जनोद्धारासाटी जीवनात येवून दानधर्म करावा, गोरगरिबांसाठी मदतकार्य करावे यासाठी हिंदुस्थानात राजे महाराजे सम्राट अशा अनेकांनी मोठमोठी कार्ये केली आहेत. अशा पुण्यवान व्यक्तिंमधे इंदूरच्या साध्वी अहिल्यादेवी होळकरांचे नाव सर्वात वरचे स्थानी आहे. त्यामुळेच त्यांना पुण्यश्लोक हे वैशिष्ट्यपूर्ण नामाभिदान प्राप्त झाले, जे राजा युधिष्ठिराला होते. अन मोजक्याच मान्यवरांना पुण्यश्लोक म्हटले जाते. त्यात बहुधा अहिल्यादेवी एकच महिला असतील.
- अहिल्यादेवींच्या काळातील बारवांची माहिती
- अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरांची माहिती
- अहिल्यादेवींच्या काळातील ऐतिहासिक वास्तूंची माहिती

सन १७२५ च्या ३१ मे ला महाराष्ट्रातील चौंडी गावी जन्म झाला. पुढे त्यांची चमक डोळ्यात भरल्याने आपली सून म्हणून मल्हाररावांनी त्यांची निवड केली. ती निवड सार्थ ठरवत परिस्तितीवश आहिल्यादेवींनी सन १७६६ ते १७९५ या कालात इंदूरचे शासन राज्यकर्ती म्हणून चालविले. तेही विरक्त वृत्तीने. त्या कधी ही विलासी वृत्तीने राहिल्या नाहीत. राजघराण्यातील असून अन राज्यकर्ती असूनही त्यांनी पाण्यातल्या कमलपत्राप्रमाने शरिराला, मनाला राजेपदाचा स्पर्श होवू दिला नाही. पवित्र महासतिसारके जीवन त्यांनी व्यतिथ केले. त्यांच्या दानधर्माबरोबरच राज्यकारभाराचे कामही आजच्याही शासनकर्त्याने शिकण्यासारखे आहे. परखड तर इतक्या की छत्रपतिंना आणि पेशव्यांनाही त्या प्रसंगी रागे भरत. त्यांना यामुळेच छत्रपति महाराजही आईसाहेब म्हणत. मातेचा मान देत. अहिल्यादेवींच्या दानधर्माने सारा भारतवर्ष गाजत होता. काशी पासुन ते रामेेश्वरा पर्यंत असे एकही तीर्थ, क्षेत्र, वा देवस्थान नाही कि जिथे त्यांनी काहि लोकोपयोगी कार्य केले नाही.
पंढरपूर तर समस्त महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवताचे, मोठ्या वर्दळीचे तीर्थक्षेत्र. येथे सदैव वारकऱ्याचा वावर. तिथे जनसुविधेला, वारकऱ्यांना आपुलकीने पहायला कमी पडतील त्या अहिल्यादेवी कशा. त्यामुळेच पंढरीच्या भक्तांवर त्यांनी आपले मायेच छत्र धरले ते वाडारूपाने. आईसाहेबांनी पंढरीक्षेत्री देवदर्शनार्थ स्वत: आलेवर वास्तव्यासाठी म्हणून वाड्याचे काम करायचे ठरविले. आपले आधी तिथे देव असावा या भावनेने त्यांनी सर्वत्र प्रमाणे इथेही सन १७५४ ला महादेव मंदिरासाठी बांधकाम सुरू केले. इकडे महादेव पिंडीही करण्यास प्रारंभ झाला. आणि एक गंमत घडली. पंढरीत देवमंदिराचे साठी पाया खोदताना मातीत मारूती सापडला. तोही नमस्कार मुद्रेतला वा दास मारूती म्हणतात तो. मोठा गाजावाजा झाला. वार्ता इंदूरास आईसाहेबांपर्यंत गेली. त्यांनी चौकशी केली आणि काम थांबविले. म्हणजे महादेव मंदिराचे काम थांबले आणि नियोजनात बदल करून तिथेच जणू देवाने कौल देवून राममंदिर बांधायला सांगितले अशा विचाराने भव्य श्रीराम मंदिर बांधले.

तेच हे श्रीराम मंदिर. अहिल्यादेवी परम महादेव भक्त असताना पंढरीत मात्र राम मंदिर का उभारले? असा प्रश्न सर्वाना पडतो. पण त्याचे उत्तर वर आहे. पण तरिही नियोजनात मंदिरासाठी निर्मिलेला महादेवही याच मंदिरात स्थापण्यात आला. ज्याचे दर्शनाने १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते कारण या महादेवावर १२ ज्योतिर्लिंग कोरलेली आहेत. जो आजही राम मंदिरात पुजेत आहे. त्याशिवाय या मंदिरात एकमुखी दत्तमुर्तीही आहे. पंढरीची क्षेत्र परिक्रमा, द्वार परिक्रमा वा अर्धकोशी परिक्रमा करताना या रामरायाला विश्वेश्वर महादेवाला अन् दत्ताला नमन करूनच परिक्रमारंभ करतात.
सुमारे १३ वर्षे या राम मंदिर अन् वाड्याचे बांधकाम चालू होते. ते १७६७ ला संपले. अन् मोठ्या थाटात अहिल्यादेवींनी चैत्र शु ||१ म्हणजेच गुढी पाडव्याचे शुमुहुर्तावर पंढरीतील या वास्तूची वास्तूशांत केली. अहिल्यादेवी स्वत: त्यासाठी इथे वास्तव्य करून होत्या. त्यांनी मोठा दानधर्म केला. जेवणावळी घडल्या. त्या समारंभासाठी मराठी साम्राज्याचे मानकरी असणारे अनेक सरदार दरकदार आमंत्रित होते. अन् तेही मोठ्या आनंदाने वास्तू:शांती साठी पंढरीत आवर्जून उपस्तित होते. अहिल्यादेवीचे आग्रहावरून खासे छत्रपतीही सातारहून या कार्यी पंढरीत आल्याचे जुने लोकांकडून सांगितले जाते.
चंद्रभागेच काठी विठ्ठल मंदिराकडून नदिला जाताना ऐन मध्यावर असणाऱ्या महाद्वार घाटाचे उत्तरेकडे हे मंदिर आणि भव्य वाड्याचे स्थान आहे. सुमारे २ एकराहून अधिक जागेत या वाड्याचे दणकट बांधकाम आहे. इतके दणकट की नवीन पाहणारास हा वाडा म्हणजे एखादा कोट वा गढीत वाटावी. महाद्वार घाट ते कुंभार घाट एवढ्या विशाल परिसरात त्याकाळी होळकरांची वसती होती. पैकी काही भाग पुढे दशनाम गोसावी साधुंसाठी, तर काही अध्यात्मिक अधिकार संपन्न स्वामींचे पायी दान केला गेला आहे. अन्य भागात होळकरांचे दिवाण पळशीकराचे वास्तव्य होते तसेच अन्य संबंधित कर्मचारी वा मानकरी यांचेहि वसतिस्थान होते.
मोठमोठाल्या २ चौकांचा चौसोपी खाश्या मराठेशाही शैलितला साधारणत: ६०० फूट लांब अन् ३०० फूट रूंद असा भव्य सुमारे १२५ खणांचा लाडकूड काम केलेला एकमजली क्वचित एक बाजूला २ मजले असलेला वाडा म्हणजे पंढरपूरातील मराठेशाहीतल्या सरदारांच्या श्रीमंतीच्या खुणा आहेत. यासाठी लाकडाचा भरपूर वापर करण्यात येवून वाडा दगड, वीटा अन चुन्याचा वापर करण्यात आला आहे. चुनाही भोकर बी, पिंपळाचा डिंक, बिबा द्रावण बेलफळ, बारिक वाळू आदी पासून तयार करून त्याची योग्यायोग्यतेची तपातणी करून वापरण्यात आला आहे. लाकूड नदीपात्रातून आणताना पेशव्यांनीही मंदिरासाठी बांधकाम करीत असल्याने त्यासाठी वाहतूकीची संमती देवून त्यावरचा सरकारी कर माफ केला होता. केवळ स्वत:च्या वास्तव्यासाठी नाही तर येणाऱ्या पांथस्थांसाठी निवाऱ्याची सोय म्हणून या वाड्याचे त्याकाळी महत्व होते. केवळ निवासच नाही तर येणाऱ्याला भोजनाची व्यवस्थाही इथे होळकरांनी केली होती. ती व्यवस्था वास्तूशांती पासून सन १९६६ पावेतो चालू होती. संस्थाने खालसा झाल्यावर या व्यवस्तेला गळती लागली.
या वाड्याला पुर्वेला असणारे प्रवेशद्वार नदिकाठाकडे जाते. तर पश्चिमेकडील भव्य दारातून आत प्रवेश करता आपण पहिल्या प्रथम चारी बाजूंनी २ ओढीचे लाकडी खणांचे बांधकामाचे चौकात प्रवेशतो. त्यातून पुढे जाता तशाच भव्य अशा दुसरे चौकात जाता येते. या दोन्ही चौकातील पाणी वाहून जाण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण भूयारी गटारांची रचना, त्यामागे पुर्वेकडील दाराने नदिकडे जाता येते तिथेच मोठी बाग असे वाड्याचे स्वरूप.

मुख्य प्रवेशद्वार सुमारे २२-२५ फुट उंचीचे दगडी बांधकामाचे वरचे बाजूला मराठी पद्धतीतील विटांचे नक्षीकाम मोठ्या जाडीचे सागवानी चौकटी त्याही एकात एक ३ अन् मोठे लाकडी द्वार. आत दो बाजू देवड्या. मोठाला अडणा, दारवर होळकरांचे बांडे निशाण लावन्याची व्यवस्था असलेली दिसते. पूर्वी तेथे निशाण असायचे हल्ली मात्र दिसत नाही. वाड्यात पैस दिवाणघराची गाद्या तक्क्यांची बैठक गरजेनुसारच्या लहानमोठ्या खोल्या, प्रशस्त स्वयंपाकघर, मोठाली तळघरे, गोशाळा, सदावर्त, घोड्याची पागा, बग्गी, पालखी अशा साऱ्या गोष्टी होत्या. शिवाय विठोबा आणि रामासाठी म्हणून तुळशीची आवश्यकता असल्याने आईसाहेबांचे आज्ञेने पंचमुखी मारूती जवळ तुळशीबागहि उभारली होती.

वाड्याचे दक्षिणेला दगडी २ मंडपांचे राममंदिर. पुर्वेला लाकडी १८ खांबावर उभारलेला ६० x २८ चा भव्य मंडप ज्यात इथेच सापडलेला सुमारे २|| फुटी दास हनुमान ६ x ४ चे लहान दगडी गाभाऱ्यात हात जोडून उभा आहे तो रामाकडे मुख करून. जणू रामाज्ञेची वाट पहात असल्यासारखा. हा मारूतीही वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण त्याला कानाकाली खांद्यावर टेकलेले विठोबासारखे मत्स्य आहेत. त्यामुळेच या मारूतीला विठ्ठलावतारी हनुमंत म्हणतात. त्यानंतर पश्चिम बाजूला लहानसा नगारखाना. त्याचे पश्चिमेला उंच कमानदार असा ४० x १८ चा दगडी मंडप त्यातच पश्चिम बाजूला उंच जोत्यावर असणारे सिंहासनावर राम, लक्ष्मण आणि सीतामाईंच्या उत्तर हिंदुस्थानी शैलितील संगमरवरी मुर्ति ज्या पुर्वाभिमुख उभ्या आहेत. या गाभाऱ्याला प्रदक्षिणा सुविधाही आहे. रामरायाचे गाभाऱ्यावर विटकामाचे दोन स्तराचे साधेसे शिखर त्यावर लाकडी कळस. खरं तर सोन्या चांदीचे कळस बसवायची ऐपत आणि दानात असतानाही इथे लाकडी कळस का हे एक कोडेच आहे.

सबंध हिंदुस्थानात बहुधा कोठेही नसणारी माता अहिल्यादेवींची संगमरवरी मुर्ती इथे रामासमोर बसविलेली आहे. ती होळकरांचे पुढचे वारस काशीराव दादा होळकर यांनी स्थापिली आहे. शके १७८५ मधे काशीरावांनी रामचरणी पितळी महिरपीचा चौरीडोल वाहिला त्यावेळीच आईसाहेबांची हि प्रसन्नवदन मुर्ती स्थापिली. ती सोबतचे प्रकाशचित्रात दिसत आहे.

या मंदिरात सहा हाताचा एकमुकी दत्त, गरूड आणि महादेव पुजले जातात. केवळ मंदिर बांधुन न थांबता त्याचे उत्सव, नित्यपुजा याचीही उत्तम व्यवस्थाही करण्यात आली होती. देवाला लागणारी विविध उपकरणे, चांदी – सोन्याचे अलंकार, पालखी, छत्र, अब्दागीरी, चांदीचे चवऱ्या आदिची व्यवस्था करण्यात आली. रामनवमी ला चैत्र पाडव्या पासून रामनवमी पावेतो नित्य विशेषाभिषेक, रामापुढे कीर्तन, वैदिक ब्राह्मणाचे वेदपठण, नित्यभोजन, नवमीला जन्मोत्सव, सायं पालखी परिक्रमा, दुसरे दिना पारण्याला २०० ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा असा जंगी कार्यक्रम असायचा. हनुमान जन्मदिनही कथा, कीर्तन, दिवसभर प्रसाद भोजनादी कार्यक्रमाने रंगून जायचा. वर्षभर नित्य २५ ब्राह्मणांना आणि अन्य पांथस्थांना भोजनाची सुविधाही होती.

एवढे करून थांबतिल त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी कशा त्यांनी परमात्मा विठोबालाही नित्य पुजा पाठासाठी वर्षासने दिली. जडावाचे दागदागिने अर्पिले. त्यांनी माता रूक्मिणीला सोन्याचा कमरपट्टा अन् जडावाची चोळी वाहिल्याची नोंदही आहे. सोबत उत्पात मंडळींना या वस्तू आईससाहेबांचे उपभोगासाठी दिल्याबाबतचे पत्रही उपलब्ध आहे. त्याशिवाय आपले तिर्थाचे उपाद्धे म्हणून संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशात वर्षासनही दिले होते. त्याबाबतच्या सनदा आमचे घरी असून त्याचे पूर्वजांनी जतन केले आहे. ज्याचे प्रकाशचित्र खाली जोडले आहे.

असे हे राम मंदिर आणि श्रीमंत होळकर सरकार वाडा म्हणजे पंढरपूरकरांचे आनंदस्थान कारण कित्येकांची उपनयनादी, विवाहाची आनंददायी स्मरणे या वाड्याशी जोडलेलि आहेत. महाराष्ट्रातील थोर इतिहास संशोधक सेतु माधवराव पगडी यांचीही मुंज या ऐतिहासिक वाड्यातच झाली आहे. जणु त्यामुळेच त्यांची इतिहासाशी नाळ जुळली असावी.
समस्त गावकऱ्यांचे घरातले चोळी, बारसे, जावळ, एकसष्टि, सहस्त्रचंद्रदर्शनादी सगळीच शुभकार्ये या वाड्यातच घडायची. आता काळ बदलला. नवीन मंगल कार्यालये निघाली सुविधांपोटी लोकमानस तिकडे वळाले. तरी आपल्या या संपन्न सांस्कृतिक ठेव्याकडे, एेतिहासिक वारसास्थळाकडे आशेने पाहणारे कित्येक जण पंढरीत आहेत आणि बाहेरूनही कैकजण अभ्यासार्थ इथे सतत येत असतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे पंढरीतील जिते जागते स्मारक म्हणूनही याकडे पाहिले जावे हिच औचित्याने अपेक्षा.
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.
- श्रीराम मंदिर आणि होळकर वाडा, पंढरपूर - August 12, 2020