Skip to content

रामेश्वर पंचायतन मंदिर : कळंबस्ते

होळकरशाहीचे शिलेदार : सरदार गानू
कळंबस्ते, ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी(महाराष्ट्र)

इतिहास :

गोविंद पंत गानू हे राणी अहिल्यादेवी होळकर(Ahilyabai Holkar) यांच्या शासनकाळात होळकरशाहीच्या खासगी जहागिरीचे प्रमुख दिवाण होते. गोविंदपंतांनी आपल्या कारकिर्दीत होळकरशाची प्रामाणिक पणे सेवा केली त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी वेळोवेळी त्यांचा सन्मान हि केला हे आपल्याला नोंदीमधून समजते.

रामेश्वर पंचायतन मंदिर

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७६ ला महेश्वर प्रांतामध्ये गोविंदपंताना काही जमीन व त्यावेळेसचे ५००० रु. उत्पन्न असलेल्या बंगारडा गावाची जहागिरी हि भाल केली होती. तसेच त्यांचा सन्मान म्हणून महेश्वर शहरात त्यांच्या नावाने “गोविंदपूरा” हि पेठ हि वसवली आहे. कळंबस्ते हे गोविंदपंत पंत गानू यांचे मूळ गाव असून त्या गावातही त्यांचा सन्मान म्हणून या पंचायतन मंदिराचा निर्माण लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला.

खाजगी जहागिरीचे नियोजन करताना अहिल्यादेवी व गोविंदपंत गानू यांचे काल्पनिक चित्र.
आभार – श्री.भूषणसिंह महाराज होळकर

होळकरांच्या खाजगी जहागिरी बद्दल थोडक्यात माहिती पाहू. राणी अहिल्यादेवींचे सासरे सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपली पत्नी गौतमाबाई होळकर यांच्या नावे खाजगी जहागिरी मिळावी म्हणुन सन १७३४ मध्ये पेशव्यांकडे मागणी केली. सातारचे चौथे छत्रपती शाहु महाराजांकडून २० जानेवारी १७३४ ला गौतमाबाई होळकरांच्या नावे सनद मंजुर झाली व सुभेदार मल्हाररावांनी कळंबस्ते गावचे रघुनाथ कृष्णा गानू यांची खाजगी जहागिरीच्या प्रमुख दिवाण पदी नेमणूक केली.

सुभेदर मल्हारराव होळकर(पहिले)

सन १७६१ ला गौतमाबाई होळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर खाजगी जहागिरीचे अधिकार राणी अहिल्यादेवींच्या कडे आले. त्यांनतर सन १७६६ ला रघुनाथ कृष्णा गानू यांचे पुत्र गोविंदपंत गानू हे खाजगी जहागिरीच्या प्रमुख दिवाण पदी नेमले गेले. त्यांनी सन १७९० पर्यंत आपले कार्य बजावले. त्यांनतर त्यांचा मुलगा गोपाळराव बाबा गानू हे दिवाण झाले.

मातोश्री अहिल्यादेवी होळकर

इंदोरचे होळकर संस्थान भारतात विलीन होईपर्यंत जातीने कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण असलेल्या “गानू” घराण्याने होळकर संस्थाना मार्फत हिंदवी स्वराज्याची सेवा केली. दोनशे-सव्वादोनशे वर्षे या घराण्याने सुभेदार मल्हारराव,अहिल्यादेवी, यशवंतराव, हरिराव, तुकोजीराव(२) यांचे सेवेत निष्ठेने दिवाणगिरी सांभाळली व वेळोवेळी त्यांचा सन्मानही करण्यात आला.

सर्वात महत्तवाची गोष्ट म्हणजे हिंदवी स्वराज्यात खासगीचा मान फक्त होळकरांनाच होता. होळकरांपुर्वी व नंतर जे सरदार झाले कोणालाही खासगीचा मान मिळाला नाही. अगदी शिंदे, गायकवाड, पवारांना सुद्धा. आज भारतात जे अहिल्यादेवी होळकरांनी उभे केलेल वैभव आहे(हजारो मंदिरे ,घाट, अन्नछत्रे इत्यादी. ) ते सारे खाजगी जहागिरीतूनच. होळकरांच्या सरकारी जहागिरीला हात न लावता.

माहिती :

विविध प्रकारच्या पुरातन ठेव्यांसाठी कोकण समृध्द आहे. आठव्या-नवव्या शतकापासून थेट पेशवेकालीन राजवटीपर्यंत आणि त्यानंतर ब्रिटिश राजवटीमधील असंख्य पुरातन खुणा आजही गतकालीन वैभवाची साथ देत आहेत. शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांच्या शिवधनातून कळंबस्ते येथे उभारलेले “रामेश्वर पंचायतन” हे एक दुर्मिळ ठिकाण. पंचायतन म्हणजे पाच मंदिरांचा समूह. येथील संगमरवरी मूर्ती अप्रतिम आहेत पाहता क्षणी नजरेत भरतात.

चालुक्य राजवटीतील अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिध्द असलेली शिवमंदिरे आणि या मंदिरांमध्ये कोरले गेलेले विविध प्रसंग त्या काळातील प्रगत शिल्पकलेची साथ देत असतानाच, हिंदवी स्वराज्यातील गड – किल्ले शौर्याची गाथा सांगत आहेत. यानंतरच्या पेशवाईतील आणि ब्रिटीश राजवटीतील धान्य साठविण्याच्या वखारी, वाडे, पुल गतवैभवाची साथ देत उभे आहेत.

ahilyabaiche netrutv ek abhyas

यातच थेट मध्यप्रदेशातून अहिल्याबाई होळकर यांच्या शिवधनातून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळील कळंबस्ते या गावी उभारण्यात आलेले रामेश्वर पंचायतन हे मंदिर ठिकाण, याची महती लक्षात घेता राज्य संरक्षित स्मारक होणे आवश्यक आहे. पंचायतनाची ठिकाणं दुर्मिळ असतात.

पंचायतन मंदिरामध्ये गणपती, सूर्यनारायण, विष्णू, अष्टदुर्गा आणि मध्यभागी शिवलिंग असते. कळंबस्ते येथील गानू नामक व्यक्ती अहिल्याबाई होळकर यांच्या संस्थानात सेवेत होती. त्यांच्या विनंतीवरूनच अहिल्याबाईंनी कळंबस्ते येथे ‘रामेश्वर पंचायतन’ उभारण्यास शिवधन दिल्याचा उल्लेख आहे, असे येथील ग्रामस्थ सांगतात.

रामेश्वर पंचायतनाची मंदिरे जांभ्या दगडातील असून सभोवताली जांभ्या दगडाची भव्य तटबंदी आहे. मंदिरासमोर उंच दोन दगडी दीपमाळा असून त्यांचं एक वेगळच पण आहे. अशा दीपमाळा सहसा कोठेही बघायला मिळत नाहीत. या पंचायतन मंदिरांच्या समूहात मध्यभागी एक शिवमंदिर असून तटबंदीच्या चारही कोपऱ्यात चार छोटी मंदिरे असून त्यांचे बांधकाम एकसमान व जांभ्या दगडात आहे.

मुख्य प्रवेशद्वार व दीपमाळा
अशाप्रकारे चार कोपऱ्यात चार मंदिरे आहेत.

मध्यभागी असलेल्या शिवमंदिरात भव्य शिवलिंग आहे. येथील शिवलिंग हे मोठे असून कमळाच्या पाकळ्यांमुळे अजूनच आकर्षित दिसते. संपूर्ण शिवलिंग हे एकाच पाषाणात घडवले असल्यामुळे त्याची लकाकी लक्ष वेधून घेते. शिवलिंगाच्या बरोबर पाठीमागे संगमरवरातील अष्टदुर्गेची मूर्ती विराजमान आहे.

शिवमंदिरातील शिवलिंग
शिवमंदिरातील शिवलिंग
शिवमंदिरातील अष्टदुर्गेची मूर्ती

या शिवमंदिराच्या पुढे भव्य नंदी असून त्याचे होळकरकालीन दगडी कोरीवकाम अप्रतिम आहे. नंदीच्या गळ्यातील घंटा व त्यावरील कोरलेले अलंकृत नक्षीकाम हि लक्ष्य वेधून घेते. अलंकृत असणारा हा नंदि एका बाजूला रेलल्यासारखा भासतो. शिवमंदिराच्या पाठीमागे   एक पाण्याचे तळेही उभारण्यात आले आहे. त्यांचे बांधकाम हि चिरेच्या दगडात असून त्यातील पाण्याचा उपयोग मंदिरातील पूजाअर्चासाठी केला जात असावा.

शिवमंदिरा समोरील नंदी
शिवमंदिरा समोरील नंदी
शिवमंदिराच्या पाठीमागील कुंड

तटबंदीच्या चारही कोपऱ्यात जी चार छोटी मंदिरे आहेत ती प्रामुख्यने गणपती, विष्णू, अष्टदुर्गा आणि सूर्यनारायण मंदिर मिळून हे रामेश्वर पंचायतन तयार झाले आहे. या मंदीरातील सर्व मुर्त्या संगमरवरी असून त्यामधील शिल्पकला अप्रतिम, अत्यंत सुबक, रेखीव आणि भावनाप्रधान आहेत. पिवळसर झाक असलेल्या संगमरवरात या मुर्त्या थेट मध्य प्रदेशातून घोड्यांवरून आणल्याचे सांगितले जाते.

विष्णू मंदिरातील मूर्ती
सूर्यनारायण मंदिरातील मूर्ती

यातील गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची असल्याने या मूर्तीला मोठे महत्त्व आहे. सूर्यनारायण, अष्टदुर्गा यांच्या मूर्ती सहसा कोठे पाहायला मिळत नाहीत. मात्र त्या कळंबस्ते येथे असल्याने हे ठिकाण महत्त्वाचे असले तरीही दुर्लक्षित आहे. या सर्व मूर्ती मुख्य मंदिराच्या चार बाजूंना उभारलेल्या छोटेखानी मंदिरात आहेत. सर्व मूर्ती दीड ते दोन फुट उंचीच्या आहेत.

गणपती मंदिरातील मूर्ती
अष्टदुर्गा मंदिरातील मूर्ती

या पवित्र ठिकाणाचं महत्त्व आणि येथील मूर्तीचं मोल लक्षात घेता अहिल्याबाईंच्या शिवधनातील हा ठेवा राज्य संरक्षित स्मारक होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुरातत्व विभागानं दोन वर्षांपूर्वी या मंदिराला भेट देऊन पाहणी केली; परंतु प्रत्यक्षात कार्यवाही सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे उदासीन असलेल्या पुरातत्व खात्याच्या मदतीची वाट न बघता स्वता या मंदिराजी डागडुजी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

येथे काही वीरगळ व शिल्प पाहावयास मिळतात.

सन २०१८-२०२० या काळात येथील ग्रामस्थांनी या मंदिराला जीवनदान दिले. त्यांचा उद्देश प्रामाणिक होता मात्र नवीन दिल्या गेलेल्या रंगामुळे मंदिराने मात्र जुने रूप गमावले. या गावात “गानू” आडनावाची लोकही आज वास्तव्यास आहेत. लोकांना रामेश्वर पंचायतन ठिकाणाला भेट द्यायची असेल त्यांनी संगमेश्वर ते कसबा येथून पुढे फणसवणे येथे गेल्यानंतर डावीकडील पूलाकडे न जाता सरळ उमरे मार्गावर जायचे.

रंगकाम केलेले नवीन रूप
रंगकाम केलेले नवीन रूप

तेथून कळंबस्ते हायस्कूल जवळून पुढे गेल्यानंतर एक छोटा पूल लागतो त्याच्या पुढे उजव्या हाताला वळल्यानंतर तो रस्ता साटलेवाडी येथील रामेश्वर पंचायतन मंदिराकडे जातो . रस्त्यावरुन थोडेसे अंतर चालावे लागते . मात्र कोणाला त्रास होवू नये म्हणून ग्रामस्थांनी छान पायवाट बांधली आहे. संगमेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तेथे राहण्याची सोय होऊ शकते.

संदर्भ व आभार:
इंदोर स्टेट गॅझेट भाग -१
अहिल्यादेवींचे जीवन व कार्य
जे. डी. पराडकर
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]

राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.
राहुल वावरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *