जेजुरी गड, ता.पुरंदर जि.पुणे(महाराष्ट्र)
Jejuri Gad, Tal-Purandar Dis-Pune(MH)
इतिहास :
श्री मल्हारी मार्तंड देवस्थान म्हणजेच श्री खंडोबा यांचे मंदिर. जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जेजुरी गडाचा विकास अनेक राजघराण्यानी केला मात्र सिंहाचा वाटा तो फक्त इंदोर (मध्यप्रदेश) येथील श्रीमंत होळकर राजघरण्याचाच. या Post मध्ये आपण फक्त जेजुरीगडाच्या विकासासाठी राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या कार्याची माहिती पाहणार आहोत.

जेजुरीचा खंडोबा हे होळकर राजघराण्याचे कुलदेवत होय. खंडोबा यांचे मंदिर सन १६०८ रोजी बांधण्यात आले. त्यानंतर श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी सन १७३५ मध्ये जेजुरी गडाच्या पुननिर्माणाचे कार्य चालू केले.
सन १७३९ ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर (प्रथम) व चिमाजी आप्पा यांनी पोर्तीगीजवर विजय मिळवल्यानंतर काही पोर्तीगीज घंटा खंडोबाच्या चरणी अर्पण केल्या.

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी सन १७४२ ला गडावरील दगडी कमानीचे आणि नंतर सन १७५८ ला गडावरील नगारखाण्याचे काम पूर्ण केले. नगारखाण्यावर एकाच आशयाचे दोन होळकर कालीन शिलालेख आहे.



वरील शिलालेखाचा आशेय खालीलप्रमाणे,
श्री शके १६७८ धाता
नाम स्वंछर श्री मा
र्तंड भैरव चरणी
खंडोजी सुत मल्हार
जी होळकर णीरंतर
सभोवारच्या सभामंडप, ओवऱ्या व इतर वास्तू श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी बांधल्या. पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात सन १७७० च्या सुमारास जेजुरी गडाच्या किल्लेसदृष्य तटबंदीचा निर्माण पूर्ण झाला. पश्चिमेला म्हाळसाबाई मंदिराच्या डाव्या व उजव्या बाजूला, उत्तरेला नगारखान्याच्या डाव्या व उजव्या बाजूला व पूर्वेला चोथऱ्याशेजारील तटबंदीवर तुकोजीराव होळकरांच्या नावाचा शिलालेख आढळतात.

वरील शिलालेखाचा आशेय खालीलप्रमाणे,
श्री शके १६६४ दुदु
भी नाम सवत्सरे
श्री मार्तंड भैरव
चरणी खंडोजी सु
त मल्हारजी होळकर

वरील शिलालेखाचा आशेय खालीलप्रमाणे,
श्री मार्तंड चरणी तत्पर
मल्हारजी सुत तुको
जी होळकर नीरंतर श
के१६९२ वीकृती नाम
संवछरे श्रावण सुध्द
प्रतीपदा सोमवार का
कारखाना कोलावंन लेप
लफात शामजीना
रायेन राजापूरक
र परगणे दिजे
तथापि म्हाळसाबाई मंदिराच्या व नगारखान्याच्या डाव्या व उजव्या बाजूला असलेल्या शिलालेखावरील अशेय सारखाच आहे. अशाप्रकारे जेजुरीगडावर होळकरकालीन तीन आशयाचे पाच शिलालेख आहे. खालील चित्रावरून तुम्हाला शिलालेखांचे निश्चित स्थान लक्षात येईल. जेजुरीगडावर जवळपास एकूण २३ शिलालेख आढळतात. निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे.

खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.

गडकोटासारखे भक्कम तटबंदीचे बांधकाम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातीलच.
जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत. देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे.

