सरदार खंडेराव होळकर व राणी अहिल्यादेवी यांच्या पोटी १ डिसेंबर १७४५ रोजी सुभेदार मालेराव यांचा इंदूर जवळील देपालपूर येथील होळकर वाड्यात जन्म झाला. सुभेदार मल्हाररावांनी आपल्या नातवाचे नाव “मालेराव” असे ठेवले. मालेराव हे अत्यंत चंचल स्वभावाचे व खोडकर होते. मालेराव हे होळकरशाहीचे दुसरे सुभेदार होय. त्यांचा शासनकाल १७६६ ते १७६७ असा एक वर्षच राहिला.
परिचय –
- जन्म : १ डिसेंबर १७४५
- जन्म ठिकाण : देपालपूर(मध्यप्रदेश)
- कार्यकाळ : सन १७६६ – सन १७६७
- सुभेदार पद : २३/०९/१७६६
- मृत्यू : ०३/०६/१७६७
- मृत्यू ठिकाण : इंदोर(मध्यप्रदेश)
- संस्थान राजधानी : इंदोर
- पत्नी : मैनाबाई(बहाड घराणे), प्रिताबाई(वाघ घराणे)
- आई : राणी अहिल्यादेवी होळकर
- वडील : सरदार खंडेराव होळकर
- बहीण : मुक्ताबाई होळकर
सुभेदार मालेराव यांचा विवाह ११ व्या वर्षी मैनाबाईशी सन १७५६ ला व दुसरा विवाह हा प्रिताबाईशी(पाराबाई) झाला. प्रिताबाई या होळकरांचे सरदार संताजी वाघ यांच्या कन्या. सन १७६१ च्या पानिपत युद्धात संताजी वाघ धारातीर्थ पडल्यांनंतर होळकरांनी सरदार संताजी वाघ यांना मध्यप्रदेशातील महिद्पुर व महाराष्ट्रातील काठापूरची जहागिरी बहाल केली होती व त्यांची कन्या प्रिताबाई हिचा विवाह सुभेदार मालेराव यांच्याशी लावून देण्यात आला होता.
सुभेदार मालेराव होळकर यांना सुभेदार मल्हारराव होळकर व सुभेदार राणेजी शिंदे यांनी वतने पत्र दिलेले होती. त्याचा उल्लेख पुढील प्रमाणे मिळतो, “मालजी होळकर… सरकार मांडवगड प्रांत माळवा येथील दरोबस्त एकतीस माहलचे कानगोईपणाचे वतन सरकारचे आहे. ते स्वामीनीं कृपाळू होऊन आम्हां उभयतांस वतन करुन.. देऊन वतनपत्रे करुन दिले ते ३१ महालचे कानगोई पणाचे वतन सरकारचे होते ती उभयतास दिली.
२ दोन सनदा उभयांचे नावच्या
२ देशाधिकारी, वर्तमानभवी यास…
तसेच ९ जानेवारी १७५६ रोजी पुणे दरबारकडून मालेरावांच्या नावाने सोनगीर(जि.धुळे) व चांदवडची(जि.नाशिक) सनद दिलेली होती. त्याबद्दलचे पत्रे उपलब्ध आहेत व त्यामधील उल्लेख पुढीलप्रमाणे आहे. “मौजे सोनगीर तालुके कोपाटणे राजश्री मालेराव होळकर यांचे नावें जहागीर देणें बदल हुकुम १ परगणे चांदवडची सरदेशमुखी सनद रा. मल्हारजी होळकर यांसी देणें मंजूर”.
गैरसमज –
सुभेदार मालेराव यांच्या बद्दल इतिहासात खूप गैरसमज पसरवले गेले आहेत. त्यांचा जो चुकीचा इतिहास सांगितला जातो त्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. उलट जे पुरावे उपलब्ध आहेत त्यावरून तर ते महान पराक्रमी योद्धे होते हे दिसून येते. त्यांच्याबद्दल अस चुकीचं सांगितलं जात कि,”होळकराच्या समृद्ध राज्यांचा वारसा असणारे मालेराव लहानपणापासूनच लहरी स्वभावाचे होते. त्यांना वाघ, चित्ते, हत्ती इ. यासारख्या प्राण्यांची आवड होती.
प्राण्याच्या सहवासात राहण्याचा व हत्तीची जलक्रिडा पाहण्याचा त्यांना छंद होता. मालेराव वेडसर व विक्षिप्त स्वभावाचे होते असे. ते ब्राम्हणाला दान देण्यासाठी म्हणून राजवाड्यात बोलवत असे. कपडे, भांडे वगैरे वस्तू दान देतांना त्यात विंचु घालून देऊन ते ब्राम्हणला चावले की मालेरावांना आनंद होईल. यावरून मालेरावांनी निष्पाप ब्राम्हणाला त्रास दिल्याचे सांगितले जाते.
पण प्रत्यक्षात मालेरावांनी आपल्या संपूर्ण जीवनात सामान्य जनतेला किंवा ब्राह्मण लोकांना त्रास दिल्याचे मात्र कुठे तसे पुरावे सापडलेले नाहीत. त्यांच्या बुद्धीमत्तेची, चातुर्याची व हुशारीचे अनेक पुरावे इतिहासात सापडतात. म्हणजे त्यांनी सामान्य जनतेला त्रास विनाकरण दिला नाही. म्हणजेच यावरून स्पष्ट होते की, मालेराव होळकर हे वेडसर नव्हते तर त्यांना जे दुष्टता व दांभिकता यांचा खूप मोठा राग होता. म्हणून त्यांच्या कडून वरील प्रमाणे कार्य झाले असावे. पण असले भंकस कथांचे पुरावे उपलब्ध नाहीत.
मालेराव यांना वाघ, चित्ते, हत्ती इ. प्राण्याची आवड होती याबद्दल शंका नाही. तसेच त्याबद्दल चे पुरावे हि भेटतात मात्र यावरून ते जनतेच्या जीवनाशी खेळत असे हे लिहणे, सांगणे किंवा दाखवणे चुकीचे आहे. नरसंहार प्राण्याची आवड असणे व त्याबरोबर विरुंगळा करणे हे मोठे धाडसाचे काम आहे.
सरस्वती नदीमध्ये ज्याठिकाणी मालेराव होळकर आपल्या हत्तीशी कवायती सराव करायच्या त्याभागाला हत्तीपाळा असे म्हटले जायचे. हे हत्तीपाळा ठिकाण सध्याची हरिराव महाराज यांची समाधी जेथे आहे त्याठिकाणी आहे व हे ठिकाण महाराजा शिवाजीराव होळकर यांच्या राज्यकाळापर्यत अस्तित्वात होते.
सुभेदार होण्या अगोदरचे जीवन –
मालेराव होळकर यांच्यावर अनेक युद्धाच्या वा मोहिमेच्या जबाबदा-या सोपवल्या जात असतं. असेच एकदा मालेराव उत्तरेकडील मोहिमेवर असताना सुभेदार मल्हरराव होळकरांनी पत्र पाठवून कळविले होते ते असे, “पंधरा दिवसानंतर राघोबादादा गोहदकडे जातील तिकडून दक्षिणेत येतील त्यांच्या बरोबर मालेराव बाबासाहेब सुद्धा येतील. श्रीमंत येऊ पावले. तर श्रीमंत मालेराव आणि फौजेची व्यवस्था बघण्यासाठी दक्षिणेत येतील”.
म्हणजेच यावरून असे लक्षात येते की, ज्या माणसांवर युद्ध मोहिमेची जबाबदारी टाकली जाते तो माणूस वेडा कसा असणार? राघोबादादा व पेशवे यांनी तरी असे स्वराज्याचे कार्य मालेरावांसारख्या मुलाकडे दिले. त्याअर्थी भविष्यात मालेराव हे सरदाराची भुमिका चांगल्या प्रकारे निभावून नेहतील यांची त्यांना खात्री होती.
सुभेदार मल्हारराव बुलंदखंडात गुंतले तरी त्यांची माळव्यातील समस्यांवर नजर होतीच. मल्हाररावांकडून मालेरावास पत्रांनी आदेश धाडण्याची अनेक दाखले मिळतात. मौजे सारंगाखेडे परगणे. सूलतानपुरच्या(जि.नंदुरबार) फत्तेसिंग राऊळकर जप्ती उठविण्याचे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी ता. १९ फेब्रुवारी १७६१ पत्र पाठवून कळविले होते.
पत्राचा मजकूर पुढील प्रमाणे असे. “चिरंजीव विजयीभव राजश्री मालवा यांसी प्रती मल्हारजी होळकर आर्शीवाद उपरी मौजे सारंगखेडे प्रगणे सुलतानपूर येथील फतेसिंग राउळ याची स्त्री अमरावतीनें तुझां पसी येउन केसरीसिंग राउळ फतेसिंगाचा भाउ यांजला गावाकडून परांगदा करून राउलकीचे वतन जप्त करविले. त्यांस तेथील जप्ती तूर्त उठवून, देशास आलिया मनास आपले म्हणून मीरखान टोके यांनी सांगितलेवरुन तुम्हास लिहिले असे. तरी मौजेमजकुरचे राउळकीची तुझी जप्ती करविली असेल ते सोडवून देणें. आम्ही देशास आलिया मनास आणून करणें ते केले जाईल. तूर्त केसरीसिंगास आणून त्याचे हातें राउळकीचें कामकाज सुदामत प्रमाणे घेणें”.
या पत्रवरून हे स्पष्ट होते की, सुभेदार मल्हाररावांनी आपला नातु मालेरावावर माळव्याची जबाबदारी सोपवलेली होती. त्यांनी मालेरावावर पूर्ण विश्वासाने माळव्याचा राज्यकारभार सोपविलेला होता. त्यामुळेच मालेरावांनी राऊळ यांच्या विधवा पत्नीस न्याय देण्याच्या विचाराने फत्तेसिंग राऊळकर यांच्या जप्तीचे आदेश दिलेले होते. मालेराव देखील या दृष्टीने समर्थपणे पावले उचलत होते. अहिल्यादेवींच्या मार्गदर्शनाखाली मालेराव होळकर कार्य करीत होते.
दुसऱ्या प्रसंगात, सुभेदार मल्हारराव होळकर यांनी चिरंजीव मालेरावास सैन्यातील सरकार मधील घोडे व उंट यांच्या खर्चासाठी आर्थिक तरतुद कण्यासाठी २५ जानेवारी १७६६ रोजी पत्र पाठवून कळविलेले होते की, सटवाजी गायकवाड याजकडील सरकार पागेची घोडी, उंटे तुझां समागमें आली आहेत.
त्यास रोजमुरा दीडमाही रुपये ५९ तुझांकडून देविले असेत, तरी एकूण साठ रुपये मशरनिल्हेकडील पागेसी देणें आणि पागेकडील घोडी, उंटे, शिंगरें तेथें आली असतील त्यांची हजेरीगणती चौकशी करुन चंदी दररोज देत जाणे. सुभेदार मल्हारराव होळकर हे आपल्या राज्यातील रयतेस त्यांच्या प्रवासाची योग्य प्रकारे काळजी घेणारे होते हे या पत्रावरून स्पष्ट होते.
तिसरा प्रसंग, सुभेदार मल्हारराव होळकरांनी नातू मालेरावास २३ नोव्हेंबर १७६५ रोजी पत्र पाठवून न्याहालकर्ण मंडलोई गंगायात्रेसाठी जात होते त्यांच्या मुक्काची व्यवस्था चांगल्याप्रकारे करण्याचे कळविले होते. ते असे, “राजश्री न्याहालकर्ण मंडलोई कस्बे इंदूर हे श्री गंगा प्रदक्षिणेस यात्रा सुध्दा जात आहेत. त्या समागमें पडताळे सुमारे ५० माणसे असामी ५०० डोली सुमार १० ऐसी जात आहेत. त्यांसे मार्गी कोणेविसे मुजाहिम न होय. रात्री राहतील तेथें चौकी पाहारा देऊन आपलाली हद्दपार करून देणे.“
सुभेदारी पदी नियुक्ती –
सुभेदार मल्हारराव होळकरांच्या पश्चात पेशवे माधवराव यांनी मालेराव होळकरांना परगणे बेरछा, दतिया व भांडेर मधील काही गावे सुभेदारांच्या छत्रीसाठी २जून १७६६ रोजी इनाम सनद बहाल कलेली होती. ती सनद पुढील प्रमाणे होती, “मालजी होळकर यांजकडे छत्रीचे खर्चाकरितां इनाम गांव दिल्याबददल सनद बार आहे. छत्री मौजे मल्हारनगर उर्फ अलंमपूर परगणे बेरछा येथे आहे तेथे सदावर्ताचे वगैरे खर्चाबदल इनाम गांव.
१७५०१ परगणे बेरछा पैकी गांवे ११
७,००० परगणे दतियापैकी गांव ३
३,००० परगणे भांडरपैकी एक गांव १
———–
२७५०१ नूतन इनाम दरोबस्त कुलबाब कुलकानू म्हणोन सनद
सुभेदार मल्हारराव होळकराचे मराठा साम्राज्यविस्तारात फार मोठे योगदान होते. त्यांच्या कार्याच्या पावती म्हणून सुभेदाराची आलमपूर(मध्यप्रदेश) येथील मुख्य समाधी-छत्री बांधण्यासाठी मालेरावास बहाल केले. राणी अहिल्यादेवींच्या नियंत्रणाखाली मालेराव यांनी हे काम पूर्णत्वास नेण्यास सुरुवात केली.
सूभेदार मल्हारराव होळकरानंतर पुणे पेशवे दरबारानें सातारा छत्रपतींच्या संमतीने २३-९-१७६६ रोजी मालेरावास सरंजाम व वस्त्रांची सनद देण्यात आली. त्या काळात असलेल्या अनेक वयस्क व अनूभवी मंडळीना मालेरावा होळकरांच्या योग्याता विषयी माहिती होती. म्हणूनच तर त्यांच्या विरूद्ध कोणीही लिहिलेले आढळत नाही.
मृत्यू –
सुभेदार मालेराव होळकर यांच्या मृत्यूचा ठोस पुरवा उपलब्ध नाही. त्यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे कोणीही ठाम पणे सांगू शकत नाही. तरी पण प्रत्येक जण आप-आपल्या परीने कथा रंगवुन मालेराव यांच्या मृत्यू कसा झाला हे सांगत असतो. त्यांच्या मृत्यूबद्दल ठोस सांगायचे म्हटले तर सन ३ जून १७६७ ला इंदोर येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची मुख्य समाधी इंदोर येथील जुन्या छत्रीबाग समाधी स्थळे समूहात आहे.
राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नियंत्रणाखाली या समाधीचे बांधकाम झाले होते. सुभेदार मालेराव यांच्या मृत्यूनंतर त्याच वर्षी सन १७६७ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांनी होळकर संस्थानची राजधानी महेश्वर घोषित केली व त्या कायम स्वरूपी महेश्वर येथे वास्तव्यास आल्या. त्यांनतर त्या फक्त आयुष्यात एकदाच इंदोर गेल्या होत्या त्यापण या समाधींचे दर्शन घेण्यासाठी.
सुभेदार मालेराव यांच्या मृत्युविषयी वेगवेगळ्या दंतकथा सांगितल्या जातात. कोणी म्हणतं त्यांना भूत लागलं होत, तर कोणी म्हणत त्यांच्याच सेन्यातील लोकांनी त्यांना विष देऊन मारलं होत, तर कोणी म्हणतं त्यांना राणी अहिल्यादेवी यांनी हत्तीच्या पायदळी दिल होत. मात्र या वाक्याला कोणताही भक्कम पुरावा उपलब्ध नाहीं. महेश्वर किल्ल्यावरील हत्तीच्या पायदळी व्यक्तीला दिलेले एक शिल्प आहे. ते शिल्प तेथील so called गाईड लोकांना दाखवतात व सांगतात कि हे शिल्प तो प्रसंग व्यतित करते.
मात्र सर्वप्रथम ते शिल्प सरदार विठोजी होळकर यांच्या समाधी-छत्रीवरील आहे. हि समाधीच राणी अहिल्यादेवींच्या नंतर बांधण्यात आली व ते शिल्प सरदार विठोजीच्या हत्येचा प्रसंग व्यतीत करते. सन १८०२ ला पुण्यामध्ये पेशव्यांनी विठोजींची हत्तीच्या पायदळी देऊन हत्या केली होती. या प्रसंगाचे लिखित पुरावे हे उपलब्ध आहेत व ते शिल्प हे च दर्शवत आहे. सुभेदार मालेराव यांच्या मृत्यूविषय सर्वात प्रथम अंदाज बांधला तो म्हणजे ब्रिटिश अधिकारी व इतिहासकार जॉन माल्कन.
ब्रिटीश इतिहासकार जॉन माल्कन यांचे मत बहुतेक लोकांना योग्य वाटते. ते म्हणजे, महेश्वर येथील जरी काम करणारा एक कारागीर नेहमी काहीना काही कामानिमीत्य राजवाडयात येत असे. सुभेदार मालेरावांची एक दासी थोड्या चंचल स्वभावाची असल्यामुळे मालेराव तिच्यावर नेहमी पाळत ठेवत असतं. एक दोन वेळेस ती दासी कारागिराला चोरून बोलत असल्याचे मालेरावाच्या लक्षात आले. त्यांच्या त्यावरचा संशय अधिकच बळावला.
एका दिवशी कारागीर चोरून दासीच्या महालाकडे जात असल्याचे मालेराव जेव्हा पहातात. तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. याच रागाच्या भरात कारागीर मालेरावाच्या हातून मारला जातो. यात देवी अहिल्याबाई निःपक्षपातीपणा चौकशी सुरू केली असं जॉन माल्कन म्हणतात. राणी अहिल्यादेवींना चौकशी अंती अस लक्षात आले की, दासीचा व कारागिरांचा जरी कामानिमित्या नेहमी संबंध येत होता. त्यात चरित्र्यावर संशय घेण्यासारख काहीच नव्हतें.
आपल्या हातून एका निष्पाप माणसाचा खून झाला. या घटनेचा मालेरावांच्या हळव्या मनावर फार मोठा आघात झाला. याच मानसिक धक्क्याने मालेरावांना वेड लागले. अहिल्याबाईंचा दान धर्मावर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी दानधर्म पुष्कळ केले. काहीच फरक पडला नाही. उलट त्यांचे जास्तच हाल होऊ लागले. अहिल्याबाईचा जीव बेचैन झाला. त्यांना आधार देण्यासाठी मल्हाररावही नव्हते. त्या बिछाण्यावर पडून रात्रदिवस चिंता करत असतं. शेवटी मालेरावांचे खूपच हाल हाल होऊ लागले.
सन १० मार्च १७६७ रोजी इंदोर येथे सुभेदार मालेराव होळकर यांचा मृत्यू झाला. त्यावेळेस त्यांचे २१ वय वर्ष पूर्ण होते व त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी मैनाबाई व प्रिताबाई या सती गेल्या. राणी अहिल्यादेवींच्या या गोष्टीला विरोध होता मात्र त्याचे व्याही घराणी खूप कडक असल्याकारणांमुळे त्या काहीही करू शकल्या नाहीत. होळकरशाहीचे दुसरे सुभेदार श्रीमंत मालेराव होळकर हे निपुत्रिक वारले.