
इतिहास :
काठापूर(बुद्रुक) ता.आंबेगाव जि.पुणे(महाराष्ट्र): सन १७५० च्या दरम्यान या वाड्याचा निर्माण सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांच्या राज्यकाळात (१७२८-१७६६) झाला. ज्यावेळेस सुभेदार मल्हारराव होळकर यांना सातारच्या छत्रपतीं कडून पेशव्यांच्या मार्फत जुन्नर प्रांतातील वाफगावची जहागिरी मिळाली, तेव्हा सुभेदारांनी या भागात एकाच वेळीस ६ ठिकाणी ६ किल्ले सदृश्य वाड्यांचे बांधकाम सुरु केले होते त्यातीलच हा एक काठापूरचा होळकर वाडा किंवा वाघ वाडा व उर्वरित ५ वाडे म्हणजे खडकी-पिंपळगाव, वाफगाव, अवसरी, मंचर व काठापूर(खुर्द).
- अहिल्यादेवींच्या काळातील बारवांची माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.
- अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरांची माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.
- अहिल्यादेवींच्या काळातील ऐतिहासिक वास्तूंची माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.
सध्या स्थितीला खडकी-पिंपळगावचा वाडा ९५% नष्ट झाला आहे, वाफगावचा वाडा रयत शिक्षण संस्थेला दान दिला आहे, काठापूरचा(खुर्द) वाडा पूर्णपणे नष्ट झालेला आहे, मंचरचा वाडा खाजगी मालकीचा आहे, अवसारीच्या वाड्याची काही ही माहित मिळत नाही व काठापूरचा (बुद्रुक) वाडा हि खाजगी मालकीचा आहे.
सन १७६१ ला पानिपतच्या युद्धात हिंदवी स्वराज्यासाठी अनेक सरदार धारातीर्थ पडले. त्यामध्ये होळकरशाहीचे सरदार संताजी वासुजी वाघ हि होते. सरदार संताजी वाघ हे वाघ घराण्याचे जेष्ठ पुरुष होय. सरदार संताजी वाघ यांचा प्रथम उल्लेख हा सन १७६१ च्या दरम्यानच भेटतो. पुढे सन १७६५ ला होळकर राजघराण्याकडून कडून सरदार संताजी वाघ यांच्या वंशजांना मध्यप्रदेशातील महिंदपूर परगणा व अन्य काही गावे आणि महाराष्ट्रातील काठापूर(बुद्रुक), काठापूर(खुर्द), अवसारी(बुद्रुक) या गावांची जहागिरी देण्यात आली.
तेव्हा पासून हा काठापूरचा वाडा “वाघ वाडा” झाला. तसेच संताजी वाघ यांची कन्या प्रिताबाई हिचा विवाह सुभेदार मालेराव होळकर यांच्याशी लावून देण्यात आला होता. सुभेदार मालेराव होळकर हे अहिल्यादेवींचे पुत्र व सुभेदार मल्हारराव होळकर यांचे नातू होय.
महिंदपूर परगणा हा होळकरशाहीतील सर्वात मोठा परगणा होता, त्याचे उत्पन्न हि सर्वात जास्त होते आणि वाघ घराण्याने या परगण्याची जहागिरी एकदम चोख संभाळली होती म्हणून तेथील स्थानिक लोक त्यांना “वाघ राजा” संबोधत असत ते आजपर्यत. पुढे तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धातील दुसरी लढाई म्हणजेच होळकर-इंग्रज लढाई हि सन २६ नोव्हेंबर १८१७ ला महिंदपुर येथे च झाली होती.

त्यांनतर होळकर-इंग्रज यांच्यातील मंदसोर तहानुसार महिंदपुरची हि जहागिरी सन १८१८ ला पुन्हा होळकर राजघराण्याच्या ताब्यात आली. त्यानंतर सन १८३४ ला महाराजा हरिराव होळकर (१८३४-१८४३) यांनी पुन्हा वाघ घराण्याला महिंदपुरची जहागिरी कायमची बहाल केली. सन १८१७ च्या होळकर-इंग्रज लढाईत महाराजा हरिराव होळकर हे सरदाराच्या भूमिकेत एका तुकडीचे नेतृत्व करत होते. त्या लढाईत त्यांचा घोडा मारला गेला होता त्याची समाधी आजही महिंदपुर येथे आहे.
माहिती:
आपुन ज्या वाड्याची माहित पाहत आहे तो वाडा काठापूर(बु), ता.आंबेगाव येथे आहे. हे काठापूर घोडगंगा नदीच्या उजव्या काठावर बसलेले आहे व नदीच्या पलीकडे डाव्या बाजूला दुसरे काठापूर आहे, ते काठापूर(खुर्द) असून शिरूर तालुक्यात येते. या दोन्ही ठिकाणी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या राज्यकाळात (१७२८-१७६६) वाडे बांधून काढले होते.

या वाड्यांना एका भुयारी मार्गाने जोडले होते व हा भुयारी मार्ग नदीच्या पात्राखालून जात होता, असे सांगितले जाते. एकेकाळी हे दोन्ही वाडे होळकरांच्या मालकीचे होते, त्यापैकी काठापूर(खुर्द), ता.शिरूर येथील वाडा पूर्णपणे जमीन दोस्त झाला असून काठापूर(बुद्रुक) येथील वाडा खाजगी मालकीचा आहे.
पूर्वी या गावाला संपूर्ण तटबंदी होती व या तटबंदीमध्ये सध्याचा जो दिसतो तो राजवाडा होता. काठापूर गावाच्या तटबंदी मध्ये एकूण सात वेसी होत्या मात्र आज तटबंदी गायब झाली असून एक वेस नजरेस पडते. हि वेस व राजवाड्याचे प्रवेशद्वार पाहताच क्षणी नजरेत भरते. राजवाड्याच्या प्रवेशद्वार बघितल्यावरच या वाड्याचे वौभव लक्षात येते.


वाड्याचे बांधकामाचा नमुना एकूणच १८ व्या शतकातील असून त्यामध्ये मराठा रजपूत कलाकसूर दिसून येते. वाड्याचे बांधकाम हे विटा, चुना मिश्रित आहे. त्या काळातील वास्तुरचनेतील भक्कमपणा, स्थापतींचे कौशल्य, कामगारांचा प्रामाणिकपणा, सुतारांचा लाकूड कामातील बारकावेचे दर्शन होते.
मागचे दोन बुरुजांची पडझड झाली असून जमिनीपासून पंधरा फूटांपर्यंत दगडी बांधकाम तर त्यावरील पंचवीस फूटांचे बांधकाम उत्तम प्रकारच्या विटांचे चुन्यातील असे आहे. या बांधकामातील घट्टपणा आणि कौशल्य स्तिमित करते. वाड्याचे प्रवेशद्वार पूर्ण घडीव दगडांचे असून भक्कम आहे. त्यावरील तीनमजली सज्जा अजून सुस्थितीत पाहायला मिळतो. बुरुजांवरील पाकळ्या त्याची शोभा वाढवतात. दरवाजावरील दोन लांबट पट्ट्यांवर व सज्जाच्या प्रत्येक गवाक्षावर उत्कृष्ट असे रेखीव नक्षीकाम पाहून मन संतुष्ट होते. आतील भाग पूर्णपणे ढासळलेला आहे. सध्या स्थितीला फक्त काही भुयारी मार्ग, तळघर यांचे अवशेष नजरेत पडतात.





वाड्याच्या आत जुन्या इमारतींचे सर्वत्र पडलेले अवशेष आहेत. मातीचे ढिगारे, वीटकामाचे लबके पाहून खेद वाटतो. अतिउत्तम चुन्यातील बांधकामाचा प्रत्यय पावलोपावली जाणवल्यावाचून राहणार नाही. दोन भुयारे मात्र अस्तित्व दाखवून जातात. हा राजवाडा तीन मजली असावा असे दिसून येते. घोडगंगा नदीच्या तीरावर उभा असलेला हा राजवाडा नदीतीर व आसपासचा सुपीक प्रदेश व निसर्गसौंदर्य न्याहाळत आहे की काय? असे वाटते.



मुख्य सदरेच्या खाली एकूण चार ते पाच तळघर आहेत, वाड्याची तटबंदी ढासल्यामुळे तसेच झाडा-झुडपांमुळे, तळघराचे प्रवेशद्वार बंद झाले आहेत. वाड्याच्या मुख्य सदरेच्या माघील बाजूस एक जुनं वीट बांधकाम केलेला पाण्याचा आड (विहीर) आढळते. वाड्याच्या डाव्या बाजूस तटबंदीला लागून नदीपात्रात एक विहीर आहे, तसेच तटबंदीचे दर्शनी बुरुंज सुस्थितीत आहे, तर बाजूची तटबंदी ढासळली आहे.



वाड्याच्या समोरील बाजूस एक समाधी आहे, समाधीच्या बाजूला वीरगळ उभी आहे परंतु ही समाधी नक्की कुणाची याबाबत फारशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र हि समाधी वाघ घराण्यातीलच व्यक्तीची असावी. तसेच बाजूच्या परिसरात जुनी कोरीव काम असलेली मंदिर आढळतात. त्यांतील खंडोबा, विष्णू लक्ष्मी, दत्त मंदीरे पाहण्यासारखी आहेत. इथे सुबक नक्षीकाम चांगल्या स्थितीत पाहावयास मिळते. या मंदिरावरील कोरीवकाम हा एक कलेचा उत्तम नमुना ठरू शकतो.




पूर्वी काठापूरच्या वाड्यात काही होळकरकालीन तोफा हि होत्या, त्यामधील एक तोफ तेथील शाळेत सिमेंट मध्ये बसवली आहे. तसेच इतिहासात धोंडाजी वाघ किंवा धोंड्या वाघ हे नाव वाचायला मिळते. अनेक जन चुकीने धोंडाजी वाघ व या वाड्याचा संबंध जोडताना दिसतात. मात्र धोंडाजी वाघ यांचा या वाड्याशी व संताजी वाघ यांच्याशी काही ही संबंध असलेले आढळत नाही.
ऐतिहासिक संदर्भ :
इंदोर स्टेट गॅझियट भाग – १
आभार :
Vikas Chaudhari, Vishal Rade
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021
मंदिराचा इतिहास आणि समाधीची माहिती कृपया मिळावी तसेच महिंदपूरवरून काही कागद मिळू शकतील काय
हा वाडा खासगी मालकी चा कसा काय झाला
कारण मी ही तेथील रहिवासी आहे फक्त
बाहेर शिक्षण जॉब मुळे गावाला नसतो
चांगली माहिती दिलीत
स्थानिक लोकांनी गुप्त धन हव्यासापोटी या वाड्याची वाट लावली आहे..
ही सरकारी मालमत्ता असायला हवी होती
Very good documents &evidancrs.people or no can maintain the historical placs
khupach sundar mahiti
kathapur bk madil shiv mandirakhalil samadhi ani naditil shiv mandirachi mahiti milali tr uttamch
donhi mandirana historical sambhandh asava….