Skip to content

वाफगावचे एक बुंदकी व दु बुंदकी नाणे

“श्री मल्हारराव चरणी तत्पर खंडोजी सुत मालेराव होळकर”

महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी असलेले वाफगाव ऐतिहासिकरित्या महत्त्वाचे असुन होळकर रियासतीचा अभ्यास करतांना मराठा कालखंडात होळकरांच्या वाफगावचा मोठा इतिहास समोर येत आहे.

खरे तर शिवनेरी पासुन जवळ असलेला वाफगाव भुईकोट इतिहासकार आणि संशोधकांच्या नजरेतून दुर्लक्षित व्हावा याचे मोठे दुर्दैव वाटते. सुभेदार मल्हारराव महाराज होळकर यांनी वाफगाव भुईकोट हा स्वतःच्या कौशल्याने निर्माण केला होता.

ज्यात भलामोठा दरबार आहे. वाफगाव भुईकोटातील राजदरबारासारखा मोठा राजदरबार अन्य कुठेही पहायला मिळत नाही. चांदवड, वाफगाव, मांडवगण सिध्देश्वर, सेंधवा, इंदुर या ठिकाणी भव्यदिव्य स्वरुपाचे किल्ले निर्माण केले तर काही जुन्या किल्ल्यांचा जीर्नोद्धार करुन ते वापरात आणले.

होळकरांच्या इतिहासातून किल्ल्यांचा इतिहास कधीच वाचायला न मिळाल्याने वाचकांची धारणा केवळ इंदुरच्या राजवाड्याइतकी मर्यादित झाली असावी. चांदवड येथे होळकरांच्या टांकसाळीतील नाणे त्याकाळी विश्वासू आणि लोकप्रिय नाणे होते त्यामुळे आजही लोक खणखणीत चांदवडी रुपयाचांच दाखला देत असतात.

चांदवडी रुपया नावाने हे नाणे प्रसिद्ध असून चांदवडच्या किल्ल्यावर तसेच गावात टांकसाळ तयार करण्यात येवून नाणी पाडण्यात येत असे पुढे श्रीमंत तुकोजीराव महाराज होळकर यांनी वाफगाव येथे टाकसाळ सुरू केली. तेथे एक बुंदकी व दो बुंदकी नाणे पाडण्यात येवू लागले या बुंदकी नाण्यांचे मुल्यही मोठे होते.

लष्कराच्या पगारासाठी नाणे पाडण्यात येत असल्याची माहिती दिलीप प्रभाकर बलसेकर यांच्या पेशवेकालीन महाराष्ट्रातील टांकसाळी, त्यांचे व्यवस्थापन आणि नाणी या शोध निबंधात वाचायला मिळते. वाफगाव टाकसाळीत तयार झालेले चांदीचे नाणे दुर्मिळ असुन ते माझ्या वैयक्तिक संग्रहात अभ्यासासाठी सुरक्षित आहे.

शाह आलम दुसरा नावे ही नाणी तयार केली जात असे तर १७७४ पासुन नाणी पाडायला सुरवात झाल्यानंतर ती सलग १७९७ पर्यत सुरू होते मात्र श्रीमंत तुकोजीराव महाराज यांच्या निधनानंतर पुढे एक वर्षे भर नाणी पाडण्यात आली आणि मल्हारगर्दी झाल्यानंतर नाना फडणवीस यांनी वाफगावची सर्व नाणी पुणे येथे हलवली होती.

याच नाण्यांचा मल्हारगर्दीत मारल्या गेलेल्या तुकोजीपुत्र मल्हाररावांच्या पत्नीने स्वतःच्या सुरक्षेस वापर केला.सुभेदार काशिराव होळकर यांनी आपल्या भावजयीसह होळकर परिवारातील इतर सदस्यांना नजरकैदेत ठेवले होते. दौलतराव शिंदे,दुसरा बाजीराव आणि काशिराव होळकरांच्या नजरकैदेत असतांना लाडाबाई, हरिराव, भीमाबाई यमुनाबाई सुरक्षित राहिले.

यासाठी नाना फडणवीस यांची गुप्तपणे मदत झाली. तुकोजीराव होळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नंतर मालेराव यांच्या नावाने गादी सांभाळली असुन त्यांच्या पत्रावर “श्री मल्हारराव चरणी तत्पर खंडोजी सुत मालेराव होळकर” असा शिक्का असायचा.

होळकरशाहीतील सर्वांनी आपपल्या कारकिर्दीत नाणे पाडले मात्र मालेरावांच्या नावाने नाणे सापडत नाहीत तसेच होळकरांचे सरदार संताजी राजे वाघ यांच्या घराण्याला नाणी पाडण्याचा अधिकार होता ही नाणी होळकरांची असली तरी राजेवाघ यांचा प्रभाव होता. महिदपुर टाकसाळीत ही नाणी पाडली जात असे.

होळकरांच्या नाण्यांवर इंदुर राजघराण्यांचे प्रिन्स श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराज तसेच डाँ.पी.के.सेठी व डाँ.शशिकांत भट यांनी मिळून A STUDY OF HOLKAR STATE COINACE पुस्तक लिहलेले आहे त्यात होळकर राजघराण्यांच्या नाण्यांचा सविस्तर तपशील आहे.

पुणे शहरापासून २० कि. मी. अंतरावर असलेले हे एक मोठे गाव. या ठिकाणी डिसेंबर १७७४ मध्ये तुकोजी होळकर यांनी आपली टांकसाळ स्थापन करून येथे पाडण्यात येणाऱ्या नाण्यांद्वारे त्यांच्या लष्कराच्या वेतनासाठी वापर करावा, असा आदेश दिला होता.

क्लुन्सनी नमूद केल्याप्रमाणे येथे दोन प्रकारची नाणी पाडण्यात येत असत. १) वाफगावी एक बुंदकी, २) वाफगावी दो बुंदकी. कालांतराने या नाण्यास चांदवड असाही नामोल्लेख करण्यात येत होता. कारण ही नाणी अगदी चांदवडी रुपयाप्रमाणे होती.

प्रिन्सपेच्या सूचीप्रमाणे वाफगावी रुपये १७२.५५ ग्रेन्स ( ११.१८ ग्रॅम ) वजनाची होती. ही दख्खन प्रांतात प्रचलित होती. या नाण्यांच्या जुलूस या शब्दाखाली एक बिंदू पहावयास मिळतो. तर वरील प्रमाणीत दोन प्रकारच्या नाण्यावर जुलूसखाली दोन बिदू आढळतात.

येथील सर्वात अगोदरचे नाणे शाह आलम दुसरा( इ.स.१७७०-७१) राजवर्ष १२ असलेले आहे व त्यावर टांकसाळीचे नाव अस्पष्टपणे जाफराबाद ऊर्फ : असे आढळते. प्रकार क्रमांक २ ही नाणी क्लुन्सच्या मते तुकोजी होळकर यांनी नंतरच्या काळात पाडली असावीत.

जी बऱ्याच संख्येत नाना फडणीस यांनी पुण्यात आणली होती कारण जेव्हा इ.स. १७९५-९६ मध्ये दौलतराव शिंदे पुण्यात आले होते त्यावेळी नुकतेच दुसरे बाजीराव हे पेशवे पदावर आले होते.

त्यांनी पुणे टांकसाळ व्यवस्थितपणे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. याचाच अर्थ पुणे येथे नाण्यांची कमतरता भासू लागल्यामुळे वाफगाव टांकसाळीतून नाणी पुणे येथे आयात करण्यात आली असावीत. दिलीप बलसेकर यांनी आपल्या प्रबंधातुन वाफगावच्या टाकसाळी बद्दल माहिती दिल्याने लुप्त झालेले एक बुंदकी आणि दुबंदकी नाणे समोर येवू शकले.

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


होळकरशाहीची उत्कृष्ट पुस्तके Online Order करण्यासाठी भेट द्या.
Ahilyabai Holkar Books in Marathi

रामभाऊ लांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *