Skip to content

इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे

होळकरशाहीत भव्य समाधी मंदिरे बांधण्याची सुरुवात १८ व्या शतकात झाली. सन १७५४ ला खंडेराव होळकर यांना कुंभेरी युद्धात वीर मरण प्राप्त झाल्यानंतर सुभेदार मल्हारराव होळकर यांनी पुत्र खंडेरावांचे समाधी मंदिर बांधले.

सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले)

मात्र राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या शासनकाळात होळकरकालीन स्थपत्यशास्त्राचा विकास झाला. त्यांनी आपल्या काळात कुंभेरीला खंडेराव होळकर यांची नवीन मूर्ती स्थापन केली ती आजही बघायला मिळते.

११ आणि १२ व्या शतकात माळवा प्रांतात परमार राजांचे राज्य होते आणि त्यांचे कला व स्थपत्यशास्त्राचे प्रमुख ठिकाण होते किल्ले हिंग्लजगढ आणि १८ व्या शतकात किल्ले हिंग्लजगढ होळकरशाहीतील प्रमुख किल्ला होता. किल्ल्यावर आजही परमार कालीन आनेक मुर्त्या बघायला मिळतात.

होळकरशाहीतील दुर्ग किल्ले हिंग्लजगड, भानपुरा(म.प्र)

१८ व्या शतकात होळकरांनी जे किल्ले बांधले त्यामध्ये मराठा व मुघल पद्धतीची बांधणी बघायला मिळते, अशीच बांधणी हिंग्लजगडा वर हि बघायला मिळते तर ज्या वास्तू निर्माण केल्या त्यामध्ये रजपूत, मराठा, गुजराती, दक्षिण भारतीय व मुघल शैली नजरेस पडते. होळकरांच्या ताफ्यात अनेक रजपूत कारागीर होते त्यामुळे येणाऱ्या काळात रजपूत शैलीचा जास्त प्रभाव दिसू लागला.

राणी अहिल्यादेवींच्या काळातील स्थापत्यशास्त्र प्रामुख्याने तीन प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते,

  • गडदुर्ग, भुईकोट व समाधी वास्तूंचा निर्माण,
  • धार्मिक मंदिरे, मस्जित व दर्गाचां निर्माण, आणि
  • बारवा, पाणपोई, नदीघाट, धर्मशाळांचा निर्माण.
गंगाजल निर्मळ राणी अहिल्यादेवी होळकर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात होळकरशाहीची किल्ले महेश्वर हि राजधानी होती. या राजधानीची नियुक्ती त्यांनीच सन १७६७ ला केली होती. देशभरात जी सर्व कामे चालत असत त्यांचा अंतिम लेखा जोखा हा महेश्वरच्या राजदरबारातून होत असे व त्यावरील जो खर्च केला जात असे तो अहिल्यादेवींच्या खासगी जहागिरीतून केला जात असे.

या खासगी जहागिरीचे सर्व कारभार त्यांचे खासगी दिवाण गोविंदपंत गानू हे पहात असत. मात्र सन १७६७ च्या अदोगर होळकरशाहीची राजधानी हि इंदोर होती ज्याची निवड सुभेदार मल्हारराव होळकर यांनी केली होती.

इंदोर शहरात होळकरांच्या भव्य समाधी स्थळांचा निर्माण हा रानी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळापासूनच सुरु झाला. उत्तरेत “समाधी” या शब्दा ऐवजी “छत्री” हा शब्द प्रचलित आहे कारण या वास्तू स्थापत्यशास्त्रात मराठा, रजपूत व मुगल या शैलीचा प्रभाव दिसून येतो म्हणून इंदोरमध्ये “होळकरांची समाधी” ऐवजी “होळकरांची छत्री” असे ऐकायला भेटते.

इंदोर शहरातील होळकरांची समाधी स्थळे किंवा छत्री प्रामुख्याने तीन भागात विभागलेली आहे. ति खालील प्रमाणे,

  1. छत्रीबाग समाधीस्थळ समूह,
  2. छत्रीबाग, गणगोर घाट(हरिराव महाराज समाधी समूह), Hari Rao Holkar Chatri
  3. कृष्णापूर समाधीस्थळ समूह. Krishna Pura Chhatri

१. छत्रीबाग समाधीस्थळ समूह:

छत्रीबाग समाधीस्थळ समूहाच प्रवेशद्वार

हे समाधीस्थळांचं ठिकाण सर्वात जुने असून त्या भोवती भव्य तटबंदी आहे. हि तटबंदी दोन भागात विभागलेली आहे. पहिला भाग हा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात पूर्ण झाला असावा तर दुसरा नंतर महाराणी कृष्णाबाई होळकर यांच्या काळात बांधला असावा.

या समाधीसमूहात प्रवेश करण्यासाठी भव्य प्रवेशद्वार आहे. हा समाधीसमूह खान(कान्हा) नदीच्या तटावर असून नदीच्या बाजूला घाट हि आहे. खालील नकाशा वरून व्यवस्थित लक्षात येईल.

छत्रीबाग समाधीस्थळ समूह नकाशा

या समाधी समूहात प्रामुख्याने पुढील समाधीस्थळे आहेत.
A.श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर,
B.श्रीमंत सरदार खंडेराव होळकर,
C.श्रीमंत सुभेदार मालेराव होळकर,
D.श्रीमंत राजकुमारी स्नेहलतराजे होळकर,
E.श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(१),
F.श्रीमंत महाराजा मल्हारराव होळकर(२),
G.श्रीमंत महाराणी गौतमाबाई होळकर(ताईसाहेब),
H.श्रीमंत महाराणी इंद्राबाई होळकर.

A. श्रीमंत सुभेदार मल्हरराव होळकर(पहिले) –

सुभेदार मल्हारराव होळकर हे होळकरशाहीचे संस्थापक. होळकरशाहीची पहिली राजधानी इंदोर या शहराची निवड त्यांनीच केली होती. मराठी साम्राज्याचे सुभेदार होण्याचा त्यांना मान मिळाला. पानिपत नंतर मराठा साम्राज्याची घडी पुन्हा उत्तरेत बसवण्यासाठी पेशव्यांनी त्यांना “येखतियारी” दिला होता.

आलमपूर येथील सुभेदार मल्हारराव होळकर यांची मुख्य समाधी आलमपूर, ता.लहार जि.भिंड(म.प्र)

आपल्या हयातीत चार पेशवे पाहिलेले मल्हारबा स्वराज्याच्या मोहिमेवर असताना सन १७६६ ला आलमपूर येथे मृत्यमुखी पडले. तिथे त्यांची मुख्य समाधी आहे. मात्र सुरुवातीला इंदोर या पहिल्याराजधानीच्या ठिकाणी त्यांची समाधी नव्हती.

सन १७८४ ला इंदोर येथे सुभेदार मल्हारराव होळकरांची प्रति समाधी राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधून पूर्ण झाली आणि येथूनच इंदोर मध्ये होळकरांची समाधी स्थळे बांधण्याची सुरुवात झाली. उंच चोथऱ्यवर हि समाधी असून असंख्य शिल्प कोरलेली आहेत. या समाधीवर दोन गोल घुमट असून मुख्य गाभारा आयताकृती असून त्यावरील घुमट आकाराने मोठा आहे.

इंदोर येथील सुभेदार मल्हारराव होळकर(१) यांची प्रति समाधी
इंदोर येथील सुभेदार मल्हारराव होळकर(१) यांची प्रति समाधी
इंदोर येथील सुभेदार मल्हारराव होळकर(१) यांची प्रति समाधी

दोन्ही घुमटावरील नक्षी आकर्षक आहेत. समाधीमध्ये एकूण दुहेरी बारा खांब असून त्यावर हि नक्षीकाम पाहण्यासारखं आहे. या समाधीच्या कामामध्ये जयपूर शैलीचा प्रभाव दिसून येतो.

समाधी मध्ये सुभेदार मल्हारराव व राणी गौतमाबाई होळकर-बारगळ यांच्या संगमरवरी मुर्त्या आहेत. सुभेदारांच्या उजव्या हातामध्ये तलवार असून ती खांद्यावर ठेवलेल्या छबीमध्ये आहे. संपूर्ण समाधीचे बांधकाम हे लाल दगडामध्ये आहे.

इंदोर येथील प्रतिसमाधी मधील सुभेदार मल्हारराव(१) व पत्नी गौतमाबाई यांच्या मुर्त्या

B. श्रीमंत सरदार खंडेराव होळकर –

सरदार खंडेराव होळकर हे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र व राणी अहिल्यादेवी होळकर यांचे पती होय. त्यांचा मृत्यू सन १७५४ ला राजस्थान येथील कुंभेरी युद्धात झाला होता. गागरसोल येथे त्यांची मुख्य समाधी आहे.

इंदोर येथील सरदार खंडेराव होळकर यांची प्रति समाधी सन १७८४ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आले. हि समाधी सुभेदार मल्हारराव होळकर(१) यांच्यासमाधीच्या डाव्या बाजूला आहे.

सरदार खंडेराव होळकर यांची गागरसोल, ता.कुंभेरी जि.भरतपूर(राजस्थान) येथील मुख्य समाधी

सरदार खंडेराव होळकर यांची समाधी मल्हारराव व मालेराव यांच्या समाधीच्या मधोमध आहे. हि समाधी पण उंच चोथऱ्यावर असून त्याला गर्भगृह व सभामंडप आहे. गर्भगृवर शिखर असून सभामंडपावर आकर्षक घुमट आहे. शिखरावर व घुमटावर होळकर कालीन दगडी नक्षीकाम पाहण्यासारखं आहे.

समाधीवर अनेक सरदार खंडेराव यांच्या आयुष्यातील लढाईचे प्रसंग कोरलेले दिसतात. त्यावर अनेक घोडे, हत्ती याबरोबरच उंटावरून लढाई केलेलं प्रसंग कोरलेले दिसतात. यासमाधी बांधकामामध्ये मराठा राजपूत शैली नजरेस पडते.

इंदोर येथील सरदार खंडेराव होळकर(१) यांचे प्रति समाधी

समाधीच्या गर्भगृहात खंडेराव व त्यांच्या सती गेलेल्या बायकांच्या मुर्त्या आहेत. खंडेराव होळकर यांच्या डाव्या-उजव्या-बाजूला व खाली बायकांच्या मुर्त्या आहेत. तसेच खंडेराव यांच्या डाव्या बाजूला चोथऱ्यावर अजून एक मूर्ती नजरेस पडते. सरदार खंडेराव होळकर यांची राणी अहिल्यादेवी होळकर या प्रथम पत्नी होत्या व त्यांच्या व्यतिरिक्त खंडेरावांना ११ पत्नी होत्या व त्या सर्व सती गेल्या होत्या. खंडेराव यांच्या सती गेलेल्या ११ पत्नींची नावे पुढील प्रमाणे पार्वतीबाई गावडयाची कन्या, सुरत कुंबरबाई आलीमोहन राजाकडील, पोपाबाई, राजकुंबरबाई, प्रेमकुंबरबाई, रामकुंबरबाई, सुंदरबाई, गंगाबाई, कुंबारवाई, कुंवरबाई रमजानीबाई(मुसलमान), नाखूबाई दिल्लीची. हि वरील सर्व नावे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग – १ या संदर्भ पुस्तकात आहेत मात्र समाधीत ११ ऐवजी १० च सती मूर्ती दिसतात.

इंदोर येथील प्रतिसमाधी मधील सरदार खंडेराव व त्यांच्या नऊ पत्नींच्या मुर्त्या

यामध्ये राणी अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती नाही कारण त्यांना मल्हारराव होळकर यांनी सती जाऊ दिले नव्हते. काही काळानंतर होळकरांच्या वंशजांकडून गर्भगृहातील उजव्या देवळीत राणी अहिल्यादेवींची संगमरवरी मूर्ती बसवण्यात अली.

उजव्या देवळीतील अहिल्यादेवींची संगमरवरी मूर्ती

सरदार खंडेराव होळकर यांच्या प्रति समाधीच्या सभामंडपामध्ये काळ्या पाषाणात नंदी बघायला मिळतो आणि या नंदीचे विशेष म्हणजे अशाच प्रकारचा नंदी राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या महेश्वर येथील समाधीमध्ये बघायला मिळतो.

इंदोर येथील सरदार खंडेराव होळकर प्रति समाधीमधील नंदीचे शिल्प
महेश्वर येथील राणी अहिल्यादेवी होळकर समाधीमधील नंदीचे शिल्प

नंदीने आपले धड एका खांबावर ठेवले असून त्या खांबावर हात जोडलेली स्त्रीचे शिल्प कोरलेले दिसून येते. होळकरशाहीत वेगवेगळ्या छबी असलेले नंदीचे शिल्प बघायला मिळतात. त्यावर हि उत्तम संशोधन होऊ शकतो.

महेश्वर येथील राणी अहिल्यादेवी होळकर समाधीमधील नंदीचे शिल्प, त्यावरील हात जोडलेले स्त्रीचे शिल्प

राणी अहिल्यादेवी यांच्या महेश्वर येथील समाधीबद्दल जाणून घेण्यासाठी येथे Click करा.

C. श्रीमंत सुभेदार मालेराव होळकर –

सुभेदार मालेराव होळकर हे अहिल्यादेवींचे एकुलते एक पुत्र होते. होळकरशाहीचे ते २ रे राजे असून कमी राज्यकाळ केलेल्या प्रशासकांमध्ये ते येतात. त्यांनी २० मे १७६६ ते १३ मार्च १७६७ असे राज्यशासन केले. त्यांच्या मृत्यू विषयी अनेक कथा प्रसिद्ध आहे मात्र त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे पुराव्यानिशी अजूनही कोणीही सांगू शकले नाही. त्यांचा मृत्यू इंदोर येथेच झाला. हे स्मारक त्यांची मुख्य समाधी समाधी आहे.

इंदोर येथील सुभेदार मालेराव होळकर यांची मुख्य समाधी

हि समाधीही एक भव्य चोथऱ्यावर असून त्याची हि स्थापत्य शैली हे रजपूत शैली दिसून येते व आकार घुमटी पद्धतीचा. या समाधीवर असंख्य देव देवदेवतांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. या समाधीला सभामंडप नसून फक्त गर्भगृह असून त्यावर एक दुहेरी पद्धतीचा घुमट आहे. त्यावर हि असंख्य होल्करकालीन नक्षीकाम कोरलेले आहे. समाधीचा गाभारा आतून अष्टकोनी आहे.

समाधीमधील सुभेदार मालेराव व पत्नी प्रिताबाई व मैनाबाई यांच्या मुर्त्या

समाधीच्या आत मधोमध मालेराव यांची मूर्ती असून त्यांचा उजव्या व डाव्या बाजूला त्यांच्या पत्नी प्रिताबाई व मैनाबाई यांच्या मुर्त्या आहेत. गर्भगृहात उजव्या कोपऱ्यात त्यांच्या प्रति अजून एक हत्तीवरील मूर्ती आहे. हत्तीवर हि मालेराव व त्यांच्या दोन्ही बाजूला दोन्ही पत्नीची मूर्ती आहे. या समाधीचा निर्माण सन १७८४ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या मार्गदर्शनाखालीच झाला. हि समाधी पण संपूर्ण लाल दगडात बांधलेली आहे.

उजव्या कोपऱ्यात हत्तीवर सुभेदार मालेराव व त्यांच्या पत्नी प्रिताबाई व मैनाबाई यांच्या मुर्त्या.

सुभेदार मालेराव होळकर यांना हत्तीचा शौक होता म्हणून हि वरील मूर्ती बनवली आहे. खान(कान्हा) नदीत त्यांनी हत्तीच्या स्नानासाठी एक बंधारा हि उभारला होता त्याला “हाथीपाला” असे म्हटले जायचे तसेच त्यांची पहिली पत्नी प्रिताबाई हि सरदार संताजी वाघ यांची कन्या आहे. पानिपतच्या लढाईत होळकरांचे सरदार संताजी वाघ धारातीर्थ पडल्यानंतर त्यांची मुलगी राणी अहिल्यादेवींची सून बनली व त्यांच्या घराण्याला काही जहागिरी दिली. महाराष्ट्रातील काठापूरचा वाडा देण्यात आला होता. मैनाबाई हि बहाड घराण्यातील आहे.

D. श्रीमंत राजकुमारी स्नेहलताराजे होळकर –

सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मारकाच्या थेट समोर स्नेहलताराजे होळकर यांचे स्मारक आहे. हि त्यांची मुख्य समाधी आहे. त्या होळकरशाहीचे १३ वे राजे श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर(३) यांच्या कन्या आहेत.

राजकुमारी स्नेहलताराजे होळकर समाधी

या समाधीचे संपूर्ण बांधकाम मार्बल मध्ये असून सभामंडप व गर्भगृह अशी समाधीची रचना आहे. समाधीला शिखर आहे. स्नेहलताराजे यांचा मृत्यू वयाच्या ११ व्या वर्षी दिवाळीत फटाकेच्या स्फोटामुळे झाला होता. त्यांच्या आईचे नाव महाराणी इंदिराबाई होळकर होते. या समाधीच्या पाठीमागे तिन छोटे शिवपिंड व त्या समोर नंदीचे शिल्प दिसून येतात. हे नक्की काय असावे हे समजत नाही मात्र ते राजे महाराजांचे अपत्ये, जे जन्मानंतर अल्पवधिच मरण पावले असतील त्यांचे दहन स्थळ असावेत.

समाधीच्या पाठीमागे तिन छोटे शिवपिंड व त्या समोर नंदीचे शिल्प दिसून येतात.

E. श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर(पहिले) –

राणी अहिल्याबाई होळकर यांच्या काळात तब्ब्ल २९ वर्ष होळकरशाहीच्या लष्करी विभागाचे प्रमुख सुभेदार तुकोजीराव होळकर(१) होते. ते होळकरशाहीचे ४ थे राजे आहेत. उत्तरेत महादजी शिंदे यांच्या बरोबर मराठा साम्राज्याच्या सीमा वाढवण्यात तुकोजीबाबांचा सिंहाचा वाटा आहे. सन १७९५ ला दक्षिण भारतात असताना महाराष्ट्रमध्ये पुणे जवळील खडकी येथे त्यांचा मृत्यू झाला. खडकी येथे त्यांची मुख्य समाधी आहे. होळकरशाहीचे पहिले महाराजा यशवंतराव होळकर(पहिले) यांनी इंदोर येथील छत्रीबागेत तुकोजीराव होळकरांची प्रति समाधी बांधून आपल्या घराण्याची परंपरा पुढे सुरु ठेवली. परंतु त्या समाधीचे बांधकाम हे महाराणी कृष्णाबाई होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.

सुभेदार तुकोजीराव होळकर(१) यांची खडकी-पिपरीचिंचवड, जि.पुणे(महाराष्ट्र) येथील मुख्यसमाधी
सुभेदार तुकोजीराव होळकर(१) यांच्या मुख्य समाधीबद्दल अधिक फोटो व माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.

इंदोर येथील समाधी छत्री मंदिर हे एका चोथऱ्यावर बांधण्यात आले असून समाधीचे गर्भगृह आणि सभामंडप असे भाग पडतात. शिखर हे महेरपी शैलीचे असून त्यावर असंख्य शिल्प कोरलेली आहेत. समाधीवर रक्षक, द्वारपाल, शिकारीची शिल्प, हत्ती, घोडे यांच्या प्रतिमा कोरून हि समाधी अतिशय सुंदर सजवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात होळकरशाहीच्या लष्करी छावणीचे ते प्रमुख होते आणि त्याला अनुसरूनच हि समाधी उभारण्यात आली आहे.

इंदोर येथील सुभेदार तुकोजीराव होळकर(१) यांची प्रतिसमाधी

समाधीमधील द्वारपालांचे कपडे हे आधुनिक स्वरूपाचे वाटतात, त्यावरून आपल्याला हे समजून येते के इंदोरमध्ये ब्रिटिशांच्या प्रभाव त्यांच्या मृत्यूनंतर काही काळातच सुरु झाला होता. समाधीच्या गर्भगृहाच्या बाहेरील दक्षिणेकडील बाजूस हिंदु देव आणि देवीच्या प्रतिमा सुंदरपणे रेखाटले आहेत. अर्ध-नारिश्वर यांच्यासह भगवान शिव यांच्या स्मारकांनीही हि समाधी अतिशय आकर्षित सजवलेली आहे.

समाधीच्या गर्भगृहावरील होळकरकालीन शिल्प

सभामंडपातील खांब खूप मोठे असून समाधीच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या खांबावर सजावट अतिशय सुंदर आहे. या समाधीमध्ये मराठा-मुघल शैलीचा जास्त प्रभाव दिसून येतो. या छत्रीबागेतील जे दोन मोठ्या समाध्या आहेत त्यातील हि एक समाधी. समाधीच्या गर्भगृहाच्या मध्यभागी एक संगमरवरी शिवलिंग असून त्याला चारही बाजूला मुखवटे आहेत.

समाधीमधील चार मुखवटे असलेले शिवलिंग

हे शिवलिंग एक वेगळ्याच प्रकारे घडवले आहे. शिल्पप्रेमींना हे शिवलिंग एक वेगळीच भुरळ घालते. शिवलिंगाच्या पाठीमागील बाजूस मेघडंबरीमध्ये सुभेदार तुकोजीराव होळकर व त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांच्या दोन बायकांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्यातील त्यांच्या एका पत्नीचे नाव रखमाबाई व दुसरीचे यमुनाबाई उर्फ राधाबाई होते.

समाधीमधील सुभेदार तुकोजीराव(१) व पत्नी रखमाबाई व यमुनाबाई त्यांच्या मुर्त्या.

F. श्रीमंत महाराजा मल्हारराव होळकर(द्वितीय) –

महाराजा मल्हारराव होळकर(२) हे महाराजा यशवंतराव होळकर(पहिले) यांचे पुत्र असून ते होळकरशाहीचे ७ वे राजे होते. १८१७ ची महिंदपुरची होळकर-इंग्रज लढाई यांच्याच राज्यशासन काळात होऊन होळकर राज्याचे एक छोट्या होळकर संस्थानात रूपांतर झाले होते. या लढाईत महाराणी तुळसाबाई साहिब होळकर, सरदार तात्या जोग, महाराजा हरिराव होळकर(लढाईच्या वेळेला ते सरदार होते), सरदार गफुरखान, सरदार भाऊसाहेब होळकर, राजकुमारी भीमाबाई व कराराच्या वेळेला महाराणी कृष्णाबाई होळकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

१८१७ ची महिंदपुरची होळकर-इंग्रज लढाई बद्दल अधिक वाचा. Click Now

महाराजा मल्हारराव होळकर(२) यांची हि मुख्य समाधी असून समाधीचे गर्भगृह व सभामंडप अशी विभागणी आहे. गर्भगृहावर शिखर असून सभामंडपावर दोन शिखर आहे. या शिखरांमध्ये मराठा, रजपूत आणि मुघल शैली दिसून येते. समाधीचा आकार भव्य असून छत्रीबागेतील जे दोन मोठे स्मारक आहेत त्यातील हे एक.

महाराजा मल्हारराव होळकर(२) यांची समाधी

समाधीच्या गर्भगृहात मेघडंबरी असून त्यामध्ये मल्हारराव व त्यांच्या नऊ बायकांच्या संगमरवरी मुर्त्या आहेत. या सर्व मुर्त्यांमध्ये वेगळे पण आहे. सर्व मुर्त्या वेग वेगळ्या हावभाव करताना बनवल्या आहेत. या समाधीवर जास्त नक्षी काम दिसून येत नाही.