गडावर चोथरा जिथे आहे त्याच्या खाली तळघरात शिव मंदिर बांधले गेले आहे हे सन २०१८ स्पष्ट झाले. तसेच या गडाच्या तटबंदीसाठी जो दगड वापरला गेला तो पणदरे(ता.बारामती) येथील खिंडीतून आणण्यात आला. पणदरे ते जेजुरी या मार्गावर गडाच्या बांधकामासाठी दगडाची वाहतूक केली जात होती म्हणून राणी अहिल्यादेवी होळकर यांनी काही पायविहिरींचा हि निर्माण केला.
गैरसमज :
तटबंदीवर सुभेदार मल्हारराव होळकर व सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या नावाचे शिलालेख असताना सुध्दा इतिहासकार, मल्हारराव व अहिल्यादेवी यांनी तटबंदीचा निर्माण केला असे सांगतात. तुकोजीराव होळकर यांच नाव असून हि त्यांचे नाव का घेतले जात नाही? याला कारण आहे होळकरांची दुहेरी राज्यव्यवस्था! सुभेदार मल्हारराव यांच्या मृत्यू नंतर होळकरशाहीत दुहेरी राज्यव्यवस्था सुरु झाली. दुहेरी राज्यव्यवस्था अधिक माहिती वाचण्यासाठी खालील link ला भेट द्या.
अहिल्यादेवी होळकरांच्या जहागीरीचे स्वरूप(दुहेरी राज्यव्यवस्था)
दुहेरी राज्यव्यवस्था बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे प्रशासकीय गोष्टीवर अहिल्यादेवी नियंत्रण ठेवत असत तर लष्करी कारवायात तुकोजीबाबा प्रत्यक्ष भाग घेत असत. राणी अहिल्यादेवी होळकर या प्रत्यक्षात सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या काळात(१७६७-१७९५) होळकरशाहीच्या रिजंट महाराणी होत्या.
म्हणजेच जे राजकीय काम होती किंवा जेथे राजकीय खर्च होत असत तेथे सरकारी शिक्का वापरला जात असत व सुभेदार पदावर तुकोजीराव असल्यामुळे त्यांचे नाव शिक्क्यावर असतं. सरकारी कामे असो किंवा खासगी कामे असो सर्वांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अहिल्यादेवींचे नियंत्रण असतं. त्यामुळे या तटबंदीचा निर्माण मल्हारराव यांच्या नंतर अहिल्यादेवीनि केला असे म्हणायला काहीही हरकत नाही व उपलब्ध पुराव्यावरून असे समजते कि, सुभेदार मल्हारराव होळकर आणि राणी अहिल्यादेवी होळकर यांनी अनुक्रमे तटबंदीचे व ओवऱ्यांचे बांधकाम शके १६६४ ते १६९९ म्हणजेच इ.स. १७४२ ते १७७७ पर्यंत पूर्ण केले.
हि तटबंदी सन १७७० ला पूर्ण झाली व यावेळेस सुभेदार तुकोजीराव उत्तरेत दिल्लीस्वारीत महादजी शिंदे यांच्या बरोबर होळकर सेन्याचे नेतृत्व करत होते. भारतभरात होळकरशाहीतर्फे सरकारी खर्चातून किंवा खाजगी खर्चातून चालत असलेल्या कामावर राणी अहिल्यादेवी होळकर स्वता लक्ष घालत असत.

माहिती :
खंडेराय-म्हाळसाई मंदिराच्या म्हणजे जेजुरीगडाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे पायऱ्या चढून वर येताना दोन कमानी (दरवाजे) चढून वर आल्यावर बानूबाईचे मंदिर लागते. तिथेच शेजारी क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा पुतळा आहे. अजून एक दरवाजा ओलांडून काटकोनातून वर आले, की छोट्या छोट्या आकारातील अकरा दीपमाळी आणि अष्टकोनी टेहेळणी बुरूज नजरेस पडतात. या दीपमाळी आणि अष्टकोनी टेहेळणी बुरूज आपल्या (भक्तांच्या) स्वागतालाच उभ्या आहेत, की काय असा भास होतो. या टेहेळणी बुरुजाकडे बारकाईने पाहिल्यास त्यावर वराह शिल्पे कोरलेेली दिसतात.
या ठिकाणावरून मंदिराचा मुख्य दरवाजा एकदम समीप आल्याचे वाटते; मात्र या दरवाजाकडे जातांना पायऱ्याची चढण (ठेवण) उंच आणि मोठी झालेली दिसते. मुख्य दगडी दरवाजाच्या उंबऱ्यावर कीर्तीमुख कोरलेले दिसते. मुख्य दरवाजा आणि त्याच्या इतर तीन कमानी चढून वर गेल्यावर आपला मंदिराच्या तटबंदी आतील आवारात प्रवेश होतो. यासाठी आपल्याला जेजूरगडाच्या तब्बल ३८५ पायऱ्या चढून वरती जावे लागते. मुख्य दरवाजातून आतील मंदिर आवारात गेल्यावर पाठीमागे दरवाजाकडे ओळून पाहिले, की दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी वराह शिल्प कोरलेले दिसून येते.
मंदिराच्या तटबंदी आतील आवारात जाताच खंडेराय-म्हाळसाईच्या मंदिरासमोरील भव्य दीपमाळा आपले चटकन लक्ष वेधून घेतील अशाच आहेत. या दीपमाळा पाषाण दगडाने सुंदर आणि रेखीव अशा बनविल्याने, त्या लक्ष वेधून घेतील अशाच आहेत. या दीपमाळावर वेगवेगळी चिन्ह कोरलेली आहेत.
मंदिरासमोर लहानमोठ्या मिळून दहा दीपमाळा आणि एक अष्टकोनी टेहेळणी बुरूज असून, या बुरुजावर सुद्धा वेगवेगळी शिल्पे कोरलेली असल्याचे दृष्टीस पडतात. टेहेळणी बुरूजाच्या आतून सुंदर घडीव दगडी पायऱ्या असून, या पायऱ्यावरून टेहेळणी बुरूजावर जाता येते. खंडेरायांच्या मंदिरासमोर तटबंदिला चिकटून मल्ल(दैत्य) राजाची प्रतिकृती उभी केलेली आहे.

खंडेराय-म्हाळसाईच्या मंदिरासमोरच्या आवारातील दीपमाळांना वळसे घालतच, आपण देवाच्या गाडी बगाड आणि नंदी घरासमोर येवून पोहोचतो. या दोन्ही ठिकाणी नतमस्तक होत होतच तिथून आपला जेजुरी येथील खंडेराय-म्हाळसाई देवाच्या मंदिरात प्रवेश होतो. तत्पूर्वी मंदिरात प्रवेश करताना भले मोठे पहुडलेले कच्छप (कासव) आणि मंदिराच्या सदरेला ओलांडूनच आपल्याला मंदिर प्रवेश करावा लागतो. मंदिरातील प्रवेश सर्वप्रथम छोटेखानी सभागृहात होतो. हे सभागृह आठ दगडी खांबावर टेकलेले असून, ते तीन छोट्या घुमटाचे बनलेले आहे. या सभागृहातील प्रवेशद्वारावर वरच्या बाजूला गणेशपट्टी कोरलेली आहे.

तीन घुमटाच्या छोटेखानी सभामंडपातून आपला प्रवेश मंदिराच्या मुख्य सभागृहात होतो. मंदिराचा मुख्य सभामंडप हा सोळा दगडी खांबावर टेकलेला असून, हा सभामंडप छोट्या छोट्या आकारातील नऊ घुमटांचा बनलेला आहे. सभामंडपात धातूचा तसेच दगडावरील देवाचा आश्वारुढ पुतळा नजरेस पडतो. तिथूनच समोर असलेले देवाचे गर्भगृह आपल्या दृष्टीस पड़ते. गर्भगृहाच्या दरवाजाच्या वरील उंबऱ्यावर स्थापत्य शैलिनुसार गणेशपट्टी कोरलेली असून, गणेशपट्टीच्या दोन्ही बाजूला वराह शिल्प कोरलेले आहे. तसेच दरवाजाच्या डाव्या बाजूच्या खाम्बावर गणेश मूर्ती कोरलेली असून, उजव्या खाम्बावर संगमरवराची यक्षमूर्ती बसवलेली आहे.
देवालयाच्या प्रशस्त सभामंडपातून गर्भगृहाच्या दगडी दरवाजातून आपला खंडेराय-म्हाळसाई मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश होतो. देवाचे गर्भगृह प्रशस्त असेच असून, ते चार दगडी खाम्बावर टेकलेले आहे. देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मात्र देवाच्या गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही. मंदिराच्या गर्भगृहात देवाचा भला मोठा असा देव्हारा असून, त्यात खंडेराय, म्हाळसाई, बानाई, इत्यादि असे मुखवटे ठेवलेले आहेत. त्याखाली खंडेराय-म्हाळसाई, बानाई यांचे लिंग असून, सदरील लिंग हे उत्तराभिमुख असेच आहे. देवाच्या अभिषेकाचे तीर्थ बाहेर जाण्यासाठी चाळुक्यांनी मंदिराच्या बाहेरून उत्तर बाजुला गोमूखतीर्थ बसवलेले आहे. गर्भगृहात भिंतितिल मोठ्या देवळीच्या कोनाडयामध्ये सोनारी, ता. परान्डा येथील श्री.सिद्धनाथ काळ भैरवनाथांची बैठी मूर्ती ठेवलेली आहे.

