चांदवड, ता.चांदवड जि.नाशिक(महाराष्ट्र)
इतिहास:
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सन १७५० च्या सुमारास उत्तरेत केलेल्या कामगिरीमुळे दिल्लीच्या मुघल बादशहाने चांदवडची जहागिरी होळकरांना दिली व त्याला पेशव्यांनी मान्यता दिली तेव्हापासून चांदवड परगण्यावर इंदोरच्या होळकर राजघराण्याची अधिसत्ता प्रस्थापित झाली. चांदवड खरे नावारूपास आले ते होळकरांच्या काळात. सन १७५०-१७६५ या कालावधीत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राणी अहिल्यादेवी होळकर यांनी चांदवड शहरातील किल्ले सदृश्य नवीन होळकर वाडा (रंगमहाल – Rangmahal) बांधला तसेच या वाड्याबरोबर संपूर्ण चांदवड भोवती काळी तटबंदी व सात वेशींचा हि निर्माण केला.
अन्य Post हि वाचा :
याच काळात काही अंतरावर असलेल्या किल्ले चांदवड वर होळकरांची टांकसाळ सुरू केली होती. होळकरशाहीत चांदवडचा चांदीचा ‘चांदोरी रुपया’ प्रसिद्ध होता. सन १८३० मध्ये चांदवडची टांकसाळ कायमची बंद झाली. आता या टांकसाळीचे अवशेष तेवढे उरले आहेत. सन १८०४ मध्ये कर्नल वॉलेस याने चांदवड होळकरांकडून ताब्यात घेतला. मात्र त्यानंतर सूत्रे पुन्हा होळकरांकडे आली. सन १८१८ मध्ये मराठा शाहीचा अस्त झाल्याने सर थॉमस हिस्लॉपने पुन्हा चांदवड ताब्यात घेतले.
पाहण्याची ठिकाणे:
वाड्याच्याआतील होळकर कालीन लाकडी नक्षीकाम व रंगचित्र, राणी अहिल्यादेवी होळकर यांचे २५० वर्षापूर्वीचे original चित्र पिंड व तलवार सोबत, राणी अहिल्यादेवी होळकर यांचा राजमहाल, राणी अहिल्यादेवी यांची राजगादी, चिरेबंदी दगडात बांधलेली प्रचंड मोठी बारव, किल्ले चांदवड व त्यावरील टांकसाळ, किल्ले धोडप, श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर, श्री रेणुकामाता मंदिर, श्री खंडोबा मंदिर, श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर, श्री कालिकामाता मंदिर.
माहिती:
सह्यादीच्या पर्वतरांगेत मुंबई – आग्रा महामार्गावर वसलेल्या चांदवड शहराला ऐतिहासिक वारसा असून येथेच होळकर कालिन कलेचा एक सुंदर अविष्कार म्हणजे चांदवडचा किल्ले सदृश्य होळकर वाडा(Holkar Wada) म्हणजेच रंगमहाल. वाड्यामधील लाकडी कोरीव काम आजही लक्ष वेधून घेते. पूर्वीच्या काळी हा वाडा होळकर वाडा म्हणून ओळखला जात असेे, परंतु येथील दरबार हॉलमध्ये असणाऱ्या रंगीत चित्रांमुळे या वाड्याला रंगमहाल असे हि नाव पडले.
होळकर वाडा ही वास्तू चांदवडचे वैभव आहे. या महालाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सुरुवातीलाच मोकळा भूभाग लागतो. थोड्या अंतरावरच वाड्याच्या मुख्य इमारतीस सुरुवास होते. दर्शनी बाजूच्या दोहींकडून दोन जिने आहेत. ते दुसऱ्या मजल्यावरील दरबार सभागृहात जातात. या भव्य सभागृहात अनेक निसर्गचित्रे पशु-पक्षी, तत्कालीन महिला-पुरुष, मुले, त्यांची वेशभूषा अशी चित्रे आहेत. इतिहासकाळात न्यायदान व आस्थापनासाठी याच सभागृहाचा उपयोग केला जात असे. काळाच्या ओघात काही जुने वाडे, वेशी आणि तटबंदी पडून गाव विस्तारलेलं असलं तरीही आज दोन-तीन वेशी आपल्याला बघायला मिळतात.
चांदवड शहर पूर्वी सात वेशींमध्ये बांधलेलं होतं. दिल्ली दरवाजा, धोडंबे(धोडप) दरवाजा, बाजार वेस, जुनी सरकारी वेस, आनकाई वेस, ढोलकीची वेस(शिवाजी चौकातली), गुजरात गल्ली वेस अशा वेशींपैकी काही आज पाहावयास मिळतात तर काहींना वाढत्या गावाने फोडून टाकलं आहे. एसटी स्टॅण्ड कडून गावात जातांना आठवडे बाजार वेस आपलं स्वागत करते. या वेशीवर जरी हल्ली फ्लेक्स बोर्ड झळकत असले तरी मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना पूवीर्चे शिलालेख आढळतात. एक मराठीतला तर दूसरा फारसी भाषेत कोरलेला आहे. मराठीतला शिलालेख थोडं बारकाईने बघितला तर वाचता येतो.
इथूनच चांदवड आपल्याला त्याच्या प्राचीनत्त्वाची प्रचिती देतं. गावात काही प्रसिद्घ आणि शिल्पकलेचे अद्वितीय नमुने असलेले साखळीवाडा, तर्टेवाडा, गोखलेवाडा, वैद्यवाडा असे जुने वाडेही होते, असं म्हणावं लागतं. कारण तेही पोखरून नेस्तनाबूत झालेत. या सर्वात आजही आपलं अनोखं सौंदर्य घेऊन उभा आहे तो म्हणजे किल्ले सदृश्य होळकर वाडा म्हणजेच रंगमहाल. गावातल्या बच्चालाही विचारलं रंगमहाल कुणीकडे, तरीही लगेच तो बोट करून रस्ता दाखवतो.
आजुबाजूला दोन भव्य बुरुज, तटबंदी आणि मध्यभागी उंच असं दगडी प्रवेशद्वार. रंगमहाल इतका मोठा अगदी जवळजवळ पुण्याच्या शनिवार वाड्याएवढा असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. उत्तरेकडे तोंड असलेल्या प्रवेशद्वाराची कोरीव कमान, छोट्या खिडक्या, आत पहारेदाराच्या खोल्या आणि वर अंबारीसारखे घुमट असलेली तटबंदी असा रंगमहालाचा रुबाबदार थाट दिसतो.
प्रवेश द्वाराचा लाकडी दरवाजा आजही शाबूत असून तो ही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने घडविलेला दिसतो. परकीय आक्रमण झाल्यास दरवाजा हत्तीच्या धडकेने तोडला जाऊ नये म्हणून त्यावर लांब व टोकदार असे लोखंडी खिळे बसविलेले दिसतात. दरवाजाच्या भव्यतेवरून आतल्या रंगमहालाचा पसारा किती असावा याचा अंदाज येतो. आत प्रवेशताच समोर मुख्य महाल नजरेत पडतो. मुख्य इमारतीत आत गेल्यावर लाकडाचे भव्य खांब त्यावरील नक्षीकाम, गोलाकार कमानी, बारीक कलाकुसरीची वेलबुट्टी, लाकडाला कोरून केलेल्या जाळीच्या भिंती असं किती बघावं नि किती नाही असं होतं.
आत गेल्यावर आपण महालाच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या चौकात येऊन पोहोचतो. हा जवळपास ६० बाय ६५ फूट एवढा चौक असून त्याच्या अवतीभोवती नजर फिरविल्यास लाकडावर किती बारीक आणि देखणं नक्षीकाम होऊ शकतं याचा प्रत्यय येतो. खुल्या चौकाच्या चारही बाजूंना वेगवेगळी दालनं, त्या दालनांचे लाकडी खांब आणि त्या खांबांच्या वरच्या भागावर काष्ठशिल्प, आडव्या तुळईंवरच्या बारीक वेलबुट्टी आणि असे कोरीव लाकडी खांबांचे एकावर एक तीन मजले असा हा भव्यदिव्य सेटच उभारलेला आहे.
या काष्ठशिल्पात आपल्याला अनेक वेगवेगळी फुलं, पोपट, मोर इ. पक्षी तसंच हत्ती, सिंह, वानर अशा अनेक प्राण्यांच्या कलात्मक प्रतिमा कोरलेल्या दिसतात. रंगमहालाच्या भिंतीही जुन्या विटांच्या आणि दगडी बनावटीच्या भक्कम अशा बनविलेल्या आहेत. संपूर्ण बांधकाम चुन्यात केलेलं आहे. या मध्यभागाच्या चौकात आपण या सर्व कलात्मकतेत हरवूनच जातो. इथं दर्शनी भागातल्या एका दालनात होळकरांची राजगादी ठेवलेली असून राजमाता राणी श्रीमंत अहिल्यादेवी होळकर जेव्हा चांदवड येत तेव्हा याच राजगादीवरून न्यायनिवाडा करत असत तसेच होळकर वंशीयांचे जुने फोटोही याच दालनात लावलेले आहेत. हल्लीच इथं अहिल्यादेवींच छोटे स्मारक बसवून त्यासमोर कारंजा बसवून थोडं सुशोभिकरणही केलेलं आहे.
वाड्याच्या पाठीमागे घोड्यांची पाग व पाण्याच्या सोयीसाठी निर्माण केलेली भव्य बारव स्थित आहे. हि बारव तीन माजली खोल आहे. मुळातच चांदवड शहर हे बारावांसाठी प्रसिद्ध आहे.
याशिवाय चांदवड शहरात व परिसरात लोकमाता राणी श्रीमंत अहिल्यादेवी होळकर यांनी काही लोककल्याणकारी कामे केली त्यामध्ये श्री चंद्रेश्वर महादेव मंदिराचा जीर्नोधार, श्री रेणुकामाता मंदिराचा जीर्नोधार व पाण्याच्या सोयीसाठी बारव व तलावाचा निर्माण, चांदवड टेकडीवर श्री खंडोबा मंदिराचा निर्माण, श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराचा निर्माण, श्री कालिकामाता मंदिराचा निर्माण केला.
अशी हि होळकरकालीन वस्तू आयुष्यात नक्की पाहिली पाहिजे. खाली Google Map दिला आहे. चांदवड शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तेथे मुक्कामाची व जेवणाची सोय सहज होऊ शकते. चांदवड शहर व तालुक्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या: chandwadtaluka.com व नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील अहिल्यादेवींच्या बारवा व अन्य ऐतिहासिक वास्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या: safarbaglanchi.com
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021
very nice information.
devlopment for this kalika mata temple fast .not in road in the kalika mata temple.
i love chandwad city , kalika mata mandir pujari
but is trust for you kalika mata mandir trust kra.
seen is beatutiful i love my chandwad
Very nice!
10 वर्ष पर्यंत मी चंदवड ला राहिले आहे….या वड्यात खेळले आहे…बालपणीची आठवण आली…पुन्हा तिथे जाव व मन भरुन पहाव…बालपण अनुभवाव अस वाटतय…
खुप छान संकलन आणि छायाचित्रे.. भरपूर मेहनत आहे एवढी सगळी माहिती गोळा करायची म्हणजे.. आम्ही चांदवड ला असताना बऱ्याच वेळा रंगमहाल पहिला आहे.. परंतु त्या वेळी तिथे सरकारी दप्तरे होती, त्यामुळे खूप ठिकाणी बघायच राहील. पण चांदवड ला ऐतेहासिक गोष्टींचा खजिनाच आहे. रंगमहालपासून चन्द्रेश्वरी मंदिरात जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे असे एकूण आहे.. खरे खोटे शहानिशा केल्यावरच कळेल.
छान ऐतिहासिक माहिती
Nice history…such a good place…really proudly..