पश्चिम महाराष्ट्रातील माण, खटाव, आटपाडी, सांगोला, जत तालुक्याचा दुष्काळी प्रदेश माणदेश म्हणून ओळखला जातो. घोंगडी हे माणदेशाचं एक भूषण तर आहेत मात्र पिकामंध्ये जोंधळा म्हणजेच ज्वारीचं पिक भूषण आहे. प्रा.लक्ष्मण हाके सर यांची हि थोडक्यात पोस्ट नक्की वाचा.
जोंधळा म्हणजे माणदेशचं भूषण, दुष्काळी भागाची शान, गावोगावच्या देवाचा माण. कधी काळी सांगोला सोन्याचं आणि मंगळवेढा दाण्याचं म्हटलं जायचं. खिलार गायी असो की माडग्याळी जातीची मेंढी, जोंधळा म्हटलं पशुधनाची ठेवण आणि पांढऱ्या शुभ्र चांदण्याची झालर, शब्दात सांगायची झाल्यास ना.धो. महानोरं यांनी म्हणून ठेवलंय, “या नभा ने या भुईला दान द्यावे,अन या मातीतून चैतन्य गावे, अशी कोणती पुण्य येती फळाला, की जोंधळ्याला चांदणे लगडून जावे”.
सुगीच्या काळात कुणबी जोंधळ्याची मळणी खळ्यावर करायचा, सात आसरा मावल्या, म्हसोबा, ताई आई, लक्ष्मी, या देवदेवतांच्या पूजा अर्चा शेतात व्हायच्या, ग्रामदेवाला गाभाऱ्यात जोंधळयाच कणीस मानान बांधायचा. मग हे गावच्या काळी आई म्हणजे पिकावू शिवारातील सोनं खळ्यावर राशीच्या रुपात मांडलं जायचं.
वर्षभर बैत्यावर काम करणारे बलुतेदार खळ्यावर जमा व्हायचे. त्या शेतकऱ्याचं उत्पन्न बघून बलुतेदार बैतं मागायचे. कमी उत्पन्न असलेल्या नडलेल्या शेतकऱ्यांकडून कमी बैत घेतलं जायचं. जोंधळयाचा पाचुंदा म्हणजे पाच पेंढ्या हक्कानं घेऊन बलुतेदार दुसऱ्या शेतकऱ्याचं शिवार गाटायचे. मेंडक्याच्या मेंढ्या जोंधळयाच्या भोवती फिरायच्या. बारा बलुतेदार जोंधळया च्या उत्पन्नावर जगायचे.
गावाला गावपण जोंधळयाच्या राशीवर यायचं. मग गावातल्या जत्रेला रंगत भरायची. जोंधळा जेवढा निकोप, पांढरा शुभ्र, तेवढं सात्विक अन्न गाव पंढरीला मिळायचं. जोंधळयाची भाकरी आणि आंबाड्याची भाजी याची आठवण जर आली तर… परिपूर्ण खेड्याची, जोंधळा पिकवणाऱ्या माणदेशाची आठवण मनात घर करून राहते…