Skip to content

होळकरकालीन बोहाळी

बोहाळी, ता.पंढरपूर जि.सोलापूर(महाराष्ट्र) : होळकरशाहीचा इतिहास व होळकरशाहीच्या इतिहासाचे साधने पुस्तकात बोहाळी गावचा उल्लेख ब-याचवेळी वाचण्यात येत असे मात्र बोहाळी बाबत कुणाकडे ही फारशी माहिती मिळत नव्हती. मात्र बोहाळी ला प्रत्यक्षात भेट देवून अज्ञात इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

बोहाळी गाव पंढरपूर आणि सांगोला तालुक्याच्या सीमेवर असुन पंढरपूर सांगोला रस्त्यावर असलेल्या खर्डी गावातून बोहाळी येथे रस्ता जातो. गावात दत्त आणि सीता रामचे मंदिर असुन काळाच्या ओघात लोक गावचा इतिहास विसरले असुन केवळ अहिल्यादेवीची बारव गावात आहे एवढाच काय तो इतिहास सांगत असतात.

गावात सीता-राम व हनुमानाचे भव्यदिव्य मंदिर होते त्या मंदिराची दिवाबत्ती करणाऱ्या गुरव, पुजारी तसेच देवस्थानला स्वतंत्र स्वरूपात जमिनी इनाम दिल्या होत्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पशुपक्षांसाठी जे राखीव कुरणे ठेवली होती त्यापैकीच एक कुरण या बोहाळी गावी असुन त्यास “बाग”असे नाव पडलेले आहे.

होळकरकालीन बोहाळी

या राखीव कुरणात पीक पिकवून ती पशुपक्षांना खावु घालावी तसेच देवाला नैवेद्य दाखवावा आणि उरलेले गायी बैलांना चारा म्हणून खावु घालावा असा उपयोग या बागाचा उपयोग करण्याकरीता फडके नामक पुजाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली होती मात्र श्री फडके यांनी मंदिराच्या इनामी जमिनी हळूहळू विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समजला.

श्रीराम पत्नी सीतेचे मंदिर निर्माण करतांना तेथे सुंदर पितळी मुर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती मात्र १९७२ दरम्यान मुर्त्यांची चोरी झाल्याचे समजले.

मंदिरासमोर असलेली दिपमाळ शेवटची घटका मोजीत असुन शेजारी तीन वीरगळ व नागशिळा आढळून येते मात्र कुणीतरी गावकऱ्यांना विरगळीबाबत चुकीची माहिती देवून ते दगड नवग्रह आहेत असे सांगितले मात्र मी गावकऱ्यांना सत्य सांगून वीरगळ असल्याचे पटवून दिले.

सीतेचे मंदिर पडले असुन आता फक्त प्रवेशद्वार शिल्लक आहे तर मुळमंदिराच्या जागेवर नवीन मंदिर बांधलेले असुन पूजा अर्चा गुरव करतात. सभामंडप नष्ट झाला असुन त्यावर पत्राचे शेड बनवलेले आहे.

बोहाळीचा आणि होळकरांचा संबंध कसा हा ही प्रश्न उपस्थित होतो. तर बोहाळीच्या कारागिरांनी पंढरपूरच्या होळकरवाड्याचे लाकडी काम केल्याने अहिल्यादेवीनी त्यांचा यथोचित गौरव करुन बोहाळी गावाचा कायापालट केला.

शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला ही बोहाळी गावात ४० एकर अहिल्यादेवीनी इनाम स्वरूपात वाहिलेली आहे तसेच होळकरांच्या वतीने शिखर शिंगणापूरला जाणारे मानकरी सरदार गावडे यांच्या कुलोपाध्याय श्री.बडवे यांनाही इथेच जमीन इनाम दिलेली आहे.

बोहाळीचा कायापालट जरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला असला तरी तो स्थानिकांना अजुनही माहिती नव्हता तर पुजाऱ्याने देवाकडे जातांना इथल्या जमीनी स्वार्थापोटी विकून मंदिराची नियमित पूजाअर्चा खंडित केली आहे.

होळकरांनी दिलेल्या जमीनीवर मोठ्या झालेल्या या पुजाऱ्याने इतिहास मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र तोच काळाच्या पडद्याआड गेला आहे.

पंढरपूर आणि सांगोला परिसरात अहिल्यादेवीचे अनेक पाईक आहेत त्यांनीही कधी पंढरपूरच्या होळकरवाड्याचा व बोहाळीच्या बागाचा कधी इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

आता मात्र बरेच लोक बोहाळी चा इतिहास समजून घेतील अशी अपेक्षा आहे.

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


होळकरशाहीची उत्कृष्ट पुस्तके Online Order करण्यासाठी भेट द्या.
Ahilyabai Holkar Books in Marathi

रामभाऊ लांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *