Skip to content
Home » पट्टण कोडोलीची विठ्ठल-बिरदेव यात्रा

पट्टण कोडोलीची विठ्ठल-बिरदेव यात्रा

आपले मेंढपाळ बांधव वर्षनुवर्षं डोंगर खोऱ्यात मेंढ्या राखत असतात. या मेंढ्या राखताना त्यांचे व त्यांच्या मेंढ्यांचे वाईट अदृश्य शक्ती पासून संरक्षण व्हावे म्हणून ते बिरोबा देवाला पूजतात. बिरोबा म्हणजे शिवाचा अवतार. या बिरोबा देवाची भारतभरात एकूण मुख्य १२ ठाणी आहेत, त्यातील ६ महाराष्ट्र आहेत आणि या सहा पैकी एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण-कोडोलीचा(ता,हतकणंगले) विठ्ठल-बिरदेव.

पट्टण कोडोलीच्या विठ्ठल-बिरदेव यात्रे बद्दल थोडक्यात सांगायचे म्हटले तर, हि यात्रा म्हणजे अहिंसेचा संदेश देणारी यात्रा. महाराष्ट्रातील धनगर समाज हा मुख्यत्वेकरुन मांसाहारी आहे पण या समाजाची सर्वात मोठी यात्रा जेथे भरते तो देव मात्र पुर्णपणे शाकाहारी आणी अहिंसेचा प्रचार करणारा आहे, तो देव म्हणजे पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल-बिरदेव.

विठ्ठल तर पंढरपूरचाच आहे आणी बिरदेव शिवांचा अवतार आहे. हे दोघे हरि-हर धनगर समजाबरोबर बारा बलुतेदार समाजाला पूज्य आहेत, साधारणतः महाराष्ट्रातल्या लोकदैवतांच्या जत्रा म्हणजे त्यात मांसाहार ठरलेला असतोच पण या यात्रेत मात्र धनगर समाजाचे वर्चस्व असूनही मांसाहार पुर्णपणे वर्ज्य आहे. हे विठ्ठल बिरदेव दोघे बंधू हुक्केरी परिसरात गेले असता तिथे हेगडी भक्तांनी दोघांना दूध अर्पण केले, त्याच वेळी काही धनगर ही दर्शनाला आले, त्यांच्यापैकी एकाच्या हातात शिकार केलेला मृत ससा होता, त्यामुळे श्री विठ्ठल बिरदेवांनी त्यांना दूर राहण्यास सांगीतले आणि त्यांना अहिंसेचा उपदेश दिला व निष्पाप प्राण्यांची कत्तल करण्यापासून परावृत्त केले व त्यांच्या या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून यात्रेतील पालखीचे दर्शन लांबूनच घेण्यास सांगीतले; ती आज्ञा आजही भक्त पाळतात व मांसाहारी लोक पालखीचे दर्शन लांबूनच घेतात.

दसरा झाल्यानंतर भोम पौर्णिमेला या देवाची यात्रा भरते. कलीयुगामध्ये चालत आलेली, नावाजलेली हेडम नृत्यची परंपरा श्री क्षेत्र पट्टण कोडोली येथील जग जाहीर आहे. येथील मंदिर ऐतिहासिक आहे. पूर्वीच्या काळी श्री.विठ्ठल-बिरदेव या देवाचे भक्त खेलोबा हे सोलापूर जिल्हयातील अंजन गाव(ता.माढा) वरून चालत येत होते. आजही या यात्रेचा मुख्य मान हा त्यांच्या घराण्याला आहे. सलग ११ दिवस पायी प्रवास करत भक्त खेलोबा यांचे वंशज अंजनगावाहून पट्टणकोडोलीच्या यात्रेत केल्या जाणाऱ्या भाकणुकीसाठी तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांसाठी येतात. सध्या या यात्रेतील महत्त्वाच्या धार्मिक विधिंचा मान श्री.नानादेव महाराज वाघमोडे उर्फ फरांडे बाबा यांना आहे.

महत्त्वाचे –
१. हेडम नुर्त्य – ढोल-कैताळाच्या निनादात फरांडे बाबा काचेचं पाणी दिलेलं जोड-हत्यार पोटावर मारून घेतात. पण वैशिष्ट्य असं कि, पोटावर हत्यार मारल्यानंतर साधा केसही तुटत नाही. भंडाऱ्याची या नुर्त्यवेळेस मोठयाप्रमाणात उधळण केली जाते.
२. भाकणूक – म्हणजे पुढील वर्षाची भविष्यवाणी करणे. यामध्ये पेरा, पर्जन्य, भक्ती, रोगराई, राजकारण, धारण, भूमाता, बळीराजा, महासत्ता, सीमावाद, हितसंबंध, कांबळा आदी बद्दल भविष्यवाणी केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!