Skip to content

इतिहासातील सोनेरी पान : अहिल्यादेवी होळकर

अठराव्या शतकातील पेशवेकालीन इतिहासाचा विचार करता मल्हारराव होळकर, महादजी शिंदे यांच्या तुलनेत अहिल्याबाईंबद्दल इतिहासात फारच कमी माहिती उपलब्ध आहे. मराठ्यांचा संपूर्ण इतिहास हा फक्त ढाल आणि तलवारीत अडकवून ठेवल्याने कदाचित असे झाले असावे. मराठा इतिहासातील कर्तबगार स्रियांच्या इतिहासाचा लेखाजोखा घेता लक्षात येते की राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई, छत्रपती राजारामांच्या पत्नी महाराणी ताराबाई, मराठा सरदार घराण्यातील उमाबाई दाभाडे, लक्ष्मी आंग्रे, दर्याबाई निंबाळकर अशा कर्तुत्ववान स्रीयांचा विचार करता लक्षात येते की, जिजाऊ आणि ताराराणी यांना पिढ्यानपिढ्या चा समृद्ध वारसा लाभलेला होता. तसा वारसा अहिल्याबाईंना नव्हता. पिढीजात मात्तब्बर घरातून त्या आलेल्या नव्हत्या तरीही त्यांनी सिद्ध केलेलं कर्तुत्व हे त्यांच्या व्यक्तिमत्वाला उंचीवर घेऊन जाते.

Ahilyabai Holkar android App

भारताच्या तात्कालीन राजकारणाचा विचार करता दिल्लीच्या मोगल बादशहाच्या व्यतिरिक्त मराठे एक बलाढ्य सत्ता म्हणून उद्याला आलेले होते, मोगल बादशाहा जरी सर्वोच्च सत्ताधारी मानले जात असले तरीही मराठे सर्वात शक्तिमान समजले जात होते. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज हे भारतात सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात होते. ब्रिटीश अधिकारी अँलन मँकफरसन याने ७ मार्च १७७६ साली आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘या देशात मराठे सगळ्यात बलाढ्य आहेत. आपला मुख्य सामना त्यांच्याशीच आहे.’ औरंगजेबाच्या मृत्यू नंतर २० फेब्रुवारी १७०७, औरंगजेबाचा मुलगा आझमशाहा याने शाहू महाराजांची कैदेतून मुक्तता केली होती. त्याच्यानंतर बहादुरशहा बादशाहा झाला. शिखांशी लढताना लाहोर येथे १७ फेब्रुवारी १७१२ रोजी बादशाहा बहादुरशहा याचा मृत्यू झाला. त्यानंतर १७१५ मध्ये गादिवर आलेला फारुकशायर याने इस्ट इंडिया कंपनीच्या मागण्या मान्य केल्या, इंग्रज सत्तेने पाळेमुळे रोवण्यास सुरवात झाली होती.

दिल्लीत सतत बदलते दुबळे बादशाहा असल्याचा हा परिणाम होता. मराठ्यांकडील आघाडीवर मोगलांच्या कैदेतून सुटून आलेल्या छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पदाची वस्रे दिली, त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे जेष्ठ चिरंजीव बाजीराव याना पेशवेपद बहाल करण्यात आले. बाजीरावांच्या काळात राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर आणि उदाजी पवार या सरदारांनी उत्तरेत मुसंडी मारत प्रचंड पराक्रम करून सर्वत्र विजय मिळविला. राणोजी शिंदे यांना उज्जैन, मल्हारराव होळकर यांना इंदूर आणि उदाजी पवार यांना धार येथील चौथाई वसूल करण्यासाठी अधिकार मिळाले. हे कुणीही मात्तब्बर सरदार घरातील नव्हते हे विशेष.

होळकर घराणे नीरा नदीकाठच्या होळ(मुरूम) नावाच्या गावाचे म्हणून होळकर नावाने ओळखले जात. १७२५ मध्ये मल्हारराव होळकर यांना बाजीराव पेशव्यांनी पाचशे स्वारांची मनसब दिली आणि मल्हाररावांच्या सरदारकीची सुरुवात झाली. बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे आणि इतर मराठा सरदारांनी उत्तर भारतात प्रचंड मुसंडी मारली. या धामधुमीत मल्हारराव होळकरांनी केलेल्या पराक्रमाचे बक्षीस म्हणून त्यांना माळवा प्रांताची जहागिरी मिळाली आणि मल्हारराव इंदूरचे सुभेदार झाले. माळव्या प्रांतावर मराठ्यांच्या सत्तेत होळकर आणि शिंदे दोन मात्त्ब्बर सरदार उदयाला आले.

महाराष्ट्रातील अहमदनगर परगण्यातील चौंढीगावाचे पाटील माणकोजी शिंदे आणि पत्नी सुशीला यांच्या पोटी ३१ मे १७२५ रोजी अहिल्याबाईंचा जन्म झाला. मल्हारराव होळकर आपल्या संपूर्ण लवाजम्यासह पुण्याकडे जात असतांना त्यांचा मुक्काम चौंढी या गावी पडला असता मल्हाररावांनी अहिल्याबाईंना बघितले आणि त्यांनी माणकोजी शिंद्यांकडे आपला मुलगा खंडेराव याच्यासाठी अहिल्याबाईंना मागणी घातली. १७३३ मध्ये मल्हारराव होळकरांची सर्वात मोठी सून म्हणून इंदूरच्या होळकर वाड्यात अहिल्याबाईंनी प्रवेश केला. गुणांची कदर करणारे सासरे मल्हारराव यांनी अहिल्याबाईंना बालवयापासून राजकारण आणि समाजकारणाचे धडे दिले. आणि अहिल्याबाईंचा राजकारणात प्रवेश सुकर झाला.

अहिल्यापती खंडेरावांना त्यांचे पिता मल्हाररावांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून स्वारीवर न्यायला सुरुवात केली होती. पेशवाईच्या काळात मराठा सरदार आपले कुटुंब सोबत घेऊन जात असत, त्यामुळे अहिल्याबाई खंडेरावांसोबत स्वारीवर जाऊ लागल्या. त्यामुळे युद्धभूमीवरील डावपेच व मसलतीही कळू लागल्या आणि अप्रत्यक्षपणे अहिल्याबाईंची जडणघडण होऊ लागली. अहिल्याबाई आणि खंडेरावाना मालेराव आणि मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली. अशातच १७ मार्च १७५४ रोजी मराठ्यांनी कुंभेरीच्या किल्याला वेढा घातला असताना झालेल्या युद्धात खंडेराव होळकर यांचा तोफेचा गोळा लागून मृत्यू झाला. पतीच्या मृत्युनंतर होळकर संस्थानाच्या अनेक जबाबदाऱ्या अहिल्याबाई सांभाळू लागल्या. मल्हारराव होळकर यांनी एक मात्तब्बर सुभेदार म्हणून नावलौकिक मिळवला होता. याच काळात राघोबादादा, होळकर, शिंदे आणि इतर मराठा सरदारांनी सतलज, बियास, रावी, चिनाब, झेलम आणि सिंधू या नद्या ओलांडून भोवतालचा प्रदेश पादाक्रांत करत सिंधू तीरावरील अटक या गावी पोहचले, आणि मराठ्यांचे अटकेपार झेंडे पोहोचले.

१७५९ च्या सुमारास मल्हारराव जयपूरच्या मोहिमेवर असताना जनकोजी शिंदे यांचे पत्र मल्हाररावांना प्राप्त झाले, अब्दालीच्या आक्रमणाची ती बातमी होती. आणि मदतीला येण्याचे कळविले होते. मल्हारराव जयपूरची मोहीम अर्धवट सोडून शिंद्यांच्या मदतीसाठी दिल्लीच्या दिशेने निघाले. १० जानेवारी १७६० रोजी दिल्लीच्या जवळ कोटपुतळी गावी असतांना वार्ता आली, दत्ताजी शिंदे मारले गेले, जनकोजी शिंदे घायाळ झाले. या मोहिमेत अहिल्याबाई सैन्याच्या छावनीतच असल्याचे इतिहास सांगतो. म्हणजे पानिपतावरील अनेक प्रसंग त्यांच्या समोर घडले असणार. पानिपतावरील युद्धाच्या जखमा सोबत घेऊनच त्या इंदूरला परतल्या. त्यानंतर अवघ्या सहा वर्षात २० मे १७६६ रोजी मल्हाररावांचा मृत्यू झाला. महापराक्रमी मल्हार पर्व अहिल्याबाईच्या आयुष्यातून संपले आणि खऱ्या अर्थाने अहिल्यापर्व सुरु झाले. मुलगा मालेरावांना सुभेदारीची सनद मिळाली. मालेरावाची कारकीर्द अत्यल्प ठरली २० मार्च १७६७ रोजी मालेरावाचा मृत्यू झाला. होळकर घराण्यातील तिसऱ्या पुरुषाचा अंत झाला होता.

होळकरांचे श्रीमंत राज्य हडपण्यासाठी राघोबादादांनी खेळी करायला सुरुवात केली. होळकरांचे राज्य ताब्यात घ्यावे किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे दत्तक घ्यायला भाग पाडायचे असे प्रयत्न सुरु झाले. अहिल्याबाईंची स्वतःची गुप्तचर यंत्रणा काम करत होती, त्यांना आतल्या गोटातल्या सर्व बातम्या मिळत होत्या. अहिल्याबाईंनी आपला मुक्काम महेश्वरला हलविला होता. राघोबादादा महेश्वर ला यायला निघाल्याच्या बातम्या अहिल्याबाईंपर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी स्वतःचे फासे फेकायला सुरुवात केली. अहिल्याबाईंची पहिली सत्वपरीक्षा सुरु झाली होती. त्यांनी तुकोजी होळकरांना फौजेसह हजर होण्यासाठी कळविले. माधवराव पेशव्यांना पत्र लिहून स्वतः कारभार करण्यासाठी अधिकार मागितले. या बरोबरच सर्व मराठा सरदारांना पत्र लिहून आपल्या बाजूने वळविले. जी वेळ आज अहिल्याबाईंवर आलीय ती आपल्यावर येऊ शकते या शक्यतेने सर्व मराठे अहिल्याबाईंच्या बाजूने उभे राहिले परिणामस्वरूप अहिल्याबाईंचा विजय झाला. मराठ्यांच्या इतिहासात प्रथमच एका विधवा महिलेने आपले अधिकार स्वतःच्या मुत्सद्देगिरीने आणि स्वतःच्या ताकदीवर मिळविले होते. अहिल्यापर्वाची सुरुवातच अशी धूमधडाक्यात झाली होती. होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.
अहिल्याबाईंनी राज्यकारभार सुरु केला तेव्हा घरातील रक्ताच्या नात्यातील माणसे बोटावर मोजण्याइतकीच होती. मुलगी मुक्ता, जावई यशवंत फणसे. दोन सख्खे भाऊ शहाजी, आणि महादजी. अहिल्याबाईंनी कारभार हाती घेतला त्यावेळी जी प्रतिज्ञा केली ती महेश्वरच्या वाड्यावर आजही लिहिलेली आहे…
‘माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.
माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे.
सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे.
परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या आहेत, त्या मला पार पाडावयाच्या आहेत.

अहिल्याबाईंची जनतेशी असलेली बांधिलकी ही अंत:करणाच्या गाभ्यातून होती याची अनेक उदाहरणे त्यांच्या चरित्रात सापडतात. गांडापूर परगण्यातील नांदगाव व आजूबाजूच्या परिसरातील गावांत फौजेच्या धामधुमीत बरेच नुकसान झाले होते. या गावांची परिस्थिती लक्षात घेता, अहिल्याबाई, तुकोजी होळकर, हरिपंत फडके, चौथाई वसूल करणारे जाधवराव अशा सर्वांनी सर्व प्रकारची मदत परिसरातील गावांना केली होती. परंतु कमाविसदार विठ्ठलपंत यांनी डोळेझाक केली. वसुलीचा तगादा लाऊन ते थांबले नाहीत तर त्यांनी दांडगटांना हाताशी धरले, आणि वसुली सुरूच ठेवली. गावातील गोधाई पाटलीण बाई, काळू पाटील, भवानी कारभारी यांनी अहिल्याबाईंना पत्र लिहून व्यथा कळविली. अहिल्याबाईंनी कारभाऱ्याना सुचना दिल्या, कमाविसदाराला कडक पत्र द्यावे, तरीही न ऐकल्यास दंड करावा, किंवा धरून समोर आणावे. हा न्यायनिवाडा बघितला की थेट शिवकाळाची आठवण होते.

अहिल्याबाईंच्या राज्यात रयतेला न्याय मिळत असे. त्यांनी अनेक विधवांना पतीच्या मिळकतीवरील हक्क मिळवून दिला. अहिल्याबाईच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः घेऊन, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातीं परंपरागत काळापासून सामानाची पहाडांतून ने आण करत असतांना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी त्यांना त्यातून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी डोंगराळ भागातील जमीन दिली आणि प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यासोबतच त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर ‘कर’ Tax घेण्याचा अधिकार दिला.

अहिल्याबाईंनी आपल्या राज्याच्या सीमा ओलांडून संपुर्ण भारत-भर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरे बांधली, नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला, विहिरी खोदल्या, नवीन रस्ते बांधले आणि जुन्या मार्गांची दुरुस्ती केली. भुकेल्यांसाठी अन्नछत्र उघडले. महेश्वर व इंदूर या गावांची रचना केली. आजही भोपाळ, जबलपूर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले आहे. याच्या मागे अहिल्याबाईंची दूरदृष्टी होती. त्यांनी द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, परळी वैजनाथ, काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी सह अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरे वा धर्मशाळांचे बांधकाम केले. वेरावळ येथील सोमनाथ चे गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले.

अहिल्याबाईंच्या चरित्राचा अभ्यास करतांना एक रूढी मला प्रथमच समजली, ती म्हणजे धनगर समाजात एक पद्धत होती, दिवसभर जी काही कमाई होईल त्यातील चार आणे भाग पत्नीच्या मालकीचा असे. मल्हारराव होळकरांनी त्यांच्या काळापासून ही परंपरा कायम ठेवल्याचे दाखले आपल्याला इतिहासातून मिळतात. मल्हारराव होळकरांच्या विनंतीवरून, बाजीराव पेशव्याच्या २० जानेवारी १७३४ च्या पत्रात मल्हारराव होळकर यांच्या सरंजामाचे खाजगी आणि दौलती असे दोन भाग केल्याचे व त्याप्रमाणे इमान देत असल्याचे म्हटले आहे. या परंपरेमुळेच होळकर संस्थानाची भरभराट झाली असावी.

अहिल्याबाईंची व्यथा म्हणजे, अत्यंत शूरवीर कार्यक्षम पतीच अकाली निधन, मुलाचा अकाली मृत्यू अशा प्रसंगी थोडही न डगमगता सासरे मल्हारराव होळकर याना अहिल्याबाईंनी समर्थपणे साथ दिली. समर्थपणे राज्यकारभार केला. राज्य हडप करण्याचे पेशव्यांचे प्रयत्न व नंतरच्या काळात तुकोजी होळकरांचे कारस्थान या सर्वाला त्या पुरून उरल्या.

त्यांच्या राज्यात गर्द वनराईने झाकलेले रस्ते, याचक तृप्त होऊन जाईल असे अन्नछत्र सदैव सुरु असत. पक्षांसाठी पिकलेली राणे राखून ठेवली जाई. असा स्वप्नवत वाटावा असा राज्यकारभार त्यांनी करून दाखवला. होळकरांच्या राज्याच्या त्या सर्वेसर्वा होत्या. मराठेशाहीच्या त्या आधारस्तंभ होत्या. पेशव्यांनी अहिल्याबाईंवर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या, पैसा मागितला व अहिल्याबाईंनी देखील सर्वाना वेळोवेळी मदत केली परंतु त्यांना पेशव्यांनी निर्णय प्रक्रीयेत मात्र कुठेही घेतले नाही. दिल्लीच्या पातशहांनी अहिल्याबाईंची दखल घेतली, शिखांनी वेळोवेळी अहिल्याबाईंचा सल्ला मागितला. राजपुतांनी वेळोवेळी अहिल्याबाईंवर विश्वास व्यक्त केला यातच त्यांच्या कार्याचा आणि कर्तुत्वाचा गौरव सामावलेला आहे.

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.

कैलास वडघुले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *