होळकर रियासतीचे श्रीमंत गावडे सरकार घराण्यातील
श्रीमंत महाराणी चंद्रावतीबाई साहिबा
यांचे ऐतिहासिक दुर्लक्षित जन्मस्थळः
गावडेवाडी ता.पारनेर जि.अहमदनगर(महाराष्ट्र)
मराठा साम्राज्याचे होळकर, शिंदे, पवार, गायकवाड आणि नागपूरकर भोसले हे प्रमुख मातब्बर सरदार घराणी आधारस्तंभ होते. या सर्वांनीच छञती शिवरायांचे व पहिल्या श्रीमंत बाजीराव पेशवे साहेबांचे उत्तर भारतातील साम्राज्य विस्ताराचे महत्वाकांक्षी धोरण आंमलात आणले. तेथे स्वराज्याचा दबदबा निर्माण केला. यापैकी होळकर राजवंशाने माळव्यावर २२० वर्ष लोकहिताचा राज्यकारभार केला. म्हणूनच होळकर राजवंशाबद्दल इतिहासात आढळणा-या नोंदी मोठ्या मार्मिक आहेत.

‘होळकर राज्यकर्ते लोकशाहीचा आदरकरणारे, प्राहिताकडे लक्ष ठेवून लोककल्याणाची कामे करणारे आणि भारत देशाला राष्ट्रीय ऐक्याच्या सुञाने बांधणारे राज्यकर्ते होते’. त्यापैकी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी १८ व्या शतकात दूरदृष्टी दाखवून जी विविध कामे केली ती आजही लोकशाही शासनाला पथदर्शक आहेत. जलव्यवस्थापन, वृक्षलागवड, दुष्काळ निवारण, लोकन्यालय, अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि साहित्य सेवा या बाबतचे लोकमाता अहिल्यादेवीचे विचार मार्गदर्शक आहेत.
पेशवे काळात अहमदनगर सरकारमधील ढवळपुरी परगणा गजबजलेला होता, ते राजकीय हालचालीचे महत्वाचे केंद्र होते. याप्रांतावर होळकर व शिंदे यांची वेगवेगळ्या काळात राजवट होती. ढवळपुरी येथे पुर्वी होळकरांचा राजेशाही वाडा होता. त्याचे आजही काही ज्योत्याचे अवशेष ढवळपुरीत दिसतात. तसेच ढवळपुरी प्राचीन काळापासून धनगर पशुपालकांची वसाहत असल्याचे उत्खननात पुढे आले आहे. तो भाग होळकर राज्याचा हिस्सा असावा हा मोठा योगायोग आहे. याच परिसरातील गावडेवाडीत होळकरांचे प्रतिनिधी म्हणून गावडे काम पहात होते.
पुढे होळकरशाहीत “होळकर-गावडे” यांचा रोटीबेटी व्यवहार झालेला आढळून येतो. येथील धोंडजीबुवा तथा कारभारी गावडे हे धार्मिक प्रवृत्तीचे धोरणी आसामी होती. होळकर दरबाराच्या बातमी पञात आणि खाजगीकडील पञव्यवरात त्यांचा गोसावी म्हणून देखील उल्लेख येतो. पुढे वारसाहक्काने गणपतराव गावडे व रावजी गावडे हे होळकरांच्या सेवेत आले. गणपतराव हे धोंडजी बाबुवाचे चिंरजीव तर रावजी हे नातु होते. रावजी गावडे यांची मुलगी चंद्रावती हिचे लग्न होळकर नरेश सवाई तिसरे तुकोजी होळकर यांच्याबरोबर सन १८९५ झाले होते. तर रावजी गावडे यांचा पुतण्या “श्रीमंत कृष्णराव गावडे” होळकर स्टेटचे महसूली आयुक्त म्हणून प्रशासनात कर्तबगार गाजविलेली होती.

तर गावडेवाडीने होळकर रियासतीला एक महाराणी, राजमाता हिजहायनेस अखंड सौभाग्यवती चंद्रावती माँसाहेब व मामासाहेब गावडे/कमिश्नर गावडेयांच्या रुपाने होळकर स्टेटला व स्वांतञ्योत्तर मध्यभारताला रेकाॕर्डस, जहागिर विभागाचे कमिश्नर दिले. म्हणून गावडेवाडीचे वर्णन मुर्ती लहान किर्ती महान असे स्वरुप इतिहासात आढळते.
या गावात असणारी छञीस्मारक हे गावडे वंशाचा मुळपुरुष धोंडजीबुवा उर्फ धोंडीबा गावडे यांची १९ व्या शतकातील आहे.
आता आपण गावडेवाडीतील पुरातत्वीय अवशेषांची माहिती घेऊ या!. वाडा संस्कृती पेशवेकाळात मोठ्या प्रमाणात उदयाला आलेली होती. पेशव्यांच्या कर्तबगार सरदारांनी वाडे बांधून आपला डामडौल संभाळलेला होता. त्यावेळी या वाड्यांना राजकीय व सामाजिक दृष्ट्या मोठं महत्व आलेलं होतं. थोडक्यात वाडा सांस्कृतिक अभिसरणाचे एक साधन होते.
हे चिरेबंदी व सागानीं बांधलेले वाडे सर्व सामान्यांच्या कुतूहलाचे विषय होत. याचप्रकारातील गावडेवाडा होता. गावडेवाडीमध्ये गावडेंचा भव्य राजवाडा होता. येथून होळकरांच्या वतीने राज्यकारभार चालत असे. सध्या येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर हा चिरेबंदी घडीव दगडात हा गणपतराव गावडेच्या काळात उभारण्यात आला होता. त्यावाड्याचे सागकाम माञ रावजी गावडेच्या काळात झालेले असावे. त्यांच्या काळात होळकर राजंशातील राजे महाराजांची उठबस या वाड्याने पाहिलेली होती.
वैभवशाली काळ या वाड्याने अनुभवलाय, चिमुकल्या चंद्रावतीचे जन्मस्थळ हाच तो प्रसिध्द गावडेवाडा. यावाड्याने आपल्या अंगाखांद्यावर चंद्रावतीला खेळवलयं. राजकीय चर्चा, गुप्तखलबते, मोठमोठया बैठका येथे झालेल्या पाहिल्यात. हा वाडा राजमाता चंद्रावतीबाई साहेबांचे राजकीय डावपेच, शिक्षण -प्रशिक्षणाचे, संस्काराचे जणू काही विद्यापीठच होते. सध्या हा वाडा नामशेष झालाय. लोकांनी घडीव दगडे व सागाचे नक्षीदार लाकडे लांबवली. अर्धवट उभ्या असणाऱ्या पडक्या भिंतीना वाचा फुटली तर ते सर्व राजवैभव मोठ्या अभिमानाने कथन करतील.
या वाड्याचा सर्व परिसर सध्या स्मशान शांतता अनुभवतोय. हे उदास, निर्जन, भकास वातावरण गतवैभवाची आठवण करुन देतय. हा वैभवशाली वाडा व ही जागा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी सारखे विकसित केले पाहिजे. येथील दुसरी ऐतिहासिक वास्तू म्हणजे धर्मशाळा होय. ही राजवाड्याच्या बाजुला होती, ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेली होती, असे येथील जुने लोक सांगतात ते माञ इतिहासाला धरुन नाही.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात धोंडजीबुवा यांच्या स्मारक छञीच्यावेळी ही धर्मशाळा “अहिल्या ट्रस्टच्या” वतीने तृतीय तुकोजीराव होळकर यांच्या काळात उभारली पाहिजे. सध्या ही धर्मशाळा नामशेष झाली असून त्याजागेवर गावक-यांनी नंतर मारुतीचे मंदीर बांधण्यात आलेले दिसते. माञ होळकरांचे महाराष्ट्रातील राजकीय हालचालीचे महत्वाचे सत्ताकेंद्र चांदवड, वाफगाव आणि गावडेवाडी असल्याने यांच्यात सतत लोकांची वर्दळ होती. सर्वसामान्य प्रजेची ये-जा होत होती. त्यावेळी या धर्मशाळेने कित्येकदा लोकांना राञीचा आश्रय दिलेला होता.
तिसरी महत्वाची वास्तू म्हणजे धोंडजीबुवा यांची छञी. ही छञी मोठीकौशल्यपुर्ण धाटणीची सुंदर आहे. घडीव दगडात आकर्षक पध्दतीने बांधण्यात आली आहे. उंच घुमट, मेहराब, कमानी, स्तंभ अशी विविध इंडोइस्लामिक पध्दीतीचे वैशिष्ट्ये या छञीचे नजरेत भरतात. सभामंडप या छञीची शोभा आणखी वाढवितो. छञीच्या भिंतीचे बांधकाम काळ्या काताळ घडीव पाषांणात केले आहे. तर घुमटाचे बांधकाम छोट्या भाजक्या विटामध्ये केलेले आहे ते चित्ताकर्षक आहे. छञीत शिवाची पिंड असुन मल्हारी मार्तंडाची अश्वारुढ, गणेशाची मुर्तीही येथे जाणीवपूर्वक बसविलेली आहे. तसेच छञीत हवा खेळती राहण्यासाठी दगडी जाळ्या बसविण्यात आलेल्या आहेत.

या छञीच्या दुरुस्तीसाठी ७ डिसेंबर १९१२ मध्ये रोखरक्कम २५००/- होळकर स्टेटने खाजगीतील तिजोरीतून उपलब्ध करुन दिली होती. त्यानुसार सध्या दिसत असलेल्या छञीचे बांधकाम संमत १९७२ म्हणजे सन १९१४-१६ मध्ये गणपतराव गावडेंने करुन घेतले. अशा संगमरवरी लेख गर्भगृह व सभामंडपाच्या मधील भिंतीवर दर्शनीभागात दिसतो.

तसेच या आशयाचे एक पञ श्री सुधाकार अण्णा गावडे, भाऊसाहेब सुर्यभान गा यांच्या प्रयत्नपुर्वक धडपडीमुळं मिळाले आहे. छञीच्या बाजुला दोन स्मारक घडीव चौथारे आहेत. ते गावडे घराण्यातील उच्चपदस्थ व्यक्तींचे असले पाहिजेत. त्याची रचना मांडणी, धाटणी वरुन या अनुमानास वाव मिळतो. छञीकडे पाहिल्यास आपल्या मनात राजप्रतिष्ठा दर्शविणारे स्मारक पाहिल्याचा आनंद व श्रध्दा भाव आपोआप निर्माण होतो. छञीच्या बाजुस मोठी ऐसपैस मोठी सहान जागा आहे. छञीकडे तोंड करुन उभे राहिले असता उजव्या बाजुस ऐतिहासिक बारव आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव संवर्धन या उपक्रमापुर्वी ती झाडाझुडपात अदृश्य होती. तीची पडझड झालेली होती. या उपक्रमामुळे होळकरकालीन पाणीपुरवठा करणाऱ्या साधनांची पुर्नबांधणी व पुनर्वापर करण्याची शासनाची योजना आहे. त्यास मोठे बळ मिळेल. ही बारव मोठी असुन तीच्यामध्ये उतरण्यासाठी इंग्रजी एल अक्षरासारख्या पायऱ्या आहेत.
बारवेला आजही तीव्र दुष्काळ असताना चांगले पाणी आहे. त्याकाळात याबारावेला विपुल पाणि असले पाहिजे. अशी रचना या बारवेची मुद्दाम केलेली दिसते. गावासाठी पाणीपुरवठा करण्याची सुविधा तसेच शेतीसाठीसुध्दा येथुन पाणीपुरवठा होत होता. तसे अवशेष येथे आढळतात. याबारवेचे काम या उपक्रमाचे नियोजन प्रमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गावातील होळकर घराण्यावर प्रेम असणारे ग्रामस्थ, पधाधिकारी मोठ्या तळमळीने करत आहेत.
छञीस्मारक, बारव, देहसमाधी असणारे स्मारक चौथारे यासाठी संरक्षक भिंत सभोवती बांधण्यात आल्याने या परिसराला मोठे सुंदर रुप आले आहे. यात सुंदर बागबगीचा पुर्वी होता. त्यास व ऐतिहासिक गावडेवाड्यास या बारवेचे पाणी मिळे. या बागेत नानाफूलझाडे बहरलेले. फुलांचे ताटवे यामुळं हा परिसर मोठा प्रसन्न होता. यामुळेच कदाचित येथे आलेल्या मान्यवरांनी येथे आकर्षक गार्डन करण्याचा मनोदय नुकताच बोलून दाखवला. आम्हांला वाटले त्यांच्या मुखातून अहिल्यादेवीच वदल्या.
या बारवेला पुर्वी जवळील नदी, कालवा, ओढा, तलाव यापैकी कसला तरी पाणीपुरवठा होत होता. सध्या नैसर्गिक बदलेल्या भूस्वरुपामुळे आकलन होत नाही. या गावडेवाडीने होळकर संस्थानाला दिलेले दोन महान रत्न म्हणजे हिजहायनेस अखंड सौभाग्यवती महाराणी चंद्रावती माॕंसाहेब आणि होळकर संस्थानाचे सर्वोत्तम प्रशासकीय प्रशासक “श्रीमंत कृष्णराव गावडे” तथा मामासाहेब गावडे यांचाही इतिहास आपल्या मनात मोठी प्रेरणा निर्माण करणारा आहे.
राजमाता चंद्रावती साहेब यांचा जन्म २४ सप्टेंबर १८८७ रोजी गावडेवाडीत झाला. रावजी गावडे यांच्या घराण्यात झाला. त्यांचा शाही विवाह होळकर महाराजा तृतीय तुकोजीराव यांच्याशी १६ मार्च १८९५ रोजी झालेला. चंद्रावती महाराणी बनुनू इंदौर संस्थानात दाखल झाल्या. त्या अत्यंत कुशाग्रबुध्दीमत्तेच्या होत्या. युरोपियन बनावटीची चारचाकी मोटार चालविणा-या पहिल्या भारतीय स्ञी चालक होण्याचा मान महाराणी चंद्रावती बाईसाहेबांना मिळतो. असं हे पुरोगामी महाराष्ट्रातील स्ञीरत्न आधुनिक विचाराचे असले तरी पितृभक्त होते.

रावजी स्मृती मंदीरांची उभारणी त्यांनी इंदौरमध्ये समाजसेवी भावनेनी केली, इंदौरमधील ते यशवंतरोडवरील भव्य तीनमजली वास्तूचे नाव वाचून अभिमान वाटतो. आजही इंदौरामधील दिमाखाने उभी असलेली ही रावजी भवनाची वास्तू गावडेवाडीची आठवण काढते. तृतीय तुकोजीराव होळकर महाराजा इंदौर यांची थोरली पत्नी म्हणून महाराणी चंद्रावती बाई साहेबांनी गाजविलेली कर्बगारी उल्लेखनीय आहे.

पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी सारखा साधेपणा व साध्वीचे वैराग्य याही राजमातेच्या चालण्या बोलण्यात, कार्यात दिसते. त्यांनी विधवा स्ञी करिता ‘अहिल्याश्रम’ तर मुलींच्या शिक्षणासाठी ‘चंद्रावती महिला विद्यालयाची’ स्थापना केली. वरील दोन्हीही संस्था सन १९२२-२४ मध्ये स्वखर्चाने बांधल्या. सरस्वती म्हाळसा शिक्षण संस्थेला उदारहस्ते देणगी देतांना स्ञीया उद्योगधंद्यात पुढे आल्या पाहिजेत.
छोट्यामोठ्या गृहउद्योगात आघाडीवर राहिल्या पाहिजेत हा दृष्टिकोन त्यांचा लक्षात येतो. स्ञीसक्षमीकरणासाठी चंद्रीका भग्नी मंडळ, शिवणक्लास, कलामंदीराची स्थापना केली. सन १९१६ पासून अहिल्या पुण्यतिथी उत्सावाला राजाश्रय दिला. तसेच अहिल्यादेवीच्या जीवनचरिञावर ग्रंथ लिहिणा-या साहित्यिकांना आर्थिक मदत व गौरव केला. मराठी भाषा वृध्दीसाठी मोठे प्रयत्न केले. उत्सवप्रिय राजमाता चंद्रावती माँसाहेबांनी थोरले सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर व पहिले श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा स्मृतीदिन उत्सव “बाजीराव-मल्हार उत्सव” आपल्या राज्यात त्यावेळी होळकर रियासतीत सुरु केला. त्यांना सवाई यशवंतराव सन १९०८ तर मनोरमाबाई राजे होळकर सन १९०९ ही दोन अपत्य झाली.

फोटोमध्ये चांद्रवतीसाहिबा होळकर(बसलेले), इंद्रावती होळकर(उभ्या), नऊ वर्षाचे
राजकुमार यशवंतराव होळकर, आठ वर्षच्या राजकुमारी मनोरमाराजे होळकर आणि
१ वर्षच्या राजकुमारी स्नेहलताराजे होळकर(इंद्रवती यांच्या हातात).
सवाई यशवतराव होळकर या त्याच्या मुलाने सन १९२६ ते १९४८ पर्यत राजा म्हणून मोठे कार्य केले. त्यावेळी राजमाता चंद्रावती बाईसाहेब म्हणून कर्तबगारी विचार करावयास लावणारी आहे. त्यांचे दत्त बंधू कमिश्नर गावडे कडकशस्तीचे ते मामासाहेब गावडे या नावाने लोकप्रिय होते. ते होळकर स्टेटचे वजनदार मोठे प्रस्थ होते. त्यांचाही जन्म याच गावडेवाडीत सन १९०३ मध्ये श्री ज्ञानूजी व विठाबाई गावडे यांच्यापोटी झाला. पुढे कृष्णराव सन १९०८ साली चंद्रावतीबाईसाहेब यांचे चूलते रघूनाथ व सौ.भागीरथी बाई गावडे यांना दत्तक गेले. त्यांचे शिक्षण महाराजा तृतीय तुकोजीराव होळकरांनी “युरोपमध्ये ब्लंडेन काॕलेजमध्ये” केले. मामासाहेब गावडे होळकर स्टेटमध्ये चढत्या क्रमाने मोठमोठी पदे भूषविली. हा त्यांचा प्रवास थक्क् करणारा वाटतो. आणि त्याचे मोठे नवल वाटते.
ते तहसिलदार, जिल्हाधिकारी, आयुक्त अशा महत्वाच्या महसुली पदावर शिस्तप्रिय, सेवानिष्ठ प्रशासक म्हणून येथे सुप्रसिद्ध होते. कमिशनर गावडे १९५५-५७ ग्वाल्हेर येथे कमिश्नर रेकाॕर्डस व जहागिर विभागात मोठ्या पदावर कार्यरत होते. त्यांची शिस्त व कामावरील निष्ठा आपल्याला मोठी प्रेरणा देते. आज त्यांची स्मृती इंदौर राजधानीत “मामासाहेब गावडे हवेली” इंदौरकरांनीही जतन करुन ठेवली आहे. आणि आपण? हा सर्व इतिहास गावडेवाडीच्या भूमीपुञांनी घडविला म्हणूनच ही भूमी नवनिर्मितीचा संदेश सदैव आपल्याला देते.
आभार : प्रा. नवनाथ वाव्हळ सर
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021