ब्लॉगचे टायटल वाचून तुम्हाला समजलेच असेल कि हा ब्लॉग कशावर असणार! आजही सर्वत्र प्रचलित आहे कि, रानावनात फिरणाऱ्या मेंढक्याला पाऊसाचा, गारांचा, दिवस-रात्रीच्या वेळेचा, किंवा एखाद्या आपत्तीचा अंदाज असतो. असा अंदाज, जो एखाद्या खगोल शास्त्रज्ञाला किंवा हवामान शास्त्राला हि नसेल. पण हे अंदाज मेंढक्याला त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींमुळे असतात. हा अभ्यास कुठल्याच शाळेत शिकविले जात नाही किंवा कुठे हि लिहून ठेवले नाहीत. पिढ्यांपिढ्या हे मेंढपाळ धनगर बांधवाना विरासत मध्ये मिळत आलं आहे. मेंढका म्हणजे जो मेंढ्या राखतो त्याला म्हणतात.

सुरुवातीला आपण मेंढक्याला पाऊसाचा अंदाज कसा येतो हे पाहू. हा अंदाज इतका व्यवस्थित असतो कि त्यापुढे हवामान खात हि फिकं पडेल, असं सांगितलं तरी काही वावगं ठरणार नाही. पण मेंढक्याच्या या अंदाजमध्ये सर्वात महत्वाची भूमिका असते ती त्याच्या मेंढ्यांची. कारण रानात हिंडायला(चरायला) सोडलेल्या मेंढ्या ज्या दिवशी न हिंडता जर एकमेकांच्या डोक्याला डोकं लावून घोळका करून उभ्या राहील्या तर समजावे त्या दिवशी मुसळधार पाऊस नक्कीच येणार. मेंढ्याच्या अशा कृतीला “मेंढर वांगारली” किंवा “मेंढरांनी घोंगाण घातलं” असं म्हटलं जात.

त्यानंतर सतत पाऊस सुरु झाला कि मेंढ्या एका ठिकाणी वागरात(जाळी) कोंडल्या जातात. त्याला “मेंढरांचा वाडा” असं म्हणतात. दोन-तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असेल व मेंढ्या तेव्हापासून वाड्याच्या बाहेर सोडल्या नसतील व त्यानंतर एकदम सर्वच्या सर्व ओरडत असतील तेव्हा समजले जाते की पाऊसाची सततधार कमी होणार किंवा पाऊस पडणे बंद होणार.

हा शोध हजारो वर्षापूर्वी मेंढ्या राखणाऱ्या धनगरांनी लावला आहे. आजच्या आधुनिक आणि डिजिटल जगात वेधशाळेचा पावसा विषयीचा अंदाज चुकेल पण मेंढक्याचा आणि त्यांच्या मेंढ्यांचा पावसाची पूर्वसूचना देणारा अंदाज कधीच खोटा ठरणार नाही. उभं आयुष्य रानावनात-निसर्गच्या सानिध्यात घालवलेल्या मेंढपाळ धनगरांना वातावरणाचे ज्ञान असत.

पूर्वी पाऊसा संबंधित मेंढपाळा धनगर बांधवांसंबंधित अजून एक अशी प्रचिती आहे कि धनगर वाडा रानात वनात जिकडे असेल त्या भागात गारांचा पाऊस पडत नाही. गारांचा पाऊस दुसरीकडे वळवण्याची विद्या पुर्वी मेंढपाळ धनगरांकडे होती, आज आहे की नाही माहित नाही. पण आज हि माहित मौखिक आहे व हे कसं शक्य होत तर, गारा पडल्यानंतर पूर्वी मोठ्या प्रमाणत मेंढ्या मृत्युमुखी पडत किंवा जखमी होत. असे नुकसान होऊ नये म्हणून मेंढपाळ धनगर हे काही वनस्पती पेटवत असे. त्यातून जो धूर होत असे तो ढगात गेला कि हि आपत्ती टळत असे, अशी माहिती मिळते.

असा आपल्या पारंपरिक विद्येपासून समृद्ध असलेल्या धनगर समाजात अजून बरेच शोध असतील पण त्याला विस्तृत असे लिखित स्वरूप नाही. थोडीफार या संदर्भात माहिती आपल्याला लेखक दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे “प्राचीन भारत की संस्कृती और सभ्यता” या पुस्तकात वाचायाला मिळते. यानंतर दिवस-रात्रीच्या वेळेचा, किंवा एखाद्या आपत्तीचा अंदाज मेंढपाळाला कसा असतो.

ऊन (सुर्य उगवल्यावर) पडलं की हाताची मुठीत करायची जमिनीवर हात ठेवून त्याची सावली मोजायची अन मग ठरवलं जात १०वाजलं, ११वाजलं. अशा प्रकारे मेंढपाळ दिवसा वेळ ठरवतो तर रात्री आकाशातील तारका वरून रात्रीची वेळ ठरवतो. आणि एखाद्या आपत्ती बद्दल मेंढपाळा त्याच्या जोडीला असणाऱ्या श्वानाच्या(कुत्र्यांच्या) ओरडण्यामुळे समजते. असं निसर्गाच्या संकेतचा अनुभव घेऊन जुनी मेंढपाळ धनगर बांधव अख्ख आयुष्य जगली.

या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर, मुंबई-पुणे ला जोडणाऱ्या लोणावळा-खंडाळा घाटाचा(बोरघाट), अंबोली घाटाचा शोध हि मेंढपाळ धनगरांनीच लावला व हा शोध लावण्यात सर्वात मोठी मदत होती ती मेंढ्यांची. मेंढ्यांनी डोगरदऱ्यातून जो मार्ग काढला तोच मार्ग कायमस्वरूपी झाला व त्यानंतर शिंग्रोबा धनगर यांने इंग्रजांना तो मार्ग दाखवला व त्यांनी शिंग्रोबा धनगर यांची गोळी मारून हत्या केली. हत्या का केली याबद्दल आपण नवीन ब्लॉग मध्ये सविस्तर माहिती पाहूच. आजही लोणावळा-खंडाळा घाटातून मेंढपाळ स्वतंत्र मार्गाने ये-जा करतात. तुरतास एकच सांगतो, गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परीस मेंढर बरी!
आभार : धुळदेव कोळेकर(सांगली)