महाराजा यशवंतराव होळकर यांची बखर अर्थात भवानीशंकर बक्षी यांची रोजनिशी या ऐतिहासिक व संदर्भीय पुस्तकाचे संपादन करुन ते दि. २ एप्रिल २०२२ गुढीपाडवा रोजी सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यात प्रकाशित करण्यात आले.
महाराजा यशवंतराव होळकर यांनी आपल्या हयातीत घडलेल्या घटनांच्या कागदोपत्री नोंदी घेण्यासाठी भवानीशंकर बक्षीवर जबाबदारी टाकली होती. भवानीशंकर बक्षीने या सर्व नोंदी फारसी भाषेत नोंदवून ठेवलेल्या असुन या फारसी कागदापत्रातुन निवडक कागदपत्रे घेवून “वाकई होलकर” असे शिर्षक देवुन त्या फारसी कागदपत्राचा इंग्रजीत अनुवाद करण्यात आला.
पुढे अ.ना.भागवत व नानाजी भवरासकर यांनी फारसीचे मराठी रुपांतर करुन भवानीशंकर बक्षी यांची रोजनिशी अथवा महाराजा यशवंतराव होळकर यांची बखर असा शेरा मारुन पुस्तक भवानीशंकर बक्षी याची रोजनिशी नावाने पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. भवानीशंकर बक्षी हा महाराजा यशवंतराव होळकर यांच्या आश्रयाला येतो, नोकरी मिळवतो आणि पुढे नमकहराम होतो.
भवानीशंकर हा नमकहराम झाल्यानंतर त्याची इंग्रज वाताहत करतात. भवानीशंकर बक्षी सारखे फितुर आणि संधीसाधुना कठोर शिक्षा मिळाली नाही तर पुढे शेकडो भवानीशंकर तयार होतील म्हणून १२ जुन १८१६ रोजी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने लाला भवानीशंकर बक्षीची हत्या केली. त्याचवेळी त्याची नजफगड जहागिरी ही जप्त करण्यात आली होती.
९ एप्रिल १७९८ रोजी भवानीशंकर बक्षी हा महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चाकरीत दाखल झाला. बोलण्यात चतुर असलेल्या भवानीशंकरने यशवंतराव महाराजांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महाराजांनी त्याच्या प्रभावाखाली न येता त्याचे चातुर्य आणि धैर्य पाहुन सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला.
यशवंतराव महाराजांवर त्यावेळी चारही बाजूने संकट होते. संकटाच्या काळात मोठ्या धैर्याने त्यांनी आलेल्या संकटावर मात टाकीत पुढचा प्रवास सुरू ठेवला होता. यशवंतराव महाराज ज्यावेळी धारवरुन महेश्वरला आले त्यावेळी सुभेदार काशिराव दादा होळकर यांच्या सैन्याशी भिकनगाव आणि कसरावद येथे त्यांना लढाई करावी लागली होती.
सन १७९८ ला भिकनगावच्या युध्दात डुड्रेनेक सोबत झालेल्या लढाईत भवानीशंकरच्या हातात बंदुकीची संगीन घुसल्याने जायबंदी होवून त्याच्या हाताची बोटे तुटली होती. २ आँक्टोबंर १८०२ रोजी बारामती जवळ झालेल्या लढाईत फत्तेसिंग माने आणि भवानीशंकर बक्षीने चांगली कामगिरी करुन विजय मिळवला होता.
तर २५ आँक्टोबंर १८०२ ला हडपसरच्या युध्दात विजय मिळवल्यानंतर भवानीशंकर बक्षी यांस एक हत्ती, घोडा, पालखी, राजे पदवीने सन्मानित करण्यात आले होते. १४ आँक्टोबंर १८०४ ला मथुरेजवळ लाँर्ड लेक विरोधात झालेल्या लढाईत भवानीशंकरला बंदुकीची गोळी चाटुन गेल्याने जखमी झाला होता. त्यास उपचारासाठी डीगच्या किल्यात पाठवले होते.
डीगच्या किल्ल्यातुनच भवानीशंकरने इंग्रजांशी संधान साधल्याचा संशय होळकर छावणीत निर्माण झाला होता. तसेच महाराजांचा चेला हरनाथसिंग आणि भवानीशंकरचे आपसात पटत नसल्याने भवानीशंकर हा हरनाथसिंग यांस अडचणीत आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असायचा.
भवानीशंकर बक्षीबाबतचा गोपनीय अहवाल आणि खबरा ऐकून यशवंतराव महाराजांनी त्यावर थेट कोणतीही कारवाई केली नाही मात्र तो आतुन स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे लक्षात येताच त्यास काही दिवस टाळले गेल्यानंतर ३० एप्रिल १८०५ रोजी भवानीशंकर बक्षी आणि नवाब मुर्तुजाखाँ हे लाँर्ड लेकच्या आश्रयाला गेले.
याबदल्यात त्यास ७ नोव्हेंबर १८०५ ला सायरची जहागिरी, नजफगड महल, फजलखाँची गढी इस्तमुरार म्हणून मिळाली. भवानीशंकर बक्षीने अटीतटीच्या काळात केलेल्या गद्दारीमुळे निष्ठावान होळकर सैनिकांनी त्याचा शोध घेतला मात्र तो इंग्रजांच्या गोटात राहु लागल्याने त्याच्या गद्दारीची माहिती दिल्लीतील कुचा घासीराम परिसरातील लोकांना देवुन त्यांस नमकहराम भवानीशंकर आणि त्याच्या हवेलीस नमकहराम की हवेली म्हटले जावु लागले.
भवानीशंकर बक्षीचे केलेल्या गद्दारीमुळे त्यांस जहागिरी व हवेली मिळाली मात्र त्याचा उपभोग फारकाळ घेता आला नाही. शेवटी जहागिरीसाठी फितुर होणारा भवानीशंकर आपला कधीच होवू शकत नाही हे इंग्रजांना ठावूक असल्याने त्यांनी त्याचा यशवंतरावावर मात देण्यासाठी उपयोग करुन घेत त्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली.
दिल्लीतील लोकांना त्याच्या नमकहरामीची गोष्ट माहिती झाल्याने त्यास कुणीही नमकहराम म्हणून चिडवायचे, हिनवायचे.पुढे त्यास ती गढी गहाण ठेवावी लागली होती त्यातच इंग्रजांनी भवानीशंकरचा मुलगा जयसिंह यांस नजफगड महल मधून ३ हजार उत्पनाचा भाग देण्यात आल्याने भवानीशंकरच्या अडचणीत वाढ झाली आणि खितपत पडलेल्या भवानीशंकरची १२ जुन १८१६ रोजी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हत्या केली.
भवानीशंकरने यशवंतरावांशी फितुरी करुन मिळवलेली जहागिरी गेली आणि फितुरीमुळे त्याचे उर्वरित आयुष्य यातनामय होवून त्याचा अंत दुर्दैवी झाला. भवानीशंकर बक्षी यांस सुरवातीपासून यशवंतराव महाराजांनी खुप काही दिले. मात्र त्यांस तो मोठेपणा पचनी पडला नाही.
महाराजा यशवंतराव होळकरांच्या मनात सुखसंपत्ती व ऐश्वर्याचा उपभोग घेण्याची कधीच मनसा नव्हती. केवळ इंग्रजांचे होईल तितके दमन आणि पतन करुन ब्रिटिशांची सत्ता उध्वस्त करायची या विचाराने ते आलेल्या प्रत्येक दिवसाला सामोरे जात असत.
यशवंतरावांनी मोठा केलेला प्रत्येक सरदार जहागिरीच्या लालसेने फितुर झाला मात्र अशा फितुरांची इतिहासाने फितुर म्हणूनच पुढे नोंद घेतलेली आहे. फितुरांमुळेच इंग्रजांना सत्ता काबीज करता आली असली तरी महाराजा यशवंतरावांनी इंग्रजांच्या कपटी मनसुब्याच्या चिंधड्या-चिंधड्या उडवून त्यांच्या ब्रिटन मध्ये दहशत निर्माण केली होती.ब्रिटीश फौजेची एकुण जी हानी झाली ती हानी करण्यात यशवंतराव होळकर यांचा सर्वात मोठा वाटा होता. यशवंतरावांनी एकट्याने ब्रिटिश फौजेची कत्तल करुन मराठ्यांच्या ताकदीची जानिव करुन दिली होती.
महाराजा यशवंतराव होळकर यांची बखर अर्थात भवानीशंकर बक्षी याची रोजनिशी हे मराठीत लिहलेले पुस्क दुर्मिळ झाले होते होते. त्यास पुनःप्रकाशित करण्यात आलेले असुन 9421349586 या क्रमांकावर संपर्क साधुन पुस्तक प्रत घरपोच मिळवु शकता. या पुस्तकात महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन करण्यात आलेले असुन सदरील पुस्तक ऐतिहासिक व अव्वल मानलेले आहे.
लग्न,वाढदिवस, जयंती आदी प्रसंगी आपण आपल्या परिचित, मित्र, नातेवाईक यांना वरिल पुस्तक भेट देऊन यशवंतराव महाराजांच्या इतिहासाचा प्रचार करावा.
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
होळकरशाहीची उत्कृष्ट पुस्तके Online Order करण्यासाठी भेट द्या.
Ahilyabai Holkar Books in Marathi
- होळकरांशी नमकहरामी करणाऱ्या भवानीशंकर बक्षीचा दुर्दैवी अंत…! - May 13, 2022
- वाफगावचे एक बुंदकी व दु बुंदकी नाणे - January 5, 2022
- होळकरांचे ऐतिहासिक वाफगाव - December 31, 2021