Skip to content

बिरोबा

धनगर समाजाच्या मुख्य दैवतांपैकी “बिरोबा’ हा एक आहे आणि त्यांची आई सुरावंती. या ओव्यांमध्ये बिरोबांच्या आईची माहिती तपशीलवार सांगितली जाते तसेच बिरोबांची जन्मकथासुद्धा सांगितली जाते. यानंतर बिरोबांच्या मानलेल्या बहिणीची म्हणजे मायक्काची आणि बिरोबांच्या पत्नीची म्हणजे कामाबाईची माहिती “गाण्या’त व “कथे’तून सांगितली जाते.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी गाव म्हटले, की डोळ्यांपुढे उभे राहते बिरोबा देवस्थान. बिरोबा हे धनगर समाजाचे आराध्य दैवत मानले जाते. बिरोवा दैवत लिंगायत आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश या मूर्ती बिरोबा मंदिरात आहेत, कर्नाटकातूनच हे देव आरेवाडीच्या डोंगरावर आले.

या डोंगरावरूनच देव भक्ताच्या दर्शनासाठी आरेवाडीच्या बनात आले. यात्रेच्या पहिल्या दिवशी गोडाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. बिरोबाच्या उजव्याबाजूला बिरोबाचा भक्त सुर्‍याबा यांचे मंदिर आहे. त्यांच्या पलीकडे मायाक्कादेवीचे मंदिर आहे.

यात्रेला येणारा धनगर समाज यात्रेच्या तिसर्‍या दिवशी बकरीचा बळी देतात. ही बकरी बिरोबाला बळी दिली जात नाहीत व नैवेद्यहि दाखवला जात नाही. धनगर समाज मेंढपाळ व्यवसाय करणारा असल्याने यात्रे निमित्त आलेला असतो. तो मांसाहारी जेवणासाठी बळी देतो.

नैवेद्य बिरोबाला नव्हे ते सुर्‍याबाला दाखवतात असे त्यांचे म्हणणे आहे. यात्रेच्या कालाधीत बिरोबाची रात्री दहा नंतर पालखी निघते. मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा पहाटॆ पर्यत काढली जाते. याच पध्दतीने नवरात्र उत्सवात देखील घटस्थापने पासून विजयादशमीपर्यत पालखी काढली जाते.

बिरोबा देवाला जाण्यासाठी मिरज-पंढरपूर मार्गावरील नागज फाटा येथे उतरून जावे लागते. नागज फाटा ते आरेवाडी अंतर अडीच किलो मीटर आहे. बनात जाण्यासाठी येथूना खासगी वाहतूक व बसेसची सोय आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि गोवा या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणून आरेवाडी येथील श्री बिरोबा मंदिर अनादिकालापासून परिचित आहे. साधारण आठ फूट लांब व आठ फूट रुंदीचा ऐतिहासिक गाभारा व वीस फूट लांब, वीस फूट रुंदीचा सभामंडप असलेले हे मंदिर.

आरेवाडी, ढालगाव व नागज या तिन्ही गावांच्या सीमेवर वसलेले हे मंदिर जरी असले तरी, या देवावर श्रद्धा आहे ती जास्त आरेवाडीकरांचीच. या देवाला येण्या-जाण्यासाठी पूर्वी वाहने खूप कमी असायची. मात्र बर्याच वर्षाच्या कालावधीनंतर हळूहळू रस्ते, वाहने यांची सोय होऊ लागली. पूर्वी वीज,पाणी, बस थांबण्यासाठी निवारा, आरोग्य सुविधा या पायाभूत सुविधा नव्हत्या, त्या आता उपलब्ध आहेत.

गुढीपाडव्यानंतर पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीला तासगाव तालुक्यातील येळावी गावच्या गावडे बंधूंचा मानाचा गोड नैवेद्य, सहाव्या दिवशी म्हणजेच षष्ठीला सार्वजनिक गोड नैवेद्य व सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमीला मुख्य दिवस असतो, तो म्हणजे बकरी कापण्याचा. श्री बिरोबा हा लिंगायत असल्याने त्याला खारा नैवेद्य चालत नाही. मात्र त्याचा भक्त सूर्याबा, जो बिरोबाच्या उजव्या बाजूला स्थानापन्न आहे, त्याला हा खारा नैवेद्य चालतो.

१९९७ मध्ये शिवाजीराव बापू शेंडगे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. त्यावेळी ते धनगर समाजाचे नेते व माजी राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला परिचित होते. मंदिर बांधकामासाठी नानासाहेब सगरे यांची मदत झाली हे मंदिर “ब” दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे व सुमारे पंचवीस कोटींचे हे मंदिर उभे राहीले.

सध्या पाणी मुबलक प्रमाणात आहे, ते जल स्वराज्य प्रकल्पामधून. हॉटेल्स, थंडपेये, मेवा-मिठाईची दुकाने, रसघाणे, किराणा दुकाने आदी सुविधा आहेत. दोन कोटी खर्चाचे मंदिरही उभे राहिले आहे, ते लोकवर्गणीतून. मात्र यापुढील सर्व सोयी-सुविधांसाठी वीस कोटी रुपये मंदिराच्या विकासासाठी मंजूर केले आहेत, ते पर्यटनस्थळ विकासाच्यादृष्टीनेच.

भविष्यात या ठिकाणी एक हजार भाविकांना एकाचवेळी सर्व सुविधांनी राहण्याची सोय, अन्नछत्र, अंतर्गत रस्ते, प्रवेशद्वार, वाहनतळ, बगीचा, वृक्षलागवड, दुकानगाळे, पोहण्याचा तलाव, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नियोजन, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध होतील.

आरेवाडीचा बिरोबा म्हटलं की, पूर्वी श्रद्धेने असो किंवा बिरोबाच्या भक्तास सूर्याबाला असो, बकरी मोठय़ा प्रमाणावर कापली जायची. पाहुणे, इष्ट मित्र त्यानिमित्ताने यायचे. मोठी प्रथाच निर्माण झाली होती. मात्र कालांतराने अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या संघटनांनी बकरी अंधश्रद्धेने कापू नयेत म्हणून प्रबोधन केले.

देवाच्या नावावर पशुहत्या करू नका असा औरंगाबादच्या खंडपीठानेही निकाल दिला. त्यामुळे आज उघडय़ावर बकरी कापणे, मंदिर परिसरात पशुहत्या करणे यासारख्या बाबी बंद झाल्या आहेत. भाविक आता प्रशासन, न्यायालय यांच्या भूमिकेचा आदर राखून अंधश्रद्धेला फाटा देऊन ही यात्रा मोठय़ा उत्साहात व शांततेत पार पाडतात.

धनगरांचे आराध्य दैवत असणाऱ्या बिरुदेवाची महाराष्ट्रात ६ आणि कर्नाटकात ६ अशी प्रमुख १२ ठाणी आहेत.

  • १) काशिलींग बिरुदेव –
    आरेवाडी, ता.कवटे महांकाळ जि.सांगली
  • २) विठ्ठल बिरुदेव –
    पट्टणकोडोली, ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
  • ३) अवघडखान बिरूदेव –
    वाशी, ता.करवीर जि.कोल्हापूर
  • ४) सतुषा(संतोषा) बिरुदेव –
    टाकेवाडी, ता.माण जि.सातारा
  • ५) हेग्गेरसिद्ध बिरुदेव –
    डोणज तळे, ता.मंगळवेढा जि.सोलापूर
  • ६) हुन्नुरसिद्ध बिरुदेव –
    हुन्नुर, ता.मंगळवेढा जि.सोलापूर
  • १) गजलींगी बिरुदेव –
    घोडेगीरी, ता.हुक्केरी जि.बेळगाव
  • २) शिरढ्याणसिद्ध बिरुदेव –
    शिरढोण, ता.इंडी जि.विजापूर
  • ३) नागठाणसिद्ध बिरुदेव –
    नागठाण, ता.जि.विजापूर
  • ४) क्वानूर करेसिद्ध बिरुदेव –
    क्वानूर, ता.जमखंडी जि.विजापूर
  • ५) मुरगुंडी मुरसिद्ध बिरुदेव –
    अथणी, ता.अथणी जि.बेळगाव
  • ६) डंग्या बिरुदेव –
    काजबेळगी, ता.तिकोटा जि.विजापूर

बिरुदेव हा धनगरांचा देव समजला जातो. या सर्व ठाणकी असणाऱ्या बिरूदेवाचे पुजारी हे धनगर आहे. धनगरी ओव्या, धनगरी ढोल, कैताळ, वेत, वाटवा, कांबळा, धनगरी वालुग, धनगरी हेडम, धनगरी सिद्ध परंपरा, धनगरी गजनृत्य, धनगरी कैपत ह्या सर्व कला, परंपरा धनगर समाजाच्या आहेत. ही परंपरा आणि संस्कृती आधुनिक काळातील बदलाने लोप पावत चाललेली आहे.

श्री बिरोबाचे देवस्थान मंगळवेढा तालुक्यात हुन्नर येथे आहे. श्री बिरोबा देवाचे बारा अवतार तर त्यांचे शिष्य महालिंगराया देवाचे सात अवतार आहेत. बिरोबा व महालिंगराया यांचा काळ इ.सन पूर्वी साडेपाच हजार वर्षापूर्वीचा आहे. गुरू बिरोबा यांचे शिष्य महालिंगराया यांची भेट डोणज ता.मंगळवेढा येथील तलावाकाठी झाली.

त्यानंतर श्री बिरोबा हे शिरढोण, ता.इंडी येथे स्थायिक झाले. इंडी हा कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातला तालुका आहे. तर शिष्य महालिंगराया हे हुलजंती, ता.मंगळवेढा येथे स्थायिक झाले. पण त्यामधून एक विसंगती घडली. ती शिष्याच्या ध्यानी आली.

महालिंगराया हुलजंती येथील ओढ्याच्या काठावर तर बिरोबा हे शिरढोण येथे त्याच ओढ्याच्या काठावर खालच्या बाजूला. शिष्याने वापरलेले पाणी गुरुंना जात असल्यामुळे महालिंगराया अस्वस्थ झाले. त्यांनी गुरू बिरोबा यांना विनंती केली, की तुम्ही ते ठाणके बदलून असे ठिकाण निवडा, की तुमच्या पूजेला वापरलेले पाणी मला मिळावे. म्हणून बिरोबांनी शिरढोण येथील जागा सोडली.

ते पुढे फिरत फिरत सांगोला तालुक्या मधील हंगीरगे मार्गे हुन्नूर येथील ओढ्याच्या काठावर हिंगणीच्या बनात स्थायिक झाले. तेथून पुढे गुरू बिरोबा यांची सेवा शिष्य महालिंगराया यांच्याकडून अखंड केली गेली. बिरोबाचा उत्सव दर अमावास्येला होत असतो. वर्षातून तीन वेळा गुढीपाडवा, अक्षयतृतिया आणि दस-याला भेट सोहळा असतो.

त्या तिन्ही दिवशी मोठी यात्रा भरत असते. गुरू शिष्याच्या भेटीचा सोहळा सीमोल्लंघनापासून सातव्या दिवशी हुन्नूर येथील गावठाणमध्ये पार पडत असतो. भेट सोहळ्यानंतर गुरू बिरोबा व शिष्य महालिंगराया मिळून बिरोबा मंदिरात जातात. पुढे देवाच्या नावाने पुजारी पाऊसपाणी, रोगराई, धान्यकडधान्य, राजकारण या सर्वांबद्दल भाकणूक सांगतात.

भाकणूक झाल्यानंतर रात्री धनगरी ओव्यांचा मराठी व कन्नड भाषांमध्ये कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी नैवेद्याचा दिवस असतो. त्या दिवशी महालिंगराया गुरू बिरोबाला पुरणपोळीचे जेवण देण्याची प्रथा आहे. भक्तगणपण पुरणपोळीचा नैवेद्य करतात. महालिंगराया तिसऱ्या दिवशी बिरोबाला अभिषेक घालून हुलजंती गावाकडे प्रयाण करतात.

बिरोबा देवस्थान पंचकमिटीने भाविकांच्या सुविधांसाठी सहा धर्मशाळा बांधल्या असून सुमारे चोवीस हजार चौरस फुटांचा मोठा मंडप उभारलेला आहे. पिण्याच्या पाण्याकरता स्वतंत्र विहीर घेऊन मोठी टाकी बांधली आहे व पाईपलाईन टाकली आहे. तसेच परिसरामध्ये चार हौद बांधले असून एक बोअरवेल घेऊन त्यात इलेक्ट्रिक मोटार बसवली आहे तसेच एक हातपंप घेऊन जागोजागी नळ कनेक्शन देऊन पाण्याची सोय केली आहे.

परिसरामध्ये प्रत्येक खांबावर एल.ई.डी. बल्ब बसवले आहेत. अशाप्रकारे प्रकाशाची सुविधा करून परिसर प्रकाशमान केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये हुन्नुर बिरोबा देवाचा समावेश ‘ब’ दर्जा गटात झाला आहे. दोन कोटींचा निधी मिळणार आहे. पूर्ण परिसराला वॉल कंपाउंड, दोन मोठे वाहन तळ, दोन भक्त निवास, आणि सार्वजनिक शौचालये असे काम पूर्ण होत आले आहे.

बिरुदेवाच्या सेवेसाठी जास्त दिवस सेवक टिकत नसे. या बिरुदेवाचे ७०० पेक्षा जास्त सेवक होवून गेले आहेत असं हालमत पुराणात आणि धनगरी ओव्यात सांगितले जाते. बिरुदेवाचे सात सेवक असे होवून गेले की ज्यांनी देवाला आपल्या सेवेने जिंकले. ते बिरुदेवाचे सर्वात आवडते सेवक झाले.

  • १) हुलजंतीचा महालिंगराया,
  • २) काजबेळगीचा सुऱ्याबा,
  • ३) उटगीचा इठोबा,
  • ४) सोन्याळचा अमोघसिद्ध,
  • ५) शिरढोण शिलवंती,
  • ६) बिज्जरगी बुळाप्पा,
  • ७) आरेवाडीचा रामा.

संकलन : धुळदेव कोळेकर

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


राणी अहिल्यादेवी होळकरांनी भारतभर केलेल्या लोककल्याणकारी कार्यांची यादी पहा.
अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी कार्य