होळकरशाहीचे शिलेदार : सरदार पळशीकर
पळशीकर वाडा : पळशी, ता.पारनेर जि.अहमदनगर
इतिहास:
सन १७५० च्या दरम्यान सरदार रामजी यादव(कांबळे) पळशीकर हे होळकरशाहीत सामील झाले. सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांनी सरदार रामजी यादव यांची कनिष्ठ सरकारी दिवाण(नायब दिवाण) पदी नेमणूक केली. दिवाण पद म्हणजे आजच्या काळातील वित्त मंत्री होय. होळकर दरबारी असलेल्या २८ मंत्रिमंडळा पैकी पळशीकर घराणे हे एक प्रमुख होय.
सुभेदार मल्हारराव होळकरांच्या काळात वरिष्ठ सरकारी दिवाण म्हणून गंगाधर चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या काम पाहत होते. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर गंगोबा तात्या हे राणी अहिल्यादेवींच्या विरोधात गेले व त्यांना बडतर्फ करण्यात येऊन त्यापदी नारो गणेश रांझेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
सुभेदार मल्हाररावांनी सरदार रामजी यादव पळशीकर यांना नियुक्ती झाल्यावर मध्यप्रदेश मधील देपालपूर परगण्यातील अजंडा गाव व महाराष्ट्रातील पळशीसहीत पाच गाव इनाम दिली होती.
सन १७५८ ला सुभेदार मल्हाररावांनी रामजी यादव पळशीकर यांचे पुत्र सरदार आनंदराव यादव पळशीकर यांना दोआबत अलीपूर खेडा हा परगणा सरंजाम म्हणून दिला होता. पुढे सन १७६१ ला पानिपतच्या युद्धात सरदार आनंदराव यादव यांनी होळ्करांतर्फे विशेष पराक्रम केला होता.
या गावच्या तटबंदीचा निर्माण रामजी पळशीकरांचे नातू रामाराव आप्पाजी पळशीकर यांनी सन १७८७ ते १७९७ च्या दरम्यान केले, असा उल्लेख तेथील प्रवेशद्वारावरील शिलालेखावर मिळतो. तसेच त्यावर नगरदूर्ग म्हणजेच भुईकोट असा हि उल्लेख मिळतो. या भुईकोटाचा निर्माण १० वर्ष चालू होता.
नारायणराव पळशीकर यांचे पुत्र रामराव पळशीकर हे महाराजा तुकोजीराव होळकर(दुसरे) यांच्या काळात सन १८४८ ला होळकर संस्थांचे प्रमुख सरकारी दिवाण होते. जुन्या होळकरवाड्यात किंवा आजचे मल्हारी मार्तंड मंदिरात ज्या क्षणापासून होळकरशाहीचा गणपती विराजमान होऊ लागला तेव्हा पासून जुना होळकर वाडा ते मूर्तिकार खरगोणकर यांच्या घरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. त्यावेळी होळकरशाहीतील सर्व प्रमुख सरदार त्या मिरवूणकीमध्ये सामील होतात. त्या सरदारांमध्ये पळशीकर हे हि असतात. १०० ते १२५ वर्षाची परंपरा आजही चालू आहे. पळशीकरांचे वंशज हे इंदोर(मध्यप्रदेश) येथे स्थायिक आहेत.
इंदोरचे होळकर संस्थान भारतात विलीन होईपर्यंत पळशीकर घराण्याने होळकर संस्थाना मार्फत हिंदवी स्वराज्याची सेवा केली आहे. होळकरांचे प्रमुख सरकारी दिवाण म्हणून पळशीकरांच्या पाच पिढयांनीं काम पहिले. दोनशे-सव्वादोनशे वर्षे या घराण्याने सुभेदार मल्हारराव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, तुकोजीराव, काशीराव, यशवंतराव, हरिराव यांचे सेवेत निष्ठेने दिवाणगिरी सांभाळली.
माहिती:
१८ व्या शतकात मराठी सत्ता प्रबळ बनल्यावर अनेक भुईकोटांचा निर्माण करण्यात आला. काही गावांचा इतिहास जाणून घेताना आपल्याला हमखास ऐकायला मिळते कि, पूर्वी आमच्या गावाला तटबंदी होती मात्र जसा काळ होत गेला तशी तटबंदी गायब होत गेली किंवा लोकांनी गायब केली मात्र महाराष्ट्रात अजूनही अशी काही गावे आहेत कि, जी पूर्णपणे आजच्या घडीला तटबंदीच्या आत वसलेली आहे त्यातीलच एक पळशी गाव.
संपूर्ण पळशी गाव दगडी तटबंदीच्या आत असल्याने आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच गावात प्रवेश करू शकतो. या तटबंदीला ऐकुन १६ बुरूज आणी ४ प्रवेशद्वार आहेत.
उत्तर व पूर्व दिशेचे प्रवेशद्वार मोठे असून त्यामधून चारचाकी आत जाऊ शकते. सध्या वापराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस पहारेकर्यांच्या देवड्या व शिलालेख कोरेलेले आहेत. पूर्व व पश्चिम बाजूला असलेले शिलालेख वेगवेगळे आहेत.
पश्चिम बाजूच्या शिलालेखावर खालील मजकूर आहे.
श्री अंबाचरणी तत्पर राम
राव आपाजि निरंतर शाखा
अश्वलायनगोत्र वसिष्ठ उ
पनाव कांबळे।। वृति कुळक
र्णि जाहागीरदार सा अंबल
यानि काम केले १२०७
पूर्व बाजूच्या शिलालेखावर खालील मजकूर आहे.
श्री गणेशायनम:।। पळशी
चे नगरदुर्ग बांधावयास प्रारं
भ शके १७०९ ल्पवंगनाम संवत्सरे
श्रावण कृष्ण १२ त्रयोदशीस।। सो
ध्दजालि शके १७१९ ल्पवंगनाम
संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध १२ त्र्ययोदसी
या भव्य दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर आपणास समोरच सुंदर बांधणीचे पुरातन शिवमंदिर दृष्टीस पडते. ते काशीविश्वेश्वराचे मंदिर असून मंदिराच्या मागील भिंतीवर मारुतीचे शिल्प कोरलेले आहे. या मंदिराच्या समोरच होळकरकालीन उत्कृष्ट एक छोटेसे मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाहेर एक विरगळ तर आतमध्ये पुरातन शिवलिंग व नागशिल्प आहे.
काशी विश्वेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर जवळच दक्षिणेकडील गडाचे मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला पळशीकरांचा वाडा पाहायचा. हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पांच्या कलाकृतींचा एक उत्कृष्ट नमुनाच. वाड्याला भक्कम तटबंदी असून वाड्याचे बांधकाम हे विटात व दगडात आहे. वाड्याच्या प्रवेशद्वारावरूनच त्याच्या सुंदरतेची कल्पना येते.
वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला आपली संस्कृती किती महान आणि व्यापक, भव्य होती याची प्रचिती येते. या वाड्यामध्ये जे लाकडी नक्षीकाम आहे त्याची तुलना कशा सोबतच नाही होऊ शकत.
वाड्यात बालाजी मंदिर आहे जे फारसे दाखवले जात नाही. सध्या दिसत असलेल्या या चार मजली वाडय़ाचे दोन मजले सुस्थितीत आहेत. पूर्वी चोथ्या मजल्यावर ५० पोती भरून कागदपत्रे होती. जी सध्या इतिहास संशोधक स. शि. निसळ यांनी अहमदनगर येथील जिल्हा इतिहास मंडळ यांच्याकडे दिली आहेत. या कादगपत्रात अनेक होळकरशाही, शिंदेशाही व पेशवाईची उल्लेख बघायला मिळतात.
वाड्याला तळघर आहे जे सध्या बंद केलेले आहे. वाड्यामधुन २ गुप्त मार्ग आहेत. जे वाड्या मागील २ वेगवेगळ्या मंदिरात जातात. वाड्यात ऐक आड (पुर्वीची छोटी विहीर) आहे. ज्याचं पाणी मात्र खारट आहे. वाडा हा २ मुख्य चौकात विभागला आहे. आणि वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वाड्याचे सर्वात सुंदर कोरिव लाकडी खांब पाहायला मिळतात. तसेच आणखी ऐक बैठकीची जागा आहे. जिथे पुरातन काळातील चित्रे भिंतीवर काढलेली आहेत.
विहीरीतील पाणी खारट तर आहेच सोबत त्या वाड्यामध्ये ऐक छोटीशी साधारण ५ इंच अशी वस्तु(विठ्ठलकृष्ण प्याला) आहे. ति खूप अद्भुत आहे. कारण ते ऐक पात्र किंवा प्याला आहे ज्यामध्ये २ मुर्त्या आहेत. उभी जी मुर्ती आहे ती पांडुरंगाची मुर्ती आहे आणि पांडुरंगाच्या हातामध्ये बाळकृष्णाची झोपलेली मुर्ती आहे. या पात्राचे वैशिष्ट्य असे आहे कि, त्या पात्रांमध्ये पाणी भरल्यानंतर त्याच्या खालच्या भागाला ऐक छिद्र (होल) आहे तरी सुद्धा त्यामधुन पाणी बाहेर पडत नाही. मात्र त्याच पात्राच्या बाळकृष्णाच्या पायाला पाणी लागताच पाणी लगेच त्याच छिद्रामधुन गळु लागते. वाचुन कदाचीत लक्षात नसेल आले तर, तुम्ही खालील व्हिडिओ नक्की पहा.
सद्यस्थितीत वाड्याचा एक मजला जरी शिल्लक असला तरी आजही त्यातील प्रत्येक खांबावर एकसंध लाकडामध्ये जे जे बारीक सारीक कोरीव काम केलेले आहे ते आपले डोळे दिपवून टाकते. पळशीकरांच्या वंशजांच्या ताब्यात सध्या हा वाडा असून वाड्याच्या देखभालीसाठी सध्या इथे एक कुटुंब राहत आहे. हा वाडा पाहून झाल्यावर आपण बाजुलाच असलेल्या पुरातन गजगौरी देवीच्या मंदिराचे दर्शन घ्यायचे, मंदिराच्या प्रवेशद्वारावर किर्तीमुख आहे.
बाजुलाच पाण्याची एक विहिर आहे. मंदिराच्या बाजूला किल्ल्याचे एक छोटेसे प्रवेशद्वार आहे, वर तटबंदीवर जाण्यासाठी येथे दगडी जिना आहे, या प्रवेशद्वारासमोरच तीन विरगळी आहेत. हे सर्व अवशेष पाहून आपण किल्ल्याचे मागील भव्य दिव्य प्रवेशद्वार गाठायचे. पहारेकरींसाठी देवडी असलेले हे प्रवेशद्वार पाहून आपण पळशी नदीच्या काठी प्रतिपंढरपूर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या विठ्ठलरुक्मिणी मंदिरात जायचे. अंदाजे २५० वर्षापूर्वी रामराव अप्पाजी पळशीकर यांनी बांधलेले.
मंदिराच्या दिशेने गेल्यावर मंदिर परिसरातील गरुडध्वज पाहिल्यावर त्यावरील कलापूर्ण नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. गरुडध्वज पाहिल्यावर त्यावरील कलापूर्ण नक्षीकाम आपले मन थक्क होऊन जाते. मंदिराची शिखरे, त्यावरील नक्षीकाम, त्यांची प्रमाणबद्धता या गोष्टी पळशीकरांच्या रसिकतेची व पांडुरंगनिष्ठेची प्रचिती आणून देतात.
मंदिराच्या महाव्दारावर गणपती, सरस्वती ही दैवते, महाव्दाराच्या चोहोबाजूस, जय, विजय, सुरया व नक्षीकाम आहे. नगार खाण्याचे रंगकाम व नक्षीकाम खास मुस्लिम पध्दतीत आहे. या विठठल मंदिरात, विठठल – रुक्मीणी व राही या तिघांचे एकत्रित मुर्त्या आहेत. असे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात फक्त पळशीलाच आहे. हे आगळे वेगळे वैशिष्टय.
सभा मंडपाच्या तीन बाजूंनी नऊ पायऱ्या नव विद्या भक्तीची प्रतिक. सभा मंडपात अठरा स्तंभ जे नउ फुट उंचीचे या स्तभांवरील कोरीव काम अप्रतिम देखणे मनात भरणार. हे अठरा खांब अठरा पुराणाचे प्रतिनिधीक स्वरुप. सभा मंडपाच्या मध्यमागी दगडी कासव आहे. कासवाच्या पाठीवर उभे राहून कर्मदृष्टीने विठठलाचे दर्शन होते.
सभा मंडपाचे वरच्या भागाच्या सव्वाटन वजनाची काशाची घंटा आपली नजर वेधते. सभा मंडपाच्या आतील बाजूस श्रीकृष्ण व गौळणीच्या रासविहाराच्या दगडीमुर्ती आहेत. श्रीकृष्ण हिंदूस्थानी कलाकारांच्या हस्त कौशल्याची उत्कृष्ट शैली आहे. वास्तु शास्त्राचा उत्कृष्ट नमुना येथे पाहावयास मिळतो. सभा मंडपातील हरणांच्या वानराच्या कोरीव मुर्ती रेखाटतानां उत्तर हिंदूस्थानी कलाकरांनी जीव ओतून काम केल्याचे दिसते.
गाभाऱ्याच्या दरवाजाच्या दोनही बाजुंना रिध्दी – सिध्दी सहित गणपती व भैरवमुर्ती आहेत. दरवाजावर ६४ योगिनी आहेत. उंबऱ्यावर दोन किर्तीमुखे आहेत. गाभाऱ्यात पांडुरंगाची शाळीग्राम शिळेची मुर्ती आहे. मुर्तीच्या दोन्ही बाजुना राही, रुक्मीणीच्या संगमरवरी मुर्ती आहेत. पांडुरंगाच्या मुर्तीच्या प्रभावळीवर मच्छ व कच्छादी दशावतार कोरलेले आहे. डोक्यावर शिवलिंग कोरलेले असून पायाजवळ सवत्स धेनु, गोपाळ आहेत. मुर्तीच्या सिंहासनावर नारद तुंबर, गंधर्व, यक्ष, किन्नर, आदिंच्या कोरीव मुर्ती आहेत.
मंदिराच्या शिखरावर आतील बाजुस व कोरीव कलाकसुरीची कोरीव कामे आहेत. त्यावरुन नजर दूर जात नाही. मंदिरात असणाऱ्या ओहारीतील नक्षीकाम अप्रतिम असून भूमितिय श्रेणीत केलेले काम असून प्रत्येक ओहोरीत वेगळ शिल्प, मंदिरा भोवती असणारी भक्कम तटबंदी मंदिराच्या प्रवेशव्दारा वरील असणारे दुसऱ्या मजल्यावरील कोरीव नक्षी कुठेही पहावयास मिळत नाही.
मंदिराच्या आवारात उत्तरेला असणाऱ्या हौदात १९७२ सालीही पाणी आटले नव्हते. मंदिराच्या आवारातूनच पुर्व व उत्तर कोपऱ्यातून एक दहा पाय-या खाली उतरत गेले की आपण पुष्करणीत प्रवेश करतो. मंदिर उत्तरमुखी असुन समोरच एक तटबंदी भिंत असुन यामध्ये एक दरवाजा आपणास सटवाई मंदिराच्या आवारात घेऊन जातो.
संपूर्ण मंदिराला जवळपास १५ /२० फुट उंचीची तटबंदी बांधलेली असून ती मंदिराची सुरक्षा रक्षक अनेक वर्षे उन वारा पाऊस झेलून सुध्दा सुव्यवस्थित आहे. मंदिर ओढ्याच्या त्रिवेणी संगमावर वसलेले असून. हा ओढा मंदिराच्या उत्तरेकडुन वाहताना दिसतो. मंदिराच्या पश्चिमेस ओढ्याच्या उत्तर किना-यावर ऐतिहासिक रामेश्वर महादेव मंदिर, गणेश मंदिर व घाट पहावयास मिळतो. तर घाटावर दोन थोर व्यक्तींच्या समाध्या बांधलेल्या निदर्शनास पडतात. रामेश्वर महादेव मंदिरातील नंदीचे शिल्प हि पाहण्यासारखे आहे.
पळशीचा कोट, विठ्ठलमंदीर व त्यासमोरील गरुडध्वज पाहिल्यावर त्यावरील कलापुर्ण नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. मंदीराची शिखरे, त्यावरील काम, त्याची प्रमाणबद्धता या गोष्टी पळशीकरांच्या रसिकतेची व पांडुरंगनिष्ठेची प्रचिती आणून देतात. कोटाच्या आत असलेला पळशी गाव ,आतील पळशीकरांचा सुरेख वाडा, दोन छत्री आणि नदीकाठचे विठ्ठल आणि महादेव मंदिर पाहून मन तृप्त होते. या वास्तूंवरून या घराण्याचे ऐतिहासिक कर्तुत्व होळकरशाहीत किती प्रभावी असावे याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
येथील असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामाबाबत काही जण चुकीची ऐतिहासिक माहिती देतात. जसे कि, या मंदिराचा निर्माण शिवकाळात सुरतेची लूट केल्यानंतर त्या लुटीमधील काही धनाच्या आधारे या मंदिराचा निर्माण केला. मात्र या मंदिरचा निर्माण हा तेथील नगरकोटाच्या वेळीचा आहे असे सांगितले जाते. नगरकोट हा १७८७ ते १७९७ च्या काळात बांधला व सुरतेची लूट हि सन १६६४ साली झाली. म्हणजे १०० वर्षंहून अधिक काळाचा फरक आहे तरी काही लोक हे समीकरण जुळवताना दिसतात. तर चुकीची माहिती पसरून देऊ नका.
आभार
Indore State Gazette Vol.1
श्री. सदाशिव शिवदे
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021
सदाशिव शिवदे साहेब आपण फार फार मोलाची माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद.मी या गावचा रहिवासी आहे.आणि खरा इतिहास समोर आणण्याचा माझाही प्रयत्न होता.परंतु सगळी साधनं हाती लागली नाहीत.काही साधनं मी पण जमवली आहेत.परंतु हे गऍझेट मला मीळावीत अशी माझी इच्छा आहे.याकरिता मला तुमचा संपर्क नंबर मिळाला तर खुप बरं होईल.
फार छान माहिती. इतिहासाचा अनमोल ठेवा उलगडून दाखवला. धन्यवाद.
छान च. पहिल्यान्दा इतकी विस्तृत माहिती वाचावयास मिळाली. धन्यवाद.
very nice information
मी विकास साळुंके, राहणार वासुंदा, मी आपला मनापासून आभारी आहे. आपन खूप विस्तृत आणि खरी माहिती दिली. यासाठी आपन खूप मेहनत घेतली. पुन्हा एकदा आपल्याला धन्यावाद!
माझ्या तालुक्यात ऐवढे सुंदर मंदिर वाडा आहे . शिवाय आमच्या गावापासून फार दुर नाही . माझे गाव पाडळी आळेCअळ्ककुटीजवळ ) आहेi. श्री रमेश खरमाळे यांच्या शेजारी गावात हिवरेमध्ये नोकरी करतो . या गावाला मी नक्की भेट देणार .