मंदिराच्या मागच्या भिंतीला एका सुंदर दगडी डिझाइन केलेल्या देवळीमध्ये एक बैठी पाषाण मूर्ती बसवलेली आहे. या मूर्तिवर भंडाऱ्याचे लोट तयार झाल्याने, ही मूर्ती काळ भैरवाची की कार्तीकाची! हे समजने मुश्किल आहे. मंदिराच्या लगोलग मागे तुळजाभवानी देवीचे मंदिर असून, देवी मंदिराच्या मागे आणि पुढे दोन्ही बाजुला प्रत्येकी दोन दीपमाळा आहेत. देवी मंदिराच्या शेजारी भूलेश्वराचे (महादेव) मंदिर आहे. भूलेश्वराच्या अगदी मंदिरा शेजारीच उत्तरेकडून पंचलिंग महादेव मंदिर असून, या मंदिरातील भगवान शिवाच्या एका साळुंखीमधे मल्हार, काशी, मातापूर, निलाद्रि आणि हरिद्वार असे पाच लिंग असल्याचे सांगितले जाते. महादेवाच्या एका साळुंखीमधे पाच शिवलिंग असण्यामागे सुद्धा काहीतरी ऋषी आख्यायिका सांगण्यात येते.
पंचलिंग महादेव मंदिराचे उत्तरेकडून शेजारीच देवाचे ओवऱ्या स्टाईलचे कमानीचे भांडारगृह आहे. हे भांडारगृह देवाच्या मुख्य मंदिर सभामंडपा प्रमाणेच सोळा खाम्बावर टेकलेले आहे. हे भांडारगृह देखील देवाच्या मंदिराप्रमानेच नऊ घुमटांचे बनलेले असून, या भांडारगृहामध्ये देवाचे शेजघर आहे. शेजघरा शेजारी देवाचे भांडारगृह असून, त्या शेजारी काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. हे भांडारगृह देखील स्थापत्य शैलीचा एक दर्जेदार नमुना आहे. सोमवती अमावस्या आणि दसऱ्याच्या दिवशी देवाची यात्रा असते, या यात्रेनिमित्ताने इथूनच देवाची पालखी निघते. तिची उत्सवमूर्ती याच भांडारगृहात ठेवली जाते.
मंदिर आवारात तटबंदिच्या आत उजव्या बाजुला बावीस ओवऱ्या असून, मंदिराच्या डाव्या बाजुला दरवाजा सोडून सत्तावीस ओवऱ्या आहेत. मंदिराच्या पाठीमागील बाजूस प्रवेशद्वार धरून चार ओवऱ्या आहेत. तर मंदिराच्या समोर प्रवेशद्वार धरून अकरा ओवऱ्या आहेत. मंदिराच्या चारही बाजूंनी मिळून अशा एकूण मंदिरात ६५ ओवऱ्या असल्याचे दिसून येते. शिवाय या ओवऱ्याच्या वरती मंदिरात चौफेर दगडी भोवऱ्या बसवलेल्या आहेत. मंदिरातील ओवऱ्यावरील बसवलेल्या भोवऱ्यांची संख्या साडेतीनशे पेक्षा जास्त आहे. दक्षिणेकडील काही ओवऱ्यामधे देवस्थानने पर्यायी खोल्यांची (रहिवास) व्यवस्था केलेली असून, यातून मंदिराचे व्यवहार चालत असल्याची माहिती मिळते.
जेजुरी मंदिराच्या सबंध तटबंदिला उत्तर, पूर्व आणि पश्चिम अशा तीन बाजूंनी दरवाजे आहेत. मात्र मंदिराच्या उत्तरेकडील पायऱ्यांवरूनच भक्तांचा जास्तीचा रातबा आहे. पूर्व आणि पश्चिम दरवाज्या बाहेरील पायऱ्या अपूर्णावस्थेत असल्याने या दोन्ही मार्गावरील भक्तांची संख्या रोडावलेली दिसते. मंदिराच्या तटबंदीचा जिर्णोद्धार झालेला असून, तो पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकरांनी केलेला आहे व या मंदिरातील ओवऱ्या आणि त्यावरील संख्येने साडेतीनशे पेक्षा जास्त असलेल्या भोवऱ्यांची स्थापत्य शैली ही होळकरकालीन स्थापत्य शैलीची आठवण करून देणारी आहे. मंदिराला भेट दिल्यावर हा इतिहास नक्की आठवा.
संदर्भ:
जेजुरी येथील होळकर कालीन शिलालेख,
इंदोर स्टेट गॅझेट भाग – १,
भारतीय लोकदैवत “खंडोबा” विषयाचा चिकित्सक अभ्यास हा शोधप्रबंध.
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
राणी अहिल्यादेवी होळकर व इतर इतिहासातील व्यक्तींचे अप्रकाशित शोधप्रबंध व Out of Print असलेले पुस्तके आपुन उपलब्ध केली आहेत. जर आपली इच्छा असेल तर नक्की खरेदी करा. बाकी सर्व माहिती तेथे दिली आहे.
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021
माता अहिल्यादेवींचा आणि होळकरशाहीचा इतिहास खूप रोमांचक आणि महत्वपुर्ण आहे. जो संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताला समजला पाहिजे. होळकरशाहीचा इतिहास आजपर्यंत लपवण्यात आला पण तुमच्या रूपाने हा खरा इतिहास समोर येत आहे, याचा खूप आनंद होतो. होळकर घराण्याचा, महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासात खूप मोठा वाटा आहे, तो सर्वांच्या समोर यावा ही तीव्र आकांक्षा. तुमच्या या देवरुपी कार्याला आमचा सलाम. 💐 माता अहिल्यादेवींचा आशीर्वाद तुमच्यावर कायम रहावाे.💐💐
Pingback: अहिल्याबाई होळकर यांची माहिती, कार्य आणि इतिहास