पिटकेश्वर, ता.इंदापूर जि.पुणे
अहिल्यादेवी होळकर यांनी पिटकेश्वर येथे १८ व्या शतकात बांधलेल्या दगडी शिवलिंगाच्या आकाराच्या विहिरीचा आजही तेथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी वापर करत आहेत. तेव्हापासून आतापर्यंतच्या अनेक दुष्काळात या ऐतिहासिक विहिरीने ग्रामस्थ, पशु पक्षांना कधीही पाणी कमी पडू दिले नाही.

१८ व्या शतकात अहिल्यादेवींनी अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला, नदीवर घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या व महत्त्वाच्या ठिकाणी शिवलिंग आकाराच्या विहिरी बांधल्या. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग पिटकेश्वर गावावरून होता. त्यामुळे अहिल्यादेवींनी याठिकाणी विहीर बांधली.

साधारण ५० फूट खोल असलेली हि विहीर दगडी कामात आखीव व रेखीव बांधलेली आहे. विहिरीच्या वरच्या बाजूला घोड्यांना तसेच जनावरांना पाणी पिण्यासाठी बांधलेला दगडी हौद व दगडी पाण्याचा पाट आजही सुरक्षित आहे.


या बारवेचे संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणयुक्त अशा दगडात आहे. बारवेत उतरण्यासाठी एकाच बाजूने सोय आहे. बारवेत उतरताना दोन्ही बाजूला देवळ्या नजरेस पडतात. देवळ्यात शिवलिंग व नंदीची मूर्ती आहे.

बारवेत पाण्याचे झरे अजूनही जिवंत आहेत. बारवेतील पाणी शेतीच्या उपयोगासाठी यावे म्हणून मोटेची सोया केलेली दिसते. या बारवेची दगडी कामात आखीव व रेखीव बांधलेली आहे.

हि बारव सध्या प्रसिद्धीस आली आहे ते तेथील दोन होळकरकालीन शिलालेखांमुळे. शिलालेख खालीलप्रमाणे,
शिलालेख क्रं.१ :

शिलालेखावरील उल्लेख खालीलप्रमाणे,
।।श्री।।
।।पिटकेश्वर येथील स्थ
ला वर वीहीर केली शालि
वाहन शके १७१० कीलक नाम
संवत्सर ।। श्री मल्लारि चरणी
तत्पर अहिल्याबाई होळकर नि
रंतर ।।
शिलालेख क्रं.२ :

शिलालेखावरील उल्लेख खालीलप्रमाणे,
।। श्री पिटकेश्वर चरणी तत्पर
अहिल्याबाई होळकर
निरंतर ।। श्री हरहार ।
यातील पहिल्या शिलालेखाच्या काळाचा उल्लेख आहे पण त्याची झीज झालेली असल्यामुळे स्पष्ट दिसत नाही. त्यातील पहिले दोन अंक दिसतात मात्र शेवटचे दिसत नाहीत. त्यातील पहिले दोन अंक दिसतात मात्र शेवटचे दिसत नाहीत. मात्र संवत्सराचे स्पष्ट्पणे कीलक नाम संवत्सर असे येत असल्याने कालगणनाचा विचार करता कीलक नाम हे शके १७१० ला येते म्हणजेच सन १७८८ च्या दरम्यान या बारवेचे बांधकाम झाले आहे. त्यामुळे अस्पष्ट दिसणाऱ्या लेखातही ते असावा असा अंदाज बांधता येतो.

दुसरा लेख कालविहीन असला तरी तोही त्याच काळात कोरला गेला असावा हे स्पष्ट होते. होळकरांचे आजवर उजेडात न आलेल्या शिलालेखांपैकी हे दोन कोरीव शिलालेख आहेत. तसेच ग्रामस्थ मंडळींनी काही दिवासांपूर्वी या बारवेच्या कडेने सुरक्षित जाळी उभारली आहे.
आभार : श्री. श्रीकांत करे
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
राणी अहिल्यादेवी होळकरांनी भारतभर केलेल्या लोककल्याणकारी कार्यांची यादी पहा.
अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी कार्य
- पिटकेश्वर : अहिल्यादेवी होळकर बारव - October 8, 2020