Skip to content

अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील नाणी

होळकरशाहीत नाणी पडण्याची सुरुवात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांनी केली होती. त्यांनी सन १७५१ च्या दरम्यान किल्ले चांदवड(चंद्राई) जि.नाशिक येथे सर्वप्रथम टांकसाळ सुरु केली व त्याच वर्षी त्यांनी स्वतःच्या नावाने शिक्का बनवून नाणी पाडण्यास सुरुवात केली.

येथूनच खऱ्या अर्थाने १८ व्या शतकात होळकरशाहीच्या पर्वाची सुरुवात झाली. किल्ले चांदवड येथील टांकसाळ हि होळकरशाहीतील पहिली टांकसाळ होय. सुभेदार मल्हारराव होळकरांच्या काळातील शिक्के व नाणी यांची आपण नंतर स्वतंत्र माहिती घेणारच आहोत.

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा सन २० मे १७६६ ला मृत्यू झाल्यानंतर पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी होळकर संस्थानाचा सुभेदार मालेराव होळकर यांच्या काळात सन १७६६ ते १७६७ व सुभेदार तुकोजीराव होळकर(पहिले) यांच्या काळात सन १७६७ ते १७९५ या कालावधीत “रिजंट महाराणी” म्हणून होळकर संस्थानाचा कारभार पहिला. त्यांनी सन ११ डिसेंबर १७६७ ला नवीन शिक्का तयार केला व त्याच वर्षा पासून त्यांनी नवीन नाणी बनवण्यास सुरवात केली.

सन १७९५ पर्यंत त्यांनी वेग वेगळी नाणी बनवली. सन १७६६ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांनी इंदोर मधील मल्हारगंज येथे नवीन टांकसाळ सुरु केली. हि टांकसाळ मोहरदास सावकार यास मक्त्याने चालवण्यास दिली होती. टांकसाळ चालवण्याची जबाबदारी जरी एखाद्या खाजगी व्यक्तीवर सोपवली असली तरी त्या टांकसाळीमधील नाण्याचा दर्जा व कस यावर होळकर सरकारचे नियंत्रण राहत असे.

होळकर सरकार कडून मोहरदास सावकार यास दर शेकडा १ रुपया मिळत असे. त्यांनतर सन १७६७ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांनी किल्ले महेश्वर(मध्यप्रदेश) ची नवीन राजधानी म्हणून घोषणा केली व त्याच वर्षी तेथे नवीन टांकसाळ सुरु केली. अशाप्रकारे सन १७९५ पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नवीन टांकसाळांची निर्मिती केली.

राणी अहिल्यादेवी यांच्या काळात जी नाणी तयार केली गेली त्यासाठी प्रामुख्याने चांदी व तांबे या धातूंचा उपयोग केला गेला. हि नाणी म्हणजे त्याकाळचे दैनंदिन जिवनात वापरले जाणारे चलन असतं. त्यामुळे त्यांचे मूल्य हे वेगळे असत.

एक आणा, दोन आणे, चार आणे, आठ आणे हि नाणी चांदीची असून अर्धा आणा, पाव आणा, धेला हि नाणी तांब्याची होती. काही नाण्यांवर टांकसाळीचे नाव लिहिले जात असे तसेच या नाण्यांवर संस्कृत व अरेबिक भाषेचा वापर केल्याचे दिसते. या व्यतिरिक्त सोन्याची मोहर देखील बनवली जात असत व त्याचा उपयोग नजराणा देण्यासाठी केला जात होता.

या नाण्यांवर वेगवेगळी चिन्ह असतं. कोणत्या हि मूल्याच्या नाण्यावर कोणतेही चिन्ह असत. या चिन्हामध्ये प्रामुख्याने सूर्य, चंद्र, गव्हाच्या ओबी व अफूचे पिक, शिवलिंग, वारू, बेलपत्र, नंदी, तोफ यासारखी चिन्ह दिसून येतात व याशिवाय अजून काही चिन्हांचा वापर केला असू शकतो. इतिहासकारंच्या मते या चिन्ले ांचा वापर नाण्यांवर करण्याची वेगवेगळी कारण असतं.

होळकरशाहीत किल्ले चांदवड जि.नाशिक(महाराष्ट्र), सिरोंज जि.विदिशा(मध्यप्रदेश), मल्हारनगर जि.अशोकनगर(मध्यप्रदेश), महिंदपुर जि.उज्जेन(मध्यप्रदेश), वाफगाव जि.पुणे(महाराष्ट्र), इंदोर(मध्यप्रदेश), महेश्वर(मध्यप्रदेश), पानिपत(हरियाणा), बगलकोट, मौसुर(कर्नाटक), हरदा, मेरठ(उत्तरप्रदेश) आदी ठिकाणी होळकरशाहीची टांकसाळ होती.

ब्रिटिशांनी सन १८३० ला किल्ले चांदवडची टांकसाळ, सन १८३२ ला महेश्वरची टांकसाळ व सन १९०३ ला इंदोर येथील मल्हारगंज टांकसाळ कायमची बंद केली. राणी अहिल्यादेवी यांच्या नंतर होळकरांच्या गादीवर विराजमान झालेल्या प्रत्येक राजाने आपल्या काळात वेगवेगळी नाणी व शिक्के तयार केले.

नाण्यांवरील असलेल्या चिन्हांचा अर्थ खालील प्रमाणे,

  • सूर्य : क्षत्रिय,शक्ती, सामर्थ्या व वंशाचे प्रतीक सूर्य असून जेजुरीचा खंडोबा देवाचे प्रतीक “सूर्य” आहे व हे होळकर राजघराण्याचे कुलदैवत आहे.
आभार – indiacollectore (insta a/c)
  • चंद्र : दयाळू आणि शांतताप्रियचे प्रतीक “चंद्र” आहे.
  • गव्हाच्या ओबी व अफूचे पिक : समृद्ध असलेल्या राज्याचे प्रतीक “गव्हाच्या ओबी व अफूचे पिक” आहे.
  • शिवलिंग : ताकद आणि साहसाचे प्रतीक “शिवलिंग” आहे.
आभार – सुधीर जोशी
  • वारू : यशाचे प्रतीक “वारू” आहे.
आभार – My Antique Collection (facebook a/c)
  • बेलपत्र : पाप व दारिद्र्याचा अंत आणि वैभवशाली जीवनाचा आरंभाचे प्रतीक “बेलपत्र” आहे.
  • नंदी : शक्ति, संपन्नता आणि कष्टाळूचे प्रतीक “नंदी” आहे.
आभार – सनी कोळेकर
  • तोफ : या चिन्हाला राणी अहिल्यादेवी यांचा इतिहास कारणीभूत आहे. त्यांच्या काळात त्यांनी एक तोफ बनवून घेतली होती तिचे नाव “ज्वाला क्रांती” तोफ असे होते व ती तोफ लष्करी दृष्ट्या संपन्न असे प्रतीक होते. तसेच काही लोकमतानुसार हि तोफ ओढण्यासाठी ६० बेलांच्या जोड्या लागत असतं. सन १७८३ ला किल्ले अमड ता.मनासा जि.नीमच(मध्यप्रदेश) येथील युद्धात या तोफेचा वापर केला होता याचे पुरावे मिळतात मात्र त्यांनतर ती तोफ कोठे गेली याचा काहीही सुगावा लागत नाही.
आभार – गिरीश शर्मा

माहिती आभार :
अ. अहिल्याबाई होळकर यांचे नेतृत्व एक राजकीय अभ्यास, प्रकरण-२.
ब. मराठे कालीन होळकर संस्थान
क. इंदोर स्टेट गॅझिट,भाग-१

राहुल वावरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *