भारतामधील महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. सोलापूरपासून पश्चिमेस ७१ कि. मी अंतरावर भीमा नदीच्या (चंद्रभागा) उजव्या तीरावर पंढरपूर वसले आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. पंढरपूरला पंढरी असेही म्हटले जाते. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात.
- अहिल्यादेवींच्या काळातील बारवांची माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.
- अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरांची माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.
- अहिल्यादेवींच्या काळातील ऐतिहासिक वास्तूंची माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.
क्षेत्र महात्म्यामुळे पंढरपूरला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात. पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. शालीवाहन वंशातल्या प्रतिष्ठित राजाने या देवळाचा इ.स. ८३ मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. देऊळ व मूर्ती यांवर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळी मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मते हे स्थान मूलत: शिवाचे होते तर वैष्णव पंथीय हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मीय त्यास नेमीनाथ समजतात तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. सूर्याचा अंशही या दैवतास मानतात. अशा या प्राचीन इतिहास असलेल्या पंढरपुरात अहिल्याबाई होळकर यांचा वाडा आहे. त्या वाड्याला श्रीमंत होळकर सरकार वाडा म्हणून ओळखले जाते. आज त्यालाच देवी अहिल्याबाई होळकर चॅरिटेबल ट्रस्ट म्हटले जाते.
अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. त्याकाळी स्त्री शिक्षण फारसे प्रचिलत नसतानाही त्यांच्या वडिलांनी लिहण्या वाचण्यास शिकवले होते. बाजीराव पेशव्यांचा एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे सुभेदार होते. ते पुण्यास जाताना चौंडी येथे थांबले होते.
आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वत:चा
मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. त्या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार पहात असत. मल्हारराव होळकरांनी मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींना सती जावू दिले नाही. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेले होते. त्या आधाराने अहिल्यादेवीनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५ म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.
राणी अहिल्यादेवी यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे आणी नदीघाट बांधले, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक तीर्थक्षेत्र, धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अहिल्यादेवी वारंवार तीर्थक्षेत्र पंढरपूरला भेट देत असत. त्यावेळी त्यांनी बांधलेला राजवाडा अजूनही त्यांच्या पुण्याईची साक्ष देतो आहे. राणी अहिल्यादेवी होळकर यांनी पंढरपूर येथे जो टोलेजंग वाडा बांधला तो अजूनही सुस्थितित आहे. होळकरांचा हा वाडा साधारणपणे दोन एकर जागेमध्ये बांधलेला आहे. होळकर वाडा हा दुमजली असून सध्या वरच्या मजल्यावरील काही भाग ढासळलेला असला तरी बाकी बांधकाम सुस्थितीत आहे. या वाड्याची समोरील बाजू साधारणपणे ६०० फूट लांब तर रुंदी ३०० फूट इतकी आहे.
राणी अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास वाचा. Read Now
इतिहास :
सन १७५४ मध्ये या वाड्याच्या पायाभरणीला प्रारंभ झाला. १३ वर्ष या वाड्याचे बांधकाम सुरु होते. वाड्यासाठी लागणारे सागाचे लाकूड मध्यप्रदेश राज्यातील जंगलामधून पंढरपूर येथे आणली होती. हि लाकडे नर्मदा नदीत टाकून नंतर ती गुजरात जवळच्या समुद्रात येत होती, नंतर रत्नागिरी समुद्राजवळ पोहचलेली हि लाकडे पाण्यातून बाहेर काढून हत्तीच्या पाठीवर टाकून पंढरपूर येथे आणली गेली. वाड्याच्या बांधकामासाठी चुना वापरला आहे. चुना तयार करीत असताना भोकरीचे बी, पिंपळाचा डिंक, बिब्याचे द्रावण, कापूस इ. साहित्य त्यामध्ये घातले जात होते. चुना चांगल्या प्रतीचा तयार व्हावा म्ह्णून घोटला जात होता. चुना चांगल्या प्रतीचा तयार झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी एक विशेष पद्धत वापरली जात असत. मोठ्या लोंखडी कायली मध्ये पाणी भरून त्यात उंचावरून चुन्याचा गोळा टाकला जात असे. तो फुटला नाही तर पक्का चुना तयार झाला आहे असे मानले जात होते.
वाड्याचा वास्तूशांती समारंभ कार्यक्रम चेत्र शुद्ध प्रतिपदा(पाडवा), सन १७६७ ला झाला. सदरचा वाडा दोन मजली आहे . तळातील मजल्यात ११ व वरच्या मजल्यावर ५ अशा एकूण १६ खोल्या आहेत. वाड्यात भव्य तळघर हि आहे. या वाड्यामध्ये दक्षिणेला राममंदिर स्थापन केले आहे. या मंदिरातील शिवपिंडीभोवती ११ छोटे शिवलिंग व गरुड आहेत. बारकाईने हा वाडा पहिला तर तो एक किल्ल्याप्रमाणे दिसतो. वाड्याला भव्य, उंच आणि दणकट अशी तटबंदी आहे. तो काळ लढाईच्या घामघुमीचा असल्याने वाड्याच्या संरक्षणासाठी सेन्य मुक्काम ठोकून होते. विठ्ठल दर्शनासाठी आल्यावर उतरण्याची व्यवस्था चांगली व्हावी व आपल्या मुक्कामा व्यतिरिक्त वारकरी लोकांची राहण्याची सोया व्हावी म्हणून हा वाडा राणी अहिल्यादेवी यांनी बांधला.
सन १७६७ ते १९६६ पर्यंत या वाड्यात अन्नधर्म व दानधर्म चालत होता. त्याचा खर्च संस्थान देत होते. अन्नछत्रात गोसावी, बेरागी, आंधळे, पांगळे व गरीब लोक जेवण करीत होते. या वाडयाच्या वास्तूशांतीच्या वेळी राणी अहिल्यादेवी होळकर स्वतः पंढरपूरमध्ये होत्या. या समारंभास अनेक सरदार व छत्रपतीही उपस्थित होते. आजही चंद्रभागा नदीच्या तीरावर पूर्वीचे वैभव, दानधर्म व सांस्कृतिक समन्वयाचे ठिकाण म्हणून हा वाडा सुस्थितीत उभा आहे. येथील वाड्याची व्यवस्था होळकर संस्थानचे वतीने बडवे यांचे नातेवाईक पाहतात.
येथील रुक्मिणी मंदिरास राणी अहिल्यादेवी होळकर यांनी सोन्याचा कमर पट्टा व अनेक हिऱ्या मोत्याचे दागीने, चांदीची भांडी दान केली. त्या भांड्यावर “सर्व सुख विठ्ठलापायी जाणे होळकर अहिल्याबाई” असे लिहिले आहे. विठ्ठल मंदिरच्या पाठीमागील बाजूस वारकर्यांची पाण्याची सोया व्हावी म्हणुन बारवेचा निर्माण केला ती बारव पेशवा बारव म्हणून ओळखली जाते तसेच आषाडी वारीमध्ये वारकर्यांची पाण्याची सोया व्हावी म्हणून आळंदी, देहू ते पंढरपूर मार्गावर अनेक बारावा निर्माण केल्या.
वाखारी येथे सर्व पालख्या एकत्र येतात व तेथे सर्व संतांच्या पादुकांना तेथील बारवेच्या पाण्याने स्नान घातले जाते व त्या बारवेचा निर्माण पण राणी अहिल्यादेवी यांनीच केला. ती बारव पहिले बाजीराव पेशवा यांच्या समरणार्थ राणी अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केली होती म्हणून त्या बारवेला बाजीराव बारव असे ओळखले जाते. याप्रमाने वारकरी संप्रदायाच्या उद्धारासाठी राणी अहिल्यादेवी यांनी कार्य केले.
प्रवेशद्वार :
होळकरांच्या वाड्याला एकूण चार प्रवेशद्वारे आहेत. पश्चिम दिशेला वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार असून ते २० ते २५ फूट उंचीचे आहे. या प्रवेशद्वाराचे बांधकाम दगड व विटांचे आकर्षक डिझाईन करुन ते डौलदार बनविले आहे. या प्रवेशद्वाराचे १५ फुटा पर्यंतच्या बांधकामात दगडी स्तंभ एकामागे एक आल्याने दगडी कप्पे तयार झाले आहेत व वरती आडव्या पद्धतीने विटांचे बांधकाम करून त्यावर कोनाकृती वीटांची नक्षी तयार केलेली आहे. प्रवेशद्वाराचा चौकट व दरवाजा लाकडी स्वरुपाचा असून चौकटीवर सुंदर लाकडामधील बेलबुट्टीचे नक्षीकाम पहायला मिळते. दरवाजाला एकात एक अशा तीन चौकटी दिसून येतात. त्यामुळे तो आणखी मजबूत वाटतो. मधली चौकट सपाट असून बाहेरील व आतल्या चौकटीच्या वरील भागात नक्षीकाम केलेले आहे.
वाड्याचे दूसरे प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला म्हणजे पूर्वेला असून ते मुख्य प्रवेशद्वारापेक्षा लहान आहे. या प्रवेशद्वारातून पाहिले असता पुढे चंद्रभागा नदीचे दर्शन होते. या प्रवेशद्वाराची उंची साधारणपणे ७ फुट आहे.
अहिल्याबाई होळकर यांनी ज्यावेळेस वाड्याचे बांधकाम सुरू केले त्यावेळी वाड्यामध्ये शिवाचे मंदिर बांधण्याचे ठरविले होते. परंतु खोदकामावेळी श्री हनुमानाची हात जोडलेली स्वयंभू मूर्ती सापडल्याने अहिल्यादेवींनी वाड्यात राममंदिर बांधले. या राम मंदिरासाठी दक्षिणेला बाहेरून प्रवेशद्वार ठेवण्यात आले.
मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला खोल्या आहेत. बाहेरील बाजूंनी पहिल्या मजल्यावरील विटांच्या बांधकामात बांधलेले झरोके खिडक्या दिसून येतात. त्याची कमानयुक्त नक्षीकाम लक्ष वेधून घेते.
वाड्यातील अंतर्गत रचना :
मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्रवेशद्वाराच्या आतून आगळ लावण्याची जागा आहे. दोन्ही बाजूस(उत्तर व दक्षिण बाजूस) ढाळज असून याचे मोजमाप १० फूट रुंद आणि २५ फूट लांब आहे. या ढाळजेला लागूनच दक्षिणेला राम मंदिराची भिंत येते तर उत्तरेला खोल्या आहेत. त्याला बैठकीची खोली म्हणतात. ढाळजेच्या जोत्याची उंची तीन फूट आहे. पुढे कमान आहे व एक मोठा चौक आहे. कमानीतून आत आल्यावर समोर पूर्व बाजूस आणखी एक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस १०*१० (लांबी * रुंदी) च्या दोन-दोन खोल्या आहेत तर आतील बाजूस दगडी कमान आहे. या प्रवेशद्वाराचे जोते देखील तीन फूट इतके उंचीचे आहे.
मधल्या प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर प्रवेशद्वाराच्या समोर ३५ फूट लांब (उत्तर-दक्षिण) व २५ फूट रुंदी (पूर्व-पश्चिम) असलेला आयताकार चौक लागतो. या चौकाच्या तळमजल्याचा भाग फारसबंदी आहे. चौकाच्या चारी बाजूंनी तीन फूट उंचीचा चौथरा आहे. या दोन्हीच्या मध्ये खालील चौकात दगडी भुयारी गटारांची व्यवस्था केलेली आहे. या चौकात पश्चिम बाजूस मागील प्रवेशद्वाराजवळ स्नानगृह व शौचालय बांधलेले आहे. या मध्यभागी असणाऱ्या चौकाच्या चारी बाजूंनी जो चौथरा आहे या चौथऱ्याच्या बांधकामात पूर्ण लाकडी स्तंभाचा वापर केलेला दिसतो. हा वाद दोन माजली आहे.
होळकर वाड्यातील काष्ठशिल्पाचे स्थापत्य शास्त्रीय बारकावे :
लाकडाचा वापर हा जगभरात केला जातो. यामुळे मानवाच्या सांस्कृतिक जडणघडण संबंधीचे अनेक धागेदोरे मिळतात. लाकडाचा वापर माणूस जेव्हा रानटी अवस्थेत होता तेव्हा पासून ते आजतागायत होत आहे. मध्ययुगीन काळात मोठाल्या इमारतीमुळे लाकडी कामास खूप वाव मिळाला. या निवासी इमारतीत विविध विभाग असत, त्यात कचेरी, दिवाणखाना, नौबतखाना, खलबतखाना, हमामखाना व दौलतखाना असे अनेक विविध भाग असत. लाकूड हे सजावटीचे बनू लागले. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर उच्चप्रतीचे लाकडी कोरीव काम होवू लागले. या लाकडी कोरीव कामाच्या प्रतीवर एखाद्या वाड्याच्या मालकांची (वतनदारांची, सरदारांची, सावकारांची) इभ्रत समाजात ठरू लागली.
पंढरपूर येथील होळकर वाड्याच्या सजावटीमध्ये काष्ठशिल्पाचा उपयोग केला आहे. स्तंभ(खांब), हस्त, दरवाजे व चौकटी यावरती लाकडी कोरीव काम केलेले दिसून येते.
दरवाजे / दाराच्या चौकटी :
वाड्याचा दर्शनी भाग उठावदार व इतर भागापेक्षा जास्त आकर्षक आहे. प्रवेशद्वाराचा मुख्य दरवाजा मोठा व मजबूत आहे. प्रवेशद्वार हे सपाट लाकडी फळ्या व त्यावर लाकडी चौकोनी तुकडे वापरून केलेले चौकोन हे आकर्षक तर दिसतातच परंतु त्यामुळे दरवाजाला आणखी भक्कमपणा प्राप्त झालेला दिसून येतो. वाड्याच्या आतील खोल्यांचे दरवाजे देखील अशाच प्रकारचे तयार केलेले आहेत. मुख्य प्रवेशद्वाराला तीन लाकडी चौकटी बसविलेल्या आहेत. या लाकडी चौकटींच्या ललाटाचा भागात काष्ठशिल्पे कोरलेली असल्याने ते सुंदर दिसतात. आतील खोल्यांच्या चौकटींच्या ललाटावर काष्ठशिल्पांबरोबरच गणेशमूर्ती देखील कोरलेल्या आहेत.
खिडक्या :
सर्वसाधारणपणे मध्ययुगीन वाड्यामध्ये खिडक्यांची रचना नसे, फक्त लहान झरोखे प्रकाश हवेसाठी सोडले जात. याच्या रचनेमागचा हेतू म्हणजे सुरक्षितता होय. तळमजल्याचा विचार करता एकही खिडकी या मजल्यावर सोडल्या जात नसे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती साधारणपणे खिडक्या सोडल्या जात असत, त्यास झरोखा दर्शन असे म्हटले जात. होळकरांच्या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचा वरचा भाग पडलेला आहे. परंतु त्या जागेत झरोखा दर्शन होते. तसेच त्यालगत या वाड्याच्या ज्या खोल्या आहेत त्या प्रत्येक खोलीतून एक-एक झरोखा दर्शन / खिडक्या आहेत. या खिडक्या बाहेरील बाजूने आकर्षक दिसतात.
खिडक्यांच्या दोन्ही बाजूने दोन मातीचे स्तंभ व त्यावर कमान आहे. अशाच प्रकारच्या खिडक्या वाड्याच्या पहिल्या मजल्यावर पूर्व-पश्चिम व दक्षिणेला दिसून येतात.
खांब (स्तंभ) :
होळकर वाड्यात प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला ढाळज व पुढे चौक आहे, ढाळजे मध्ये मजबूत खांबाच्या योजना केलेली आहे. परंतु सध्या हे खांब बांधकामात झाकले गेले आहेत. खांब हे दोन प्रकारचे असतात. गुजराती किंवा मुघल किंवा दिल्ली (मुसलमानी पद्धती) गुजराती शैलीचे खांब चौकोनी आकाराचे असतात. हा चौकोनी खांब खालून मध्यापर्यंत जवळपास साधा असतो. अनेक पारंपरिक फुला-पानांच्या कोरीव कामाने ही खांबे मध्यापासून वर पर्यंत सजविलेले असतात. वर चढत जाणारी वेल व त्याचा शेवट हा मोराच्या रचनेने केलेला असतो. यानंतर स्तंभशीर्ष येते, या स्तंभशीर्षावर अतिशय सुंदर मोर, फुले किंवा भौमतिकी आकृत्या सुबकपणे कोरलेल्या आढळतात. होळकरांच्या वाड्यातील स्तंभशीर्षावर वेलबट्टी, मण्यांची माळ, फुले फारच कौशल्याने कोरलेले आहेत. या स्तंभावरूनही त्यांची सौंदर्यदृष्टी व वास्तूंचा शैली प्रकार ठरविण्यास मदत होते.
दिल्ली शैलीतील गोलाकार खांब खालून फुगीर व वरती थोडे कमी फुगीर अशी असते. यावर अनेक टोकदार झाडांच्या पानाची रचना कोरलेली असते. खांबाच्या खालच्या बाजूस एखाद्या कुंड्याची रचना तयार केलेली असते(कोरलेली असते). यात दोन कमळे आतील बाजूंना झुकल्यासारखी दर्शविली जातात. वरील बारीक होत जाणारा खांब शक्यतो साधा ठेवलेला असतो. दिल्ली शैली ही सुरू किंवा सायप्रस या नावाने ओळखली जाते. हे सुरुदार खांब प्रामुख्याने दगडी नक्षीदार तळखड्यावर बसविलेले असतात. या तळखड्यावर वेलपल्ली, कमल पुष्प, कमलकालीका असतात. दिल्ली शैलीतील स्तंभांचा प्रभाव या वाड्यातील झरोखा दर्शन/खिडक्याच्या बाहेरील रचनेत तयार केलेल्या स्तंभावर दिसून येते.
सर :
सर हे भार सहन करणारे मुख्य घटक आहेत. म्हणून त्यांच्यावर कोरीव काम केले जात नाही, जर केले तर ते खूप कमी
प्रमाणात केले जाते. सर्वसाधारणपणे जी काही सजावट केली जाते ती लांबट पद्धतीमध्ये पाना-फुलांच्या वेलबुट्टीसहित केले जाते.
काही ठिकाणी या वेलींना आंबे लटकावलेले दाखविलेले असतात. होळकर वाड्यातील सर अतिशय साधे असून त्यावर कोणतेही नक्षीकाम केलेले नाही.
हस्त :
साध्या खांबासोबत येणारे हस्तही साधेच चौकोनी ठोकळे असतात. तर गुजराती खांबाबरोबर येणारे हस्त तरंगाचे असून त्यामध्ये
उलट-सुलट कमल पुष्पे व त्यावर शृंखला कोरलेली असते. हा हस्ताचा सर्वसामान्य प्रकार होय. होळकर वाड्याच्या स्तंभावरील हस्त एखाद्या कलात्मक पानाचा अर्ध्या भागाप्रमाणे कोरलेले आहेत. या सोबत झुंबर अडकविण्यासाठी गोल लोखंडी कड्याही
काही ठिकाणी दिसतात.
स्तंभशीर्ष :
स्तंभ व हस्त यांना जोडणारा भाग म्हणजे स्तंभशीर्ष होय. होळकर वाड्यातील स्तंभशीर्षावर अतिशय कलात्मक मण्यांची माळ, कमळाचे फुले, पाने कोरलेली आहेत. त्यामुळे स्तंभाचा, छतांचा भाग आकर्षक दिसतो.
तळखडे :
गुजराती शैलीतील तळखडे आणि दिल्ली शैलीतील स्तंभांचे तळखडे हे वेगवेगळे दिसून येतात. सर्वसाधारणपणे लाकडी स्तंभाचे तळखडे दगडी घडीव स्वरुपाचे असतात. अशाच प्रकारचे दगडी घडीव तळखडे होळकरांच्या वाड्यातील सर्व स्तंभाखाली आहेत.
छत :
छत हे अतिरिक्त फळीचा भाग असून फार मोठा भाग छताने व्यापलेला असतो. हे फार वेगवेगळ्या पद्धतीने कोरलेले असतात. छताचा भार सरावर असतो. सराच्या वर कडे असतात. त्या कड्या दोन सरावर टेकलेले (आधारलेले) असतात. त्या कड्यावर छतावरील मातीचा भाग सहन करण्यासाठी तक्ता (दोन कड्यामधील पूर्ण फळी) किंवा फळ्यांचे छोटे छोटे तुकडे करुन
टाकले जातात. यालाच लोखंडाच्या किंवा तांब्याच्या हलकड्या लावल्या जातात आणि त्या तुकड्यावर किल्चन (लाकडाचे छिलके) टाकले जातात आणि त्यावर नंतर अर्धा किंवा एक इंच पांढऱ्या मातीचा थर व त्यावर पांढऱ्या मातीच्या विटाचा थर टाकला जातो. (त्याला माळवद असे म्हटले जाते.) ही पांढरी माती उन्हाळ्यात उष्णता रोधकाचे काम करते किंवा त्यामुळे उन्हाळ्यात माळवद थंड राहते. होळकर वाड्याचे छत विचारात घेता ते खुप साधे आहे. छताच्या पुढे आलेल्या सज्जाच्या लाकडी भागाला पानपट्टी नक्षी कोरलेली आहे.
वाड्यात असणारी मंदिरे :
वाड्याचा पाया खोदत असताना हनुमानाची हात जोडलेली(नमस्कार स्थितीत) किंवा विठ्ठल रूपातील स्वयंभू मूर्ती सापडल्याने अहिल्याबाई होळकरांनी वाड्यात राममंदिर स्थापन केले. राम, लक्ष्मण आणि सीता अशा संगमरवरी सुंदर मूर्ती या मंदिरात आहेत. वाड्याच्या दक्षिण बाजूस हे मंदिर आहे.
या मंदिराची पूर्व-पश्चिम लांबी २०० फूट पर्यंत असून पूर्वेला रामाचे मंदिर आणि त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला रामाच्या समोर हनुमान मंदिर पश्चिमेस स्थापन केलेले आहे आणि त्या मंदिरात हनुमानाची स्वयंभू एक पाषाणी मूर्ती जी वाड्याचे काम चालू असताना मिळाली. त्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. अहिल्याबाई होळकर या शिवभक्त होत्या. त्यांनी वाड्यात शिव मंदिर स्थापन करण्यासाठी जी शिवपिंड व नंदी तयार केले होते ते राम मंदिरासमोर उजव्या बाजूला एका कट्ट्यावर ठेवलेले आहेत.
वाड्यातील भुयारी गटारांची योजना :
मानवी वस्ती म्हटले की, सांडपाण्याची व्यवस्था महत्त्वाची असते. होळकर वाड्यामध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी दगडी गटारांची योजना उत्तम स्वरुपाची आजही कार्यरत आहे. स्वयंपाकघरातून तसेच मंदिरातून भुयारी दगडी गटारातून पाणी वाहून मागील चौकात येते आणि मागील प्रवेशद्वाराखालून बाहेर पर्यंत दगडी गटारे आहेत. वाड्यात पाणीपुरवठा हा चंद्रभागेतून केला जात होता. पश्चिमेला असलेल्या मागील दरवाजा समोरच चंद्रभागा वाहते. अर्थातच त्यामुळे हा परिसरही रमणीय आहे.
वाड्याचा मागील भाग :
वाड्याचा मागील भाग म्हणजे पश्चिमेकडील जेथून चंद्रभागा नदीचे विशाल पात्र दिसते. या प्रवेशद्वाराला दिंडी दरवाजाही आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक लोखंडी कलात्मकरित्या तयार केलेला जिना आहे. पायऱ्यांचा हा जिना नागमोडी वळणे घेत वरच्या मजल्यावर जातो. या पायऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या जिन्याची प्रत्येक पायरी वेगळी करता येते. एकात एक हुक अडकविल्याप्रमाणे या पायऱ्या बसविलेल्या आहेत. वाड्याची पश्चिमेकडील तटबंदी नाहीशी झालेली आहे.
वाड्यातील तळघरे व भुयारी मार्ग :
मध्ययुगीन काळातील वाड्यांना तळघरे पहायला मिळतात. काही तळघरांचा अजूनही वापर होताना दिसतो. या तळघरातून भुयारी मार्ग देखील असतात. होळकर वाड्यात दोन तळघरे आहेत. ही तळघरे वाड्याचा दुसरा चौक जो पाठीमागील पश्चिमेकडील प्रवेशद्वारा अगोदर लागतो. त्या चौकाखाली दोन तळघरे आहेत, त्याचे छोटेसे प्रवेशद्वारही तिथे आहे आणि सध्या अडगळीचे
सामान ठेवण्यासाठी त्या तळघरांचा वापर केला जातो. या तळघरातूनच अहिल्याबाइंर्नी पांडुरंग दर्शनासाठी एक भुयारी मार्ग तयार केलेला होता. साधारणपणे ४०० मीटर पर्यंत लांब हा भुयारी मार्ग आहे, परंतु सध्या तो बंद आहे.
चैत्र महिन्यात दहा दिवस इथे कीर्तन-प्रवचनादी कार्यक्रम होतात. रामनवमीस मोठा उत्सव होतो. या वाडयात लग्न-मुंजीचे व अन्य धार्मिक कार्यक्रमही होतात.
संदर्भ :
सोलापूर जिल्यातील मध्ययुगीन काळातील वाडे(शोधप्रबंध)
पंढरपूरमधील ऐतिहासिक वास्तू व धर्मशाळा(शोधप्रबंध)
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021
या वाड्यातील लोखंडी जिना हा हुबेहुब अक्कलकोट संस्थानातील महाल मध्ये आहे तो बहुतेक इंग्लंड मधुन आणला आहे असं मी ऐकल आहे कृपया विस्तृत माहिती घ्यावी
वरिल सर्व माहिती बद्दल धन्यवाद
Very informative article. I am visiting Pandharpur- a dream come true. Yesterday we saw the Holkar wada from outside. Was so impressive. Did not know if visitors can enter.
Also, please share information about Muktabai Holkar’s (phanse) tomb. Heard that she had committed sati in Pandharpur.
Thank you
Ajun Ahilaya bai holkar badal histary send kara brother
Nice information
Nice information sir
इतकी सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे.खूप खूप धन्यवाद. वास्तविक शालेय अभ्यास क्रमात याचा समावेश असायला हवा .
आपला नं द्यावा फोनवर बोलता येईल
९१५८८१०००८ हा माझा नं
राहुलजी,
माहितीपूर्ण लेख.
वाड्याची माहिती खूप छान,सविस्तर दिली आहे
धन्यवाद
आम्ही होळकरांचो पंढरीक्षेत्राचे पुरोहित असून अहिल्यादेवींचे वर्षाला २६० रू चे वर्षासन होते त्याची अस्सल पत्रेही आहेत मजकडे
शक्य असेल तर त्या कागदपत्रांचे फोटो [email protected] या email वर पाठवू शकता का?
Jay malhar history send me and group add me
Very good about information
I’m proud of you Malhar raje holkar