गडकिल्ल्यांचे प्रामुख्याने तीन मुख्य प्रकार आढळतात. ते म्हणजे, १.गिरिदुर्ग किंवा गडकोट, २.जलदुर्ग व ३.भुईकोट किंवा भुदुर्ग आणि वनदुर्ग, गव्हरदुर्ग, कर्दमदुर्ग, मेढेकोट, जोडकिल्ले हे इतर प्रकारचे किल्ले होय. माहिती वाचण्यासाठी खालील चित्रांवर Click करा.
- गिरीदुर्ग किंवा गडकोट : उंच डोंगररांगा मध्ये एखाद्या डोंगराच्या, पर्वताच्या शिखरावर, माथ्यावर बांधलेला गड म्हणजे गिरिदुर्ग होय. उदा- रायगड, राजगड, लळींग इ.
- भुईकोट किंवा भुदुर्ग : नावाप्रमाणेच सपाट जमिनीवर, मोकळ्या जागेत, तटबंदी, खंदक यांनी वेढलेला गड/किल्ला भुईकोट/भुदुर्ग या प्रकारात मोडतो. उदा- वाफगाव, चाकण ,परांडा, नळदुर्ग इ.
- जलदुर्ग : पूर्णपणे अथवा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेल्या खडकावर, बेटावर, समुद्रात पाण्यामध्ये बांधलेला तटबंदीयुक्त किल्ला म्हणजे जलदुर्ग होय. उदा- सिंधुदुर्ग, पदमदुर्ग, कुलाबा, विजयदुर्ग इ.
- वनदुर्ग किंवा वारक्षदुर्ग : घनदाट अरण्याने, झाडीने वेढलेले दुर्गम गड वनदुर्ग या प्रकारात मोडतात. उदा- सिदगड, वासोटा.
- गव्हरदुर्ग किंवा गुहादुर्ग – डोंगरात असलेल्या अनेक गुहांचा वापर करून बांधलेला किल्ला म्हणजे गव्हरदुर्ग होय. उदा- शिवनेरी.
- कर्दमदुर्ग : दलदलीच्या प्रदेशात उभारलेला दुर्ग म्हणजे कर्दमदुर्ग होय. उदा- वसई चा किल्ला, या किल्ल्याच्या बाजूला दलदल आढळते.
- कोष्टदुर्ग किंवा मेढेकोट : लाकडी फळ्या व सोटांच्या मदतीने तटबंदी बनवून उभारलेला किल्ला म्हणजे मेढेकोट होय.
- जोडकिल्ले : एकाच डोंगरावर ,वेगवेगळ्या शिखरावर, जवळपास असलेले गड जोडकिल्ले म्हणून ओळखतात. उदा- पुरंदर – वज्रगड, चंदन-वंदन
आज महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असणारे गडकिल्ले प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. सद्यस्थितीत हे गडकिल्ले पडझड झालेल्या अवस्थेत असले, तरी पूर्वी ते वैभवसंपन्न होते. किल्ला पाहता – पाहता जर अभ्यासला तर त्याचे मर्म मनाचा ठाव घेते, आणि हे गडकिल्ले पाहताना अभ्यासाचा विषय म्हणजे या गडांची दुर्गबांधणीच. गिरिदुर्ग असो, भुईकोट किंवा जलदुर्ग अश्या विविध प्रकारच्या गडांवर असंख्य वेगवेगळ्या कल्पना गडबांधणी करताना अंमळ केल्या गेल्या, तट, बुरूज , माची, फांजी, खंदक, जंग्या, चऱ्या इ. ब-याच दुर्गबांधणीतील गोष्टी गडकिल्ले भटकंती करत असताना अनभिज्ञ असल्याने पाहण्याचे राहून जातात. काही समजतात काही समजत नाहीत. अश्याच गडबांधणी मधील काही ज्ञात-अज्ञात महत्त्वाच्या ठराविक संज्ञांचा थोडक्यात आढावा घेऊया.
- गडाची तटबंदी : कोणत्याही गडाची तटबंदी म्हणजे एकप्रकारे गडाचे चिलखतच. प्रामुख्याने गडाची तटबंदीही त्याच्या भौगोलिक रचनेवर अवलंबून असते, परंतु जास्त करून तटबंदी एकसलग गडमाथ्यावर आपल्याला दिसते. परंतु इथे शिवछत्रपती निर्मित गडाचे एक वैशिष्ट्य सांगावे वाटते की शिवछत्रपती निर्मित गडावर प्रामुख्याने तटबंदी ही पायथ्यापासून अर्ध्या टप्प्यांवर दिसते. तटबंदी प्रामुख्याने विटा, माती, दगड इ. वस्तूंचा वापर करून उभारली जात असे. गडावरील टाक्या खोदताना निघणारा दगड प्रामुख्याने या कामी येत असे. तटाची मजबुती ही गडाच्या संरक्षणाच्या दृष्ट्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट. तोफांचा, नैसर्गिक आपत्तींचा आघात सहन होईल इतपत ती अभेद्य करण्याचा प्रयत्न होई. तटाची उंची, जाडी, रुंदी ही प्रत्येक ठिकाणी गरजेनुसार उभारली जाई. बांधकाम करताना मजबुतीकरता प्रामुख्याने चुन्याचा वापर होई. तटबंदीचा वापर जास्त करून डोंगराच्या कमकुवत बाजूकडे प्रामुख्याने होतो, जिथे नैसर्गिक दुर्गमता आहे तिथे तटबंदीची गरज भासत नसे. उदा, रायगडची तटबंदी.
- फार वर्षांपूर्वी तटबंदी ही लाकडी फळ्या किंवा मातीची असत. जशी जशी प्रगती होत गेली तसतसा पुढे यासाठी दगड व विटांचा वापर सुरु झाला. काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला त्याठिकाणच्या तटातील वेगळेपण ही दिसून येते, जसे की तटासाठी वापरलेल्या दगडातील फरक, तटाची उंची, बांधणी, रचना इ. गरजेनुसार काही तटांची तात्पुरती तर काही ठिकाणी कायमची मजबूत बांधणी केलेली दिसून येते.
- बुरुज : बुरुज म्हणजे मारा-गिरी करण्याची एक मुख्य जागा, टेहळणीसाठी संरक्षण च्या दृष्ट्टीने गडाची महत्त्वाची बाजू. तोफा डागण्यासाठी गडाच्या आसमांतात टेहळणीसाठी बुरुज अतिशय महत्त्वाची जागा. तटबंदी मध्येच बाहेरच्या अंगाला याची वेगळ्या आकारात मजबूत बांधणी केलेली असते. बुरूजाच्या बांधणीतही अनेक वेगवेगळे प्रकार कल्पकतेने राबवल्याचे दिसून येतात, यामध्ये गोलाकार, कोनांचा, पाकळ्यांचा, दुमजली, चिलखती असे विविध प्रकारही आढळून येतात.बुरूज हे गडाचे प्रामुख्याने महत्त्वाचे अंग. बुरूज पडल्यावर अनेक किल्ले शत्रूच्या ताब्यात सहजतेने गेल्याचे अनेक उदाहरण आपल्याला इतिहासात आढळून येतात. काही गडावर बुरुजांची संख्या जास्त असल्यास स्थान, ओळख निश्चिती साठी त्यांना नावे दिलेली आढळतात जसे की देवावरून, बुरूज रचनेवरून, गावावरून उदा: हत्ती बुरुज, फत्ते बुरुज, झुंजार बुरुज, शिरवले बुरुज, वाघजाई बुरुज इ. अनेक गडांवरील नावे उपलब्ध आहेत.
- फांजी : तटबंदीवर भिंतीवरील आतील बाजूस सपाटी करण्यात येत असे त्याला फांजी असे म्हणतात. पहारेकऱ्यांना गस्त घालण्यासाठी याचा उपयोग होत असे. फांजीवर पोचण्यासाठी ठिकठिकाणी तटबंदीवर सोपान बनवलेले असतात. गस्त घालण्यासाठी, पहा-यावेळी सैनिकांना तटबंदी वर पहारा देण्यासाठी, फिरण्यासाठी याचा वापर होत असे. वेगवेगळ्या गडावर याच्या बांधणीत ,लांबी, रुंदी आदी गोष्टींमध्ये विविधता आढळून येते.
- चिलखती बुरुज : हल्ल्याच्या दृष्टिने नाजूक ठिकाणी असे बुरूज असतात. गडाच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे हे याच्या नावातच समजते. संरक्षणाच्या दृष्टीने गडाला घातलेले हे चिलखतच, आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजगडची संजिवनी माची, अद्भूत, अविश्वासनीय, अकल्पनिय असे हे बांधकाम. नेहमीच्या बुरूजाला बाहेरून अजून एका बुरूजाचे संरक्षण म्हणजे चिलखती बुरूज. रायगडावरही असा चिलखती बुरुज आपल्याला पहायला मिळतो. शत्रूच्या हल्ल्यात चिलखती बुरुज तटबंदी ढासळलीच तर आतला बुरुज पूर्ण शाबूत रहावा अशी ही योजना. अतिशय संरक्षणात्मक आणि अप्रतिम अशी ही बांधणी.
- जंग्या किंवा झरोके : किल्ल्याच्या तटाला आतील बाजूकडून बंदुकीचा, बाणांचा मारा शत्रूवर करण्यासाठी छिद्र, भोके असतात त्यांना जंग्या असे म्हणतात, याची दिशा प्रामुख्याने खालच्या बाजूस तिरपी असते, किल्ल्याच्या आतून शत्रूला बंदूक, बाणाने सहज टिपता येईल अशी याची रचना असते. तटाच्या आतूनच शत्रूला न दिसता शत्रूवर मारा करण्यास याचा अगदी योग्य वापर होई. गडावर प्रत्येक ठिकाणी ही रचना आपल्याला आढळून येते. तटबंदी आणि बुरूजांतील विविध प्रकार आजही आपण अनेक किल्ल्यांच्या, वाड्यांच्या तटा-बुरूजावर पाहू शकतो.
- चऱ्या : तटबंदीवर, द्वारावर, बुरूजांवर पाकळ्यासारखे, त्रिकोणी, पंचकोणी आकाराचे दगड बसवलेले असतात त्यांना चऱ्या असे म्हणतात. याच्या आड लपून शत्रूवर माराही करता येतो, तसेच या मुळे किल्ल्याच्या सौंदर्यातही भर पडते. अशी वेगवेगळ्या आकारातील रचना किल्ल्यावर आढळून येते.