Skip to content

होळकरांचे ऐतिहासिक वाफगाव

महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचे जन्मगाव वाफगाव ता.राजगुरू जिल्हा पुणे असुन वाफगावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. होळकर राजघराण्यांच्या वंशावळीत सहावी वस्ती होळकरांची वाफगाव असा उल्लेख आढळतो.

मल्हारराव होळकर यांना माळव्याची सुभेदारी मिळाल्यानंतर पुत्र खंडेराव होळकर छत्रपती शाहु महाराज यांचेकडून १७३४ ला वाफगाव संबधित संपुर्ण अधिकार मिळवतात आणि राजघराण्यांच्या वैभवाला शोभेल असा भुईकोट उभारणीचा मुहुर्त पाहुन ७ एकरात भव्य दिव्य असे बांधकाम करुन घेतात.

यात सात बुरुज, भक्कम तटबंदी, अंधारी बारव, किल्ल्यातील व्यवस्थेसाठी पिण्याच्या पाण्याची दगडी पाय-या असलेली एल आकाराची बारव, राजदरबार, राणीमहल, जमादारखाना, टंकसाळसह राजराजेश्वर मंदिराचे निर्माण करुन तेथील दिवाबत्ती पुजाअर्चेचा अधिकार दिक्षित घराण्यांकडे देतात. जे आजही वंशपरंपरेने हा वारसा चालवत असुन मातोश्री गौतमाबाई होळकर यांनी माणकेश्वराची देवी व गर्ग्याची सटवाई या दोन्ही देवतांची वाफगाव बागात स्थापना करुन आपल्या मुलांच्या जावळ तसेच यात्रा विधी करतात ही परंपरा पुढे अनेक वर्षे सुरू होती.वाफगावास फुटगाव असा दर्जा होता.

किल्ले वाफगावचे प्रवेशद्वार

१७४९ मध्ये मल्हारराव होळकर यांची कन्या उदाबाई यांच्या विवाहासाठी बुंदीचा हाडा राजा उम्मेंदसिंह मोठा लवाजामा घेवून बुंदी येथून वाफगाव साठी निघतो रस्त्यावर असलेल्या सर्व तीर्थक्षेत्री दर्शनयात्रा करुन पैठण येथे आपल्या वडिलांचे श्राद्ध घालतो. बुंदीचा हाडाराजा उम्मेंदसिंह यांचे वाफगाव येथे तोफेचे बार उडवून स्वागत करण्यासाठी मल्हारपुत्र युवराज खंडेराव पुढे येतात अतिथी देवो भवः म्हणत उम्मेंदसिंह यांचे स्वागत करुन त्यास एक शिरपेच आणि घोडा नजर करतात.

उम्मेंदसिंह यांच्या फौजेसाठी खास होळकरी जेवनाच्या पंगतीचे आयोजन केले जाते आणि उम्मेंदसिंह यांचेसाठी खंडेराव स्वतः शिकार करुन शाहीभोजनाचे आयोजन करतात. छोटा भाऊ दिपसिहं, भजनेरीचा जहागिरदार शेरसिंह, हरदावत हाडा नाहरसिंह,स्वतःचा खाजगी सचिव हरजन हाडाचा मुलगा दलेलसिंग उम्मेंदसिंह यांच्या समवेत शाही भोजनात सहभागी होतात. यासंदर्भातील खालील राजस्थानी काव्यातुन वाफगाव भेटीचा संदर्भ मिळतो.

“तारागड कारा बीच डारयो,बंधन लाही तब दर्प बिरसारयो
बापगाव मल्हार जुध्दजित,निज कन्या उपमय मंडित इत !!

श्राध्द वपन उपवास बिहीत सब,बिरचीअग्ग बुंदीस चलीए तब |
उज्ज असित इम गय धरि नय धुर,बाफगाव नामक हुलकर पुर ||
पुण्यापुर मल्लार हुतो तब, खंडु नृप सतकार कियो सब |
समुह जाय बधाए रु लिन्ने,हय सिरोपाव निवेदन किन्नै ||

माळव्यात स्थिर झाल्यानंतर वाफगाव येथे सुभेदार मल्हारराव होळकरांची नेहमीच बैठक असायची ते दक्षिण उत्तर महालाची वहिवाट, लावणी, उगवणीचे निर्णय घेत वाफगाव अंतर्गत १५ लक्ष रुपये उत्पनांची गावखेडी होती.

सुभेदार मल्हारराव होळकर यांचे समवेत पानिपत युध्दात गेलेले आनंदराव होळकर हे लढता लढता पानिपतमध्ये धारातिर्थी पडतात त्यांच्या वारसांना सुभेदार मल्हारराव महाराज वाफगाव बहाल करतात मात्र आनंदराव यांचा परिवार इंदुर मध्ये स्थिर होतो.

पुढे वाफगावची वहिवाट केल्यानंतर ते वाफगाव बदल्यात महुजवळचे उमरिया गाव घेतात यासंबंधीची सनद पंचभैया सुरेश होळकर यांचेकडे पहायला मिळते. सुभेदार तुकोजीराव होळकर यांची पत्नी यमुनाबाई उर्फ राधाबाई या वाफगावी राहतात. त्या तिथेच बाळंत होवून ३ डिसेंबर १७७६ रोजी त्यांचेपोटी बाल यशवंतरावाचा जन्म होतो.

ही वार्ता अहिल्यादेवींच्या कानावर पडताच महेश्वर येथे तोफेंचे बार उडवून आनंद साजरा करतात तर लगबगीने अहिल्यादेवी बाळंतवीडा घेऊन यशवंताचे तेजस्वी मुख पाहण्यासाठी वाफगाव येथे जाताच होळकरांचा महाल पुष्हारासह तोरणांनी सजवल्या जातो नौबती, नगारे वाजवून मानाच्या हत्तीवरून साखरपान वाटुन पंचक्रोशीतील लोकांना जेवण दिल्या जाते.

सोन्याच्या पाळण्यात घालुन बाळ यशवंताचा जन्मसोहळा साजरा केल्या जातो. पती, पुत्र, नातु, सासु, सासरे यांच्या वियोगाने दुःखी झालेल्या अहिल्यादेवी यशवंतरावाच्या जन्माने सुखावतात. यावेळी त्यांचेसमवेत नारायणराव बारगळ, लांभाते, बुळे, वाघमारे सरदार असतात.

बाल यशवंतराव यांच्या शिक्षणाची व्यवस्था कायथा या गावी केल्या जाते ते वाफगाव येथून कायथा येथे जातात त्यांना राजपरिवार संस्कारासह संस्कृत, फारसीचे शिक्षण दिल्या जाते. यशवंतराव यांना काशिराव, मल्हारराव, विठोजी असे तीन भाऊ असतात.

यशवंतराव होळकर यांचे बालशिक्षण सरल्यानंतर त्यांना कौटुंबिक कलहांना सामोरे जावे लागते. अहिल्यादेवींच्या निधनानंतर तुकोजीराव यांना सुभेदारी मिळते. १७९७ मध्ये तुकोजीराव राजघराण्यांच्या गादीवर इच्छा नसतांना थोरला पुत्र काशिराव यांस सुभेदार म्हणून बसवतात मात्र सुभेदारीवरुन तुकोजींचे पुत्र मल्हारराव बंड करतात.

काशिराव दौलतराव शिंदेच्या मदतीने मल्हारराव यांचेवर अचानक छापा घालून काटा काढतात यातून भावाभावांत फुट पडते आणि यशवंतराव हे मल्हारगर्दीतून बाहेर पडुन मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेत नागपूर ला जातात. तिथे दुसरे रघुजी मार्फत त्यांना चांदा येथे नजरकैद केले जाते.

यशवंतरावावर एकापाठोपाठ संकटाचे येतात आणि याच संकटातून ते सावरतात काळाने त्यांचे सर्वस्वी हिरावून घेतले होते अंगावरील कपड्याशिवाय आणि होळकर नावाशिवाय काहीच नव्हते. चांदा येथून ते निसटुन ते माळव्याची वाट पकडतात. रस्त्यात त्यांना भवानीशंकर हा मित्र मिळतो.

भवानीशंकर हा यशवंतरावांच्या चाकरीत येतो आणि ते दोघेही तोरणामाळेत असलेल्या झुंझारसिंग नायकाकडे जातात. झुंझारसिंह नाईक यशवंतराव यांना शंभर घोडेस्वारासह सामिल होतात. पुढे पोट भरण्यासाठी इंदुर ला गेलेले शामराव महाडिक आणि बाळाजी कळमकर यशवंतरावाची धार येथे भेट घेतात.

धार येथे दुसऱ्या आनंदराव पवारांचा सेनापती रंगराव ओढेकर फितुर होवून धारची गादी बळकावू पाहतो. आनंदरावाना संकटाच्या काळात यशवंतराव मदत करतात. रंगराव ओढेकरांचे बंड शमवून त्यास बाहेर हाकलून लावतात.

हा पराक्रम पाहताच आनंदराव यशवंतरावासमोर धारमध्ये नोकरीचा प्रस्ताव ठेवतात मात्र यशवंतरावाच्या मनात काही औरच होते. त्यांनी फौजेसाठी देपालपुर परगण्यात लुटालूट करुन काशिरावाला आवाहन दिले. दरम्यान सारंगपुर येथे त्यांना वजीर हुसेन, मीरघासी, मर्दान अली, मेहरबानसिंग, जमाखान, सोबाजी आणि भवानीशंकरच्या माध्यमातून भोपाळचा पेंढारी अमीरखाँ व त्याचा भाऊ करमदीनखान मिळतो.

अमीरखाँ च्या माध्यमातून गफुरखाँ मिळतो. मल्हारगर्दीत यशवंतरावाची पत्नी लाडाबाई आणि कन्या भिमाबाई काशिरावांच्या कैदेत असते. एकाकी असलेल्या यशवंतरावांना तुळसाबाई मिळते. महेश्वर जवळच्या भिकनगाव येथे काशिराव आणि यशवंतरावाच्या फौजेत लढाई होवून काशिरावांचा पराभव होतो.

काशिराव सुभेदार झाल्यापासून कधीच महेश्वरच्या गादीवर बसले नव्हते महेश्वरच्या गादी रक्षणासाठी यशवंतरावाच्या राज्यभिषेकाचा सोहळा आयोजित केल्या जातो. दि. ६ जानेवारी १७९९ रोजी यशवंतराव महाराज यांचा महेश्वर येथील राजराजेश्वर कार्तवीर्य सहस्त्रअर्जुनाच्या मंदिरासमोर थाटामाटात राज्यभिषेक सोहळा साजरा होतो.

मराठेशाहीला वाचवण्यासाठी यशवंतराव महाराजा होतात आणि
इंद्र्प्रस्थितो राजा चक्रवर्ती भूमंडले !
तत्प्रसादात्कृता मुद्रा लोक स्मिंवै विराजते !!
लक्ष्मीकांतपदांभोज भ्रमराचितचेतसाम !!
यशवंतस्य विख्याता मुद्रेशा पृथिवीतले!!
अशा पध्दतीची मुद्रा यशवंतराव अंगिकारतात

यशवंतराव हे मराठेशाहीला इंग्रजापासुन सावरण्यासाठी दुसरा बाजीराव, दौलतराव शिंदे यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांनाच ललकारले जाते यशवंतराव लाखाची फौज घेवून पुण्याची मोहिम आखतात.

होळकर शिंदे पेशवे वादानंतर दुसऱ्या बाजीरावाने वाफगाव चा महाल जप्त केला होता हडपसरच्या लढाई अगोदर महाराजा यशवंतराव यांनी वाफगाव पुन्हा जुन १८०२ मध्ये ताब्यात घेतले आणि मल्हारराव यांची गर्दी जाहल्यावर उभयतां सदाशीवपंत व रामचंद्र यांस कासीराव यांनी कैद केलेले असते.

दोन वर्षें वाफगांवच्या किल्यात कैद असलेल्या सदाशिव पंत व रामचंद्र पंताची यशवंतराव सुटका करतात. हडपसरच्या मैदानावर युध्द होवून
दि. २५ ऑक्टोबर १८०२ रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांचा विजय होतो. लढाईत त्यांना अनेक जखमा होतात मात्र मनातील जखमांनी ते दुःखी होतात.

दुसरा बाजीराव पळून जातो आणि इंग्रजाचे मांडलिकत्व स्विकारतो. पेशवाईचा अस्त होतो. यशवंतराव इंग्रजाच्या विरोधात मोहीमा आखतात. दिल्लीच्या बादशहाचे स्वतः संरक्षण करतात आणि त्यांच्या पराक्रमावर खुश होवून बादशहा महाराजा यशवंतरावाचे
“राजराजेश्वर, श्रीमंत, चक्रवर्ती,
अली जाह(उच्चतम गरिमा) ,
जुबदत उल-उमारा(सेना का सर्वश्रेष्ठ), बहाद्दूर उल-मुल्क(साम्राज्य का बहाद्दूर),फर्जद ए अर्जमंद (महान पुत्र),नुसरत जंग(सहाय्यक युद्द में )
या बिरुदावलीने सन्मान करतो.

यशवंतराव महाराज भानपुरा येथे आपली नवी राजधानी स्थापन करुन इंग्रजाच्या विरोधात मोहीमा उघडतात. माँन्सनचा मुकुंददरा घाटात मोठा पराभव करतात, वेलेस्लीवर ही मात करतात.

दिवसेंदिवस इस्ट इंडिया कंपनीचे शेकडो अधिकारी यशवंतरावाच्या हातून मारल्या जावून लाखो रुपयांचे नुकसान होते तर यशवंतराव कलकत्तावर फत्ते करण्यासाठी तोफखाना सुरू करून तोफा तयार करतात. भरतपूर आणि ढीगच्या किल्ल्यातून पुन्हा एकदा इंग्रजाचा पराभव करतात.

लाहोरच्या रंजितसिहांच्या मदतीने मोठ्या युध्द्याची घोषणा करतात कारण यावेळी भारतातील एकही राजा, रजवाडा, नवाब, शहा इंग्रजाच्या विरोधात नसतो. यशवंतराव वगळता सर्वांनी इंग्रजाचे मांडलिकत्व स्विकारले होते. यशवंतरावाची ताकद ही त्यांच्या फौजेत आणि विश्वासू शिलेदारावर होती.

इंग्रजांनी मैदानात यशवंतरावाना पराजित न करु शकल्यामुळे त्यांनी त्यांचे शिलेदार फोडायला सुरवात केली. यशवंतरावांनी भरतपूर नंतर दिल्ली ताब्यात घेण्याची मोहीम आखली होती. भरतपूर येथे तीन महिने लढाई सुरू होती. तब्बल एक कोटी रुपये या युध्दावर खर्च झाले.

यात त्यांचा विश्वासु सोमाजी लांभाते पडला तर इंग्रजाचे नुकसान होवून ब्रिटनच्या संसदेत या लढाईचे पडसाद उमटले आणि वेलेस्लीला माघारी बोलावून घेण्यात आले. दरम्यान भवानीशंकर याने दिल्ली मोहीमेची माहिती देवून इंग्रजाशी हात मिळवणी केली. त्यास गद्दारीसाठी दिल्लीतील चांदणी चौकातील रुस्तुमखाँ ची हवेली आणि नजफगड महाल दिला मात्र दिल्लीकरांनी यशवंतरावाशी गद्दारी केलेल्या भवानीशंकरला “नमकहराम” उपाधी दिली.

यशवंतराव होळकर यांनी हरनाथसिंग होळकराला लखनौ वर पाठवले. हरनाथसिंगाने लखनौ फत्ते केले. यशवंतरावानी कलकत्त्यावरही हल्ला केला मात्र फौज कमी पडली. पुन्हा माघारी येत यशवंतरावानी भानपुरा येथे फौजेची जमवाजमव सुरू केली.

शाहीर अमरशेख यांनी यशवंतरावाच्या स्वांतत्र्य संग्रामावर पोवाडा रचला असुन वर्णन करतांना अमर शेख लिहतात कि,

डावाला प्रतिडाव होळकर टाकीत असे आगळा !
असुन पाण्यामध्ये मासा पायापाशी उपाशीच बगळा!!
खच खंदकामध्ये इंग्रज प्रेताचा पडला
नव शस्त्रास्त्रे असुन इंग्रज खंदकात सडला.
करीन रक्तबंबाळ देश मी ब्रिटीशानो तुमचा
भारभुमीच्या तसुतसुवर हक्क फक्त अमुचा
फंदफितुरी बंद करा अन या मैदानाला
मेल्या आईचे दुध होळकर नाही हो प्याला
नेपोलियन युरोपात ह्यो होळकर हिकंड
अडकित्यातील जशी सुपारी करु तुकडं तुकडं

यशवंतरावानी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला एकट्याने सुरवात करुन गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, बंगाल मध्ये जावून इंग्रजावर छापे घातले असुन त्यांनी इंग्रजाच्या विरोधात तब्बल सात वर्षे संघर्ष करुन जेरीस आणले होते.

शेवटी तोफखान्यात तयार केलेल्या तोफगोळ्याची चाचणी घेतांना स्फोट होतो आणि यशवंतरावाना मेंदुज्वर जडतो दरम्यान मोहीमा थांबतात. यशवंतरावासारखा थोर पुत्राचा वाफगाव येथे जन्म झाला त्या वाफगाव ची माती धन्य झाली.

वाफगाव येथील होळकरांचा राजवाडा सध्या रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असुन द्वितीय यशवंतराव होळकर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना शाळेसाठी दिला होता. त्या वाड्यात पिपाणी आणि पक पक पकाक नावाचे चित्रपटाची शूटिंग करण्यात आली होती.

शिवराम राजगुरू यांच्या आजोबांना याच किल्ल्यात विष्णुची मुर्ती सापडली होती. त्यांना गुरुपद मिळाल्याने राजगुरू असे आडनाव मिळाले असून महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय सुरू आहे.

काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]


होळकरशाहीची उत्कृष्ट पुस्तके Online Order करण्यासाठी भेट द्या.
Ahilyabai Holkar Books in Marathi

रामभाऊ लांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *