वाघ्रळ, ता.जि.जालना(महाराष्ट्र)
ऐतिहासिक व पुरातन बारवा आणि त्याबद्दल संदर्भासहीत दिलेल्या माहितीचे ८ भाग सोशल मीडीयावर, अंबडचे ऐतिहासिक वैभव या सदराखाली “शोध दुर्लक्षित वास्तु व बारवांचा” या विषयाशी संबधीत लेखमाला सोशल मीडीयावर प्रसारीत केल्यानंतर आणि दै. नवाकाळ मुंबई व दै. सामना या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर मला अनेक ठिकाणाहुन बारवाबद्दल माहिती देणारे काँल येवु लागले. म्हणुन माझे मित्र श्री. जोशी सर जालना यांनी वाघ्रळ देवीचे ता.जि जालना येथील ऐतिहासिक बारवेबद्दल माहिती देवुन एकदा बारवेला भेट देण्याचा आग्रह केला. आज दि ९/५/२०१७ रोजी दुपारी ०१:३० वा ४५ सेल्सीअंश इतके उन्ह असतांना सत्यभान पा खरात यांना सोबत घेवुन वाघ्रळ गावाला भेट दिली, आणि ऐतिहासिक बारवेचा शोध घेतला.
यशवंतराव होळकर यांच्या जीवनावरील “झुंज “ कादंबरी आजच Order करा.
बारव बघितल्यानंतर उन्हाचा लाही लाही करणारा त्रास विसरुन उन्हात आल्याचे चिज झाले असा मनात विचार करुन बारवेची व्यवस्थित पाहणी केली दगडी पाय-या उतरुन तळापाशी गेलो बारव महाकाय आहे. त्यात हत्ती, उंट त्या बारवेत उतरुन पाणी पिऊ शकतात अशी मजबुत दगडी बांधणीची विशाल बारव निट निरखुन पाहिली. बारवेच्या कमानीवर बारवबद्दलचा शिलालेख आहे. अशी ही बारव प्रथमच मराठवाड्यात पाहत असल्याने त्याविषयी कुतुहल वाटले. पंढरपुरची बाजीराव विहीर आणि करमाळ्याची विहीर या बारवेसमोर लहान वाटतात.
या बारवेला पाण्याचे सात झरे असुन जिवंत पाणीसाठा आहे काडीकचरा व गवतामुळे बारवेचे वैभव खराब झाले असले तरी बारव जशास तशी आहे शेजारी राहणारे खांडेभराड काका यांनी ही बारव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली असल्याचे सांगीतले तर तेथुन ये जा करणा-या वयोव्रध्दांनी बारव अहिल्याबाईची असल्याचे सांगीतले. बारवेशेजारी एक दगडी मंदिर असुन, समोर छत्रीत दगडी नंदी व खाली दोन अडीच फुटाचा कासव सोबत पाण्याचा हौद, नदांदिप व एक समाधी आणि धर्मशाळा आहे.
सभोवतालचा परिसर स्वच्छ असुन बारव पाहताच मन प्रसन्न होते. या बारवे बरोबर गावात तीन चार कमानीच्या दगडी वेशी तर दगडी चौकाचे आणि होळकर पेशवे वाड्यासारखे अनेक वाडे आहेत. या वाघ्रळ गावाला ऐतिहासिक महत्वाबरोबर शौर्य व पराक्रमाची भुमी म्हणुन ओळखले जाते. वाघ्रळ हे गाव मराठवाड्याचे जालना जिल्ह्यातील शेवटचे गाव असुन तेथुन नागपुर प्रांत म्हणजे विदर्भ सुरु होतो. मराठवाडा मुक्तीसंग्रात वाघ्रळ गावचा विस्ताराने इतिहास असुन या गावचे संशोधन होणे महत्वाचे आहे.
बारवेशेजारी असलेल्या मंदिरात पुर्वीच्या काळी जगंदबेचे ठाणे होते मात्र देवी तिथुन डोगंराकडे गेल्याने तिथे एक दगडी मंदिर बांधलेले होते. गावक-यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला असुन यामुळे वाघ्रळ गावास देवीचे वाघ्रळ म्हणुन ओळखतात. पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या धर्मशाळेपैकी वाघ्रळ ची धर्मशाळा अजुन चांगल्या स्थितीत आहे. चार भिंती चांगल्या असुन त्यावर लोखंडी पत्रे टाकल्यास ती वास्तु उपयोगी येवु शकते. पुर्वी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असावी व यात्रेकरु थांबत असावे तसेच या ठिकाणी भाविकांची गर्दी असावी म्हणुन धर्मशाळेचे बांधकाम झालेले असावे. सद्य परिस्थितीत अनेक ठिकाणच्या धर्मशाळा नष्ट झालेल्या आहेत पंरतु इतिहासाची साक्ष देणारी वाघ्रळची धर्मशाळा आजही आपले अस्तित्व टीकुन आहे.
जालना येथील स्व. भगवानराव काळे यांच्या आपला जालना जिल्हा या ऐतिहासिक पुस्तकात वाघ्रळ बद्दल दिलेल्या माहितीचा संदर्भ महत्वाचा असुन पुढे संशोधन कामी उपयोगी ठरणारा ग्रंथ आहे. वाघ्रळ ची महाकाय बारव होळकर शाहीचे ऐतिहासिक वैभव असुन मोठ्या उंचीची चिरेबंदी दगडी बारव पाहण्यासारखी असुन जलव्यवस्थापनेचा एक चांगला नमुना आहे. जल व्यवस्थापनेचा सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वाघ्रळची बारव आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
समाधी मंदिर
- होळकरांशी नमकहरामी करणाऱ्या भवानीशंकर बक्षीचा दुर्दैवी अंत…! - May 13, 2022
- वाफगावचे एक बुंदकी व दु बुंदकी नाणे - January 5, 2022
- होळकरांचे ऐतिहासिक वाफगाव - December 31, 2021