०० स्वार व दोन पलटनी या अभियानासाठी पाठविल्या.
मल्हाररावाने त्याचा साथीदार शमशेर खाना सहित अतिशय शौर्याने शिंदे (सिन्धीया) च्या सैन्याचा मुकाबला केला. या संघर्षात मल्हारावास चौदा घाव लागले होते व अशाच अवस्थेत एक भाला त्याच्या विक्षेत शरीरात घुसला त्यांचे प्राण निघाले. या संघर्षात विठोजी व यशवंतरावही मल्हारावासोबत होते. यशवंतराव या लढाईत जखमी होऊन पुण्याकडे पळाले. मल्हाररावाच्या मृत्यूनंतर युद्ध शिबिरातून शिदे (सिन्धीया) ने होळकर घराण्यातील महिलांना कैद केले. ज्यात मल्हाररावाची गर्भवती पत्नी जयाबाई (जीजीबाई) यशवंतराबाची पत्नी लाडाबाई व मुलगी भीमाबाई एक अन्य महिला यमुनाबाई ह्या प्रमुख होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने मल्हाररावाची गर्भवती पत्नी जयाबाईला पुण्यात होळकर प्रतिनिधी केशवपंत कुन्टेच्या घरी ठेवण्यात आले. तेथेच योग्य वेळी तिने खंडेरवास जन्म दिला.
यशवंतरावांची सुरुवातीची अवस्था व सॆन्याची जुळवाजुळव :
परिस्थिती जेव्हा सहन शक्ती पलीकडे जाते. तेव्हा आपल्या उपचारासाठी स्वत:च विचित्र उपाय शोधून काढते. ज्याचे सर्वश्रेष्ठ उदाहरण यशवंतराव होळकरांचा अभ्युदय होय. काशीराव तसेच दौलतराव शिंदे यांच्या भ्याड कृत्यामुळे यशवंतराव रागाने पेटून त्यांच्या अन्यायाचा सुड घेण्याचा निश्चय केला. सर्वप्रथम जेजूरी येथे आपले कुलदैवत मल्हारी मार्तण्ड येथे जावून त्यांनी आपल्या उद्देशाची मनोकामना केली. यशवंतराव सर्वथा निर्धन तसेच संकटांनी ग्रासले तर होतेच पण महत्त्वाकांक्षी होते. स्वप्नद्रष्टे होत्या.
जेजूरी येथील मंदिरातील आगलावे नावाच्या पुजाऱ्याने त्यांना एक घोडी व ४०० रूपयांची आर्थिक सहायता प्रदान करून जेजूरीहून रवाना केले. इ.स. १७९६ च्या अंतीम काळात शरण जाण्याच्या हेतुने ते नागपूरचे शासक राघोबा भोसले(द्वितीय) यांच्याकडे जाऊन पोहचले. परंतु तेथेही त्यांचे दुर्भाग्य आड आले.पेशवा तसेच शिंद्यानी त्यांना धमकी पर पत्र देवून यशवंतरावांना कैद करण्यात यावे असे पत्रात नमूद केले. अखेरीस विवश होवून राघोबा भोसलेंनी ३० जून, १८०० इ.स. दिवशी यशवंतरावांना कैद केले.
एकदिवस यशवंतरावानी सवड पाहून कैदेतून पळून जाण्यात यश संपादन केले. परंतु येथेही त्यांचे दुर्भाग्य आड आले पुन्हा त्यांना राघोबा भोसले यांच्या बंदीगृहात टाकण्यात आले. पुढचे सहा महिने ते दुर्भाग्याशी लढा देत तेथेच राहिले. शेवटीला ते राघोबा भोसले यांच्या बापू विठ्ठल प्रभू या अधिकाऱ्याच्या साह्याने पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर यशवंतराव तापी नर्मदा या नद्यांच्या मध्यवर्ती खोऱ्यामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याच्या हेतुने मार्गस्थ होत असताना त्यांना भवानीशंकर नावाचा निष्ठवान, विश्वासपात्र व तसेच स्वामी भक्त सहयोगी मिळाला. ज्याने नंतर यशवंतरावाच्या प्रत्येक संकटामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले. त्यानंतर त्यांनी भवानीशंकराच्या साह्याने दुसरे २०० अनुयायी एकत्र करून उत्तर खानदेश मधील सुल्तानपूर व नंदुरबार या प्रदेशावर लढाई करण्यास सुरूवात केली. खानदेशामधील फुंकार नायक यांनी ही यशवंतरावाच्या सैनिकांना सहयोग दिले.
दुर्दैव सारखं यशवंतरावाच्या मागावर होत. काशीराबाचे समर्थक शिंदेचे अधिकारी भिकाजी होळकर आणि आनंदराव होळकरांनी यशवंतरावास पुन: कैद करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. काही काळानंतर यशवंतराव बडवानी पोहोचले. बडवानीच्या प्रदेशावर त्यावेळी गोरधन नायकाचा प्रभाव होता. गोरधन नायक यशवंतरावास कैद करून काशीरावाच्या नजरेत भरण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे यशवंतरावास विशेष आग्रह करून आपल्या प्रदेशात घेऊन गेला. परंतु यशवंतरावास जेव्हा या कारस्थानचा पत्ता लागला तेव्हा त्यांनी तेथून पळ काढला. एके दिवशी राजधानी किल्ले महेश्वरची स्थिती जागण्यासाठी छदमवेश धारण करून ते महेश्वरला पोहंचले. अडचणी त्यांना पारखत होत्या व ते अडचणीशी झुंजत होते. राज्यपदाचे स्वप्न पाहणाऱ्या यशवंतरावास महेश्वरमध्ये एक दिवस काढण्यासाठी हरभरे खाऊन आपली भूक भागवावी लागली.
निरंतर कष्ट झेलत यशवंतराव महेश्वर कडून धरमपूरी करत धारला पोहंचले. यशवंतराव जेव्हा धारला पोहंचले तेव्हा त्याची अवस्था इतकी हालाकीची होती, की त्यांच्याकडे घालायला चांगले वस्त्र सुद्धा नव्हते. धारचे शासक आनंदराव पवार यांनी यशवंतराव त्याच्या साथीदारासाठी वस्त्र व एक पालखी पाठविली. आनंदरावा यांनी यशवंतरावास काही काळासाठी आश्रय दिला व आर्थिक मदतही केली. दुर्दैव यशवंतरावाच्या सारखं मागावरच होत. धार मध्येही यशवंतराव जास्त काळ शरणार्थी राहू शकले नाही.
धार मध्ये त्याच्या आश्रयाची बातमी सर्जेराव घाटगेद्वारे शिदे (सिन्धीया) पर्यंत पोहोचली. शिंदे (सिन्धीया) नी पवार शासकास धमकी वजा पत्रकात लिहिले की, यशवंतरावाची आपल्या राज्यातून जर हकालपट्टी केली नाही तर त्याचे दुष्परिणाम भोगण्यास तयार राहावे. तिकडे पवारचा दिवान रंगराव ओढेकर जो शिंदे (सिंधीया) यांचा समर्थक होता. तो ही शिंदेच्या पक्षात सक्रीय झाला. यशवंतरावाच्या धार येथून निष्कासनात त्याने सुद्धा महत्त्वाची भूमिका वठविली. नाईलाजाने यशवंतरावाना धार सोडावे लागले.
धार सोडल्यानंतर यशवंतरावांनी बरेच सैन्य जमविले, ज्यांत मुख्यत: भील्ल, मराठे, अफगाण आणि पिण्डारी होते. त्यावेळी पर्यंत यशवंतरावांची सैन्य शक्ती संघटित होत होती. त्यामुळे प्रतिशोधाच्या भावनेने उत्तेजित होवून त्यांनी माळव्यात शिंदेच्या प्रदेशांना स्वतंत्रपणे लुटण्यास आरंभिले. यशवंतरावाचा आपल्या महत्त्वकाक्षे पेक्षा स्वर्गीय बंधू मल्हाररावाचा मुलगा खंडेरावावर जास्त स्नेह होता. त्यामुळे त्यांनी पेशवेंना आग्रह केला की खंडेरावाला होळकर राजवंशाचा मुख्य घोषित करून यशवंतरावास त्याचा सरंक्षक आणि राज्याचा कार्यकर्ता अध्यक्ष मानलं जावं या आग्रहा सहीत यशवंतरावाने आपला भाऊ काशीरावाविरूद्ध युद्धाची घोषणा केली व सोबतच त्यांनी हे ही स्पष्ट केले की ते होळकर राजवंशाचा न्यायी उत्तराधिकारी खंडेरावाच्या अधिकारासाठी संघर्ष करीत आहे.
होळकर घराण्याच्या जुन्या आणि एकनिष्ठ सेवकांना जेव्हा कळाले की तुकोजीरावाचा एक वीर क्रियाशील पुत्र काशीराव विरूद्ध उघडपणे उभा झाला आहे तर ते होळकरवंशाचे स्वामीभक्त, प्रामाणिक व महत्त्वाकांक्षी लोक यशवंतरावांच्या झेंड्याखाली एकत्रित होवू लागले. त्यांच्यात श्यामराव महाडीक पिंपळे, बाळाजी कमलाकर, फत्तेहसिंग माने, हरनाथसिंग, रामासिंह आणि दादाजी पाराशर मुख्य होते. या व्यतिरिक्त सारंगपुरचा वजीर हुसैन, मिरघासी व मर्दान अली, रामपूरचा नजीबखान, भोपालचा कालेखान व सरूधीन खान आणि मेवाडचा जफर अली खान व हकीमखान हे आपापल्या साथीदारांसह यशवंतरावांच्या सैन्यात सामील झाले. शुजालपुरला असताना नरसिंहगढ राज्याच्या अधिकाऱ्यांनी यशवंतरावांच्या सहाय्यासाठी ४०० घोडेस्वार, दोन हजार पायदळ, राजकीय वस्त्र आणि दोन हजार रूपयांचा नजराणा भेट केला.
ज्या वेतनार्थी अफगाण शिपायांना अन्य ठिकाणाहून काढून टाकले गेले त्यांचे समूह सुद्धा यशवंतरावांच्या झेंड्याखाली एकत्रित होऊ लागले. अशा अफगाण पिंडारी नेत्यामध्ये करीमउद्दीन आणि त्याचा वडील भाऊ अमीरखान मुख्य होते. शुजालपूरच्या सैन्य शिबीरात करीमुधीनने यशवंतरावास आपले १०० घोडेस्वार भेट केले आणि आपला भाऊ अमीरखान आपल्या सेवेत उपस्थित होऊ इच्छितो या बाबतीत निवेदन केले. यशवंतरावाची मान्यता मिळताच पिंडारी गेला, अमीरखान याने त्याची भेट घेतली. अमीरखानने यावेळी यशवंतरावास या भेटीत राजकीय वस्त्र आणि एक हजार रूपये नजराणा दिला. त्यानंतर अमीरखान होळकरांच्या सेवेत घेतल्या गेला. जरी पुढे चालून अमीरखान यशवंतरावाचा घनिष्ठ सहयोगी बनला होता तरी तो मात्र धुर्त आणि विश्वासघातकी होता.
अमीरखान संभल (मुरादाबाद) चा राहणारा होता. त्याचे वडील एक मुल्ला होते व छोट्याशा जमिनदारीचे मालक होते. अमीरखान जवळपास २० वर्षाच्या अल्पवयात आपला लहान भाऊ करीमउद्दीन सोबत माळव्यात उपजीविकेसाठी आला होता. प्रथम तो आपल्या दहा साथीदारांसोबत रानौद (राजौद) च्या जमीनदाराच्या इथे नियुक्त झाला. त्यानंतर पेशव्यांचा माळव्यातील कोण्या एक जिल्ह्यातील तहसीलदार नत्थेखानच्या इथे नियुक्त झाला. त्यावेळी त्याला आणि त्याच्या साथीदारांना तीन तीन, चार-चार, आणि दहा-पंधरा रूपये वेतन मिळत होते. काही काळाने अमीरखानाचा भागोदय होऊन तो आपल्या सहा स्वार व साठ पायी समर्थकांसह भोपाळचा नवाबह्यात मुहम्मद खान याच्या इथे नियुक्त झाला. काही काळाने अमीरखान यशवंतरावांच्या सेवेत आला तिथेच त्याचा भाग्योदय झाला.
कसरावद युद्ध – काशीरावचा पराजय :
यशवंतरावांच्या सैन्यात त्यावेळे पर्यंत प्रमुख पणे दिल्ली आणि रोहिलखंडचे पठाण, खानदेश, हैदराबाद आणि अर्काटचे मुस्लिम, भील्ल, मराठा व पिंडारी होते. या सर्वांच्या सामील होण्याने त्याच्या सैन्यात आता दोन हजार घोडेस्वार आणि पाच हजार पायदळ सैनिक होते. एवढ्या प्रमाणात सैन्य एकत्र केल्यानंतर सैन्याच्या आणि राजकीय खर्चा पोटी यशवंतरावांने वेगवेगळ्या प्रांताकडून खंडणी वसूल करण्यास प्रारंभ केला. त्याने शुजालपूर कडून १० हजार, बड्योदाकडून ४ हजार, आष्टाकडून १५ हजार आणि नेमावरकडून ७ हजार रूपये वसूल केले तसेच शिंदेचे समृद्ध शहर हंडिया लुटले.
यशवंतराव जेव्हा आर्थिक आणि सैन्यदृष्टीने समृद्ध झाले तेव्हा ते आपल्या मूळ राज्याच्या प्राप्ती मागे लागले. सन १७९८ मध्ये सैन्य घेऊन यशवंतरावांनी फ्रेंच सेनापती दुन्धेने(डुडरेस) ला, जो काशीरावच्या पक्षाचा होता, त्याला पराजीत केले. या विजयानंतर त्यानी महेश्वरमध्ये काशिरावच्या इतर समर्थकांना पत्र लिहून ताकीद दिली की ते आपले हित इच्छित असतील तर त्यांनी काशीरावांच्या पक्षाचा त्याग करून त्यांच्या समोर आत्मसमर्पण करावे. त्यानंतर महेश्वरच्या सर्व अधिकाऱ्यांनी यशवंतरावांच्या स्वामीत्वाचा स्वीकार केला. काशीरावांवर पूर्ण विजय मिळविल्यावर यशवंतरावांनी महेशवरच्या किल्ल्यात प्रवेश केला.
यशवंतराव होळकरांचा राज्यभिषेक :
जिथे सुभेदार मल्हारराव(प्रथम) ची उपपत्नी हरकुबाईने त्यांचे अभिनंदन केले. जानेवारी, १७९९ च्या आरंभी ते आपल्यामूळ राज्य सिंहासनावर आरूढ झाले. आणि महेश्वरात त्यांचा राज्याभिषेक संपन्न झाला. युगांतराची प्रक्रिया खरे तर त्याच दिवशी पूर्ण झाली ज्या दिवशी राज्यभिषेकानंतर यशवंतरावांनी सुभेदार या पदवी बरोबर महाराजा ही पदवी सुद्धा धारण केली. ह्यानंतरच माळव्यात होळकरांच्या स्वतंत्र सत्तेला आरंभ झाला. राज्याभिषेकानंतर यशवंतरावांनी राज्याची संपूर्ण जिम्मेदारी (बागडोर) स्वत:कडे घेतली आणि अहिल्यादेवीच्या कोषावर सुद्धा त्यांचा अधिकार झाला. ह्या घटने सोबत होळकर राज्यात चाललेल्या गृहयुद्धाचा सोक्षमोक्ष झाला. अहिल्यादेवीच्या मृत्यूनंतर पवित्रता आणि सन्मानाचे प्रतीक होळकर वंशाच्या गादीसाठी रक्तपाताची आणि लुटमारीची जी प्रक्रिया सुरू झाली होती, ती यशवंतरावांच्या राज्याभिषेकासोबतच संपली आणि तुकोजीरावांच्य(प्रथम) अवैध परंतु वीर पुत्राने, यशवंतरावांनी आपल्या बाहुबलाच्या जोरावर त्यावर अधिकार मिळविला.
सिंहासनारूढ होताच यशवंतरावांनी सर्वप्रथम राज्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या समोर हजर करविले आणि कर्मचाऱ्यांकडून ३ लाख रूपये नजराण्याच्या रूपात वसूल करून त्यांची सेवा बहाल केली. राज्याभिषेकाच्या या शूभ वेळी यशवंतरावांनी प्रशासनिक क्षेत्रात नविन नेमणूका केल्या आणि स्वामी भक्त सेवक राज्य कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान केला. त्यांनी आपल्या विश्वासाच्या सहाय्यकाला लाला भवानी शंकरचा कण्ठहार, पालखी आणि बक्षीस देवून सन्मान केला. कृष्णाजी मुकुंदला सुद्धा बक्षी पदानुरूप कारभार सोपला गेला. पिण्डारी नेता अमीरखान ला मोत्यांचा कंठहार, एक हत्ती आणि राजकीय वस्त्र भेट केले होते. अमीरखानचा भाऊ करीमउदिदनलाही खिल्लत प्रदान केली गेली. सादतखान व मेहरबानसिंह यांनाही सन्मानित केले गेले व त्यांना एका गावाची जहांगीर प्रदान करण्यात आली. फिरजाखानाने यशवंतरावांसाठी सैन्य सामुग्री तयार केली होती. त्यामुळे त्याला राजकीय सेवेत घेतले गेले. यशवंतरावाच्या या उदारतेमुळे त्यांचे जुने सेवक संतुष्ट झाले आणि नवीन लोक त्यांच्या सेवेत येण्यास तत्पर झाले, ज्यांत धारचा शासक आनंदराव पवारचा साडूभाऊ आणि अब्दुल हरमान व इतर काही लोक मुख्य होते. महेश्वर मध्ये राहतांना यशवंतरावांच्या सैन्यात ८०० स्वार आणि १५००० पायदळ झाले.
महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक बद्दल अधिक वाचा. Read Now
यशवंतराव होळकर – शिंदे यांच्या संघर्षला सुरुवात :
पेशवा बाजीराव (प्रथम) च्या वेळी पासूनच शिंदे आणि होळकर मराठा राज्याचे दोन प्रमुख आधारस्तंभ होते. परंतु प्रकृतीच्या नियमानुसार या दोन्ही आधारस्तंभाच्या पुढच्या पीढ्यांत समान योग्यता व समतेने कार्य करणे कोणाच्या ही आवाक्यात नव्हते. शिंदे संस्थापक राणोजीचे उत्तराधिकारी एक दोन अपवाद सोडले तर सर्व योग्य होते. परंतु सुभेदार मल्हारराव (प्रथम) चे उत्तराधिकारी असे नव्हते.
अहिल्याबाईच्या वेळेपासूनच अहिल्याबाई आणि महादजी शिंदेचे संबंध मैत्रीचे राहिले नव्हते. तरी अहिल्याबाईनी आवश्यकतेच्या वेळी महादजीस मदत देवून आपली मैत्री प्रकट केली होती. तरी महादजीला होळकर परिवाराच्या कोणत्याही सदस्याप्रती कोणतीच श्रद्धा राहिली नव्हती. ज्यावेळी अहिल्याबाईच्या जावयाचा मृत्यू झाला तेव्हा कमीत कमी शिष्टाचार म्हणून तरी महादजीनी शोक व्यक्त करण्यासाठी अहिल्याबाईची भेट घेणे आवश्यक होते. परंतु जेव्हा जानेवारी, १७९२ मध्ये महादजींनी उज्जैनहून पुण्यासाठी प्रस्थान केले तेव्हा शिष्टाचाराच्या नात्याने सुद्धा त्यांनी अहिल्याबाईंना भेटण्याची काळजी घेतली नाही. यामुळे दोनही परिवारांतील संबंधांत अधिक कटूता आली. तुकोजीराव (प्रथम) च्या शासन काळातही दोन्ही राजवंशाच्या दरम्यान इर्षे वाढला. इर्षेमुळे व शत्रुत्वामुळे कामनाची अग्नि प्रज्यलीत होत राहिली, जिच्यात शिदे आणि होळकर जळत राहिले. शिदे, सेनापती भोपाल भाऊची आणि तुकोजीरावांचा(प्रथम) मुलगा मल्हाररावाद्वारे शिदे सेनापतीवर प्रत्याक्रमणाच्या नीतीने, शिंदे व होळकरांच्या मध्ये वौमनस्याची दरी अधिकच वाढत गेली.
शिंदे आणि होळकर घराण्यात युद्धाचे सावट तर उत्तर-पूर्वी क्षितीजावर होते, परंतु जेव्हा सप्टे. १७९२ मध्ये शिंदे सेनानायकांनी दोआब व मथूरा जिल्ह्यांच्या पश्चिमेत होळकरांच्या जहागिरी बळकावयास सुरूवात केली तेव्हा कलहाचे हे ढग जयपूर पासून उत्तरेकडे २२ मैलावरच फाटले आणि राजस्थान या दोघांसाठी शक्ती परीक्षणाचे केंद्र बनले. दोन्ही राजवंशाच्या वृद्ध मंत्र्यांनी शिदेचे जीवा दादा आणि होळकरांचे पराशर दादा यांनी आपल्या स्वामीना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु तो व्यर्थ ठरला. शेवटी मध्यउत्तर भारतावर अधिपत्य गाजविण्यासाठी शिदे आणि होळकरांच्यामध्ये जी प्रतिद्दंद्रिता होती तिचा निर्णय जून, १७९३ मधील लखेरीच्या युद्धाने झाला. या युद्धात होळकरांचा पराभव झाला व उत्तर भारतात शिंदेचे अधिपत्य झाले. अशाप्रकारे पानिपतच्या पूर्वकाळात शिंदे आणि होळकरांच्या मध्ये जो संघर्ष सुरू झाला होता तो लखेरीच्या युद्धानंतर पूर्ण पराकाष्ठेला पोहोचला.
दोन्ही परिवारांच्या भावी पिढ्यांना हे वैमनस्य पंरपराेतून प्राप्त झाले व त्याने अजून कडव्या प्रतिद्रद्वितेचे रूप ग्रहण केले होते. यशवंतरा (प्रथम) यांनी आपल्या शासनकाळात याच परंपरागत विमनस्कतेच्या भावनेतून कुपित होवून माळव्यात शिंदेच्या प्रदेशांना नेछूट पणे लुटले.
जुलै १८०१ मध्ये यशवंतरावांनी आपल्या आक्रमक हालचालींचा वेग वाढविला. प्रतिशोधासाठी त्यांनी शिदेच्या अधिकार क्षेत्रातील उज्जैन नगराला आपल्या आक्रमणाचे लक्ष बनविले. तिकडे शिंदेचे सैन्य सुद्धा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात उजैनला पोहोचले. दोन्ही सैन्यांत युद्ध होवून होळकर त्यात पराभूत झाले परंतु सप्टेंबर महिन्यात यशवंतराव आणि अमीरखान यांच्या संयुक्त आक्रमणासमोर शिंदेच्या सैन्याने शस्त्र खाली ठेवले. या विजयामुळे यशवंतरावच्या सैन्य यशात खूप वाढ झाली. पावसाळा सुरू झाल्याकारणाने पुढील दीड महिन्यापर्यंत शिंदे आपल्या पराभवाचा बदला घेवू शकले नाही.
वर्ष संपताच आक्टोबर १८०१ मध्ये शिंदे सैन्याने शहाजीराव घाटगेंच्या नेतृत्वात १२ सैन्य दस्ते आणि २०,००० घोडदळाच्या विशाल सेने सहित इन्दौर वर आक्रमण केले. तिकडे यशवंतराव सुद्धा शिंदे सैन्यात सामना करण्यास पूर्ण तयार होते. यशवंतरा वांनी १० सैन्य रस्ते, ५ हजार रोहिला सैनिक, १२ हजार मराठा घोडेस्वार, १५ हजार पठाण घोडेस्वार आणि ९० तोफांनी आपली सुरक्षाव्यवस्था मजबूत केली. दोन्ही सैन्य इन्दौर नगराच्या दक्षिणेतील बीजलपूर नावाच्या जवळ गडबडीत येऊन थांबले. (तेव्हा पासूनच या गावाचे नाव गडबड पडले.) ८-९ दिवस दोन्हींकडून लहानसहान मुठभेडी आणि थांबून थांबून गोळीबार होत राहिला. शेवटी २९ आक्टोंबर, १८०१ च्या रात्री तिसऱ्या प्रहरी शिंदेने सैन्याला चारही बाजूंनी घेराव घालून आक्रमणाची योजना बनवली.
अमीरखान आणि भवानी शंकर बक्षींच्या नेतृत्वात १०-१२ हजार सैनिकांना शिंदे सैन्याला घेराव घालण्यासाठी त्याच रात्री पाठवण्यात आले आणि सोबतच हा ही निर्देश दिला की रात्री तिसऱ्या प्रहरी होळकरांच्या मुख्य शिबिरातून एक तोफ उडविली जाईल, जी सामुहिक आक्रमणासाठीचा संकेत असेल. अमीरखान आणि बक्षी आपल्या सैनिकांसह आपल्या मोर्चाकडे रवाना झाले. या दरम्यान यशवंतरावांच्या आणि शिंदेच्या पिंडारी सैन्यामध्ये एका मुठभेडीत पिंडारी सैन्याचा पराभव होवून ते पळून गेले. त्यांच्या पळून जाण्याने फार मोठी युद्धसामुग्री होळकरांच्या हाती लागली. यशवंतरावाने युद्ध सिमीत ठेवण्याच्या उद्देशाने त्यांचा पाठलाग केला नाही आणि पूर्व निर्धारित योजनेचा प्रतिक्षेप थांबले. या अवधीत शिंदे सैन्याने संगठित होऊन यशवंतरावांवर आक्रमण केले. अमीरखान आणि बक्षी आपल्या निर्धारित स्थानावर पोहोचण्यापूर्वीच यशवंतरावाच्या सैन्याला अवांच्छित युद्धात उतरावे लागले.
३० ऑक्टोंबरच्या पहाटेच दोन्हीकडून भीषण गोळीबारास प्रारंभ झाला. दुपार नंतर शिंदे सैन्यात निराशेचे चिन्ह दिसू लागले होते. परंतु सायंकाळी संघटित होवून शिंदे सैन्याने पूर्ण शक्तीनिशी होळकरांवर आक्रमण केले. याच अबाधित अमीरखानचा प्रिय घोडा बरछी बहादूर घायाळ होवून धारातीर्थी पडला. तेव्हाच होळकर सैन्यात हा भ्रम व्याप्त झाला की अमीरखान मारला गेला. (मालकमनुसार अमीरखान आपल्या रक्षणासाठी झाडामागे लपला होता.) या भ्रमपूर्ण वातावरणामुळे आणिअफवे मुळे संध्याकाळ पर्यंत होळकर सैन्यात धावपळ माजली. यशवंतरावांच्या तोफांमध्ये बिघाड झाल्याने आणि अनुभवी युरोपीयन अधिकारी ब्रिगेडमध्ये नसल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विजयाचे कोणतेच चिन्ह दिसत नसल्याने यशवंतरावाने आपल्या सहकाऱ्यासह विन्ध्य पहाडात स्थित जामघाटमध्ये शरण घेतली. यशवंतरावच्या पलायनाने इन्दौर शहर शिंदेच्या स्वाधीन झाले.
यशवंतरावांनी मैदान सोडताच शहाजीरावाने नादीरशाही क्रुरेतेने इन्दौर नगर लुटले, भावनांना नष्ट केले आणि राजवाडा पेटवून दिला. इन्दौरचे लोक शहाजीरावाच्या क्रौर्यापासून बचाव व्हावा यासाठी १५ लाख रूपये देण्यासाठी तयार होते. परंतु एवढ्या मोठ्या रकमेने सुद्धा शहाजीराबाचे हृदय परिवर्तन झाले होते. इन्दौरमध्ये त्याचा नृशंस अत्याचार तसाच चालू राहिला. तेव्हा शहाजीरावच्या अत्याचारांनी त्रस्त होवून स्त्रियांनी आपली अब्रू वाचविण्यासाठी विहिरीत उड्या टाकून आत्महत्या केल्या ज्याच्या शवांनी विहिरी भरून गेल्या होत्या. या लुटमारीत जवळपास ४ ते ५ हजार लोकांना आपल्याप्राणांची आहूती द्यावी लागली. शेवटी होळकरांचे सेनानी तात्या जोग व त्यांच्या सेनिकांनी अखंड प्रतिकार करून शिंद्यांचा हा हल्ला काही काळानंतर परतावून लावला व इंदोर आणि राजवाडा पूर्णपणे नष्ट होण्यापासून वाचविले.
विठोजी होळकरांची हत्या :
जेव्हा यशवंतराव नर्मदेच्या क्षेत्रात अशाप्रकारे व्यस्त होते तेव्हा त्यांचा मोठा भाऊ विठोजी पेशव्यांच्या विरोधात त्यांच्या अधिकारातील क्षेत्रात आपला प्रतिशोध पूर्ण करण्यासाठी अनियंत्रितपणे लूट करू लगला. ज्यांनी पेशवे व दौलतराव शिंदेमुळे अपार कष्ट भोगले ते सर्व विद्रोही त्याच्या सोबत आले. पेशव्यांच्या राज्यात अग्निकांडाच्या आणि लुटमारीच्या वार्ता पसरू लागल्या. राजधानी बाहेर बाजीराव पेशव्याचे शासन जवळपास संपल्यातच जमा होते.
विठोजी होळकर मंगळवेढा, करकुंभ, पंढरपूर या प्रांतात लूट करू लागला. काशीराव होळकरांचे सरदार मोत्याजी काळू गावडा व विवाजी यशवंत हे सुद्धा खानदेशात व गोदावरीच्या तीराने वाटेल तशी लुट व जाळपोळ करू लागले. पेशव्याने बाळकृष्ण गंगाधर बबन पागे यास त्याजवर पाठविले. परंतु तोच उलटा विठोजीस सामील होवून त्याच्या बरोबर मुलखात अत्याचार करू लागला. त्याशिवाय येसाजी रामकृष्ण, बाजीबा व कृष्णराव मोदी हे शिंद्यांचे सरदारही विठोजीस मिळून खूप दिवस पगार वगैरे न मिळाल्यामुळे अशा अत्याचारांनीच निर्वाह करू लागले. त्या वेळच्या या दंगलीचे अनेक कागद ठिकठिकाणी छापलेले आहेत ते समजण्यास वरील नावे उपयोगी पडतील. हे सरदार अमृतरावाचे नाव पुढे करून मुलखात पुंडाई चालवीत मग त्यास खरोखरच अमृतरावाचे प्रोत्साहन किती होते किंवा तेच आपण होवून ही बनावट सबब पुढे करीत होते हे समजणे कठीण आहे.
बाजीराव नालायक आहे. त्याचा पाडाव करून आपण पेशवाई सांभाळणार, अशा आशयाच्या सनदा अमृतरावाने आपणास दिल्या आहेत, असा प्रकाश विठोजी होळकर व वरील सरदार यांनी सर्वत्र चालूकेला. रयतेचे बोभाटे बाजीराव व काशीराव होळकर यांच्याकडे गेले, तेव्हा त्यास त्यांनी मनाई हुकूम पाठविले. पण या कागदी हुकमास विचारतो कोण? बंडवाल्यांनी देवाचे दागिने सुद्धा लुटून घेतले आणि रयतेस इतका उपद्रव दिला की त्याची वर्णने वाचून अंगावर काटे उभे राहतात. विठोजी होळकर तट किल्ले कोट किंवा ठाणी घेई, त्यांजवर तो अमृतरावाचे निशाण लावी. इ.स. १७९९ मध्ये ही दंगल सुरू झाली. ती पुढील साली विशेषच वाढली. नोव्हेंबर १८०० चे वर्तमान होळकर व यशवंतराव रामकृष्ण मिळून वीस हजार फौज करकुंभच्या शिवेस आली. तेव्हा तेथील मालक पटवर्धन यांनी तेवीस हजार रूपये खंडणी करार केला. फौज अमृतराव यांची आहे म्हणताच पुढे बाळकृष्ण गंगाधराकडील सामान सोलापूरावर चालून आले. पानशांच्या फौजेचा पाडाव करून पेढ लुटलो, वेशी मोडल्या आता परिणाम काय? बाजीरावाचे सरदार बाळाजीपंत पटवर्धन पाडाव गेले. पानशाने मोठी नादानी केली. तोफा सोडून पळाले.
जिवाजी यशवंताने गंगधडीस मोठा प्रलय उडविला. मोत्याजी काळू गावडे पैठणाकडे जावून मुलखास उपद्रव देऊ लागले. त्याचे बोभाटे ब्राह्मणांकडून, विशेषत: कामगांवकर दीक्षिता कडून बाजीराव, शिंदे, होळकर वगैरेकडे सारखे चालू झाले. त्यावरून यांनी त्यास मनाई हुकूम पाठविले. त्यांच्याबरोबर जिवाजी यशवंत बावनपागे, फत्तेसिंग माने, शहामीरखाँ वगैरे यशवंतरावांच्या सरदारांनी व त्यांच्या पुढाऱ्यांनी तापी पासून कृष्णेपर्यंतच्या प्रदेशात कहर उसळून दिला. बाजीरावाचे जिणेच सर्व शून्यवत बनले. अशीही दंगल अमृतरावाचे नावावर चाललेली पाहून बाजीरावास आपल्या भावाचा अत्यंत संताप आला. त्यास वाटले, आपली पेशवाई आता जाते. विठोजीवरही तो तसाच चिडून गेला. त्र्यंबक महिपत उर्फ नाना पुरंदरे, बापू गोखले, गणपतराव पानसे वगैरे सरदारास बाजीरावाने बंदोबस्तास पाठविले व जिवाजी यशवंताचे पारिपत्य केल्या खेरीज तोंड दाखवूनये अशी आज्ञा केली. विठोजी होळकर व बाळकृष्ण गंगाधर यांनी महालो महाली खंडण्या घेवून मनस्वी उपद्रव केला आहे, त्यास सरकारांतून पुरंदरे यास सरंजाम देवून रवाना केले आहे. यास सामील होवून पारिपत्य करणे. अशी पत्रे बाजीरावाने तमाम सरदारांस पाठविली.
बाळोजी कुंजर बाजीरावाचा मुख्य कारभारी पुरंदऱयाच्या घरी लहानाचा मोठा झाला. असल्यामुळे नाना पुरंदऱ्यावर त्याचा लोभ होता. इ.स. १८०१ च्या मोर्चात पुरंदऱ्याने बाळकृष्ण गंगाधर व जिवाजी यशवंत यांचे पारिपत्य केले. विठोजी होळकर निराळा फुटून मुलखात दंगा करतो. खूप लोक व गावचे गाव उजाड पाडले. त्यास बापू गोखले यांनी कैद करून पुण्यास पाठविला. त्यास हत्तीच्या पायाशी बांधून ठार मारला. सरकार वाड्यात पोहोचताच बेडी तोडून मार मार मारला. दोनशे कमचा मारून लागलीच हत्तीच्या पायास बांधून ओढविला. दुसरे दिवशी आज त्यांचे कारभारी वाड्यात येवून बोलले, दहावीस लाख दंड घ्यावयाचा होता. मूठमाती द्यावयास परवानगी द्यावी. त्यावरून तसे करण्यास आज्ञा दिली. बायको सहगमन करणार होती, तिला आज्ञा झाली नाही. तीन पुत्र कैदेत आहेत. जिवाजी, यशवंत भेटीस येवून गेले. तो बाळकृष्ण गंगाधर यांच्यावर सरकारच्या फौजेने छापा घातला.
ते पुण्यात येवून बळवंतराव नागनाथाचे बहादरीने भेटले. कैदेत आहेत. विठोजीचा हा प्रकार छ. २ जिल्हेजी म्हणजे ता. १६ एप्रिल, १८०१ रोजी घडला. बाजीरावाने हा प्रकार अत्यंत अविचाराचा केला आणि त्यामुळेच त्याचा व राज्याचा अखेर नाश झाला. विठोजीने कितीही बंडखोरी केली असली तरी अशी बंडखोरी त्या बेळी शेकडो सरदार करीत होते. खुद्द शिंदे व सर्जेराव घाटगे यांचा तर तो रोजचा क्रमच होता. अशा शिक्षेने यशवंतरावास व अमृतरावास दहशत बसविण्याचा बाजीरावाचा उद्देश असावा. शनिवार वाड्याच्या पुढील चौकात हा प्रकार घडला. शिक्षेचा अम्मल होत असता वरच्या दिवाण खान्यात बाजीराव, बाळोजी कुंजर वगैरे मंडळी मजा पाहत बसली होती. विठोजीचा मुडदा तसाच चोवीस तास केवळ दृष्टी सुखासाठी खाली चौकात ठेवला. अत्यंत नीच दर्जाचा खुनशी सूड असे याचे वर्णन कै. खऱ्यांनी केले आहे ते योग्य आहे. यातून विठोजी हा कसा झाला तरी मराठेशाहीच्या दोन मुख्य आधारस्तंभातला एक सरदार. त्यास अशा रीतीने वागवून बाजीरावाने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. शिंदे आप्त आणि होळकर शत्रू असा भेद दर्शविल्यास बाजीरावास वस्तुतः काही एक प्रयोजन नव्हते.
त्या वेळी सुद्धा पुण्यातील पुष्कळांची अशीच भावना होती. विठोजीस क्रूर शिक्षा करण्याचा विचार नरसिंह खंडेराव विंचूरकर याला कळताच तो धावत बाजीरावाकडे गेला आणि विठोजीला मारू नये अशी परोपरीने त्याने बाजीरावाची विनवणी केली. परंतु व्यसनांध मनुष्याप्रमाणे बाजीरावाने विंचूरकराचे म्हणणे झिडकारले. बाजीरावालाही भीषण सल्ला बाळोजी कुंजराने दिला. बाळोजी कुंजर मुख्य कारभारी असून त्या जागेवर खरा हक्क अमृतरावाचा होता. या भयंकर प्रकाराने यशवंतरावासारख्या मानी व उद्दाम पुरूषाचे पित्त भडकून त्याने त्याचा पुरेपूर वचपा भरून काढला. विठोजी आपल्या कनिष्ठ भावा सारखाच शूर व कर्तृत्ववान आणि कदाचित जास्त समंजस होता. तुकोजी होळकरांचे तिघेही मुलगे पराक्रमी असता त्यांचा उपयोग बाजीरावाने रष्ट्रकार्याकडे केला नाही, हे पाहून मोठा उद्वेग वाटतो.
ही बातमी जेव्हा यशवंतराव होळकरास मिळाली तेव्हा त्यांना खूप राग आला. आपल्या मोठ्या भावाचा विठोजीचा ते अतिशय स्नेह व आदर करीत असत. त्यामुळे अशाप्रकारे अमानविय पद्धतीने केल्या गेलेल्या त्याच्या हत्तेची वार्ता ऐकूण त्याचे ह्रदय पेशव्याच्या प्रति प्रतिशोधाने भरून गेले. आता केवळ शिंदेच नव्हे तर मराठ्यांची अधिपती पेशवासुद्धा त्यांचा शत्रू झाला.
यशवंतराव लढाईसाठी पुण्याकडे रवाना :
विठोजी होळकरांची हत्या होण्याआधी काही दिवसांपूर्वी माळव्यातून यशवंतरावांनी शिंद्यांविरोधात पुकारलेल्या लढाईतून माघार घेतली होती व काही मागण्या पेशव्यांकडे ठेवल्या होत्या. ते खालील प्रमाणे,
- दौलतराव शिंदेने खंडेरावास बंदी बनवून ठेवले होते. त्याला मुक्त केले जावे जेणे करून त्याला होळकर राज्याचा औपचारिक स्वामी व यशवंतरावास त्याचा संरक्षक व होळकर राज्याचा प्रबंधक नियुक्त करता येईल.
- भारतवर्षातील कोणत्याही भागातील कोणतेही गाव किंवा दुर्ग, जे कधी होळकरांच्या अधिपत्याखाली होते ते पुनः यशवंतरावांच्या अधिकारात दिले जावे. सोबतच होळकरांशी कोणताच भेदभाव न बाळगता त्यास शिंदेंच्या समकक्ष मानले जावे.
- दौलतराव शिंदे, काशीरावास कोणत्याही सैन्याने मदत करू नये, जेणे करून तो होळकर घराण्याचा प्रमुख बनू शकेल.
आपल्या न्याय मागण्यांवर पेशव्याकडून कोणतीच अनुकूल प्रतिक्रिया न पाहून त्यांनी आपल्या वयोवृद्ध व अनुभवी राजनीतिज्ज्ञ पाराशर दादाला पेशवेकडे अनुनय विनय करण्याच्या हेतूने पाठविले. परंतु दम्पी पेशव्यांनी त्यांची विनंती ऐकण्यास नकार दिला. आपली विनंती अमान्य झाल्याने अतिशय रूष्ठ होवून व वेळवाया घालविण्यापेक्षा यशवंतरावाने आपल्या फतेसिंह माने आणि शहामत खान या दोन प्रमुख सरदारांना पेशव्यांच्या प्रदेशात बदला घेण्यास पाठविले.
यशवंतरावांची चढती कळापाहून काशीरावाचा दम सुटला. त्याने आपली माणसे समेटासाठी यशवंतरावांकडे पाठविली. आपण जमविले नीटच, परंतु शिका आमचे नावाचा चालवून कारभार सर्व तुम्ही मुखत्यारीने करावा. असे बोलणे सुरू करून मागाहून खुद्द काशीराव यशवंतरावास मिळण्यासाठी महेश्वरास दाखल झाला. हे वर्तमान पुण्यास बाजीरावास समजताच त्याने काशीरावास हुकूम पाठविला, की तुम्ही परत शिंद्याकडे जावे हा हुकूम काशीरावाने मानला नाही. म्हणून बाजीरावाने होळकराचा सर्वच संजाम जात केला. काशीराव हातचा गेलेला पाहून दौलतरावाचा आधार तुटला आणि यशवंतरावास जोर चढून त्यांनी शिंद्यांचे उज्जनी शहर जाळून बेचिराख केले. त्याच्या पेंढाऱ्यांनी नर्मदे पलीकडे येवून बऱ्हाणपूर पर्यंतचा प्रदेश जिंकून राज्य केले.
तेव्हा दौलतरावने यशवंतरावांशी तडजोडीचे बोलणे चालू केले. ते असे की, खंडेरावास तुमच्या हवाली करतो, आणि पेशव्याकडून तुमच्या सरदारीचा बंदोबस्त करून देववितो. हा समेटाचा प्रयत्न कदाचित सिद्धीस गेला असता, परंतु याच वेळी पुण्यास बाजीरावाने विठोजी होळकरास क्रुरपणे हत्तीच्या पायाखाली बांधून ठार मारल्यामुळे प्रकरण विकोपास गेले व आता यशवंतरावांचे पेशव्याशीस युद्ध अटळ होते.
नर्मदोत्तर प्रदेशात शिदे होळकरांची वाटणी समसमान होती. ती महादजीच्या वेळेपासून हळूहळू शिंद्याकडेच भोगू लागली. कोणतेही हक्क सामर्थ्याने रक्षावे लागतात. होळकर घराण्याचे सामर्थ्य कमकुवत होताच शिंद्यानी त्यास चेपले. तुकोजीच्या मरणाने आपण निरंकुश झालो असे दौलतरावास क्षणभर वाटले. थोडी बहुत दहशत मल्हाररावाची होती तो ही नाहिसा झाला. विठोजी आणि यशवंतराव कर्तृत्ववान निघतील अशी त्यावेळी कोणाचीच अटकळ नव्हती. परंतु आता ते संकट नुसत्या दौलतरावासच नव्हे तर सर्व मराठी राज्य ग्रासण्यास समर्थ झाले.
यशवंतराव दक्षिणेकडे म्हणजेच पुण्याकडे चढाई करून येऊ लागला, तसे बाजीरावाचे पंचप्राण कासावीस होऊ लागले. शिंदे दूर गेल्यामुळे रघूजी भोसल्यास जवळ बोलावून आणण्यासाठी त्याने नारायण बाबूराव वैद्य यास पूर्वीच नागपूरास रवाना केले होते. त्यावर रघूजी भोसल्याने तो. २६ फेब्रुवारी, १८०२ रोजी कळविले. नारायण बाबूराव यांसमागमे खासदस्तुरचे पत्र आलेते प्रविष्ट होऊन लेखनाभिप्राय अवगत झाला. त्याची श्रीधर लक्ष्मण व कृष्णराव माधव यांची बिदा केली आहे सल्ला मसलतीचे प्रकार यांसी बोलण्यात आले आहेत ते सर्व बोलतील .त्यानंतर पुन: ता. २५ ऑगस्ट, १८०२ चे रघूजीचे पत्र आले की आपण अंतकरणापासून लोभममता ठेऊन आहेत हे समजून खातर जमा अधिकोतर झाली. येथील ही निस्सीम भाव खचितच आहे. जो बेत उभयंता वकिलांनी आपत्याशी केला आहे तो फार चांगला व पोक्त आहे. त्यात तेथून दुसरे व्हावयाचे नाही. या भाषेत एक बाजूस बाजीरावाची आर्जवे तर दुसऱ्या बाजूस भोसल्याचा दुटप्पी डाव व्यक्त होतो.
स. १८०२ च्या मार्च महिन्यापासून यशवंतरावाच्या स्वारीची पुण्यात मोठी खळबळ उडू लागली. वकिलांच्या व मुत्सद्यांच्या वाटाघाटी सुरू झाल्या. भोसल्याचे वकील पुण्यास आले. पाराजीपंतही होळकरांकडून आले. वकिलांचे बोलण्यात बेत बसला नाही तर मग भोसले येतील. बोलणी होतात परंतु मळमळीत. इंग्रजाकडील वकील शिंद्याकडे आले आहेत. दिल्लीचा बंदोबस्त करतो म्हणतात. इंग्रज दिल्ली कडे दंगा करणार. एप्रिलात होळकर तापीचे दक्षिण तीरी आले. शिंद्याची चार पलटणे व फौज बऱ्हाणपुरास गोपाळराव भाऊ जवळ आली, ते जमाव करून होळकरांवर येणार होळकरांनी पुढे न यावे म्हणून त्यांच्या कडे पाराजी पंताचे विद्यमाने सरकारातून केशव जनार्दन पाठविले. होळकरांचे फौजांनी मुलखाची बाकी ठेवली नाही. यशवंतराव होळकर हे महेश्वराहून निघून सेंधव्यास काशीरावास ठेऊन भीकणगांवास आले, तेथून या लतेरास तापी उतरून अलीकडे बेटावद येथे मुक्काम करून मे महिन्यात कासारबारीखाली चाळीसगाव येथे येऊन राहिले. त्याचे पाठोपाठ शिंद्याची फौज चालून येऊ लागली.
बापू गोखले थोडा बहुत लायक होता, पण तो सावनूर प्रांतात गुंतल्यामुळे पुण्यास येवू शकला नाही. पटवर्धन तर कोणीच आले नाहीत. त्यास बाजीरावाचा विशेष तगादा लागला, तेव्हा उभ्या उभ्या येवून सबबी सांगून निघून गेले. जुन्या सरदारांस दुखविण्याचा जो उद्योग बाजीरावाने केला तोच आता त्यास जाचक झाला. त्याने अनेक नवीन सरदार बनविले, परंतु युद्ध कौशल्य नुसत्या हुकमाने थोडेच तयार होणार? नगरचा कसाई कादरखान पूर्वी बारगीर होता तो आता सरदार बनला. अशी किती तरी नवीन नावे आहेत ती येथे देण्याचे प्रयोजन नाही. चतुरसिंग भोसल्यास जवळ बोलावून त्यास पाच हजार फौज ठेवण्याचा बाजीरावाने हुकूम केला. या नवीन सरदारास त्याने खर्चासाठी सरंजाम नेमून दिले, ते सर्व कागदावर राहिले. सरंजामाचा पैसा उगवून लोकांच्या पदरात पडेल तेव्हा घरातून बाहेर पडणार. शिंद्यानी आपला भरंवशाचा इसम निंबाजी भास्कर यास बाजीरावाजवळ मुद्दाम ठेवले होते, तो व बाळोजी कुंजर हेच बाजीरावाची सर्व व्यवस्था पाहत होते. बजीरावाचा मावसभाऊ गोविंदराव. परंजपे यास नव्या तोफा पाडण्याची आज्ञा झाली. त्यावरून परांजपे यांनी पर्वती खाली रमण्यात तोफा टाकण्याचा कारखाना जारी केला आहे. जणू काय तोफांचा कारखाना म्हणजे फुलांच्या माळाच होत. या तजविजी चालू असताच कोकणात पळून जाण्याची तजवीजही बाजीरावाने भरपूर ठेवली होती. जी काही थोडी फौज पुण्यास जमली ती पांडोजी कुंजर याच्या हाताखाली देवून फत्तेसिंग मान्यांचे पारिपत्याकरिता त्याने रवाना केली.
बाजीराव सर्वथैव बाळोजी कुंजराच्या तंत्राने चालत होता. बाळोजी व त्याचे साथीदार होळकरांचे पक्के द्वेष्टे होते. म्हणून होळकरांच्या बोलण्याकडे त्यांनी बिलकुल लक्ष दिले नाही. उलट पदोपदीने त्याचा अपमान करीत गेले. होळकरांचा वकील पाराजीपंत पुण्यास आला. त्याच्याशी सामान्य शिष्टाचार सुद्धा बाजीरावाने पाळला नाही. जून, जुलै व ऑगस्ट हे तीन महिने होळकरांचा मुक्काम खानदेशात किल्ले थाळनेर येथे होता. तेवढ्या अवधीत त्याच्या सरदारांनी तो मुलूख वैराण करून सोडला. पारोळ्यातून दोन लाख वसूल केले. एंरडोल जाळून तुटून नाहीसे केले. यशवंतरावांच्या सरदारात फत्तेसिंग माने हा मोठा धाडसी, खाष्ट व दक्षिणेचा पूर्ण महितगार होता. त्यांने आघाडीचा मान पत्करला. गणपतराव नारायण व शहामतखान हे नाशिक प्रांती आले.
२१ जूनला आपल्या पठाणांसह शहामतखानाने नाशिक जिल्हा अतिशय नृशंसपणे पदाक्रांन्त केला. दुसऱ्या महिन्याच्या आरंभी अहमदनगर पासून ६० मैल उत्तर पश्चिमेला आणि नाशिकच्या दक्षिण पूर्वेला स्थित सिनरला पोहोचला. २ ऑगस्टला यशवंतराव स्वत: संगमनेरला पोहोचले. त्यानी पेशव्याशी युद्धाचे संचलन स्वत:च्या हाती घेतले. तो पर्यंत शहामतखान नाशिक, सिन्नर आणि राहूरी (अहमदनगरच्या २० मैल उत्तरेला) मार्गे फत्तेसिंगच्या दिशेने पुढे सरकत होता.
फत्तेहसिंह माने पंढरपूरच्या जिल्ल्यांवर तुटून पडले होते. दक्षिण अभियानात होळकरांच्या पिंडारी प्रधान सेनेने संपूर्ण महाराष्ट्रात आतंक स्थापित करून ठेवला होता. त्या काळातील मराठी वर्तमानपत्रांनी यशवंतरांवाच्या पिंडारी प्रधान सैन्याच्या आतंका विषयी लिहिले. पिंडाऱ्यांनी पश्चिमेत घाटमाथ्या पर्यंत सर्व नगरे लुटून नष्ट केली आहेत. फक्त पुणे शिल्लक राहिले आहे. होळकरांच्या भीतीने संपूर्ण पुणे जिल्हा नष्ट केला आहे आणि सर्व लोक पळून गेले आहेत.
शहामतखान हा राहुरी मार्गे येऊन फत्तेहसिंह मानेना मिळाला होता. दोघांच्या सैन्यात वाढ होवून त्यांनी अहमदनगरच्या दक्षिण प्रदेश भीमा नदीपर्यंत उद्ध्वस्त केला. माने व आबाजी लक्ष्मण लाड यांनी अहमदनगर प्रांतात लुटालूट केली. नगरचा किल्ला व दहा लक्षांचा मुलूख बाजीरावाने शिंद्यास दिलेला असल्यामुळे लुटण्यात होळकरास विशेष अभिमान वाटला. जांबगाव, श्रीगोंदे व सिद्धटेक पर्यंतचा सर्व मुलुख मान्यांनी जाळून लुटून फस्त केला. बळवंतराव नागनाथ, रायाजी वरामजी पाटील, मानाजी शेटे व निंबाजीपंत इत्यादिकांचे वाडे वा मोरी वगैरे ठिकाणी होते, ते सर्व अग्नीच्या भक्षस्थानी पडले. महादजीने बांधलेला जांबगावचा सुंदर वाडा आबाजी लक्ष्मणाने खणून काढला.
यशवंतरावांच्या सारख्या आक्रमणांनी पेशवे खूपच भयभीत झाले आणि होळकरांचे प्रतिनिधी पराशरांना आपल्या स्वामीस परत जाण्याची विनंती करण्याची याचना केली. याच्या दुढतेने प्रत्यूत्तर दिले की, मी चार महिन्यापासून तुमच्या दारावर बसून न्यायासाठी याचना करीत आहे. आता पर्यंत आपण एका तरी वचनाचे पालन केले आहे का? मी आपल्या स्वामींना परत जाण्यास कसे काय सांगू शकतो. या प्रसंगी उपस्थित बालोजी कुंजरने आगीत तेल ओतण्याचे काम केले. त्याने होळकरांच्या तक्रारीबद्दल तिरस्कार प्रदर्शित केला आणि पेशव्यांना होळकरांविरूद्ध युद्धासाठी उत्तेजीत केले.
पुणे अभियानात जस जसे यशवंतराव पुढे सरकू लागले. तेव्हा ठिकठिकाणी शिंदे सैन्याशी त्यांचा संघर्ष झाला. त्यावेळी पुण्याच्या मार्गात नारायणगढ(नारायणगाव, ता.आंबेगाव) जवळ शिंदेचे शक्ती शाली सैन्यं त्याचा मार्ग रोखून उभी होती. त्यामुळे यशवंतरावांनी पेशवेच्या राजधानीवर दोन बाजूंनी आक्रमण करण्याचा निश्चय केला. त्याने शहामतखानास जुन्नरकडून आणि फत्तेहसिंह मानेला पंढरपूर येथील निराधारीकडून बारामतीकडे पुढे सरकण्याचे आदेश दिले. यशवंतराव व शहामतखान हळूहळू पुण्याकडे पुढे सरकत होते. शेवटी संयुक्त फॊजने पुण्यावर हल्ला करण्याचे ठरले व ८ ऑक्टोंबर १८०२ ला यशवंतराव व पेशव्याच्या सैन्याशी बारामती येथे भयंकर युद्ध सुरु होऊन पुण्यावर यशवंतराव हल्ला करणारच हे नक्की झाले. त्यावेळी पेशवे सैन्याचे नेतृत्व बाबा पुरंदरे(त्र्यंबक महिपत) आणि पांडोजी कुंजरच्या हाती होते. या लढाईत फत्तेहसिंह माने पेशवा विरूद्ध प्रथम शस्त्र वापरू इच्छित नव्हते, परंतु पुरंदेरेने अग्निवर्षाव केल्याने त्याला विवश होवून उत्तर द्यावे लागले. या मुठभेडीत पेशवेचे सैन्य अस्ताव्यस्त झाले. पुण्याच्या एका लेखकाने युद्धसमयी लिहिले, “चित्पाबन सेनापती, जो पेशवा घराण्याचा वंशानुगत सहाय्यक आणि मित्र होता, सुरक्षेच्या वेळी पळून जाणाऱ्यांत सर्वात पुढे होता. आपल्या तोफांना तिथेच सोडून नाना पुरंदरे आपला जीव वाचवून पळून गेला. उपसेनापती पंडोजी कुंजर असा पळाला की तीन दिवस त्याचा पत्ता लागला नाही. पायी सैनिक पकडले गेले आणि त्याचे सर्व काही हिरावून घेतले गेल.”
८ ऑक्टोंबर, १८०२ बारामतीचे हे युद्ध म्हणजे भविष्यातील महान घडामोडींचा पूर्व संकेत हेता. पेशव्याला व्यक्तीगत क्षती पोहोंचवावी किंवा त्याचा अपमान करावा, अशी यशवंतरावाची इच्छा नव्हती. त्याना पेशव्यांकडून फक्त न्याय हवा होता. यशवंतरावांनी बारामती शिबिरातूनच अंतिम संदेश पाठविला, आपण स्वामी आहात. आपल्यावर हात उगारायची माझी इच्छा मुळीच नाही. शिंदे आणि माझ्यातील झगड्याचा शांतीमय तोडगा काढणे तुम्हाला शोभा देईल. इंग्रज दारावर येवून मराठा राज्यावर अधिकार करण्याच्या संधीच्या प्रतिक्षेत आहे. व्यर्थ वार्तालाप करण्यास माझ्याजवळ वेळ नाही. शांतीमय निवाड्यासाठी मी आपल्याला शेवटची संधी देत आहे. रक्तपात रोखण्याची तुमची इच्छा असेल तर आपल्याकडून बाळोजी कुंजर आणि दाजीबा देशमुख यांना आणि बाबूराव आंग्रे व निम्बाजी भास्करला शिंदेतर्फे अटी निश्चित करण्यासाठी तातडीने पाठवा, मी दुसऱ्या कोणाशी बोलणार नाही. जर हे कार्यकर्ते आले नाही तर मी सशस्त्र निर्णय घ्यावयास विवश होईन. माझे भांडण शिदे सोबत आहे आणि तुम्ही त्याच्या हातचे बाहुले बनून राज्याचा विनाश करत आहात. इंग्रज दारावर आहेत. तुम्ही स्वामीचं कर्तव्य करावं आणि मला सेवकाच कार्य करू द्यावं.
बारामतीच्या युद्धची बातमी समजताच बाजीरावाच्या मनाची अत्यंत तारांबळ उडाली होती त्यामुळे तो यशवंतरावांशी समेट करण्यास तयार झाला. बाजीरावाने पाराजी पंतास बोलावून त्याच्या बरोबर यशवंतरावास वस्त्रे देवून समेट ठरविण्यासाठी बाळोजी कुंजराला रवाना केले. हे वर्तमान निंबाजी भास्कर व दाजी देशमुख यास समजल्यावर त्यांनी बाळोजी कुंजरास निकर्ष केला की, आमची पंचवीस हजार फौज जालनापुरा जवळ जमली असता तुम्ही यशवंतरावाशी समेट कसा काय करू शकता? असे बोलून होळकरास जी वस्त्रे जात होती ती मना करविली. आणि युद्ध होणारच हे निश्चित झाले. यशवंतरावांचे सेन्य हे जेजुरी येथे मुक्कामी होते. दि. २५ ऑक्टोंबर १८०२ रोजी यशवंतरावच्या सेन्याची पेशवे व शिंद्याच्या सेन्याशी हडपसर येथे लढाई होऊन यशवंतरावांनी निर्णायक विजय मिळवला.
यानंतर बाजीराव(दुसरा) सिंहगड मार्गे कोकणात पळून गेला. पुण्यातील शनिवार वाडा हा ४ महिने यशवंतरावांच्या ताब्यात होता. त्यांनी जेव्हा पुणे सोडले तेव्हा अमृतरावास पेशवे बनवले व आपल्या परिवाराची पेशव्यांच्या तावडीतून सुटका केली. महाराजा यशवंतराव होळकर विजयी होऊन माळव्याकडे निघाले.