मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्राच्या संस्कृती मध्ये स्त्रियांचे स्थान खूप महत्वाचे आहे. ती माता आहे, देवी आहे, उत्तम शासक आहे, मार्ग दर्शक आहे, आणि वेळ प्रसंगी रणांगण गाजवणारी रण चंडी आहे. राजमाता जिजाऊ, रणरागिणी ताराराणी, महाराणी येसूबाई अशी असंख्य उदाहरणे आहेत.
ह्या नारी शक्तीच्या परंपरेतील मानाचा तुरा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या माँसाहेब. होळकर घराण्यामध्ये ही स्त्रियांना विशेष सम्मान व अधिकार प्राप्त होते, त्या महत्वाच्या सल्ला मसलती मध्ये भाग घेत, न्याय निवाडा करत आणि वेळ पडेल तेव्हा तलवार ही गाजवत. सुभेदार मल्हारराव होळकर ह्यांनी केलेली स्वराज्य सेवा व पराक्रमाचा सम्मान म्हणून छत्रपती शाहू महाराज ह्यांच्या आदेशाने दि. २०/०१/१७३४ रोजी पेशवे बाजीराव ह्यांनी सुभेदार मल्हारराव होळकर ह्यांच्या प्रथम पत्नी गौतमाबाई साहेब ह्यांचे नावे खासगी जहागीर(वंश परंपरागत)ची सनद करून दिली.
ह्या खासगी जहागीरमध्ये महेश्वर, चोली, हरसोला, सावेर, बरलोई, देपालपूर, हातोद, जागोटी इत्यादी गावे देण्यात आली. ह्याचे प्रारंभिक उत्पन्न होते २,६६,000/-. अश्या प्रकारे होळकरांच्या जागिरीचे दोन भाग झाले. “दौलत आणि खासगी” ह्यातील दौलतीचे अधिकार हे राजा किंवा सुभेदारा कडे असत आणि खासगीचे अधिकार हे शक्यतो राजा किंवा सुभेदार ह्यांच्या जेष्ठ पत्नी कडे असत.
मराठयांच्या इतिहासात असा मान फक्त होळकर घराण्यालाच होता. खासगी गादीची संपूर्ण व्यवस्था स्वतंत्र होती. त्यांचा दिवाण, शिक्का, महसूल, न्याय व्यवस्था सर्व काही स्वतंत्र होते. ज्याप्रमाणे होळकर नरेशांचे आदेश “श्री शंकर” ऑर्डर म्हणून जात, त्याचप्रमाणे खासगीचे आदेश श्री सौ. महाराणी साहेबांची “श्री शंकर” ऑर्डर ह्या नावे जात.
सुभेदार मल्हारराव होळकर ह्यांच्या वेळी खासगी चे सर्व अधिकार गौतमा बाई साहेबांकडे होते व त्याचा उपयोग व उपभोग घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांना होतं. पण सुभेदारांच्या पराक्रमाला शोभेल असाच वापर त्यांनी ह्या संपत्तीचा केला. दौलतीच्या अडचणीच्या वेळी खासगीतून आर्थिक मदत केली जाई, दुष्काळ, युद्ध, महामारी सारख्या प्रसंगी खासगीतून रयतेला मदत केली जात.
पानिपतच्या युध्दा नंतर होळकर सैन्याची पुन्हा उभारणी करण्यासाठी खासगीतून आर्थिक सहाय करण्यात आले होते. त्याच प्रकारे शिंद्यांच्या ही फौजेची पुन्हा उभारणी करण्यासाठी महादजी शिंदेंना खासगीतुन आर्थिक मदत करण्यात आली होती. २१/१०/१७६१ ला गौतमा बाईसाहेब स्वर्गवासी झाहल्यावर खासगीचे सर्व अधिकार अहिल्या मासाहेबांकडे आले.
त्यांच्या काळी पण खाजगीचे जहागीरचे दिवाण गोविंदपंत गानू होते, मासाहेबांच्या काळात खासगीचे उत्पन्न १५ लाख रुपये असून त्याचा ७०% उपयोग हा लोक उपयोगी कामांसाठी मासाहेबांनी केला. संपूर्ण भारतात असंख्य घाट, बारव, तलाव, रस्ते ,धर्मशाळा, मंदिरे, दर्गा, मस्जित बांधून त्यांनी राष्ट्राची पुन्हा बांधणी तर केलीच पण त्या बरोबर ह्या कामांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, व्यापार, कृषी, पर्यटन,अश्या अनेक क्षेत्रांना नवी उभारी दिली.
महेश्वर येथे वस्त्र निर्मितीचे कारखाने उभारून सैन्यातील वीर हुतात्म्यांच्या स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून दिला, सम्मानाने जगण्याची शक्ती दिली. मासाहेबांनी अश्या प्रकारे कोणतेही व्यक्तिगत स्वार्थ न पाहता अत्यंत साधे जीवन जगत आपल्या संपूर्ण सत्ता आणि संपत्तीचा वापर फक्त लोक कल्याणकारी कामांसाठीच केला आणि घराण्याच्या भावी पिढ्यांसाठी एक आदर्श घालून दिला.
अहिल्या मासाहेबांच्या नंतर काही काळ खासगी जहागीरचे अधिकार रखमाबाई साहेबांकडे(सुभेदार तुकोजीराव १ ह्यांच्या पत्नी) होते, त्यांच्या नंतर अहिल्या मासाहेबां प्रमाणे खासगी ची गादी चालवली ती महाराजा यशवंतराव होळकर प्रथम ह्यांच्या पत्नी कृष्णा मासाहेब ह्यांनी. त्यांच्या वेळी गोविंदपंत गानू ह्यांचे चिरंजीव गोपाळराव गानू हे खासगी चे दिवाण होते.
कृष्णा मासाहेबांनी महेश्वर येथे अहिल्या मा साहेबांच्या छत्रीचे(समाधी) अपूर्ण काम पूर्ण करून घेतले, भानपुरा येथे यशवंतराव महाराज ह्यांची छत्री(समाधी) बांधून घेतली, अहिल्या मासाहेबांच्या वेळी चालू केलेले सर्व काम त्यांनी अखंडित पणे चालू ठेवले. हा काळ होळकर घराण्याचा पडता काळ होता, दौलतीला वारस न्हवता, भारतामध्ये इंग्रजांचा प्रभाव वाढत होता अश्या परिस्थिती मध्ये त्यांनी खासगी आणि दौलत ह्या दोनी गोष्टी अगदी उत्तम सांभाळल्या.
पुढे होळकर घराण्यातील सर्वच स्त्रियांनी अहिल्या मासाहेबांचा आदर्श समोर ठेवत खासगी ची गादी चालवली, होळकरांच्या २२० वर्षाच्या राज्य काळात स्त्री ही पुरुषपेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नाही हे खाजगी गादी च्या माध्यमातून होळकर घराण्याच्या स्त्रियांनी दाखवून दिले आहे. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि सर्व संस्थाने त्यामध्ये विलीन झली, होळकर संस्थान ही विलीन जहाले आणि दौलत व खासगी ह्या दोनी गादी समाप्त झहाल्या.
ह्या वेळी इंदूरचे शेवटचे नरेश महाराजा यशवंतराव होळकर द्वितीय ह्यांनी अहिल्या मासाहेबांचे दान धर्म, देवस्थानची व्यवस्था, पूर्वजांच्या छत्रीची व्यवस्था तशीच चालू राहावी ह्या साठी पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर खासगी ट्रस्ट ची स्थापना केली.
होळकरशाहीतील खासगी जहागीरच्या गादीचे मानकरी खालीलप्रमाणे,
- गौतमाबाई होळकर – सुभेदार मल्हारराव(१) ह्यांच्या पत्नी,
- अहिल्याबाई होळकर – खंडेराव होळकर ह्यांच्या पत्नी,
- रखमाबाईहोळकर – सुभेदार तुकोजीराव(१) ह्यांच्या पत्नी,
- कृष्णाबाई होळकर – महाराजा यशवंतराव(१) ह्यांच्या पत्नी,
- गौतमाबाई होळकर(ताईसाहेब) – महाराजा मल्हारराव(२) ह्यांच्या पत्नी,
- भागीरथीबाई होळकर – महाराजा तुकोजीराव(२) ह्यांच्या पत्नी,
- राधाबाई होळकर – महाराजा शिवाजीराव ह्यांच्या पत्नी,
- चांद्रवतीबाई होळकर – महाराजा तुकोजीराव(३) ह्यांच्या पत्नी.
- संयोगीताराजे होळकर – महाराजा यशवंतराव(२) ह्यांच्या पत्नी.
आभार : श्रीमंत भूषणसिंह होळकर राजे
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
होळकरशाहीची उत्कृष्ट पुस्तके Online Order करण्यासाठी भेट द्या.
Ahilyabai Holkar Books in Marathi
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021