समाधीमधील महाराजा मल्हारराव(२) व त्यांच्या सती गेलेल्या नऊ पत्नीच्या मुर्त्या

G. श्रीमंत महाराणी गौतमाबाई होळकर(ताई साहेब) –

महाराणी गौतमाबाई होळकर-गाढवे या महाराजा मल्हरराव होळकर(द्वितीय) यांच्या पत्नी असून त्यांचा मृत्यू सन १८५९ ला झाला. १८ व्या व १९ व्या शतकातील स्त्रियांची समाधी या त्यांच्या पतीच्या समाधी बरोबर सामायिक असत मात्र हि एकमेव अशी छत्रीबागेतील स्वतंत्र समाधी आहे जी केवळ स्त्रीसाठी उभारलेली आहे. यावरून त्यांचे व्यक्तिमत्त्व कळते. त्यांना लोक आदराने ताईसाहेब म्हणत असत. यांच्या वर अजूनही जास्त संशोधन झालेले दिसून येत नाही. हि समाधी महाराजा मल्हारराव होळकर(द्वितीय) यांच्या समाधीच्या समोर आहे.

महाराणी गौतमाबाई होळकर यांची समाधी

या समाधीचा निर्माण सन १८७४ ला झाला असून आकार छोटा आहे. समाधीवर शिखर व पुढे सदर आहे. शिखरावर व सदरेवर शिखर असून समाधीचे संपूर्ण बांधकाम दगडात व मराठा शैलीत आहे. समाधीच्या गर्भगृहात ताईसाहेबांची संगमरवरी सुंदर मुर्ती आहे.

समाधीमधील महाराणी गौतमाबाई होळकर यांची मूर्ती

त्यांच्या उजव्या हातात गणपतीची मूर्ती असून दोन्ही हातांनी समोरील शिवपिंडीवर पाणी घालत असलेले छबी कोरलेली आहे. समोरील शिवपिंड संयुक्त पाषाणात कोरलेली असून तिच्या पुढे छोटी व सुरेख अशी संगमरवरी नंदीची मूर्ती आहे.

महाराणी गौतमाबाई यांच्या कडेला गणपती व शिवपिंडावर पाणी घालत असलेली सुरेख संगमरवरी मूर्ती

गैरसमज – होळकरशाहीचे संस्थापक, १ ले राजे सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांच्या पत्नीचे नाव पण गौतमाबाई आहे व होळकरशाहीचे ७ वे राजे महाराजा मल्हारराव होळकर(दुसरे) यांच्या पत्नीचे पण नाव गौतमाबाई(ताईसाहेब) आहे. त्यामुळे अनेक जणांचा गैरसमज होतो. १ ले राजे सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांची पत्नी गौतमाबाई या बारगळ घराण्यातील आहेत तर ७ वे राजे महाराजा मल्हारराव होळकर(दुसरे) यांच्या पत्नी गौतमाबाई(ताईसाहेब) या गाढवे घराण्यातील आहे.

H. श्रीमंत महाराणी इंदिरासाहिब होळकर –

या होळकरशाहीचे १३ वे राजे श्रीमंत तुकोजीराव होळकर(तृतीय) यांच्या पत्नी आहेत. हि वास्तू ज्या जागेवर निर्माण केली ज्या जागेवर त्यांचे दहन करण्यात आले होते. हि वास्तू पुर्नपणे संगमरवरी दगडात असून मधोमध छोटीशी शिवपंड व नंदी आहे. हि वास्तू महाराजा मल्हारराव होळकर(दुसरे) यांच्या समाधीच्या उजव्या बाजूला आहे.

महाराणी इंदिरासाहिब होळकर यांची समाधी
पहिला छत्रीबाग समूह यांचा Video पहा

कधी इंदोरला आला तर या समाधीवास्तू नक्की पहा. खाली Google Map दिला आहे.

२. छत्रीबाग समाधीस्थळ समूह(हरिराव महाराज छत्री):

हे समाधीस्थळांचं ठिकाण गणगोर घाटावर आहे. या समाधीस्थळाला भव्य तटबंदी असून प्रवेश करण्यासाठी भव्य द्वार आहे. इंदोरमधील हे होळकरांच्या समाधीस्थळाचं दुसरं ठिकाण आहे. या समाधिस्थळात पुढील समाधी आहेत.
A.श्रीमंत महाराजा हरिराव होळकर,
B.राजा श्रीमंत सर काशिरावदादा होळकर(K.C.S.I),
C.श्रीमंत सरदार भाऊसाहेब होळकर,
D.श्रीमंत सरदार तात्या जोग(विठ्ठलराव किब),
E.श्रीमंत महाराजा खंडेराव होळकर,
F.श्रीमंत जिजीबाई साहेब होळकर,
G.डाव्या बाजूची अज्ञात समाधी ,
H.श्रीमंत महाराजा तुकोजीराव(दुसरे) यांच्या मुलीची समाधी,
I.श्रीमंत रक्माबाई होळकर समाधी,
J.श्रीमंत लक्ष्मीबाई होळकर,
K.उजव्या बाजूच्या अज्ञात समाध्या या वास्तू आहेत.

गणगोर घाट येथील छत्रीबाग समाधी समूह(हरिराव महाराज समाधी)

A. श्रीमंत महाराजा हरिराव होळकर –

महाराज हरिराव होळकर हे होळकरशाहीचे ९ वे राजे होय. ते विठोजीराव होळकरांचे पुत्र होय. विठोजी होळकरांची पुणे शनिवार वाड्यापुढे हत्तीच्या पायदळी देऊन हत्या करण्यात आली होती. सन १८१७ च्या महिंदपुरच्या लढाईत महाराज हरिराव एक तुकडीचे प्रमुख होते. ते सन १८३४ ला होळकरांच्या गादीवर आले. त्यांचा हि इतिहास खूप रंजक आहे. हे त्यांच्या समाधीच्या स्वरुपावरूनच समजते. येथील समाधी समूहातील हि समाधी सर्वात मोठी असून मधोमध आहे. अदोगर फक्त या समाधीच्या संरक्षणासाठीच भव्य तटबंदी उभारण्यात अली होती. या समाधीचे बांधकाम महाराणी कृष्णाबाई होळकर यांच्या राज्यकाळात पूर्ण झाले.

गणगोर घाटावरील छत्रीबाग समाधीस्थळाचे मुख्यद्वार

हि समाधी महाराजा हरिराव होळकर यांची मुख्य समाधी होय. एका चोथऱ्यावर हि समाधी बांधण्यात आली असून असंख्य कथापट या समाधीच्या भिंतीवर कोरण्यात आले आहे. ज्यावर देव, देवी, आदर्श पुरुष आणि नर्तिका, गंधर्व या कल्पित कथा देखील कोरल्या गेलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि श्री राम यांच्याशी संबंधित असेलला घटना, द्रौपदी स्वामीवरची कथा देखील यावर कोरलेली आहे. समाधीच्या पाठीमागील बाजूला भव्य बारव आहे.

महाराजा हरिराव यांच्या समाधीच्या मागील बाजूस असलेली बारव
महाराजा हरिराव यांच्या समाधीची मागील बाजू, बारव व डाव्या बाजूला भाऊ होळकर यांची समाधी

समाधीचा चोथरा उंच असून त्यावरही चार बाजूने असंख्य शिल्प कोरल्यामुळे तो अतिशय शोभिवंत आणि सुंदर दिसत आहे. समाधीचा सभामंडळ सुरेख असून त्यामधील खांबावरील नक्षीकाम समाधीची शोभा वाढवताना दिसून येते. या खांबावर भगवान विष्णू आणि इतर हिंदू देव आणि देवीच्या मूर्ती कोरल्या आहेत. आदर्श राज पुरुष यांचे वर्णन करणारे सुरेखा शिल्प हि नजरेस पडते. समाधीच्या प्रवेशद्वारावर दोन भव्य द्वारपालही कोरले आहेत.

महाराजा हरिराव होळकर यांची समाधी

आपुन जेव्हा समाधीमध्ये प्रवेश करतो, एका बाजूला गरुडाचे शिल्प आहे आणि दुसर्‍या बाजूला वेणू गोपाळचे शिल्प सुंदर पाषाणावर कोरलेली आहे, त्यामुळे सभामंडपाची अजूनही शोभा वाढताना दिसून येते. समाधीच्या गर्भगृहाच्या आत मधोमध शिवपंड असून त्याच्या पाठीमागे महाराजा हरिराव होळकर व बाजूला त्यांच्या तीन बायकांची व समोर त्यांचे दत्तक पुत्र महाराजा खंडेराव होळकर यांची मूर्ती स्थापित केली आहे. समाधीचे शिखर मराठा शैलीच्या मंदिरासारखे आहे ज्याचा आकार रथसारखा दिसतो.

महाराजा हरिराव होळकर व त्यांच्या तीन पत्नी आणि समोर दत्तकपुत्र महाराजा खंडेराव यांच्या मूर्ती

शिखरावर सुंदर काम देखील केले आहे, संत आणि पवित्र व्यक्तींच्या बर्‍याच प्रतिमा समाधीवर कोरलेल्या आहेत. समाधीचे वरील बांधकाम द्रविड शैलीत असून उर्वरित बांधकाम नागर शैलीत आहे. समाधीच्या दुसऱ्या मजल्यावर शिखराशेजारी जाण्यासाठी प्रवेशद्वारापासून आतील बाजूने मार्ग आहेत. समाधी समोरील होळकरकालीन दगडी कारंजा व दीपमाळ हि आकर्षित आहे.

समाधीसमोरील होळकरकालीन कारंजा

B. राजा श्रीमंत सर काशीरावदादासाहेब होळकर(K.C.S.I) –

आपण जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून आत येतो तेव्हा डाव्या बाजूला कोपऱ्यात तिन तुळशी वृंदावन नजरेस पडते. हि समाधी सरदार काशिरावदादा यांची आहे. या समाधीच्या बांधणीमध्ये मराठा शैली नजरेस पडते. एका चोथऱ्याच्या मधोमध तिन तुळशी वृंदावन आहेत.

सर सरदार काशीरावदादा होळकर((K.C.S.I)) समाधी

या समाधीच्या पुढील बाजूस सर सरदार काशीरावदादा होळकर यांचे दहनस्थान आहे. त्या ठिकाणी एक चोथरा निर्माण केला आहे. सर सरदार काशीरावदादा होळकर हे होळकरशाहीचे ११ वे राजे महाराजा तुकोजीराव होळकर(द्वितीय) यांचे थोरले बंधू आहेत. त्यांनी इंदोर मध्ये सन १८६० ला पहिल्या खंडोबा मंदिराचा(मार्तंडबाग) निर्माण केला होता व १९ व्या शतकात ते “व्हाईस ऑफ कॉन्सिलचे” व्हाईस प्रेसिडेंट होते.

सर सरदार काशीरावदादा होळकर((K.C.S.I)) दहनस्थळ

C. श्रीमंत सरदार भाऊसाहेब होळकर –

सरदार भाऊसाहेब होळकर हे होळकरशाहीचे ११ वे राजे श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) यांचे वडील आहेत. सन १८१७ च्या महिंदपुर लढाईत सरदार भाऊसाहेब होळकर हि सामील होते. त्या लढाईत त्यांनी हि महत्त्वाची भूमिका बजावली होती. या समाधीचा निर्माण सर सरदार काशीराव दादा होळकर यांनी सन १८७४ च्या दरम्यान केला. या समाधीच्या बांधणीसाठी त्या काळी रुपये १०००० खर्च आला होता असा उल्लेख मिळतो.

सरदार भाऊसाहेब होळकर समाधी

सरदार भाऊसाहेब होळकर यांची समाधी हरिराव महाराज यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला असून सर सरदार काशिरावदादा यांच्या दहनस्थळाच्या पुढे आहे. या समाधीचे बांधकाम चोथऱ्यावर असून वेगवेगळी शिल्प हि बघायला मिळतात. समाधीची बांधणी मध्यम स्वरूपाची, मराठा शैलीप्रमाणे असून समाधीवर शिखर, पुढे सभामंडप आहे. समाधीमध्ये त्यांची मूर्ती व शिवपिंड आहे.

D. दिवाण तात्या जोग(विठ्ठलराव किबे) –

तात्या जोग हे होळकरांच्या घराण्यातील व्यक्ती नसून ते होळकरांचे दिवाण होते. हि एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांचे समाधीस्थळ होळकरांच्या समाधीस्थळात आहे. त्याला कारण हि तसेच आहे. त्यांनी होळकरशाहीला जे योगदान दिले त्याबद्दल हा त्यांचा सन्मान असावा असे म्हटले चालेल. त्यांचे महत्त्वाचे पराक्रम आपल्याला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या इतिहासात वाचायला मिळतात. जेव्हा सन १८०१-१८०२ ला होळकर-शिंदे वाद उफाळला होता, शिंद्यांनी इंदोर वर आक्रमण केले होते. त्यावेळी महाराजा यशवंतराव होळकर(१) उत्तरेत होते तेव्हा इंदोरला शिंद्यांच्या फोजेपासून सरदार तात्या जोग यांनी वाचवले होते. तसेच १८१७ च्या महिंदपुर युद्धात हि त्यांची भूमिका महत्त्वाची होती व त्यांनतर १८१८ मध्ये झालेल्या होळकर-इंग्रज करारावेळी हि ते उपस्थित होते. त्यांच्या स्मरणार्थ इंदोर शहरातील एका भागाला नाव हि देण्यात आले आहे.

सरदार तात्या जोग समाधी

तात्या जोग यांची समाधी हरिराव महाराज यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला असून सरदार भाऊसाहेब होळकर यांच्या समाधीच्या पुढे आहे. या समाधीची बांधणी मराठा शैलीप्रमाणे असून समाधीवर शिखर व पुढे सभामंडप दिसतो. समाधीची बांधणी हि सरदार भाऊसाहेब होळकर यांच्या समाधीपेक्षा थोड्या छोट्या स्वरूपाची आहे व त्यामध्ये फक्त शिवपिंड आहे.

भाऊसाहेव होळकर, तात्या जोग, खंडेराव महाराज व बाजूची अनोळखी समाधी चोथरा

E. श्रीमंत महाराजा खंडेराव होळकर –

महाराजा खंडेराव होळकर हे होळकरशाहीचे १० वे राजे होते. त्यांचा हि राजकाल १ वर्ष असा अल्पवधीचा होता. त्यांचे ज्या ठिकाणी दहन करण्यात आले त्याठिकाणी हि वास्तू उभारण्यात आली. हि वास्तू हरिराव महाराज यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला असून सरदार तात्या जोग यांच्या समाधीच्या पुढे आहे.

महाराजा खंडेराव होळकर दहनस्थळ व समाधी

काही कालावधीनंतर महाराजा खंडेराव होळकर यांची मूर्ती महाराजा हरिराव होळकर यांच्या समाधीमध्ये स्थापन करण्यात आली. महाराजा खंडेराव होळकर यांना महाराज हरिराव यांनी दत्तक घेतल्यामुळे पित्यासमोर मुलाची मूर्ती बसवण्यात आली.

महाराजा खंडेराव होळकर दहनस्थळासमोर तात्या जोग व बाजूला मोठी हरिराव महाराजांची समाधी

F. श्रीमंत महाराजा हरिराव व जिजीबाई साहेब होळकर दहनस्थळ –

हि दहनस्थळे महाराजा हरिराव यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला असून सरदार तात्या जोग यांच्या समाधीच्या उजव्या बाजूला आहे. हे दोन दगडी चोथरे महाराजा हरिराव होळकर व श्रीमंत जिजीसाहेब होळकर यांचे दहनस्थळ आहे. सरदार तात्या जोग यांच्या समाधी कडील चोथरा हा श्रीमंत जिजीसाहेब यांचे दहनस्थळ असून त्या बाजूचा चोथरा महाराजा हरिराव होळकर यांचे दहनस्थळ आहे. श्रीमंत जिजीसाहेब यांची अजून हि ओळख पटली नाही. जर आपल्याला माहित असेल तर आम्हला संपर्क करावा.

महाराजा हरिराव व श्रीमंत जिजीसाहेब होळकर यांचे दहनस्थळ

G. डाव्या बाजूची अनोळखी समाधी –

हि समाधी हरिराव महाराज यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला असून महाराजा खंडेराव होळकर यांच्या समाधीच्या बाजूला आहे. हि कोणाची समाधी आहे याची ओळख पटली नाही मात्र हि समाधी होळकर घराण्यातील एखाद्या महाराणीची असावी. प्रथम दर्शनी हा एक दगडी चोथरा असून, जर तुम्हला या बद्दल माहिती असेल तर आम्हाला कळवावे.

डाव्या बाजूची अनोळखी समाधी

H. श्रीमंत महाराजा तुकोजीराव(२) यांच्या मुलीची समाधी –

आपण जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून आत येतो तेव्हा उजव्या बाजूला हि समाधी दिसून येते. हि समाधी होळकरशाहीचे ११ वे राजे महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) यांच्या मुलीची आहे. हि समाधी नक्की कोणत्या मुलीची आहे त्याचे अजून हि उल्लेख मिळत नाही. एका दगडी चोथऱ्यावर छोटस पण देखणी वास्तू निर्मण केली आहे. चोथऱ्यावरील नंदी व शिखरावरील नक्षीकाम सुंदर आहे.

महाराजा तुकोजीराव(२) यांच्या मुलीची समाधी

I. श्रीमंत रक्माबाई होळकर –

हि समाधी हरिराव महाराज यांच्या समाधीच्या उजव्या बाजूला असून महाराजा तुकोजीराव(२) यांच्या मुलीच्या समाधीच्या पुढील बाजूस आहे. श्रीमंत रक्माबाई होळकर यांची अजून हि ओळख पटली नाही. जर आपल्याला माहित असेल तर आम्हला संपर्क करावा. एका चोथऱ्यावर हि अष्टकोनी घुमटी शैलीची समाधी असून त्यावर आठ शिल्प व शिल्पपट आहे. आठही शिल्पांची छबी एकप्रकारे आहे. शिखराचा आकार कमळाकृती आहे.

श्रीमंत रक्माबाई होळकर समाधी

J. श्रीमंत लक्ष्मीबाई होळकर –

हि समाधी हरिराव महाराज यांच्या समाधीच्या उजव्या बाजूला असून श्रीमंत रक्माबाई होळकर यांच्या समाधीच्या पुढील बाजूस आहे. श्रीमंत लक्ष्मीबाई होळकर या सर सरदार काशिरावदादा होळकर यांच्या पत्नी आहेत. एक छोटासा दगडी चोथरा उभारण्यात आला आहे.

K. उजव्या बाजूच्या अनोळखी समाध्या –

या समाध्या हरिराव महाराज यांच्या समाधीच्या उजव्या दिशेच्या पुढील बाजूस आहेत. या ठिकाणी एक तुळशीवृदांवन असून दोन दगडी चोथरे आहेत. त्यावर शिवपिंड व नंदीचे छोटेसे शिल्प नजरेस पडते. या वास्तू कोणाच्या आहेत याची अजूनही ओळख पटली नाही मात्र या हि वास्तू होळकर घराण्यातील स्त्रियांचीच असावीत.

उजव्या बाजूच्या अनोळखी समाध्या

अलीकडच्या काळात हरिराव महाराज छत्री समुहाचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला. अचानक होत असलेल्या विकास कामांमुळे हा छत्री परिसर विकला कि काय अशा अफवा पसरू लागल्या होत्या मात्र तसे काहीही नव्हते. मध्यप्रदेश व राजस्थान शासन तेथील राजघराण्याला आपल्या मालकीच्या ऐतिहासिक वास्तू विकण्याची परवानगी देते. त्यांचे काय कारण आहे हे वाचण्यासाठी Heritage Properites India व उत्तरेतील चालू घडामोडी वाचण्यासाठी Vision IAS Current Affairs या Website ला भेट द्या.

महाराजा हरिराव समाधीस्थळ समूहाची पाठीमागील बाजूची तटबंदी, प्रवेशद्वार व गणगोर नदीघाट

कधी इंदोरला आला तर या समाधीवास्तू नक्की पहा. खाली Google Map दिला आहे.

३. कृष्णापूरा छत्री समाधीसमूह :

कृष्णपुरा छत्रीबाग हा होळकर राजघराण्याचा तिसरा समाधी समूह असून कान्हा व सरस्वती नदीच्या संगमावर या समाध्या उभारण्यात आल्या आहेत. सुरेख समाध्या व भव्य नदीघाट यामुळे या परिसरात खूप वर्दळ दिसून येते. या समाधी समूहात पुढील समाधी आहेत, A.श्रीमंत महाराणी कृष्णाबाई होळकर,
B.श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर(२),
C.श्रीमंत महाराजा शिवाजीराव होळकर,
D.श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर(२),
E.श्रीमंत राजकुमारी मनोरमाराजे होळकर.

कृष्णापूरा छत्री समाधीसमूह

A. श्रीमंत महाराणी कृष्णाबाई होळकर –

महाराणी कृष्णाबाई होळकर यांची समाधी सर्वप्रथम येथे निर्माण केली गेली त्यामुळे या भागाला “कृष्णापूरा छत्री” असे म्हणतात. महाराणी कृष्णाबाई होळकर उर्फ केसरबाई होळकर या महाराजा यशवंतराव होळकर(पहिले) यांच्या पत्नी आहेत. १८१८ नंतर होळकरशाही कोणामुळे अस्तित्वात राहिली असेल तर फक्त एकच नाव समोर येते ते म्हणजे महाराणी कृष्णाबाई होळकर. त्यांना दुसरी अहिल्या पण म्हटलं जाते. १९ व्या शतकात त्यांना होळकरशाहीच्या खाजगी जहागिरीचे अधिकार प्राप्त झाले होते.

महाराणी कृष्णाबाई होळकर समाधी

या समाधीचा निर्माण श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय यांनी सन १८४९ च्या दरम्यान केला होता. महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय यांना महाराणी कृष्णाबाई होळकर यांनी दत्तक घेतले होते.

महाराणी कृष्णाबाई होळकर समाधी वरील शिल्प

महाराणी कृष्णाबाई होळकर यांची समाधी एका उंच चोथऱ्यावर असून त्याची उंची साधारण ६ ते ८ फूट आहे. या समाधीच्या बांधकाम शैलीत मुघल, मराठा आणि राजपूत शैलीचे मिश्रण दिसते. समाधी छत्रीच्या प्रवेशद्वारावर अतिशय सुंदर दगडी नक्षीकाम असून गणेशाच्या शिल्पासह अनेक संगमरवरी मुर्त्या बघायला मिळतात.

महाराणी कृष्णाबाई होळकर समाधी वरील शिल्प

हे सर्व नक्षीकामाची शैली हि मराठा बांधणीची आहे. समाधीच्या चोथऱ्यावर चोहूबाजूने द्वारपाल, भगवान कृष्ण आणि गायींच्या शिल्प आहेत. त्याच्या अवतीभोवती असलेले कोरीव काम हि उत्कृष्ट आहे. समाधी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांचे शिल्प कोरलेले असून त्यांनी मराठा ठेवीचे कपडे परिधान केले आहे.

महाराणी कृष्णाबाई होळकर समाधी वरील शिल्प

जेव्हा आपुन मध्यभागी प्रवेश करतो तेव्हा आपल्याला नंदी नजरेस पडतो. नंदीवरील कोरीव काम हे सुरेख असून पूर्ण बांधकाम हे संगमरवरी मध्ये आहे तसेच दुहेरी खांब कमानीसह जोडलेले दिसतात.

महाराणी कृष्णाबाई होळकर समाधी मधील नंदी

समाधीचे शिखर, गर्भगृह व सभामंडप असे भाग पडतात. त्यापैकी शिखर, गर्भगृह व सभामंडपाच्या बाह्य बाजूने असंख्य हिंदू देव देवतेच्या शिल्प पाहावयास मिळतात. तसेच सभामंड्प हा अष्टकोनी असून त्यामध्ये दुहेरी बांधणीचे ३६ खांब आहेत. सभामंडपाच्या आतील बाजूस हि काही शिल्प बघायला मिळतात ज्यामध्ये अर्धनारीश्वर, लक्ष्मी आणि महालक्ष्मी यांचे शिल्प भिंतींवर कोरलेले आहेत.

महाराणी कृष्णाबाई होळकर समाधी वरील शिल्प

या समाधीच्या बांधकामात थोडेफार ओरिसाच्या मंदिरांच्या स्थापत्य शैलीचे प्रतिबिंब दिसून येते. समाधीच्या गर्भगृहापासून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग आहे. त्या मार्गे एका वेळी एकच व्यक्ती समाधीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊ शकतो. महाराणी कृष्णाबाई यांनीही अनेक लोक कल्याणकारी कार्य केली आहेत. होळकर राजवाड्याच्या बाजूलाच तेवढ्या आकाराचा त्यांनी बांधलेला गोपाल वाडा व मंदिर यावरून त्यांचे व्यक्तिमत्व समजून येते. सन १८१८ ते १८४९ पर्यंत त्यांनी राणी अहिल्यादेवींप्रमाणे रिजंट महाराणी म्हणून राज्यकारभार पहिला तसेच त्यांचा स्वतःचा शिक्का होता. त्यावर खालील उल्लेख आहे.

श्री म्हाळसाकांत चरणीतत्पर अहिल्याबाई कारकीर्द, कृष्णाबाई होळकर.

B. श्रीमंत तुकोजीराव(दुसरे) व शिवाजीराव होळकर –

महाराणी कृष्णाबाई होळकर यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला आपल्याला हि जोड समाधी पहावयास मिळते. मात्र सुरुवातीला महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) यांची समाधी होती. जिचा निर्माण महाराजा शिवाजीराव होळकर यांनी सन १८८६ च्या दरम्यान केला होता. ते तुकोजीराव(दुसरे) यांचे पुत्र होते. पुढे सन १९०३ च्या दरम्यान महाराजा शिवाजीराव होळकर यांच्या समाधीचा निर्माण करण्यात आला. जिचा निर्माण महाराजा तुकोजीराव(तिसरे) यांनी केला. ते शिवाजीराव महाराज यांचे पुत्र होय. अशाप्रकारे हि पिता पुत्राची समाधी एकसंध बांधण्यात आली याचे कारण त्या दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम.

महाराजा तुकोजीराव(२) व महाराजा शिवाजीराव होळकर संयुक्त समाधी

या संयुक्त समाधीच्या दोन्ही गर्भगृहात अनुक्रमे महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) व महाराजा शिवाजीराव होळकर यांच्या मूर्ती आहेत. महाराजा तुकोजीराव(२) यांची मूर्ती एका चोथऱ्यावर असून त्या समोर महाराणी कृष्णाबाईंची दोन्ही हातांनी पाणी शिवपिंडावर वाहत आहेत अशा स्वरूपात सुंदर छबीतील संगमरवरी मूर्ती आहे. हि सर्व स्थपणा महाराजा शिवाजीराव होळकर यांनी केली होती.

महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) व समोर महाराणी कृष्णाबाई यांची मूर्ती

हि संयुक्त समाधी एका उंच अशा चोथऱ्यावर असून पूर्ण काम हे लाल दगडात आहे. या समाधीचा सभामंडप खूप मोठा असून दोन्ही समाधीच्या शिखरांवर असंख्य मुर्त्या कोरलेल्या दिसून येतात.

महाराजा तुकोजीराव(२) व महाराजा शिवाजीराव समाधीतील सभामंडप

दोन्ही समाधीच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस असलेले द्वारपालांचे शिल्प लक्ष वेधून घेते. या समाधी मधील द्वारपालांची उंची साधारण ५ फूट एवढी आहे. त्यांच्या डोळ्यांची कलाकृती खूप आकर्षित कोरलेली आहे.

समाधीतील द्वारपालाचे भव्य शिल्प

दोन्ही समाधीच्या गर्भगृहा समोर संगमरवरी नंदी बघायला मिळतो. नंदीच्या शिल्पावरील नक्षीकाम व घंटा आकर्षित आहे.

समाधीमधील नंदी

होळकरशाहीचे ८ वे राजे महाराजा मार्तंडराव होळकर यांना अवघ्या १ वर्षाच्या कालावधीनंतर सन १८३४ ला होळकरशाहीच्या गादीवरून पायउतार व्हावे लागले होते तेव्हा त्यांना सन १८३५ ला इंदोरहुन पुण्याकडे कायमचे रवाना करण्यात आले होते. त्यांना पुण्याला सोडण्यासाठी इंदोरहून काही सरदार मंडळी त्यांच्याबरोबर आली होती त्यामध्ये सरदार भाऊसाहेब होळकर पण होते. या सर्वांचा मुक्काम ३ ते ४ महिने करंजी(खुर्द) या होळकरांच्या खाजगी वतन असलेल्या गावी पडला होता तेव्हा प्रवासात ३ जून १८३५ ला महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) यांचा जन्म करंजी(खुर्द), ता.निफाड जि.नाशिक येथे झाला. पुढे काही दिवसांनी महाराजा मार्तंडराव होळकर यांना पुण्याला पोहच करण्यात आले. त्यांचे उर्वरित सर्व आयुष्य पुण्यातील होळकर वाड्यात गेले तेथेच ते सन १८३९ ला निपुत्रिक वारले. त्यांची समाधी अद्यापही भेटत नसून त्यांना मरेपर्यंत होळकर स्टेट कडून ५०० रु. पेन्शन मिळत होती.

होळकरशाहीचे ११ वे राजे

महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे)

२७ जून १८४४ ला सरदार भाऊ होळकर यांचे पुत्र मल्हारी यास महाराणी कृष्णाबाई होळकर यांनी दत्तक घेऊन होळकरशीचे ११ वे महाराजा म्हणून घोषित केले व तेव्हा पासून ते महाराजा तुकोजीराव होळकर(द्वितीय) या नावाने ओळखले जाऊ लागले. महाराणी कृष्णाबाई यांनी हे नाव आपले सासरे सुभेदार तुकोजीराव होळकर(प्रथम) यांच्या समरणार्थ ठेवले होते.

हे पुस्तक Online Order करण्यासाठी Click करा

महाराजा तुकोजीराव होळकर(द्वितीय) यांच्या काळातच होळकरशाहीच्या भरभराटीला पुन्हा सुरुवात झाली. त्यांना आपुन आधुनिक इंदोरचे जनक म्हणू शकतो. यांनीच ब्रिटिशांना रेल्वेसाठी कर्ज दिले होते. यांच्याच काळात इंदोर संस्थानात रेल्वे बांधकाम पूर्ण झाले, अनेक कपड्यांच्या गिरणी सुरु करण्यात आल्या तसेच त्यांनी “अकरा पंच संस्थेला” पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिले. यांच्या राज्यकाळात इंदोर संस्थानानेही सन १८५७ च्या उठावात भाग घेतला होता. अधिक माहितीसाठी खालील विडिओ नक्की पहा. त्यांचा मृत्यू १७ जून १८८६ ला महेश्वर येथे झाला.

महाराजा तुकोजीराव होळकर(द्वितीय) यांचा संमग्र इतिहास

महाराजा शिवाजीराव होळकर हे होळकरशाहीचे १२ वे राजे होते. त्यांनी आपल्या पित्याची परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांचा ब्रिटिशांना असलेला उघडपणे विरोध हे सर्वांना माहित आहे. “फुटीकोठी” या सारख्या लष्करी वास्तूवरुन त्यांचा ब्रिटिश विरोध आपल्याला समजून येतो.

होळकरशाहीचे १२ वे राजे

महाराजा शिवाजीराव होळकर

फुटीकोठी बांधून पूर्ण झाली असते तर आज भारतातील सर्वांत उंच वास्तू ती बनली असती मात्र ब्रिटिशांनी फुटीकोठीचे काम पहिल्याच टप्यावर थांबवले. खरे तर महाराजा शिवाजीराव होळकर हे संस्थानाचे शेवटचे राजे होते. महेश्वर येथे त्यांच मृत्यू सन १९०३ ला झाल्यांनतर इंग्रज रेसिडेन्सी यांच्या अध्यक्षतेखाली इंदोर संस्थानात कॉन्सिल ऑफ रेसिडेन्सीची नियुक्ती झाली.

फुटीकोठीचा Video पहा

C. श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर(दुसरे) –

महाराणी कृष्णाबाई होळकर यांच्या समाधीच्या उजव्या बाजूला महाराज यशवंतराव होळकर(दुसरे) यांची समाधी आहे. ते होळकरशाहीचे १४ वे म्हणजे शेवटचे राजे होते.

महाराज यशवंतराव होळकर(दुसरे) समाधी

महाराजा यशवंतराव होळकर(दुसरे) यांची समाधी आकाराने लहान असून संपूर्ण बांधकाम लाल दगडात आहे. समाधीचे खांब लहान असून त्यावरील नक्षीकाम व त्याचे दुहेरी एकसंध बांधणीमुळे खूप आकर्षित वाटतात. समाधीवर शिखर असून गर्भगृहात महाराजा यशवंतराव यांची मूर्ती असून पुढे शिवलिंग आहे. हि समाधी एका चोथऱ्यावर असून चोथरा लहान आहे.

महाराज यशवंतराव होळकर(दुसरे) यांची मूर्ती

महाराजा यशवंतराव होळकर(दुसरे) यांच्या बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर यांच्या काळात होळकर संस्थान भारतात विलीन झाले. जो धनगर राजकुमार व मराठा राजकुमारीचा आंतरजातीय विवाह सांगितला जातो त्यातील धनगर राजकुमार म्हणजेच महाराज यशवंतराव होळकर(दुसरे) होय.

होळकरशाहीचे १४ वे राजे

महाराजा यशवंतराव होळकर(दुसरे)

कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या मृत्यूनंतर हा अविस्मरणीय आंतरजातीय विवाह सोहळा पार पाडण्याची जबाबदारी त्यांचे वडील, होळकरशाहीचे १३ वे राजे महाराजा तुकोजीराव होळकर(तिसरे) यांनी जिकरीने पार पाडली होती. हा विवाह खरं तर साटेलोटे विवाह होता. महाराजा तुकोजीरावांनी(तिसरे) आपली मुलगी पण त्यावेळेस घाटगे घराण्यात सून म्हणून दिली होती. महाराजा तुकोजीराव होळकर(तिसरे) यांचा मृत्यू सन १९७८ ला प्रदेशात झाला व त्यांनतर त्यांचे दहन छत्रीबाग पहिल्या समूहात केले गेले. त्यांची समाधी बांधण्यात आली नाही.

होळकरशाहीचे १३ वे राजे

महाराजा तुकोजीराव होळकर(तिसरे)

D. श्रीमंत राजकुमारी मनोरमाराजे होळकर –

राजकुमारी मनोरमाराजे होळकर या महाराजा तुकोजीराव होळकर(तिसरे) यांची कन्या आहे. या समाधीचा निर्माण त्यांचे बंधू महाराजा यशवंतराव होळकर(दुसरे) यांनी सन १९५४ ला केला. समाधीचे संपूर्ण बांधकाम हे संगमरवरी मध्ये असून तिचा आकार छोटासा आहे. समाधीला शिखर, गर्भगृह व सभामंडप आहे. समाधीमध्ये त्यांची मूर्ती व शिवपिंड आहे.

राजकुमारी मनोरमाराजे होळकर समाधी

राजकुमारी मनोरमाराजे होळकर यांची मूर्ती

कृष्णापुरा छत्री Video नक्की बघा

कधी इंदोरला आला तर या समाधीवास्तू नक्की पहा. खाली Google Map दिला आहे.

इंदोर मधील अन्य समाधीस्थळे :

सरदार चिमणाजी अप्पासाहेब बुळे –

या व्यतिरिक्त होळकरशाहीतील जे महत्त्वाचे सरंजाम सरदार होते त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे “बुळे घराणे” उर्फ “बोलीया सरकार”. बुळे घराण्यातील एक भव्य समाधी इंदोर मध्ये बघायला मिळते. हि समाधी होळकरशाहीचे सरंजाम सरदार चिमणाजी अप्पासाहेब बुळे यांची असून ती कृष्णपुरा छत्रीच्या विरूद्ध दिशेला नदीच्या पलीकडच्या काठावर आहे. शहरीकरणामध्ये हि समाधी सध्या हारऊन गेली आहे.

सरदार चिमणाजी अप्पासाहेब बुळे समाधी

पूर्वी समाधीला मजबूत कोट व भव्य दुमजली प्रवेशदार होते. मात्र सध्या समाधी कोटाची अवस्था बिकट असून प्रवेशद्वार साबूत आहे. सन २०१८ पासून, इंदोर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत या समाधीचा विकास मोठयाप्रमाणात सुरु असून समाधीमध्ये चिमणाजी बुळे व त्यांच्या दोन बायकांची मूर्ती आहेत.

बुळे समाधीच्या तटबंदीचे प्रवेशद्वार

समाधीच्या बांधकामात राजपूत शैली दिसून येते तर असंख्य शिल्पा कृती कोरलेली आहे. समाधीचा आकार घुमटा प्रमाणे असून उंचीला सर्वात मोठी समाधी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सरदार चिमणाजी अप्पासाहेब बुळे हे महाराजा यशवंतराव होळकर(पहिले) यांचे नातू व भीमाबाई होळकर-बुळे याचे पुत्र होते. या समाधीचा निर्माण सरदार नारायणराव बुळे यांनी सन १८५८ रोजी केला.

बुळे सरकार छत्री Video

कधी इंदोरला आला तर हि समाधीवास्तू नक्की पहा. खाली Google Map दिला आहे.

श्रीमंत गौतमाबाई होळकर-बारगळ –

श्रीमंत गौतमाबाई होळकर-बारगळ या होळकरशाही संस्थापक श्रीमंत थोरले मल्हारराव होळकर यांच्या पत्नी असून त्यांचा मृत्यू सन १७६१ च्या दरम्यान झाला होता. त्यांची समाधी इंदोर मधील पिपलीया तलावाच्या शेजारी आहे. समाधी साधेसुधी असून एखाद्या मंदिराप्रमाणे आहे. समाधीमध्ये एक शिवपिंड आहे.

एक विशेष गोष्ट म्हणजे होळकरशाहीतील १८ व्या व १९ व्या शतकात ज्या महत्त्वाच्या व्यक्ती होऊन गेल्या त्यांची मुख्य समाधी या इंदोर शहरात नसून इतर ठिकाणी आहेत. ते खालीलप्रमाणे,
  • सरदार खंडेराव होळकर – गांगरसोली, ता.कुंभेर जि.भरतपूर(राजस्थान),
  • सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) – आलमपूर, ता.लहार जि.भिंड(मध्यप्रदेश),
  • सुभेदार तुकोजीराव होळकर(पहिले) – खडकी-पिपरीचिंचवड जि.पुणे(महाराष्ट्र),
  • महाराणी अहिल्यादेवी होळकर – महेश्वर, जि.खरगोण (मध्यप्रदेश),
  • महाराजा यशवंतराव होळकर(पहिले) – भानपुरा, जि.,मंदसोर(मध्यप्रदेश),
  • महाराणी तुळसाबाई साहिबा होळकर – महिंदपुर, जि.उज्जेन(मध्यप्रदेश),
  • वीरांगना भीमाबाई बुळे-होळकर – समाधी शोध चालू आहे.
आभार व संदर्भ
श्रीमंत भूषणसिंह महाराज होळकर,
होळकरशाहीचा इतिहास भाग -१, लेखक – व. वा. ठाकूर

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


राणी अहिल्यादेवी होळकरांनी भारतभर केलेल्या लोककल्याणकारी कार्यांची यादी पहा.
अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी कार्य

राहुल वावरे

2 thoughts on “इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे”

  1. रोहिणी मतंगे

    नमस्कार प्लिज श्रीमंत तुकोजीराव होळकर तृतीय याच्या 3 ऱ्या पत्नी इंदिराबाई होळकर यांची कारकीर्द मजणजे कार्य लिहावे कारण मी आत्ता मांनगाव जिल्हा सिंधुदूर्ग येतील श्रध्देय टेम्बेस्वामी मन्दिर इंदिराबाई नी बनवले आहे असा उल्लेख आहे मी इंडोरची आहे पण दर्शनाला गेले होते
    समाधान वाटले की होळकर घराणे खूप दानी आहे हे प्रखरपणे जाणवले ।
    प्लिज या राणीसाहेब चा कारकीर्द उल्लेख देणार का प्लिज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *