*श्री पाळकी*
*शिव चरणी तत्पर*
*संताजी पांढरे शरफनमुलुक निरंतर॥*
मराठ्यांच्या इतिहासात आपल्या पराक्रमाने अविट ठसा उमटविणाऱ्या पांढरे घराण्यातील हा उमदा रणवीर. मराठ्यांच्या स्वातंत्रसंग्रामात सत्वर भाग घेऊन आपल्या सैन्यदलाचे नेतृत्व करत थेट औरंगजेबाशी भिडणारा रणगाजी म्हणजे संताजी राजेपांढरे. पांढरे घराण्याच्या अनेक शाखा महाराष्ट्र ,कर्नाटक , आंध्रा. इ भागात विस्तारित झाल्या आहेत, परंतु शिखर शिंगणापूर च्या पायथ्याला असणाऱ्या नातेपुते हे पांढऱ्यांच्या मूळ वतनाचे गाव होय. शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सुरवातच पांढरे घराण्यातील मुलगी व माळशिरसच्या वाघमोडे घराण्यातील मुलगा यांचे लग्न झाल्या शिवाय सुरवातच होत नाही अश्या या नातेपुते गावचे वतनदार म्हणजे संताजी पांढरे.
संताजी पांढरे यांचा सर्व प्रथम उल्लेख मिळतो तो म्हणजे , इस 1701 -02 च्या दरम्यान झालेल्या मोगल मराठा युध्दात. सर्वशक्तिमान औरंगजेब स्वतः मोठ्या लवाजम्यासह दक्षिणेत उतरला होता.मराठ्यांचे नेतृत्व छत्रपती या नात्याने महाराणी ताराऊ करत होत्या. मोगलाणी जुल्फीकार खानच्या नेतृत्वाखाली पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला होता. पण मराठ्यांनी थेट मोगलावर मोठ्या चढाया करून त्यांचे आक्रमण उधळून लावले होते. या घटनेची हकीकत देताना निकोलस मणुची आपल्या ‘असे मोघल या पुस्तकात’ लिहतो, मोगल सेनापती जुल्फीकार खान याने पन्हाळयाला वेढा घातला आहे. त्याज पाशी पन्नास हजार पायदळ , आणि तीस हजार घोडदळ आहे.
फेब्रुवारी महिन्यात मराठ्यांनी किल्ला समोरील मोगलांच्या सैन्यावर हल्ला चढवला. ते मोगल मोर्चा पर्यंत चालून आले, मारामारी मोठी निकराची झाली. जुल्फीकार खानाला आपला मोर्चा मागे घ्यावा लागला. मराठे मोगल सैन्यावर सतत छापे घालत. आज एका ठिकाणी छापा तर उद्या दुसऱ्या ठिकाणची रसद तोडलेली असे. यामुळे बादशहाच्या छावणीत नेहमीच भयंकर तुटवडा भासे. त्यानंतर खासा औरंगजेब स्वतः विशालगड घेण्यास सरसावला तेंव्हा *संताजी पांढरे* यांच्या सोबत प्रतापराव मोरे , राणोजी घोरपडे इ सरदारांनी मोगली सैन्यावर चौफेर आक्रमणे करून बादशहाची पुरती फजिती केल्याचे मणुची आपल्या पुस्तकात नोंद करतो.
संताजी पांढरे यांच्या याच कार्याची दखल घेऊन प्रतापराव मोरे यांना लिहलेल्या पत्रात ताराऊ म्हणतात, *राजमान्य राजश्री प्रतापराव मोरे यांसी आज्ञा ऐसीजे , तुम्ही व राजश्री संताजी पांढरे फौजेनिशी मलकापूर नजिक औरंगजेबाची चौकी होती ती मारली हे वर्तमान कळल्यावर स्वामीनी तुम्हास आज्ञापत्र पाठविली आहेत ती पाऊण वर्तमान कळले. औरंगजेब विशालगडास बिलगला. याजकरिता त्याचे कबीलाबाड मारून हमेशा गोटावर हल्ले करावे. तरीच तो बलकबूल राहतो. याजकरीता तुम्ही व बाजे सरदार फौज घेऊन मुकाबला केला. आपले अवघे एकदिल होऊन औरंगजेबास जडुण राहणे. तुम्ही स्वामींचे एकनिष्ठ सेवक मायेचे विश्वासू आहात.* अश्या आशयाचे पत्र लिहले होते.
औरंगजेबाची ही विशाळगड मोहीम खूपच मानहानीकारक घडली ह्यात मोगलांकडील 6000 माणसे गमावली ह्यामध्ये संताजी पांढरे यांचा मोठा वाटा होता. एकदा तर मराठे अगदी औरंगजेबाच्या तंबूच्या जवळ येऊनच ठेपले होते. स्वतः आलमगीर हातात धनुष्यबाण घेऊन पुढे सरसावला ऐन वेळी एक रजपूत सरदार मदतीला धावला त्यामुळे मराठे मागे हटले ही मदत आली नसती तर खासा आलमगीर बादशहाच कैद झाला असता. मोगल बातमीपत्रातील एका नोंदी नुसार 1 मार्च 1703 साली संताजी पांढरे मोठे सैन्य बरोबर घेऊन अहमदनगर जवळ असणाऱ्या तिसगाव मढी भागात आक्रमण करत असल्याच सांगण्यात आले आहे.
6 नोव्हेंबर 1705 रोजी प्रसिद्धगड उर्फ रांगणा या किल्ल्यावर एक ऐतिहासिक मजहर तयार केला गेला त्यामध्ये नेमाजी राजे शिंदे , धनाजी जाधवराव , हंबीरराव मोहिते , या सारख्या मातब्बर मंडळी बरोबरच संताजी पांढरे यांचा शिक्का उमटवल्याचे दिसून येते. यावरूनच संताजी पांढरे यांची मातब्बरता समजून येते.
इस 1706 च्या सुमाराला संताजी पांढरे , धनाजी जाधव , नेमाजी शिंदे , दमाजी थोरात इ मंडळी अहमदनगर येथील छावणीवर तुटून पडले. ही मोहीम खुद्द बादशहा वर करण्यात आली होती. शाही सैन्याचे प्रचंड मोठे नुकसान करून मराठे मागे फिरले. वरील नोंदी पाहिल्या तर संताजी पांढरे यांनी मोठ मोठ्या मोहिमा ह्या बादशहाच्या विरोधात केल्याचे दिसून येते. मध्यंतरीच्या काळात औरंगजेब भिंगार या ठिकाणी मृत्यु होऊन छ. थोरले शाहु यांची कैदेतून सुटका झाली. छ. शाहु महाराज महाराष्ट्रात आल्या नंतर अनेक मातब्बर मराठा सरदार छ. शाहु ना जाऊन मिळाले. परंतु बदललेल्या राजकीय परिस्थिती मध्ये ही संताजी पांढरे यांनी महाराणी ताराराणी यांचा पक्षाला एकनिष्ठ राहिला.
बिदर – हैदराबाद हा प्रांत संताजी पांढरे यांच्या सरंजामाचा भाग होता. यावर छ. शाहू यांच्यावतीने सेनाकर्ता बाळाजी विश्वनाथ , कूसो मल्हार व संताजी पांढरे यांच्या मध्ये कर्नाटकीय प्रदेश आपल्या ताब्यात ठेवण्या वरून कलबुर्गी प्रांती मोठी धुमश्चक्री घडून पेशव्यांकडील 4 सरदारांच्या मांडीखालील घोडी ठार पडली. तर राजजी भोसले व राणोजी रणनवरे हे प्रत्यक्षात कामी आले. संताजी पांढरे यांच्या कडील काही घोडी बाळाजी विश्वनाथ यांच्या हाती लागली. पुढे कोल्हापूर गादी मध्ये यादवी झाल्यामुळे संताजी पांढरे छ शाहु महाराजांना सामील झाले. व छ . शाहु महाराज यांच्यावतीने कारवाया करू लागले.
संताजी पांढरे शरीफनमुलुक:
शरीफनमुलुक हा संताजी पांढरे यांचा अधिकृत किताब असल्याचे दिसून येते. संताजी पांढरे यांच्या शिक्यात हाच किताब दिसून येतो. शरीफनमुलुक हा फार्सी शब्द असून शरीफनमूलूक म्हणजे मुख्य सरंजामदार अथवा मुख्य सरदार होय. मोगल लष्करात ऐन उल मुल्क, मुझफ्फर उल मुल्क, निजाम उल मुल्क असे किताब धारण केलेले अथवा दिलेले दिसतात त्याच धर्तीवर मराठी सैन्यात शरीफनमुलुक, शाहमत मुलुक, जफ्तनमुलुक, उमदेतुलमुलुक आमीर अल उमराव असे किताब दिल्याचे दिसून येते. हा किताब मोठ्या विभागाचा सुभेदार अथवा त्या दर्जाचा अधिकाऱ्यांना दिल्याचे दिसून येते.
संताजी यांच्या सरंजामाचे छ. शाहु यांच्या रोज कीर्दीतील स्वरूप:
1 शेला अष्टगोळी केशरी.
1 मंदील
1 हत्ती
1 तरवार
1 कुडकेची जोडी
संताजी पांढरे यांचे कडील वतन:
कसबा नातेपुते हे गाव संताजी पांढरे यांचे वतनी गाव होते त्याबरोबर मौजे वावरहिरे , मौजे सराटी , मौजे गीरवी ही गावे संताजी पांढरे यांची वतनी गावे होती. मराठवाड्यातील उदगीर परगण्यातील मौजे तोरणे व मौजे औराद तर रायबाग परगण्यातील मौजे सिराढोण (आजचे इचलकरंजी जवळचे शिरढोण) ही गावे देखील त्यांच्या वतनदारीचा भाग होती. संताजी पांढरे यांचे एकून 75 महाल , यशवंतराव व लुयाजी पांढरे यांचे कडील 4 सामायिक महाल परगने . ह्या व्यतिरिक्त अन्य परगण्यातील 81 गावे ही संताजी पांढरे यांच्या सरंजामा अंतर्गत येत होती.
बिदर प्रांतातही संताजी पांढरे यांची वतनी गावे होती ती अनुक्रमे मौजे जणवाडा , मौजे समसेलापुर , मौजे मरखळ , मौजे रायकोड, मौजे पांपड , मौजे संतापूर ही होत. संतापूर हे गाव संताजी पांढरे यांच्या नावावरूनच पडले असावे. संताजी पांढरे यांना छ शाहू महाराज यांनी 60 परगने व तीन कसब्यांचे नाडगौडकीचे वतन वंशपरंपरेने करून दिलेले होते. मुळात हे वतन छ राजाराम महाराज यांनीच जिंजी मुक्कामी असताना करून दिल्याचे दिसते. या वतनात 1500 पेक्षा जास्त गावे समाविष्ट होती.
संताजी पांढरे यांच्या सैन्यातील सरदार मंडळी:
1) सरदार हिंदुराव वाघमोडे
2) सरदार यशवंतराव वाघमोडे
3) सरदार राणोजी वाघमोडे
4) सरदार राणोजी माने
5) सरदार गिरजोजी माने
6) सरदार कुसाजी माने
7) सरदार बाजी माने
8) सरदार बहीर्जी पांढरे
9) सरदार दादजी पांढरे
10) सरदार सीदोजी रूपणवर
11) सरदार निंबाजी ठेंगिल
12) सरदार यशवंतराव सलगर
13) सरदार सीदोजी सलगर
14) सरदार आगाजी सलगर
15) सरदार धूळोजी लवटे
16) सरदार भिकाजी लवटे
17) सरदार रायाजी लवटे
18) सरदार उदाजी रणनवरे
19) सरदार यशवंतराव पांढरे(संताजी पुत्र)
20) सरदार लुयाजी पांढरे(संताजी पुत्र)
21) सरदार खंडोराम(पांढरे यांचा दिवाण)
संताजी पांढरे यांची समाधी:
संताजी पांढरे यांची समाधी त्यांच्याच नावावरून पडलेल्या गावी म्हणजे मौजे संतापूर ता.औराद जि.बिदर (कर्नाटक) या ठिकाणी आहे. समाधीचा आकार प्रचंड मोठा असून जमिनीपासून साडेसहा फूट उंचीच्या चौथरा वर 32 फूट लांब व रुंद कोरीव घडीव दगड व चुन्याचा वापर करून या समाधीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. समाधीची जमिनीपासून उंची साधारण 40 ते 50 फूट असावी. समाधीच्या प्रवेशद्वारा समोर कारंजे देखील होते मात्र आता दुरावस्था झाली आहे.
आपले संपूर्ण आयुष्य रणांगणात घालवलेल्या पराक्रमी वीराचा मृत्यु देखील रणांगणातच झाला मोगलांचा सुभेदार मुबारिज खानाने कर्नाटकातील मुलुखा वर हल्ले केले त्याला परतवत असताना मोगलांचा सेनापती चंद्रसेन जाधव याच्या सोबत झालेल्या चकमकीमध्ये संताजी पांढरे यांना वीरमरण आले . व स्वराज्यासाठी या वीरशिपायाने आपले प्राण ठेवले ..
धन्य धन्य ते संताजी पांढरे…
संदर्भ:
सरंजामी मरहट्टे
(मूळ संदर्भ पुस्तकात पहावयास मिळतील.)
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
राणी अहिल्यादेवी होळकरांनी भारतभर केलेल्या लोककल्याणकारी कार्यांची यादी पहा.
अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी कार्य
- रेणापुरचे राजेहाके - December 1, 2021
- शरीफनमुलुक सरदार संताजी पांढरे - October 24, 2020
- राणी अहिल्यादेवी व सांगलीकरांचे ऋणानूबंध - August 12, 2020
You for got village Tadkal
खुप छान माहिती दिलीत