“खाजगी देवी अहिल्याबाई होळकर चॅरिटीज ट्रस्ट, इंदोर”
हे नक्की काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम मध्यप्रदेश राज्याच्या स्थापनेविषयी माहिती घ्यावी लागेल. भारत स्वातंत्र्य झाल्यावर काही राज्य स्थापन झाली त्याचप्रमाणे मध्यप्रदेश स्थापन झाले व त्याचे सुरुवातीचे नाव होते “मध्य भारत”. या मध्य भारत राज्यात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशचा काही भाग, राजस्थान, छत्तीसगड व महाराष्ट्रातील विदर्भ सामील होता. त्याची राजधानी नागपूर होती.
पुढे विदर्भ हा मराठी भाषिक प्रांत महाराष्ट्राला जोडला व १ नोव्हेंबर १९५६ ला नवीन राज्य स्थापन झाले त्याचे नाव “मध्य प्रदेश”. मध्यप्रदेश आकाराने विशाल असल्यामुळे व नवीनच राज्य स्थापन झाल्यामुळे त्यांच्या पुढे अनेक आर्थिक संकट होते. त्यातच होळकर संस्थान कडून व्यक्तिगत मालकीच्या नसलेल्या दोन प्रकारच्या मालमत्ता तेव्हाच्या मध्य भारताच्या व नंतरच्या मध्यप्रदेशच्या मालकीच्या झाल्या. त्यापैकी एक प्रकार होता होळकर शासकांनी व्यक्तिगत दानधर्मातून सार्वजनिक वापरासाठी बांधलेल्या वास्तू. विशेता तीर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी बांधलेल्या वास्तू या प्रकारात मोडतात(अहिल्यादेवींनी बांधलेल्या). या ऐतिहासिक वास्तूचा म.प्र. सरकार देखभाल करू शकत नव्हते म्हणून त्यांनी सन २७-०६-१९६२ ला “खाजगी देवी अहिल्या बाई होळकर चॅरिटीज ट्रस्ट, इंदोर” स्थापन केले.
या ट्रस्टमध्ये म.प्र. राज्याचा राज्यपाल, इंदोर जिल्ह्याचा कलेक्टर हे राज्याचे दोन प्रतिनिधी, केंद्र सरकारचा एक प्रतिनिधी व होळकर घराण्याचा वारसदार हा अध्यक्ष असणार अशी तरतूद बनवण्यात अली. यामध्ये राज्यपाल इंदोर मधील चार व्यक्तींची व अध्यक्ष दोन व्यक्तींची या ट्रस्टमध्ये नियुक्त करू शकतो अशी हि घटना बनवली. तसेच होळकर संस्थान भारतात विलीन होण्याच्या वर्षी होळकर संस्थानच्या बजेटमध्ये अशा वास्तूंची देखभाल व जतन यासाठी २,९१,९५२ रुपयांची तरतूद होती. तेवढीच रक्कम मध्यप्रदेश सरकारने त्यापुढे दरवर्षी ट्रस्टला द्यायची व त्यातून ट्रस्टने वास्तूंच्या देखभाल व जतनाचे काम करायचे, अशी व्यवस्था केली.


सध्या ट्रस्ट मध्ये उषादेवी मल्होत्रा-होळकर(अध्यक्ष), सतीश मल्होत्रा, इ. डी. मुळे, ए. के. चितळे, सुमित्रा महाजन, यशवंत होळकर (रिचर्ड होळकरांचे पुत्र), रणजित मल्होत्रा (सतीश मल्होत्राचे पुत्र) आहेत. उषादेवी मल्होत्रा व सतीश मल्होत्रा हे ट्रस्ट स्थापन झाल्यापासून आजपर्यंत या ट्रस्टचे सदस्य आहेत. होळकर संस्थान भारतात विलीन झाले तेव्हा महाराजा यशवंतराव होळकर(२) हे राजगादीवर होते. त्यांचा मृत्यू सन १९६१ ला झाला त्यानंतर पुढच्या वर्षी हे ट्रस्ट बनवले गेले. त्यांना दोन अपत्ये होती. रिचर्ड उर्फ शिवाजी होळकर व उषादेवी मल्होत्रा-होळकर. रिचर्ड हेच अध्यक्ष होणार होते मात्र त्यांची आई परदेशी असल्यामुळे व त्याकाळी भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीमुळे त्यांचा हक्क नाकारला गेला व उषादेवी या अध्यक्ष बनल्या. त्या जेव्हा अध्यक्ष झाल्या तेव्हा त्यांचं लग्न सतीश मल्होत्रा यांच्याशी झाले होते. महाराजा यशवंतराव होळकर(२) यांची तीन लग्न झाली होती. त्यामध्ये त्यांच्या दोन स्त्रिया परदेशी होत्या. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी आपली बहीण ज्या होळकर राजाला दिली होती ते राजे म्हणजे हेच. संयोगिताराजे होळकर-घाटगे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी दोन विवाह केले. (पुढे काही वर्षांनी भारतीय राज्यघटनेतील बदलामुळे रिचर्ड यांना भारतीय नागरिकत्व मिळाले होते मात्र वेळ निघून गेली होती.)


ट्रस्ट हे होळकरकालीन वास्तूंचे देखभाल करण्यासाठी बनवले होते. ना कि त्या वास्तू विकण्यासाठी. आणि या गोष्टी ट्रस्टमधील तत्कालीन बिनसरकारी व सरकारी व्यक्ती विसरून गेले असे वाटते. कालांतराने २.९१ लाख ही सरकारकडून मिळणारी रक्कम ट्रस्टला अगदीच तुटपुंजी पडू लागली. पण ट्रस्टने ती वाढवून देण्याची विनंती सरकारला केली नाही. ज्यांचा आता उपयोग होत नाही व ज्या जीर्ण झाल्या आहेत, अशा वास्तू विकून पैसे उभे करण्याची भन्नाट शक्कल ट्रस्टने सरकारच्या परस्पर काढली. पण मालमत्तांची मालकी सरकारकडे आहे, मग त्या विकायच्या कशा, अशी अडचण ट्रस्ट पुढे उभी राहिली.
ट्रस्टवर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्य सचिव होतेच. त्यांच्याकडे सरकारच्या परवानगीसाठी अर्ज केला गेला. त्या तत्कालीन महाशयांनी सरकारी मालमत्ता ट्र्स्ट विकू शकत नाही, असे कळविण्या ऐवजी, सरकारची परवानगी घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे उत्तर ट्रस्टला पाठविले. अर्थात हे असेच होणार होते. मुख्य सचिव ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून बसले होते तेव्हाच त्यांचे मल्होत्रा या सर्व व्यक्तींशी घोडबंगाल ठरले होतेच. अशा प्रकारे सरकारकडून आडकाठी दूर झाली, हे सरकारी सही-शिक्क्यानिशी पक्के करून घेतल्यावर ट्रस्टने निवडक मालमत्ता विकण्यासाठी ग्राहकांची चाचपणी सुरू केली आणि या ट्रस्टने पहिला घोटाळा केला तो सन १९६९ मध्ये.
- सन १९६९ मध्ये. वाराणसीमधील अहिल्यादेवींच्या काळातील नगावा बाग जी २.५ एकर क्षेत्राची होती तिची परस्पर विक्री केली पण हि घटना काही प्रसिद्धीस अली नाही.
- त्यांनतर सन १९८३ ला राजस्थानमधील पुष्कर येथील होळकरवाडा, जमीन व अन्य तीन स्थवर मालमत्ता जी अहिल्यादेवींची काळातील होती ती विकली गेली. हि घटना प्रसिद्धीस आली. गुन्हा नोंद झाला.
- सन २००३ ला उत्तराखंड राज्यातील हरिद्वारमधील होळकर वाडा, हनुमान मंदिर, कुशावर्त नदीघाट, ११ एकर जमीन जी अहिल्यादेवींची काळातील होती ती विकली गेली. हि घटना प्रसिद्धीस अली. गुन्हा नोंद झाला.
- सन २००६ ला तामिळनाडू राज्यातील रामेश्वरमधील होळकर वाडा, धर्मशाळा, १४ एकर जमीन जी अहिल्यादेवींची काळातील होती ती विकली गेली. हि घटना प्रसिद्धीस अली. गुन्हा नोंद झाला..
- सन २००९ ला इंदोर जिल्ह्यातील हातोद शहरामधील राम मंदिर, बिलकेश्वर मंदिराच्या जमिनीची विक्री, या शहरातील ५२ बारवांची विक्री, काही जमीन ज्या अहिल्यादेवींच्या काळातील होती ती विकली गेली तसेच देपालपूर शहरातील मंगलेश्वर महादेव मंदिर व त्याच्या जमिनीची विक्री. हि घटना प्रसिद्धीस अली. गुन्हा नोंद झाला. सन २००९ या वर्षा पासून नव्या पर्वाला सुरुवात झाली. तत्कालीन इंदोरच्या आमदार सुमित्रा महाजन यांनी तत्कालीन म.प्र. राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र लिहून ट्रस्टच्या कारभाराचा पाढा वाचला. पत्रात त्यांनी उषादेवी यांचे पती सतीश मल्होत्रा यांना दोषी ठरून त्यांवर कारवाई करण्यास सांगितलं.
वर जी वर्ष दिली आहेत त्यावर्षी फक्त ट्रस्टच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. मात्र या व्यतिरिक्त अशा असंख्य घटना आहेत कि ट्रस्ट ने जमिनी विकल्या मात्र ते लोकांना व म. प्र. सरकारला माहित नाही. साधारण अंदाजे १५०+ अहिल्यादेवींनी लोककल्याणकारी कार्यासाठी खाजगी संपत्तीतून बांधलेले वाडे, मंदिरे, धर्मशाळा, नदीघाट व बारवा आहेत ज्यांची विक्री झाली आहे.
ऑक्टोबर २०२० ला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने निकाल देत. मध्य प्रदेश सरकारने या सर्व वास्तूंच्या महसुली रेकॉर्डमध्ये आपल्या स्वत:च्या मालकीची स्पष्ट नोंद करावी आणि त्यावर ‘कधीही विकता येणार नाही’ असा शेरा ठळकपणे लिहावा, तसेच या वास्तूंचे जतन व देखभाल अधिक चांगल्या प्रकारे कशी करता येईल यावर विचार करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्यासाठी लागणार्या या पुरेशा निधीची तरतूदही करावी, असा आदेश दिला. एवढेच नव्हे तर ज्या मालमत्ता याआधी विकल्या गेल्या आहेत त्या पुन्हा सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी पावले उचलावीत व ज्यांनी त्या विकल्या त्या तत्कालीन सरकारी व असरकारी मंडळींवर आणि ज्यांनी विकत घेतल्या त्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई सुरु करावी, असेही न्यायालयाने सांगितले.
वास्तविक २००३ ला हरिद्वारमधील कुशावर्त घाट विक्रीच्या घटनेमुळे सन २०१२ मध्ये सुमित्रा महाजन यांच्या प्रयत्नामुळे प्रथमच सतीश मल्होत्रा यांच्यावर गुन्हा नोंद झालेला होता. अहिल्यादेवी होळकरांच्या सर्व ऐतिहासिक वास्तूंच्या विक्रीमागे सतीश मल्होत्रा हे मुख्य आरोपी आहेत. हे असे झाले कसाईला गाय दिली संभाळायला. महाराष्ट्रातही अनेक संपत्ती विकली गेली आहे त्याची नोंद म.प्र. सरकारकडे नाही. मात्र त्यांची एक समिती लवकरच महाराष्ट्रात येणार असून त्यांची चौकशी जेजुरीपासून सुरु होणार आहे. खडकी(पुणे) येथील तुकोजीबाबा यांची मुख्य समाधी लवकरच आझाद होईल आणि ज्यांनी चुका केल्या त्यांना नक्कीच सुट्टी नाय.

अशा प्रकारे होळकरांनी बांधलेल्या पण सरकारी मालकीच्या धर्मादाय वास्तू ट्रस्टच्या माध्यमातून ‘घशात’ घालण्याचे हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी सुमित्राताईनी आठ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या प्रयत्नांची या निकालाने यशस्वी सांगता झाली.
या बद्दल एक सच्चा अहिल्याभक्त तुमचा कायमस्वरूपी ऋणी राहील ताई..!

डिसेंबर २०१९ यामध्ये प्राध्यापक निलेश शेळके सर यांनी होळकरांची वंशावळ प्रकाशित केली. तिला भूषणसिंह होळकर यांचे सहकार्य लाभले आहे. ती खाली देत आहे. तसेच होळकरांची अजून एक वंशावळ आहे जी कै.गणेश मतकर यांनी बनवली आहे. त्यांना उषादेवी होळकर यांचे सहकार्य लाभले होते. दोन्ही वंशावळी ९९% तंतोतंतच आहेत.


काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021
We like to meet you