मेंढ्यांची लोकर कातरणी हि वर्षातुन दोनदा किंवा तिनदा केली जाते, खरं तर मेंढीची कात्रण केल्यानंतर लोकरीची पुर्ण वाढ होण्यासाठी सहा महीने लागतात. काही ठिकाणी कात्रण मशीन द्वारे केली जाते तर काही ठिकाणी पारंपारीक पद्धतीने लोखंडी कात्रीने केली जाते. पण पूर्वी सर्व ठिकाणी पारंपारीक पद्धतीने लोखंडी कात्रीने मेंढ्यांची कात्रण केली जात असे.
पूर्वीच्या काळी कात्रण हि इर्जीक(वारंगुळा) पद्धतीने केली जात असे. काही ठिकाणी हे चित्र आजही नजरेस पडत आहे. इर्जीक म्हणजे जर पाच मेंढपाळ असतील तर सर्वानी मिळून आज एकाच्या मेंढ्यांची कात्रण करायची, काही दिवसांनी दुसऱ्या मेंढपाळांच्या मेंढयांची कात्रण करायची, असे करून ग्रुपमधील सर्व मेंढपाळांच्या मेंढ्याची कात्रण केली जात असे. कात्रणीसाठी येणार खर्च व हे जिकरीचे काम असल्यामुळे असे केले जात असे.
ज्या मेंढपाळांच्या येथे इर्जीक असायची तेथे सर्व पाहुण्यांसाठी गोड-धोड जेवायचे पदार्थ केले जायचे. कात्रण झाले कि सर्वजण गप्पाटप्पा करत जेवणाचा आस्वाद घेत असत. पण आता काळ बदला भरपूर लोक मेंढपाळ व्यवसायातून बाहेर झाले. त्यामुळे या कात्रींचे कारागीरही जवळपास नामशेषच झालेत म्हणून सध्या मेंढ्या कातरणीसाठी लागणाऱ्या कारागीरांचा तुटवडा भासतो तसेच पारंपारीक पद्धतीनं एका मेंढीची कातरणी करण्यासाठी अर्धा ते एक तासापर्यंत वेळ जातो तर यांत्रीक मशीनद्वारे एका मेंढीची लोकर तिन ते पाच मिनीटात कापली जाते.
त्यामुळे आता मेंढ्या कातरणीसाठी यांत्रिक मशीनचा वापर सरास होतो. जो तो मेंढपाळ स्वता मेंढ्याची कात्रण करतोय. पूर्वीची इर्जीक पद्धतीने केली जाणारी कात्रण तर बंदच झाली आहे. कात्रणीनंतर शक्यतो लोकर फेकुनच दिली जाते कारण घोंगडी बनवण्यासाठी जर लोकर कात्रण करणार असाल तर त्यासाठी लागणारे व्यवस्थापन, मेहनत आणि महत्वाचे म्हणजॆ कमी बाजारभाव. आम्हालाही जेव्हा घोंगडीसाठी लोकर गोळा करावी लागते तेव्हा मेंढपाळ बांधवाना काही तरी आमिष दाखवावे लागते तेव्हा आम्हाला लोकर व्यवस्थित मिळत आहे.
आम्ही त्यांना योग्य अमिश दाखवत आहे कारण आम्ही त्यांच्यातीलच एक आहोत म्हणून. पण असे किती दिवस चालणार? आता गरज आहे ती शासनाच्या पुढाकाराची..! कात्रीचे कारागीर कमी असल्यामुळे आधुनीक पद्धतीने लोकर कात्रण करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं लोकर कापणी मशीन खरेदीसाठी ७५% सबसीडी दिली पाहिजे. लोकरीपासून जेवढ्याही गोष्टी बनत आहेत त्यासाठी परदेशी बाजार पेठ खुली केली पाहिजे. जर परदेशी बाजारात विक्री होऊ लागली तर स्वाभाविकच लोकरीला चांगला भाव भेटेल.
सर्वात चिंतेचा विषय म्हणजे, मेंढपाळ व्यवसाय दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. उद्या हा व्यवसायच बंद झाला तर त्यापासून मिळणारे सर्व उत्पादने नाहीशी होतील. भविष्यात हातमागावरील Original घोंगडीची जागा मशीनवरील Duplicate घोंगडीने घेतली तर वावगे वाटायला नको किंवा काही मोठ्या प्रमाणात ती जागा घेतली पण आहे. मेंढपाळ व्यवसायाला चालना मिळावी म्हणून शासनाने ठोस निर्णय घेतले पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात जे दुर्मिळ आहे ते अधिकच दुर्मिळ होईल हे नक्की.