अंबड, ता.अंबड जि.जालना(महा.): अंबड हे पन्नास हजार लोकसंख्येचे शहर.या शहराचे पुनर्निर्माण गौतमाबाईसाहेब होळकर यांनी केलेले आहे. हे शहर खाजगी च्या जहागिरीसाठी पहिले बाजीराव पेशवे यांनी गौतमाबाईसाहेबांना दिलेले शहर. त्यांनी या छोट्याशा खेड्याचे शहरात रूपांतर केले. त्यांच्यानंतर या शहराच्या विकासाचे कार्य अहिल्यादेवींच्या हाती आले, त्यांनी लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी या शहरात छोट्या-मोठ्या मिळून ४० बारवा बांधल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी १७६१-१७६७ पर्यंत खंडोबा बिल्केश्वर या मंदिराचे निर्माण केले व सुभेदार तुकोजी होळकरांनी(पहिले) या मंदिरास बळकट केले.
या गावात या मंदिराला प्रति जेजुरी म्हणून ओळखलं जात परंतु या मंदिराला नावलौकिक मिळालेला नसल्याने भाविक भक्तापासुन हे मंदिर वंचित राहीलेले दिसते या मंदिराच्या वास्तुस्थापत्य हेमाडपंथी असुन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे आपल्याला पाहता येईल.
मंदिरात खंडोबाच्या मूर्ती समोर शिवलिंगाची स्थापना केलेली आहे, या शिवलिंगावर केलेल्या अभिषेकाचे जल बाहेर नेण्यासाठी भुयारी मार्ग तयार केलेला आहे व ते जल गोमुखातुन बाहेर येते.
या मंदिराला वेगवेगळ्या शैलीचे छोटे-मोठे ७ कळस पाहण्याजोगे आहेत. या मंदिरात सूर्यनारायनाची, रेणुकादेवीची, चित्रगुप्ताची मूर्ती आहे. या मंदिरात कुठेही न पहायला मिळणारी गणपती आणि हनुमानाची सोबतच आहे. या मंदिरात सुभेदार तुकोजीराव होळकरांचे वैयक्तिक चंदनाचे देवघर आहे. या मंदिरात तिन्ही मुर्त्याच्या अभिषेकाचे पाणी एकाच गोमुखातून निघण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे संत मानिकदास यांची समाधी आपल्यास पाहायला मिळते.
मंदिर सुबक आणि आकर्षक आहे छतावर जाण्यासाठी चार दिशेला चार रस्ते आहेत तर मंदिराच्या खालुन एक भुयार आणि दगडी लादणी तर पाण्यासाठी जमीनीखाली दगडाचा गोल हौद व त्याव दगडाचे गोल झाकन आहे. मंदिरात अंतर्गत पाणी व्यवस्थापन केलेले आहे तर दोन दिपमाळ आणि देवीचे वाहन मंदिराचे आकर्षण आहे.
तर मंदिराच्या समोर असलेल्या महालाबद्दल ऐतिहासिक पत्र उपलब्ध असुन तो महाल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पतीस कुंभेरी येथे युध्दात वीरगती मिळाल्यानंतर दिल्लीच्या बादशहाने पुत्र युवराज मालेराव होळकर यासं अंबडचा महाल दिल्याची नोंद संदर्भिय पत्रात उपलब्ध आहे.
मराठी फौजेचे सेनापती सुभेदार मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव शुरवीर खंडेराव होळकर दि. ८ जानेवारी १७५४ रोजी दिल्लीच्या बादशहाचा निरोप घेऊन निघाले होते तर दुसरीकडे खंडणीच्या वसुलीसाठी मराठ्यांच्या फौजांनी दि. २० जानेवारी १७५४ कुम्भेरीचा (जि भरतपुर राजस्थान ) जाटराजा महाराज सुरजमल जाटच्या किल्ल्याला वेढा घातला होता पंरतु कुंभेरीचा राजा एक कोटी रुपयाची खंडणी देण्यास तयार होत नसल्याने बाहेरुन किल्ल्यावर जाणारी रसद मराठी फौजेचे सेनापती सुभेदार मल्हारराव होळकर यांनी रोखली होती.
मार्च महिना उजाडुन दोन आठवडे उलटले तरी महाराज सुरजमल जाट तयार होत नव्हता शेवटी किल्ल्यावरील धान्यसाठा संपल्याने त्यांनी युध्दाचा निर्णय घेतला आणि मराठे जाट युध्द सुरु झाले युध्दाची बातमी शुरवीर खंडेराव महाराज यांना समजल्यानंतर ते मथुरेहुन १५ व १६ मार्च रोजी कुंभेरीकडे निघाले.
१७ मार्च १७५४ ला ते कुंभेरीला जवळ होळकरांची छावणी असलेल्या गांगरसोली या ठिकाणी पोहचले होते छावणीत येताच पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी त्यांना जेवायचे ताट वाढले ते घास तोडांत घालणार ऐवढ्यात एक दासी शामीयान्यात धावत आली तिने महाराज खंडेरावांना मुजरा करीत कुंभेरीच्या युध्दभुमीत सुभेदारांना शत्रुनी वेढा घातला असल्याची माहिती दिली वेळ दुपारची होती हातातल्या घासाचे व भरल्या ताटाचे दर्शन घेतले आणि अहिल्यादेवीकडुन समशेर घेत रणमैदानावर दिल्लीच्या बादशहाने दिलेली अफगाणी तलवार अशा दोन्ही तलवार घेवुन महाराज खंडेराव पोहचले होते.
पुढे सुभेदार मल्हारबाबा शत्रुच्या वेढ्यात हातातल्या भाल्याने लढत होते पुढे होवुन खंडेरावांनी वेढा सोडला आणि शत्रु सैन्याला हाततल्या दोन्ही तलवारीच्या घावाने कापन सुरु केले होते यामुळे सुभेदारांच्या भोवतालचा वेढा सुटला होता महाराज खंडेरावांनी आपले वडील सुभेदार मल्हारबाबांच्या जवळ जावुन त्यांच्या पायाला हात लावुन घोड्यावरुनच दर्शन घेतले आणि दोघेही लढु लागले.
कधीही युध्दात न हारलेल्या माझ्या पित्याला वेढा घालुन मारण्याआधी मला पराजित करा असे ओरडुन महाराज खंडेराव होळकर किल्ल्याच्या दिशेने शत्रुंची फौज कापीत निघाले त्यांच्या या आवेशाने शत्रुत घबराट निर्माण झाली होती किल्ल्याचे रक्षण करणा-या लोकात खंडेरावांच्या तलवारीची जरब बसली होती.
हातातल्या तलवारीने मारीत किल्ल्याच्या दिशेने येणा-या खंडेरावांकडे किल्ल्यावर असलेल्या महाराज सुरजमल जाटाचे लक्ष गेले आणि किल्ल्या वरील तोफदांजांना तो म्हणाला कि खंडेरावाला थांबवा पंरतु तोफगोळ्याच्या मधुन खंडेराव पुढे पुढे येत असल्याचे पाहुन सुरजमल जाटांनी आपल्या तोफंदाजांना खडसावले अरे ह्या तोफा आहेत का चिलमी तीनही तोफांचा मारा करा खंडेराव थांबवा वरुन किल्ल्यावरून तीन ही तोफा खंडेरांवांच्या दिशेने आग ओकु लागल्या शेवटी घात झाला एक तोफगोळा महाराज खंडेराव होळकरांच्या छातीला लागला आणि महाराज खंडेराव तिथेच कामी आले.
त्यांचा मृत्यु झाला होता खंडेरावाचा झालेला मृत्यु पाहुन सुरजमलाने युध्द थांबवले व तो किल्ला सोडुन पळुन गेला खंडेरावांच्या मृत्युची बातमी छावणीत जाताच एकच आक्रोश झाला रडारड सुरु झाली आयुष्याच्या शेवटपर्यत अनेक दुख भोगलेला सुभेदार पिता त्या युध्दभुमीवर एकुलत्या एक मुलगा व होळकर दौलतीच्या वारशाचे पडलेले पार्थीव मांडीवर घेवुन लहान मुला सारखा ढसा ढसा रडत होता छावणीत पुण्यश्लोक अहील्यादेवी व नऊ सवती रडत होत्या आक्रोश करीत होत्या तर महाराज खंडेराव अहिल्यादेवींचे दोन मुल छोटा मालेराव व मुक्ता तो आक्रोश पाहुन रडत बसली होती.
शुरवीर शहीद खंडेराव महारांजाचे पार्थिव गांगरसौली येथील छावणीत आणले सायंकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरु झाली होती. अहिल्यादेवीसह इतर नऊ बायका सती जाण्यासाठी पांढरे वस्त्र धारण करु लागल्या सजलेले पार्थिव चंदनाच्या लाकडाने रचलेल्या चितेवर ठेवले आणि अहिल्यादेवी सती निघाल्याचे पाहुन सुभेदारांना अती दुख झाले ते पुढं झाले आणि सती जाणा-या अहिल्यादेवीना विनंती करु लागले कि पोरी मी पिकलेलं पान आहे कधीही गळुन पडेल.
ही छोटी निरागस मालेराव व मुक्ता बघ पंरतु रितीरिवाजाचे पालन झालेच पाहीजे म्हणुन अहिल्यादेवी निश्चयावर ठाम राहत मुक्ता व मालेरावांने पायाला घातलेली मिठी सोडवीत चितेकडे निघाल्या शेवटी मल्हारबाबा आडवे झाले आणि त्यांनी अहिल्यादेवींना सांगीतले की ह्या होळकर गादीचा वारस गेला आहे पंरतु या रणमैदानावर माझा खंडु मेला नसुन माझी अहिल्या मेली असे समजतो आणि तुझ्यात माझा खंडु आहे असे समजतो हा कारभार तुला सांभाळायचा आहे या दौलतीला आणि इंदौरला तुझी गरज आहे म्हणुन सती जावु नको असं शेवटचं सागुंन ढसा ढसा रडणा-या त्या पितृतुल्य सास-यांची अवस्था बघुन अहिल्यादेवीनी सती जाण्याचा निश्चय रद्द केला.
त्यांच्याऐवजी कुवंर साहब रमजानी सह इतर बायका महाराज खंडेराव होळकरासोबत सती गेल्या त्यांची चिता पेटल्यानंतर महाराज खंडेराव होळकर यांचे इमानी श्वान गुलबदन त्या पेटलेल्या चितेत उडी घेवुन स्वतःला अग्नीच्या हवाली केले.
ह्या घटनेची माहिती दिल्लीचा बालशहा यास समजल्यानंतर त्यास दुःख झाले व त्यांच्या क्षेत्रात महाराज खंडेरावांचा युध्दात मृत्यु झाल्याने चोळी बांगडीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वेरुळ घृष्णेश्वर चा परगणा देवुन पुत्र मालेराव यास अंबडचा महाल (खंडोबा मंदिरा समोरची होळकर हवेली)दि. १६ जुन १७५४ रोजी दिली व या महालाच्या देखभाल दुरुस्तीसाठी (अंबड, वाघलखेडा, एकलहेरा) आदी गावात १०० एकर जमीन इनाम दिली तर पुणे येथुन श्रीमंत पेशवे यांनी खंडेरावांच्या उत्तर क्रियेकरिता एक लक्ष रुपये दिले व सुरजमल जाटाने कुंभेरी येथे खंडेरावांच्या छत्रीकरीता गांगरसोली, तमरेल, सहत वगैरे १५४२७ उत्पन्नाची गावे व मिठागर ही खर्चाकरिता लावुन दिल्या.
दिल्लीच्या बादशहाने सुभेदार मल्हारराव होळकर यांना झालेल्या पुत्रवियोगाचे दुःख सांत्वन पर पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की शुरवीर खंडेराव पराक्रमी होते त्यांच्यात मराठी अस्मितेचे प्रचंड तेज होते त्यांच्या स्वाभिमानापुढे दिल्लीचे तख्त हे सन्मानाने झुकले होते त्यांच्या मुत्सदीपणा आम्ही अनुभवला असुन अशा लढवय्या पुत्राचा मला अभिमान असुन त्याच्या निधनाचे मला दुःख झालेआहे या दुःखातुन तुम्हाला सावरण्याची इश्वर शक्ती देवो तसेच माझ्या क्षेत्रात त्यास विरमरण आल्याने त्यांच्या साहसाचे आदर करीत वेरुळचा परगणा वअंबड महाल दिला आहे.
असा इतिहास अंबडच्या होळकर महालाचा असुन त्याचे उत्पन्न मोठे होते तो महाल होळकरांना मिळाल्यावर उत्पन्नात वाढ झाली होती वर्षानुवर्ष या महालातुन मोठे उत्पन्न होळकरांना मिळत होते अशा या महालाची प्रचंड दुरावस्था आज झाली असुन तो दिव्य मालेरावांचा महाल शेवटची घटका मोजीत आहे त्याची शासन दरबारी सिटी सर्वे क्रमांक १३६० क्षेत्र ४६५.५ अशी नोंद असली तरी त्यावर होळकर ऐवजी इतरा लोकांचे नाव आहे तो महाल जरी इतिहासात होळकरांचा असला तरी त्यावर अवैध कब्जा झालेला असुन पडलेल्या त्या महालाच्या दगडी भिंती, बुरुज ,स्वागत कमान इतिहासाची आज ही साक्ष देतात.
या महालाच्या देखभालीसाठी भागोजी पाटील गवारे यांना नियुक्त केले होते मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यास शासन केल्याचा उल्लेख पत्रात मिळतो. पत्र क्र.१० – सदनाजी भगोरे यांचा अर्ज की भागोजी गवारे कैलासवासी मालेराव बाबांचे खिदमतगार होते त्यांचा काळ जाहल्यावर ते न पुसता गेले यावर अंतर पडले .धरमपुरी मुक्कामी साहेबांनी धरुन शासन केले त्यात आता अंतर पडणार नाही जामीनाविषयी आज्ञा झाली त्यास मी जामीनदार जाहलो आता वावगी वर्तणुक करनार नाही.
वरिल मजकुराचे पत्र भागोजी गवारे यांचे वतीशे सन १७८५ ला सदनाजी भगोरे यांनी महाराज तुकोजीराजे होळकर यांना लिहले आहे. या पत्राचा आपन असा अर्थ घेवु शकतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पती महाराज खंडेराव वारल्यानंतर दिल्लीच्या बादशहाने त्यांचे पुत्र युवराज मालेरावबाबा यांना अंबड चा महाल दिला होता.
सदरील महालाचे खिदमतगार अंबड येथील भागोजी पाटील गवारे हे होते. युवराज मालेराव होळकर यांच्या मृत्युनंतर भागोजी गवारे यांनी होळकर सरकारला महालाची माहिती न देता त्याकडे दुर्लक्ष केल्याने धरमपुरी अर्थात पैठण येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मुक्कामी असता त्यांनी भागोजी गवारे यांना त्यांच्या चुकीबद्दल शिक्षा दिली होती पंरतु पुन्हा असे दुर्लक्ष होणार नाही याची हमी घेवुन मी भागोजी गवारे यांचा जामीनदार झालो असल्याबाबतचे सदनाजी भगोरे यांनी पत्रात म्हटले आहे. सदरील पत्राचा उल्लेख होळकर शाहीचा इतिहास या पुस्तकात आहे. अशा या मंदिर व महालाचे होळकरांच्या राजवैभवात मोठे महत्व आहे.
अशी हि होळकरकालीन वस्तू आयुष्यात नक्की पहिली पाहिजे. खाली Google Map दिला आहे. अंबड हे तालुक्याचे ठिकाण असल्यामूळे तेथे मुक्कामाची व जेवणाची सोय सहज होऊ शकते.
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
फोटो : मा.अक्षय बर्वे
राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.
- होळकरांशी नमकहरामी करणाऱ्या भवानीशंकर बक्षीचा दुर्दैवी अंत…! - May 13, 2022
- वाफगावचे एक बुंदकी व दु बुंदकी नाणे - January 5, 2022
- होळकरांचे ऐतिहासिक वाफगाव - December 31, 2021