खडकी-पिंपळगाव, ता.आंबेगाव जि.पुणे(महाराष्ट्र): हा होळकर वाडा (Holkar Wada) पाहिल्यानंतर काय बोलावे अन काय नाही हे कळणारच नाही कारण या वाड्याचे फक्त प्रवेशद्वारच स्थित आहे. या वाड्याची सर्व तटबंदी हि पडलेली आहे किंवा पाडलेली आहे. खरं काय ते इतिहासचं जाणतो. हा किल्लेसदृश वाडा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांनी आपल्या राज्यकाळात बांधला असून जे शिल्लक प्रवेशद्वार आहे त्यास “हत्ती दरवाजा“ म्हटलं जाते.
- अहिल्यादेवींच्या काळातील बारवांची माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.
- अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरांची माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.
- अहिल्यादेवींच्या काळातील ऐतिहासिक वास्तू वाचण्यासाठी येथे Click करा.
प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस दोन होळकर कालीन शिल्प हि पहावयास मिळतात. असे सांगितले जाते कि, जेव्हा सुभेदार मल्हारराव होळकर यांना वाफगाव ची जहागिरी मिळाल्यानंतर त्यांनी ६ गावात ६ किल्ले सदृश्य वाडे एकाच वेळी बांधायला काढले होते. त्यातीलच एक हा खडकी – पिंपळगावचा होळकर वाडा. उर्वरित ५ वाडे म्हणजे काठापूरचा होळकर वाडा, वाफगाव, अवसरी, मंचर व काठापूर(खुर्द).
येथे पाहण्यासाठी काही होळकर कालीन वास्तू स्थित आहेत त्यामध्ये महादेव मंदिर व त्यामधील नंदी, लक्ष्मी नारायण मंदिर, काळभैरवनाथ मंदिर, बिरोबा मंदिर, राजमाता अहिल्यादेवी होळकर(Ahilyadevi Holkar) यांनी बांधलेला नदी घाट, तसेच अवचितराव वाघमारे-पाटील यांनी पितृ उध्दर्तीर्थ बांधलेली समाधी. अवचितराव वाघमारे हे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर (प्रथम) यांचे नातू असून श्रीमंत उदाबाई वाघमारे(होळकर) व सरदार बाबुराव मानाजी वाघमारे यांचे पुत्र होय. महादेव मंदिर व काळभैरवनाथ मंदिराला आजच्या काळातील रंग दिल्यामुळे त्यावरील असलेले होळकर कालीन नक्षीकाम हे इतिहास जमा झालेले आहे.
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) यांची मुलगी श्रीमंत उदाबाई होळकर-वाघमारे यांचा विवाह बाबुराव मानाजी वाघमारे-पाटील यांच्याशी झाल्यानंतर हे खडकी गाव श्रीमंत उदाबाई यांना चोळीबांगडी म्हणून होळकर कुटुंबियांनी बक्षीस स्वरुपात दिले. श्रीमंत उदाबाई या श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व श्रीमंत गौतमाबाई होळकर यांच्या कन्या होय.
उदाबाई वाघमारे – होळकर यांची समाधी होळकर कालीन स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे. या समाधी नक्षी कामामध्ये मराठा व राजपूत कलाकृती दिसून येते व तसेच या समाधी गर्भगृहा मध्ये एक महादेव पिंड असून तीन पादुका आहेत. यावरून हि समाधी तिन लोकांच्या स्मरणार्थ बांधलेली आहे हे स्पष्ट होते. समाधीच्या गर्भगृहातील दारावर होळकर कालीन शिलालेख नजरेस पडतो. या समाधीवर झाडे झुडपे वाढताना दिसतात ते वेळेत साफ केले नाही तर येणाऱ्या काळात त्याचा समाधी मंदिरावर विपरीत परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही. तसेच समाधीच्या बांधकामामध्ये येथील स्थानिक शेतकऱ्याने विटांचे बांधकाम करून समाधीचे विकृतीकरण केल्याचे दिसून येते व हि समाधी ज्या शेतकऱ्याच्या शेतात आहे त्या शेतकऱ्यांने या समाधीमध्ये मटका खेळणाऱ्या लोकांना मासिक भाड्यावर त्याच्या बापाची संपत्ती असल्यागत पत्ते खेळण्यास परवानगी देऊ केली आहे.
समाधीमधील शिलालेखावरील उल्लेख पुढील प्रमाणे :
श्री गणेशाय नम : प्रतापि महाराज मळहारराजा जसि लक्षुमिगौतमा नाम तया उदरी रत्नकन्या विराजे उदाबाई हे नाम पृथ्वीत गाजे. सके १७११ सौम्य नाम संवत्सरे चौत्र शुद्ध ९ नवमी मंदवासरे ते दीवसी बाबूरावा वल्द(वडील) मानाजी पाटील वाघमारे मोकदम तक्षिम दिड मौजे खडकी तर्फे महाळुंगे तस्ये भार्या उदाईवा पुत्र अवचितराव पाटील वाघमारे याणी पित्रु उद्धारार्थ परलोकसाधनार्थ छत्रीचे काम केले असे.
येथील होळकर कालीन नदीघाट हा गावाची शोभा वाढवताना दिसतो. नदीघाट पाहण्यासाठी जाताना येणाऱ्या वेशीवर अजून एक होळकर कालीन भव्य शिलालेख आढळतो. या शिलालेखावरील उल्लेख हा समाधीवरील शिलालेखाशी तंतोतंत जुळतो. अहिल्यादेवी होळकर निर्मित या नदीघाटाचा पुनर्निर्माण अवचिराव वाघमारे यांनी समाधी निर्माणाच्या वेळी सन १७९० च्या दरम्यान केला. हा नदीघाट खूपच भव्य दिव्य आहे. या नदीघाटच्या उजव्या बाजूला या वाड्याचे दुसरे द्वार दिसते. येथील हत्ती द्वारावरील व बिरोबा मंदिरावरील होळकर कालीन दगडी नक्षीकाम आज हि पाहण्यासारखे आहे. या गावातील मंदिरांचा पुनःविकास हा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात झाला.
येथील असलेल्या या होळकर कालीन वास्तूमुळे या गावास पर्यटनाचा “c” दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे येथील असलेल्या या वास्तूची लवकरात लवकर डागडुजी होणे आवश्यक आहे. या गावापासून काहीच अंतरावर राणी अहिल्यादेवी होळकर यांनी एक बारव बांधलेली आहे तिला स्थानिक लोक “जोगेश्वरी बारव” म्हणून ओळखतात.
अहिल्यादेवीनी बिरोबाची मंदिरे निर्माण केली हे सहसा पाहवयास मिळत नाही मात्र खडकी गाव हे त्याला अपवाद आहे. येथील बिरोबाचे मंदिर पूर्ण दगडी तोडीमध्ये आहे. तसेच येथील अमृतेश्वर महादेव मंदिर हे साधे सुधे पण त्या समोरील मेघडंबरीमधील नंदी व त्यावरील नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. हा नंदी महादेव मंदिरातील नंदीच्या तुलनेने लहान आहे मात्र तो मेघडंबरी मध्ये असल्यामुळे त्याची शोभा वाढताना दिसते. हे मंदिर समाधी शेजारी आहे. या गावातील सर्व मंदिराचा निर्माण अहिल्यादेवी यांनी केला आहे असे स्थानिक लोक सांगतात.
मंचरहुन काही अंतरावर असलेले नारायणगावातील भट कुटूंब खडकीच्या वाघमारे-पाटील यांचे दिवाण होते. त्यांना वाघमारे-पाटील यांच्या उत्पन्नचा हिसाब किताब ठेवायचा अधिकार होता. ते कुटूंब सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. त्यांच्याकडे असलेल्या काही कागदपत्रा वरून हे समजते कि, वाघमारे कुटूंब हे जेजुरीवरून येथे स्थायिक झाले व बाबुराव वाघमारे हे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या काळात होळकरशाहीचे प्रमुख सरदार होते, त्यांना सांवेर (मध्यप्रदेश) या परगणाची जहागीरी दिली होती.
अवचितराव वाघमारे-पाटील हे उदाबाईचे दत्तक पुत्र असून त्यांनी बाबुराव वाघमारे, उदाबाई वाघमारे व त्यांची सवत या तिघांची संयुक्त समाधी निर्माण केली व समाधी निर्मतीवेळी तेथील नदीघाटाचा जीर्णोद्धार हि केला त्यामुळे एकाच आशेयाचा शिलालेख समाधी व नदीघाटावरील द्वारावर आढळतो.
पुण्यावरून येण्याचा मार्ग : पुणे – राजगुरुनगर – मंचर – पिंपळगाव(महाळूगे) – खडकी.
ऐतिहासिक संदर्भ :
इंदोर स्टेट गॅझियट भाग – १
आभार :
दैनिक भास्कर(शिलालेख मजकूर), Amit Khatu
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
[email protected]
- राणी अहिल्यादेवी होळकर यांचा मुरूम येथील शिलालेख - November 8, 2022
- इंदोरमधील होळकरांची समाधीस्थळे – छत्री मंदिरे - April 5, 2022
- अहिल्यादेवी होळकर कालीन डाक व्यवस्था - December 31, 2021
Pingback: किल्ले वाफगाव - महाराज यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ | Ahilyabai Holkar