आज्जी-आई च्या मायेची ऊब म्हणजे गोधडी
जगातली सगळी पांघरुणे एकीकडे आणि धुवून, वापरून मऊ – जुन्या झालेल्या साड्यांची शिवलेली गोधडी एकीकडे. बाहेर झिम्माड पाऊस बरसायला लागतो. घरातल्या भिंतींमधून ओला गारवा वाहू लागतो. गारठलेल्या शरीराला ऊब द्यायला चादरी, ब्लैकेट भराभर बाहेर निघतात.
पण, मनाला ऊब द्यायची ताकद जिच्यात गवसते, ती गोधडी लांब मोठी सुई, जाडसर दोरा वापरून जुनी चादर किंवा कांबळं किंवा तत्सम काही वापरून त्याला बाजूने नऊवारी, पाचवारी साडी किंवा सफेद धोतर जोडून गोधडी शिवणे ही वरकरणी सोपी वाटणारी पण कठीण वीणकाम कलाच!
‘गुथना’ या हिंदी क्रियापदातून ‘गुदडी’ हे हिंदी आणि त्यातून ‘गोधडी’ हे मराठी रूप जन्माला आले. उरलेल्या, जुन्यापान्या वस्त्रांच्या चिंध्यांतून विणलेले वस्त्र या व्याख्येपलीकडे गोधडी उरून राहते. काटकसरीनं राहणाऱ्या तळागाळातील किंवा मध्यमवर्गीय वर्गाच विणलेलं सुबक वस्त्रांकित रुप म्हणजे गोधडी.
‘रिसायकलिंग’ हा शब्द आता आला, पण जुन्या जाणत्या आयाबायांना हे गुपित गोधडीतून खूप आधीच उलगडलं होतं. दुपारच्या वेळी रिकाम्या हातांना द्यायचं काम एवढंच गोधडीचं अस्तित्व नाही. अंगावर ल्यालेली वस्त्रं गोधडीतून अजरामर करण्याची ती अनोखी कला आहे.
बालवयात दुपटं आणि या दुपट्यातून गोधडी असा आपला प्रवास होतो. गोधडीसाठी वापरलेल्या वस्त्रांना मायेच्या आठवणींच्या किती विविध छटा! डॉ. कैलास दौंड या आठवणींची गोधडी कवितेतून विणतात.
गोधडी नसतो चिंध्यांचा बोचका, गोधडीला असते अस्तर
बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे
गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटीवाटीनआईनं दटावून बसवलेल्या.
चिंध्यांना दटावून बसवणं ही गोधडी विणकामातील महत्वाची गोष्ट. केवळ चिंध्या शिवणं इतकाच व्यवहार त्यात नाही; तर प्रत्येक चिंधीला, जुनेऱ्याला त्याची जागा मिळवून देणं, रंगसंगती, विण असा सगळा मामला यात गुंतलेला आहे.
साडीची मधोमध घडी घालणं, साडीचे दोन पदर धावदोरा घालून एकमेकांना शिवून टाकणं, चारी बाजूंनी घातलेला धावदोरा मध्ये मध्ये उलटी टीप, चारी बाजूला टीप घातल्यावर मग शिवलेला आतला भाग; असा भरगच्च कार्यक्रम एका गोधडीच्या विणीत लपलेला असतो. गोधडी शिवणारी तिच्या कसबानुसार, वेळेनुसार हे सगळं करत बसली तरी एक उबदार गोधडी विणण्यासाठी दहा दिवसांचा काळ लागतोच.
भारतातील प्रत्येक प्रांतात गोधडी शिवण्याची आपली आपली पद्धत आहे. पश्चिम बंगालमध्ये ‘कांथा वर्क’ नक्षी गोधडीसाठी वापरली जाते. या गोधडीवर नक्षीच्या माध्यमातून एक कथा सांगितलेली असते. कच्छमध्ये हीच गोधडी ‘धडकी’ होते. कच्छच्या रणातील हाडं गोठवणाऱ्या थंडीला ही धडकी सुसह्य करते. धडकी ही केवळ गारठ्यातील सोय नाही तर परंपरा आहे.
लग्नाच्या आंदणात लेकीला माय थड़की बनवून देते. आईच्या विणकामावरून लेकीच्या विणकाम कौशल्यास पारखण्याची संधी सासरच्यांना मिळते. त्याहीपलीकडे परक्या माणसांत, परक्या घरात ही आईने शिवलेली धडकी मायेची ऊब देत असणार हे नक्कीच.
झारखंडची लेद्रा गोधडी सोहरी आणि खोवर या चित्रप्रकारातून प्रेरणा घेऊन बनवली जाते. बिहारची ‘सुजनी’ तर स्त्रियांच्या दैनंदिन कामांची गाथाच गोधडीतून समोर उलगडते. कर्नाटकात ही गोधडी कौड़ी म्हणून ओळखली जाते. अनेगुंडी भाग या कौडीसाठी प्रसिद्ध आहे. भारतातील इतर भागांप्रमाणेच इथेही एकच एक स्त्री किंवा आजूबाजूच्या स्त्रिया एकत्र जमून छंद म्हणून या गोधड्या शिवतात.
आंध्र प्रदेशातील सिटी जमात गोधड्या शिवण्यात वाकबगार मानली जाते. या जमातीच्या मान्यतेनुसार जेवढी मोठी गोधडी तितके घरदार समृद्ध. त्यामुळे मोठमोठ्या गोधड्या विणण्याची इथल्या घरादारी जणू स्पर्धाच असते. गोव्यात लहान बाळांच्या दुपट्यांना ‘मानेस’ म्हणतात. मुलगी वयात आली की ही कला तिला आई, आजीकडून शिकावी लागते.
महाराष्ट्रात पण गोधडीच्या संदर्भात अशी रीत आहे. “गोधडी शिवून सोयरा गुंतवणे”. नवीन लग्न झाले कि सासू ने गोधडी शिवून जावायला भेट दिली जाते. यामधील उद्देश एकच कि जसे अनेक तुकडे एकत्र येऊन एक उबदार गोधडी बनते त्याचप्रमाणे अनेक नवीन नाती एकत्र येऊन त्यांच्यामध्ये उबदार व जिव्हाळ्याचे नातं तयार व्हावं.
साधारण ३५०० वर्षांपासून जगभरात गोधड्या बनवल्या जात आहेत. इंग्रजीत गोधडीसाठी ‘क्विल्ट'(Quilt) असा शब्द आहे. जुन्या फ्रेंचमधील ‘कल्सिता’ या गादीसाठी असलेल्या शब्दात या क्विल्टचा उगम दडलेला आहे. बहुतांश देशांत गरज म्हणून गोधड्या शिवल्या गेल्या, पण पश्चिम आफ्रिकेतील गोधड्यांना एक वेगळा संदर्भही आहे.
गुलामगिरीतून स्वतंत्र होण्यासाठी झालेल्या चळवळीत चक्क या गोधड्यांनी गुप्त संदेश देवाणघेवाणीचं काम केलं. या गोधड्यांवरील विणकामात चिन्हांसह संदेश गुंफलेला असे. त्यातून एकमेकांशी संदेशन होई, उबदार गोधडीचा हा अगदी वेगळा पैलू,
गोधडीसाठीच रजई, वाकळ असा शब्दप्रयोगही केला जातो. वर्गवारी करायची झाली, तर रजई म्हणजे गोधडीचं अधिक श्रीमंती रुप. गोधडी उरल्यासुरल्या कपड्यातून होते, तर रजई खास दर्जेदार, रंगसंगतीचा विचार केलेल्या कापडापासून बनते. वाकळ म्हणजे गोधडीचं थोडं गरीब रूप. प्राचीन काळापासून वाकळ या वस्त्राचा उल्लेख आढळतो.
‘घरी मोडकिया बाजा वरी वाकळांच्या शेजा।’
अभंगातील हा संदर्भ काटकसर दाखवणारा ठरावा.
गोधडीशी साधर्म्य दाखवणारी पासोडी आज नामशेष झाली आहे. पासोडी बनवण्यासाठी खादी वस्त्राच्या दोन किंवा चार पट्ट्या एकत्र शिवल्या जात. अभिजनांची रजई किंवा दुलई, तर सामान्यांची गोधडी किंवा पासोडी. पांघरायच्या पासोडीला ‘वळकटी’ म्हटले जाई. काळाच्या ओघात पासोडी नाहीशी झाली. पण, स्वतःत व्यावसायिक बदल करत गोधडी टिकलीच नाही तर पार सातासमुद्रापार गेली.
या प्रवासात संत गाडगेबाबांच्या खांद्यावरच्या गोधडीला विस्मरून चालणार नाही. जनशिक्षणाची, समाजसुधारणेची वीण जपणारी ही गोधडी गाडगेबाबांची ओळख बनली होती. त्यामुळे त्यांना ‘गोधडेबाबा’ असंही संबोधलं जाई. महाराष्ट्रात गुदड़ी वा गोधडी पांघरणारा साधू किंवा फकीर म्हणजे गोसाव्यांचा एक पंथ असून त्यांना ‘गोदड’ म्हटले जाते.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहराचे ग्रामदैवत आज श्री संत गोदड महाराज आहेत. महाराजांचे गुरु संत नारायण महाराजांनी आपल्या शिष्याला गोधडी दिली होती. त्यामुळं आजही महाराजांच्या समाधीला रात्री गोधडी लपेटली जाते. या पार्श्वभूमीवर अनेक भाविक भक्तीभावाने महाराजांना गोधडी अर्पण करतात.
पूर्वापारपासून गोधडी हे केवळ वस्त्र नाही तर ती भावना आहे. तासन तास मान मोडून शिवणकाम करत जुनेऱ्या वस्त्राला नवसंजीवनी देणाऱ्या आई-आजीच्या उबदार कुशीची भावना, नवीन वस्त्रांची आस बाळगत असताना जुनं काही आनंदाने जपण्याची भावना, ज्याच्या किंवा जिच्या कपड्यातून ती गोधडी आकाराला येतेय ती व्यक्ती प्रत्यक्षात असो वा नसो, त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची भावना !
म्हणूनच कुणा अनाम कवीला व्यक्त होताना म्हणावंसं वाटतं,
जाड सुईतून गुंफतेस धागा जुन्या लुगड्याशी,
धोतराशी गोधडीतून बांधत जातेस नाते मायेचे पिढ्यापिढ्यांशी.


